शस्त्र घेऊन गुंडागिरीचा सामना करायला सांगणारे गांधीजी माहीत आहेत?

२६ मे २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाबद्दल लोकांमधे असेच गैरसमज पसरवण्यात आलेत. एका गालावर चापट मारली की दुसरा पुढं करा, हा एक असाच गैरसमज आहे. कारण भित्र्यासारखं पळून जाण्यापेक्षा शस्त्र हातात घेऊन गुंडगिरीचा सामना करणं कधीही चांगली गोष्ट आहे, असं सांगणारे गांधीजी आपल्याला माहीत नाहीत. पुण्यातल्या एका व्याख्यानात माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे गांधीजींच्या अहिंसेबद्दल सविस्तर बोलले.

कार्यक्रमः वसंत व्याख्यानमाला 

वक्तेः माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ लेखक नरेंद्र चपळगावकर

विषयः गांधीजी आज का आठवतात? 

दिनांकः १७ मे २०१८, सायंकाळी साडेसहा 

ठिकाणः टिळक स्मारक मंदिर, पुणे

काय म्हणालेः गांधींनी प्रत्येक प्रश्नाचा नव्याने विचार करून उत्तर शोधलं

 

१. गांधीवादाचं अस्तित्व नाकारलं

एखादं तत्वज्ञान माणूस आत्मसात करतो आणि त्या तत्वज्ञानानुसार प्रश्न सोडवायला निघतो. गांधींनी असं तत्वज्ञान नाकारलं. गांधीवाद नावाचं कोणतंही तत्वज्ञान अस्तिवात नसल्याचं सांगितलं. आणि एका सत्याकडून दुसऱ्या सत्याकडे जाण्याचा मार्ग गांधीजींनी स्वीकारला. या मार्गानुसार गांधीजींनी प्रत्येक प्रश्नाचं नव्याने विचार करून उत्तर शोधलं. गांधी हा काळानुसार बदलत जाणारा माणूस होता.

गल्लीतली पोरं ज्या भाषेमध्ये भांडण करतात त्या भाषेत आजचं राजकारण चालू आहे. स्वायत्त संस्थांचा सरकारवर वचक पाहिजे, असं गांधीजींचं मत होतं. आज अशा स्वायत्त संस्थांचा प्रभाव हळुहळू कमी होऊ लागलाय.

राम मंदिरासारखे काही प्रश्न सामंजस्याशिवाय सुटणार नाहीत हे सगळ्यांना माहीत आहे. पण त्यातसुद्धा द्वेषभावना भडकावून लोकभावनाचा आधार घ्यावा, असं राजकारण्यांना वाटत. अशा आजच्या काळात सहकार्य, चर्चा, प्रेम अशा मार्गावर विश्वास असणारे गांधी सतत आठवत राहतात.

हेही वाचाः गांधीजींचा राम समजून घ्यावाच लागेल

२. सत्य सांगण्याचं धैर्य

आयुष्याच्या उत्तरार्धात गांधींनी ब्रह्मचर्याचे प्रयोग केले. आपण हे सगळं कबूल केलं आणि लिहिलं तर चघळण्यासाठी लोकांना हाच विषय मिळेल. आणि ते आपल्या कामाकडे दुर्लक्ष करतील हे गांधी चांगलं माहीत होतं. असं असूनही लोकांना सत्य सांगण्याचं धैर्य गांधींनी दाखवलं.

सेंट पीटर्सबर्ग स्टेशनवर रेल्वेच्या डब्यातून हाकलून देण्यात आलं ते गांधी, त्या ठिकाणी कडक थंडीमध्ये एका बाकड्यावर बसून आपण या ठिकाणाहुन परत जावं की या सगळ्या परिस्थितीचा सामना करावा असा विचार करून अन्यायाविरुद्ध लढा उभारणारे गांधी, राजकारण हे भ्रष्ट असतं आणि जो कोणी याला स्पर्श करेल तोही भ्रष्ट होईल असा समज दृढ होत चाललेल्या काळात हे राजकारण शुद्ध करणं हे आपलं पहिलं काम आहे, हे राजकारण शुद्ध झालं तरच समाज सुधारेल याची जाणीव असणारे गांधी, आपल्या शत्रूंचा आदर करणारे आणि व्यक्तिगतरित्या अवमान न करणारे गांधी, हिंसेचा प्रतिकार हिंसेने केल्यास प्रश्न सुटत नाही उलट द्वेष वाढतो याची जाण असलेले गांधी. गांधीजी अशा विविध रुपात पुनःपुन्हा आठवत राहतात.

३. दुसरा गाल पुढं करणं ही अहिंसा?

आपल्या देशात अफवा पसरवणं हा फार धंदा जुना आहे. मी शाळेत असताना गुरुजी शिकवायचे, अहिंसा म्हणजे काय?  एका गालात मारल्यावर दुसरा गाल पुढं करणं. गांधींना समजावून न घेता त्यांच्याविषयी अफवा पसरवल्या जातात. हिंसा नसणं हा गांधीजींच्या अहिंसेचा अभावात्मक गुण आहे. 

गांधीजींवर एकदा एका पठाणाने प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेचा संदर्भ देऊन गांधीजींच्या मुलाने त्यांना विचारलं की मी तुमच्या ठिकाणी असतो तर काय करायला पाहिजे होतं? तुमच्या अहिंसेनुसार शांतपणे त्याची समजूत काढायला पाहिजे होती का? गांधींनी मुलाला उत्तर दिलं, ‘तू अशावेळी मिळेल त्या शस्त्राचा वापर करून, मिळेल त्या ताकदीने त्या हिंसेचा प्रतिकार करून माझा जीव वाचवायला हवा, हीच खरी अहिंसा आहे.’

हेही वाचाः गांधीजींना तुकोबा भेटले होते

४. अहिंसेचा अर्थ आणि मर्यादा

हैदराबाद मुक्तीचा लढा अहिंसेच्या मार्गाने सुरू होता. परंतु या लढ्यात रझाकारांचे अत्याचार खूप वाढले. त्यामुळे हिंदू लोकांचं मनोबल खचलं. अशावेळी हैद्राबाद सीमेवर मिळेल त्या शस्त्राचा वापर करून प्रतिकार शिबिरं उभारण्यात आली. रझाकारांच्या अत्याचाराला सडेतोड उत्तर देण्यात आलं. या लढ्याचे साक्षीदार गोविंदभाई श्रॉफ आणि स्वामी दयानंद सरस्वती हे गांधीजींना भेटले तेव्हा त्यांना म्हणाले की बापू आम्ही तुमच्या अहिंसा तत्वज्ञानाविरुद्ध वागलो.

आता गांधीजी आपल्यावर चिडतील असं त्यांना वाटलं. पण गांधीजी म्हणाले भित्र्यासारखं पळून जाण्यापेक्षा शस्त्र हातात घेऊन तुम्ही गुंडगिरीचा सामना केला ही चांगली गोष्ट आहे. गांधीजी हे अहिंसेचा अर्थ आणि अहिंसेच्या मर्यादा जाणणारे होते.

५. सैन्याशिवायचा देश हवा होता?

गांधींनी कधीही राष्ट्र हे सैन्याशिवाय असलं पाहिजे असं म्हटलं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की एक आदर्श जग असं निर्माण झालं पाहिजे की ज्या ठिकाणी शस्त्राच्या मदतीने प्रश्न सोडवले जाणार नाहीत. तिथे चर्चा, मतांची देवाणघेवाण, परस्पर सामंजस्य या मार्गाने प्रश्न सोडवले जातील. पण असा काळ येत नाही तोपर्यंत सैन्य असायला पाहिजे ही गांधीजींची भूमिका होती

गांधींच्या चूका आपण निर्भयपणे दाखवू शकतो. पण सर्वच पुढाऱ्यांच्या चुका आपण निर्भयपणे दाखवू शकत नाही. 

एकमेकांच्या सहकार्याने आपण या जगात राहणार आहोत. या वास्तवाचं भान सध्याच्या जगात सुटत चाललंय. निःशस्त्रपणे संघटीतरित्या आत्मबळ दाखवलं तर शस्त्रधारी लोकही शरण येतात याची ज्योत गांधींनी लावली. गांधी काय पुन्हा पुन्हा जन्माला येत नसतात. आपल्यातल्या लहान माणसांना गांधी व्हावं लागतं.

हेही वाचाः 

साध्वी प्रज्ञा ठाकूर खरंच साधू की फक्त दिखावा?

यूपीत महागठबंधनचं राजकारण फेल गेलं, त्याची दोन कारणं

अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?

नथुरामायणः गांधीजी ज्या देशाचे रहिवाशी होते, तो देश नथुरामचा नव्हता