इंटरनेटमुळे आपली लाईफस्टाईल झपाट्याने बदलतेय. पण या बदलामुळे आपण गांगरून गेलोय. आपापल्या क्षेत्रातले जाणकार इंटरनेटचा वापर मर्यादित करण्याबद्दल सांगताहेत. मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवण्यास सांगताहेत. अशावेळी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. बालसिंग राजपूत मात्र खूप वेगळा विचार मांडताहेत. त्यांच्या भाषणाचा हा मुद्देसुद रिपोर्ट.
कार्यक्रमः मराठी सोशल मीडिया संमेलन
ठिकाणः यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट, मुंबई
वेळः १७ नोव्हेंबर
वक्तेः डॉ. बालसिंग राजपूत, पोलिस अधीक्षक, सायबर, महाराष्ट्र पोलिस
विषयः सोशल मीडियामुळे होत असलेले परिणाम
काय म्हणालेः सोशल मीडिया हाताळण्यासंबंधीची निरीक्षणं
गीतेतल्या अठराव्या अध्यायामधे लिहिलंय, बदल हा जीवनाचा नियम आहे. पण आपण हा बदल सहजासहजी स्वीकारत नाही. आपण आपल्या कम्फर्ट झोनमधे जगतो. आगीचा शोध लागला तसं आपला कम्फर्ट झोन बदलला. चाकाचा शोध लागल्यावर पुन्हा कम्फर्ट झोन बदलला. दळणवळणाची सोय आल्यावर परत एकदा झोन बदलला. डिजिटल दळणवळणाचा शोध लागल्यावर तर आपल्या कम्पर्ट झोन खूप उलथापालख झाली.
हे सगळे बदल चुकीचे आहेत का? तर असं काही नाही. कारण आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन विचारच करत नाही. आपण फक्त होय किंवा नाही या दोन गोष्टींवर लक्ष देतो. यातला जो नाही प्रकार आहे, तो टक्केवारीत एखादं टक्क्यावरच आहे. पण आपण त्याच्यावरच लक्ष देतो. बदलामधे जास्त धोके आहेत, हे खरंय. पण आपण बदलाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. होणाऱ्या बदलाची गळाभेट घेता आली पाहिजे.
अभिव्यक्त होणं हा माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे. माणूस उत्क्रांत होत गेला तसं अभिव्यक्त होणं हा माणसाचा मुलभूत अधिकार झाला. डोळे, तोंड आणि कान हे अवयव आपल्या अभिव्यक्तीमधे महत्त्वाचे मीडियम आहेत. सोशल मीडियाने या तिन्हींना नवं स्वातंत्र्य मिळवून दिलं. यातलं निगेटिव बाजूला सारणं ही आपली सगळ्यांची सामुहिक जबाबदारी आहे.
सोशल मीडिया म्हणजे कलेक्टिव रिस्पॉन्सिबल बिहेविअर आहे. इथे आपलं जगणं, कल्चर आलं पाहिजे. आपण आपलं कल्चर इथे न मांडता फक्त निगेटिव गोष्टींवर भर देत राहिलो, तर सोशल मीडियामुळे ज्या ९९ टक्के सकारात्मक गोष्टी घडताहेत, त्याकडे कानाडोळा केल्यासारखं होईल. आणि आपण असं किती काळ वागणार आहोत?
हेही वाचाः अमिताभप्रमाणे आपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून
काम नाही म्हणून हा सोशल मीडियावर भटकतोय, असं अनेकांना वाटतं. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्यूब यासारख्या कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही एकदा फेरफटका मारा. तेव्हा एक गोष्ट ध्यानात येईल. ज्यांच्या सुप्त कलागुणांचं कधीकुणी कौतुकच केलं नाही त्यांना इथे दहा दहा लाख व्ह्यूज आहेत. त्याच्या क्रिएटिविटिला लोक सलाम ठोकताहेत.
ज्यांच्या क्रिएटिविटिचं कधी सेलिब्रेशन झालं नाही, कौतुक झालं नाही, स्टेज मिळालं नाही, अशा व्यक्तींना सोशल मीडियाने नवं जग दिलंय. त्याच्या क्रिएटिविटिला इथे वाव मिळाला. क्रिएटिविटिलाही चौकटीत बांधून ठेवलं पाहिजे, या प्रस्थापितांच्या विचाराला सोशल मीडियाने धक्का दिला. यालाच विनोद म्हटलं पाहिजे, हीच क्रिएटिविटि आहे अशा चौकटींना सोशल मीडियाने मोडून टाकलं. या सगळ्या मोठ्या बदलांचं आपण स्वागत करणार की त्याला नावं ठेवणार?
इंटरनेटमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता व्यक्त केल्या जातात. इंटरनेटमुळे फार विषमता वाढलीय, वाईटपणा खूप वाढतोय, समाजाला धोका निर्माण झालाय, असं सांगितलं जातं. पण असं काही नाही. एक उदाहरण बघा. लोकशाहीच्या, लोकांच्या वाढीचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असतं, ते म्हणजे डिसेंट आणि सगळ्यांना एकाच मंचावर बोलण्याची संधी देणं. मत, मतांतरं मांडणं हे लोकशाहीचं महत्त्वाचं लक्षण आहे. रांगेतल्या शेवटच्या माणसाला आपलं मत मांडता आलं पाहिजे. आपला देश, संस्कृती, समाज, राजकीय पद्धत हे लोकशाहीवादी आहेत. आपल्या या लोकशाहीवादी जीवनशैलीला हे मीडियम मदत करतं. याचं आपण कौतुक केलं पाहिजे.
आपल्या सामुहिक जगण्याच्या कल्चरला पुढे नेणारं हे नवं माध्यम आहे. या नव्या माध्यमाचा स्वीकार करण्याऐवजी आपण फक्त दोष शोधत बसणं बरं नाही. हे दोष दुरुस्त करण्यावर आपण आपली क्रिएटिविटि चालवली पाहिजे. तो दोष कसा झाकोळला जाईल, कमी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे करतानाच या नव्या बदलाला आपण अधिक पूरक कसे होऊत याकडे लक्ष दिलं पाहिजे.
समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची संख्या ही एखादं टक्क्याच्या घरात आहे. ९९ टक्के लोक चांगले आहेत. हेच लोक समाज घडवत आहेत. जे काही वाईट घडतंय ते चांगलं करण्यासाठी आपण ९९ टक्के लोक काम करतोय. तसंच सोशल मीडियावरही गैरप्रकार करणाऱ्यांची मतं बदलवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यांची विचारपद्धती सुधारण्याची गरज आहे. त्यांना वाळीत टाकून प्रश्न सुटणार नाही.
चांगल्याला चांगलं साथ देतं, वाईटाला वाईट साथ देतं, असं म्हणतात. समाजातली ९९ माणसं शांत बसली तर संख्येने एखादंदुसरा असलेल्या वाईटांचं फोफावत. ९९ लोकांनी आवाज उठवला तर वाईटांचा आवाज बंद होतो. आपल्याला चांगलं आवडत असेल तर आपण नेटवर चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त पसरवल्या पाहिजेत. आपलं कल्चर, आपली मतं, आपली क्रिएटिविटी, विचार आपण मनमोकळेपणाने मांडलं पाहिजे. त्यातूनच जो बदल निर्माण होईल, तो बदलच जगाला पुढे घेऊन जाईल.
माझा हा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. हा दृष्टिकोन आपण स्वीकारावा असं मला वाटतं. आपण फक्त नकारात्मक गोष्टींकडे बघत राहिलो, तर क्रांती घडू पाहणाऱ्या नव्या माध्यमाला मूकण्याची शक्यता आहे. असं करून नव्या पिढीला या क्रांतीचे लाभ घेण्यापासून आपण दूर लोटतोय.
हेही वाचाः रशियन फेसअॅपवर फोटो एडिट करताय, मग आपण सावध राहिलं पाहिजे
लोकांमधे सोशल मीडियाच्या हाताळणीबद्दल जाणीवजागृती केली पाहिजे. आपल्याला हे काम फक्त सरकार, पोलिस यांच्यापुरतं मर्यादित आहे, असं वाटतं. पण अशाने जाणीवजागृतीच्या या कामाला लोकचळवळीचं स्वरूप येणार नाही.
अनेकांना मोबाईल तंत्रज्ञानाचं अक्षरशः शुन्य नॉलेज आहे. अशावेळी अचानक ५ जीचा मोबाईल हातात पडतो. तेव्हा माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर जसं होतं तशी या नॉलेज शुन्य व्यक्तींबद्दल होऊ शकतं. प्रत्येक माणसाची तंत्रज्ञान हाताळण्याची क्षमता वेगवेगळी असते. अशावेळी सर्वांकडे उच्च पातळीचं तंत्रज्ञान देण्याआधी ते कसं वापरायचं हे सांगितलं पाहिजे. यातून आपल्याला तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळता येईल.
दुसऱ्यांच्या मतांचा, कल्चरचा आदर केला पाहिजे. त्याचवेळी गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्यात मात्र कुठलीच हयगय करायला नको. कायद्यावर, व्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येक देशातले कायदे आपापल्या मुल्यांवर आधारलेले असतात. अचानक परदेशी मुल्यं आपल्यावर आदळतात. त्यामुळे ही मुल्यं घेऊन येणारी टेक्नॉलॉजी हाताळताना आपल्याकडून चुका होतात. कारण अशा पद्धतीची टेक्नॉलॉजीच आपल्याला आतापर्यंत वापरायला मिळालेली नाही. ही टेक्नॉलॉजी माहीत झाल्यावर आपण सगळेच या तंत्रज्ञानाला खूप चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो.
ज्ञानाची कवाडं बंद केल्याने काही होणार नाही. असं केल्याने काही कोंबड आरवायचं थोडंच थांबणार आहे? मुलांची एनर्जी चांगल्या पद्धतीने चॅनलाईज करण्यात आपले पालक फेल जाताहेत. त्यातूनच मुलांना तंत्रज्ञानापासून रोखण्याचा विचार समोर येतोय. प्रत्येक पालकाला वाटतं, की आपल्या मुलाने गुगलचा, अमेझॉनचा सीईओ व्हावा. असं वाटत असतानाच आपल्या मुलाने तंत्रज्ञानापासून दूर राहावं, असंही वाटतं. मग तंत्रज्ञान हाताळण्यापासून दूर ठेवलेलं मुलं सीईओ कसं होणार?
मुलांना तंत्रज्ञान एक्सपोज होऊ द्या. त्यातलं चांगलं, वाईट त्याला समजू द्या. तंत्रज्ञानाच्या हाताळणीबद्दल सगळेच जबाबदारीने वागू या. तुम्ही काय करता, असं एकमेकांना विचारण्याऐवजी आपण सर्वांनी मिळून तंत्रज्ञानाविषयी जनजागृती करू. त्यातूनच नवे आपल्याला मार्ग कळतील.
हेही वाचाः
आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट
सोशल मीडियाच्या फोडणीसाठी अॅक्सिडेंटलचा मसाला