दिनकर साळवे : सांस्कृतिक चळवळीतले सहोदर

०७ मार्च २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


फुले, मार्क्सवादी, आंबेडकरी चळवळीतले सांस्कृतिक कार्यकर्ते दिनकर साळवे यांचं काल सहा मार्चला मुंबईत दीर्घ आजाराने निधन झालं. युगायुगाची गुलामी चाल, आभाळ भरून आलं यासारख्या लोकगीतांसोबतच त्यांनी महाराष्ट्रातल्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीचं सांस्कृतिक विश्लेषण केलं. त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमतत्वाचा वेध घेणारा हा लेख.

ज्यांना ‘जात’ मोडायचीय त्यांनी पहिल्यांदा आपली ‘जात’ सोडली पाहिजे! जातिव्यवस्थाविरोधी लढा म्हणजे ‘स्वजातीय प्रस्थापितांविरुद्ध लढा’! प्रत्येक जातीतल्या विस्थापितांनी आपापल्या जातीतल्या प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष केल्याशिवाय जातिव्यवस्थाविरोधी चळवळ उभी राहणार नाही.

– दिनकर साळवे

दिनकर साळवे आज हयात नाहीत. यावर अजूनही आपला विश्वास बसत नाही. महाराष्ट्राला परिवर्तनाच्या चळवळीची एक समृद्ध परंपरा आहे. या चळवळीचा एक साक्षीदार आणि सक्रीय भागीदार असलेले दिनकर साळवे बुधवारी ६ मार्चला अकाली निघून गेले.

समाजात अनेक कवी, समीक्षक, विचारवंत, लेखक, कार्यकर्ते आणि नेते असतात. परंतु जे कवी आहेत ते चळवळीकडे तुच्छतेने बघतात. समीक्षक चांगली कविता लिहू शकत नाहीत. लेखकांना कार्यकर्ता म्हणून जगता येत नाही. परिणामी त्यांची एकंदरच समज ही कोती बनते. तर जे कार्यकर्ते आहेत त्यांना सांस्कृतिक जग कविता, गाणी, समीक्षा यांचं जग परकं आणि निरुपयोगी वाटतं.

पण दिनकर साळवे यांचं वैशिष्ट्य असं की कवी, गीतकार, समीक्षक, लेखक, विचारवंत, कार्यकर्ते, नेते आणि वक्ते अशा अनेक भूमिकांचा अपूर्व मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्वात होता. त्यांचं आपल्यातून निघून जाणं यातून चळवळीची मोठी हानी झालीय.

सांस्कृतिक कार्यकर्त्याचा पिंड

दिनकर साळवे यांचा खरा पिंड हा सांस्कृतिक कार्यकर्त्याचा होता. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती आणि अशी सांस्कृतिक जगताचा वेध घेणारी मार्क्सवाद, फुले, आंबेडकरवादाच्या बहुप्रवाही अन्वेषणपद्धतीच्या आधारे त्यांनी स्वत: विकसित केलेली टोकदार आणि मर्मग्राही विश्लेषणपद्धती ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचं विशेष असं वैशिष्ट्य होतं. व्यक्तिमत्वाच्या बहुआयामित्वामुळे त्यांच्या ठायी अपवादात्मक अशी परिपक्वता आणि कमालीची एकात्मता दिसून येत असे.

अगदी तरुणपणी दिनकर साळवे हे डाव्या चळवळीच्या संपर्कात आले. १९७० आणि ८० च्या दशकात भारतभरातल्या तरुणांच्या मनात प्रस्थापित व्यवस्थेविरूद्ध मोठा असंतोष खदखदत होता. दिनकर साळवे या असंतोषाचे वाहक बनले. त्यांच्या कार्यकर्तेपणाची सुरवात ही लाल निशाण पक्षाची कोल्हापुरात उमेदवारी करण्यापासून झाली. नंतर पारंपरिक मार्क्सवादाला सोडून ते सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाकडे आकर्षित झाले आणि उर्वरित आयुष्य ते मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादी भूमिकेतून जगले.

काही काळ सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं. धुळे, नंदुरबार भागातल्या आदिवासी समाजात काम करणं आणि पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ या नियतकालिकाच्या मुद्रणात योगदान देणं, अशा स्वरूपाचं ते काम होतं. त्यांच्या या जडणघडणीत रणजित परदेशी यांचा आणि येवला परिसरातल्या चळवळीचं मोठं योगदान होतं.

मौखिक परंपरेचा पाईक

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जगताचं साळवे यांनी किती सुक्ष्मतेत जावून वाचन केलं होतं याची प्रचिती त्यांच्या सानिध्यात जे आले त्यांना वारंवार मिळालेली आहे. दिनकर साळवे हे मुख्यतः मौखिक परंपरेतले होते. शेकडो लेखकांची हजारो पुस्तकं वाचून त्यांनी सांस्कृतिक राजकारणाविषयी स्वतःची अशी अस्सल स्वरूपाची समज विकसित केली होती. लेखनाकडे त्यांचा फार कल नव्हता.

क्रांतिसिंह नाना पाटील अकादमीची स्थापना १९९४-९५च्या आसपास झाली तेव्हा या संस्थेसाठी त्यांनी मुख्यतः पुस्तिकांचं लेखन केलं. हे संपूर्ण लेखन मौलिक स्वरूपाचं असलं तरी महाराष्ट्रातल्या राजकीय चळवळीतले कार्यकर्ते, लेखक, विचारवंत आणि समीक्षक यांच्याकडून त्यांचं लेखन दुर्लक्षित राहिलंय. महाराष्ट्रातले पारंपरिक डावे अभ्यासक आणि पारंपरिक मराठी समीक्षक यांनी सादर केलेल्या विश्लेषणापेक्षा अगदी वेगळं, मूलभूत आणि मर्मग्राही असं विश्लेषण त्यांनी सादर केलं.

केवळ रंजनासाठी तर लांबच, पण केवळ ढोबळ आणि स्वैर अशा पुरोगामी भूमिकेतून लिहिण्याचंही त्यांनी कटाक्षाने टाळलं. असं करण्याऐवजी, भारतातली जातिव्यवस्था, पितृसत्ता आणि भांडवलशाही यांचा संयुक्तपणे वेध घेण्याच्या हेतूने ज्या चळवळी कार्यरत राहिल्या त्या चळवळींचा जैविक बुध्दिजीवी बनणं त्यांनी पसंत केलं.

दलित राजकारणाचा अचूक वेध

त्यांच्या वैचारिक आणि समीक्षात्मक लेखनाची सुरवात ‘चक्रव्यूव्हात दलित चळवळ’ आणि ‘दलित साहित्याची कोंडी’ या पुस्तिका लिहून झाली. या दोन्हीही पुस्तिकांची शीर्षकं ही नकारात्मक होती. एव्हाना स्वान्तसुखाय बनलेल्या दलित मध्यमवर्गाने सादर केलेल्या चळवळीविषयीच्या आत्ममग्न आणि स्वगौरवपूर्ण विश्लेषण टाळून त्यांनी दलित राजकारण आणि दलित साहित्य यांच्यामधे निर्माण झालेल्या अरिष्टाचा सर्वाधिक अचूकपणे वेध घेतला.

‘चक्रव्यूहात दलित चळवळ’ या पुस्तकातलं ‘चक्रव्यूह भेदू : ब्राह्मणी आणि भांडवली भ्रमांना छेदू’ हे सहावं प्रकरण आजही भारतातल्या दलित चळवळीला मार्गदर्शनपर आहे. दलित साहित्य हे अरिष्टात सापडलंय याची जाणीव अनेकांना झालीय. तरीही या अरिष्टाचं नेमकं आकलन हे फारसं कोणाला सादर करता आलं नव्हतं. अलीकडच्या काळात डॉ आनंद तेलतुंबडे आणि डॉ. जयंत लेले यांनी दलित चळवळीचं जे विश्लेषण सादर केलं ते विश्लेषण त्यांच्यापूर्वी साळवे यांनी सादर केलं होतं, असं आवर्जून सांगावंसं वाटतं.

‘दलित साहित्याची कोंडी’ या पुस्तिकेने या अरिष्टाचं नेमक्या शब्दांत आकलन सादर केलं. या पाठोपाठ दिनकर साळवे यांचे ‘तीन शाहिर : एक तुलना’ ही पुस्तिका प्रसिध्द झाली. या पुस्तिकेत समाजवादी वसंत बापट, आंबेडकरवादी वामन दादा कर्डक आणि मार्क्सवादी अण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरी वाङ्मयाचा आणि लेखनप्रेरणांचा तौलनिक अभ्यास सादर केला. तौलनिक साहित्यअभ्यासाच्या क्षेत्रात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता. या अभ्यासात २० व्या शतकातल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक वेध घेतला.

संत वाङ्मय हे दिनकर साळवे यांच्या अभ्यासाचं विशेष असं क्षेत्र होतं. या विषयावर त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेलं नसलं तरी ठिकठिकाणी त्यांनी सादर केलेली याविषयावरची मतं ही संत वाङ्मयावर भारंभार ग्रंथ लिहिणाऱ्या तथाकथित प्रथितयश अभ्यासकांपेक्षा निश्चितच वेगळी आणि अधिक उद्बोधक अशी होती. संत वाङ्मयाचा अचिकित्सक गौरवाने पाहणं आणि संताना ‘टाळकुटे’ संबोधून संत वाङ्मयाचं यांत्रिक आकलन सादर करणं, या दोन्ही टोकाच्या भूमिका त्यांनी कटाक्षाने टाळल्या.

मध्ययुगीन संत हे जातिव्यवस्थेचे बळी

मध्ययुगीन संत हे भारतातल्या मध्यवर्ती असलेल्या जातिव्यवस्थेचे बळी होते, हे त्यांचं आकलन ते चक्रधर ते कर्ममेळा यांच्या लेखनातल्या असंख्य दाखले देवून मांडलं. सवर्ण जातीत जन्माला आलेले संत आणि पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीत जन्माला आलेले संत यांच्यात भेदभाव करणारा ईश्वर आणि विठ्ठल हाच खरा गुन्हेगार आहे, अशा आशयाचा कर्ममेळा यांचा अभंग सादर करून मध्ययुगीन भारतातल्या जातिसंघर्षावर ते वाचकांचं आणि श्रोत्यांचं लक्ष आकर्षित करत. या संघर्षाचं सौम्य प्रक्षेपण हे संत वाङ्मयात कसं झालं होतं याचं त्यांनी सादर केलेलं आकलन हे महत्त्वाचं आहे.

संत चक्रधर यांनी महिलांना दीक्षा देवून त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक अधिकारांची प्रस्थापना केल्यामुळे देवगिरीच्या रामदेवराय यादव याच्या प्रधान असलेल्या हेमाद्री पंडिताने चक्रधर स्वामींचा खून केला, असं मांडून दिनकर साळवे मध्ययुगीन भारतात जातपितृसत्तेने तयार केलेल्या तणावाचा वेध घेत असत.

या संत वाङ्मयाचा पार्श्वभूमीवरच मराठी शाहिरीचा उगम झाला आणि त्यातून पुढे चालून सत्यशोधक, आंबेडकरी, समाजवादी, डावी शाहिरी उदयाला आली असं त्यांनी मांडलं. ‘संत नामदेव ते नामदेव ढसाळ’ अशा काळाच्या दीर्घ पटलावर ते त्यांच्या प्रासादीक शैलीत सांस्कृतिक महाराष्ट्र सादर करायचे.

कुठल्याही प्रकारे प्रस्थापितांकडून लाभांकित होण्याची मनिषा न बाळगल्यामुळे पारंपरिक साहित्यिक, तसंच पुरोगामी साहित्यिक यांची चिकित्सा त्यांना निर्भीडपणे करता आली. ग. दि. माडगूळकर यांच्यासारखे पारंपरिक लेखक, तर पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या दिग्गज लेखकांची अग्राह्य प्रतिपादनं ते पुरेशा संदर्भ आणि पुराव्यासह खोडून काढीत.

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमधून साहित्यिक निर्माण होणार नाहीत; तर बालकवींची निसर्गकविता महाराष्ट्रातील शेतकरी ट्रॅक्टरवर बसून गातील!’ अशा आशयाचा एक लेख पु. ल. देशपांडे यांनी १९७४ मधे लिहिला होता. असा ४०-४५ वर्षांपूर्वीचा मासलेवाईक दाखला आणि त्याच काळात ना. धो. महानोर हे रानातल्या कविता घेवून मराठी साहित्याच्या प्रागंणात कसे अवतिर्ण झाले, हे दिनकर साळवेच सांगू शकत असत!

आंबेडकरी शाहिरी जगलेला माणूस

चळवळीशी प्रत्यक्ष संपर्क न ठेवता संशोधन करणारे प्राध्यापक कसं चुकतात, हे डॉ. कृष्णा किरवले यांच्या ‘आंबेडकरी शाहिरीचे अंतरंग’ या पुस्तकातल्या चुका दाखवून दिनकर साळवे यांनी सिध्द केलं. ‘मासळी बोले आपुल्या पिलाला, खेळ बाळा तू खाली तळाला’ या वामन दादा कर्डक यांच्या गाण्याचा तसा चुकीचा अर्थ किरवले आणि त्यांचे मार्गदर्शक गंगाधर पानतावणे यांनी काढला होता. हे आंबेडकरी शाहिरी प्रत्यक्ष जगलेले साळवेच दाखवू शकले.

दिनकर साळवे यांच्या वक्तृत्वाने अनेकांचे डोळे दिपून जात. एकदा अहमदनगर शहरात त्यांचं व्याख्यान होतं. व्याख्यानानंतर शहरातल्या एका कॉलेजच्या मराठीच्या विभागप्रमुख मला विचारत्या झाल्या, ‘कोणत्या कॉलेजत शिकवतात साळवे सर?’ मी म्हणालो, ‘ते प्राध्यापक नाहीत.’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘प्राध्यापक नसूनही किती अभ्यास आहे त्यांचा!’ मी गमतीने म्हणालो, ‘ते प्राध्यापक नाहीत, म्हणूनच त्यांचा एवढा अभ्यास आहे!’

आपल्या अभ्यासाच्या आत्मविश्वासामुळे ते मोठ्या साहित्यिकांनादेखील प्रश्न विचारत. एकदा कर्णाची व्युत्पत्ती त्यांनी थेट शिवाजी सावंत यांना ऐकवून चकित केलं होतं. विजय तेंडूलकर यांच्या घरी त्यांच्या वाचनाच्या टेबलावर शरद् पाटलांचं ‘अब्राह्मणी साहित्यांचे सौंदर्यशास्त्र’ हे पुस्तकं बघून त्यांनी तेंडुलकरांना त्या पुस्तकाविषयी छेडलं. तेव्हा तेंडूलकर म्हणाले, ‘या वर्षातील हे सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे.’ तेव्हा ही संधी घेऊन साळवे चटकन म्हणाले, ‘हे कुठेतरी लिहून नोंदवा ना, सर!’ पण, मराठी साहित्यिकांमधे एवढं औदार्य कुठंय? तेंडुलकरांनी ते मत कुठं नोंदवलं नाही, याची सल साळवे यांच्या मनात शेवटपर्यंत होती.

एसटीतल्या प्रवासात लिहिलं अजरामर लोकगीत

दिनकर साळवे यांनी विपुल कवितालेखन केलं. तरीही कवितासंग्रह प्रकाशित करण्याकडे त्यांचा फारसा कल नव्हता. चळवळीची गरज म्हणून त्यांनी समीक्षालेखन आणि वैचारिक गद्यलेखन करणं स्वीकारलं. कविता प्रकाशित करण्यापेक्षा गद्य प्रकाशित करण्याला प्राधान्य दिलं.

आता लोकगीत बनलेले ‘युगायुगाची गुलामी चालं’ हे गाणं त्यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या महिला आघाडीच्या मोर्चाला राज्य परिवहन महामंडळाच्या बसने जात असताना प्रवासात लिहिलं होतं. त्यांच्या अनेक कविता प्रकाशित स्वरूपात विखुरलेल्या आहेत आणि अनेक कविता अप्रकाशित असण्याची शक्यता आहे. याचा नीट शोध घेणं, हे आपलं पुढच्या काळातलं काम असायला हवं.

कॉ. शरद् पाटील यांचं चरित्र लिहिणं ही दिनकर साळवे यांची मनस्वी इच्छा होती. पाटलांचं सर्वाधिक विश्वासार्ह असं चरित्र तेच लिहू शकले असते. पण ही इच्छा पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. कदाचित हे चरित्रलेखन आता होणारदेखील नाही!

मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद या विचारप्रवाहाच्या प्रभावात जी ज्ञानमीमांसा पुढे आली तिची नोंद भाषिक काठिण्याच्या सबबीखाली घेण्याचं अनेकांनी टाळलं. मात्र, दिनकर साळवे यांनी ओघवत्या भाषाशैलीतून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारणाचा वेध घेतला. त्यांच्या या लाघवी शैलीमुळे ते चळवळीतल्या शिबिरांमधले आवडते वक्ते होते.

नव्या व्यवस्थेची मज पृथ्वी हवी आहे

शेवटच्या आजारपणात ते घरातच अर्धबेशुद्धावस्थेत गेले. तेव्हा सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चा आणि आंदोलनाविषयी ते पुटपुटत होते. एखादा कलावंत आंतरिकरित्या आपल्या राजकीय ध्येयवादाशी किती तादात्म्य पावलेला असतो, हे त्यातून दिसून आलं.

आजकाल समाजाविषयी कृतक आकलन आणि बोलघेवडी निष्ठा बाळगणाऱ्या छछोर  साहित्यिकांची चलती असण्याच्या काळात आणि एकंदरच राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांत अभूतपूर्व पतन अनुभवायला येत असतानाच्या काळात दिनकर साळवे यांचा मृत्यू अधिकच क्लेशदायक आहे. त्यांच्या जाण्याने जी हानी झालीय ती भरून काढण्यासाठी आपल्याला बरीच तयारी करावी लागणार आहे. त्यांच्या शेवटच्या लेखांपैकी एका लेखात त्यांनी व्यक्त केलेलं हे मत आपल्याला नेहमीच प्रेरणादायी ठरेल, असं वाटतं,

जातिव्यवस्थेचे सर्वात मोठे बळी दलित आणि आदिवासी आहेत आणि तेच या लढाईचे बिन्नीचे सैनिक असतील. सांस्कृतिक आघाडीवर शब्दांच्या बॉम्बगोळ्यांचा मारा करण्यासाठी त्यांच्या साहित्यिकांनी इथले जातीय, वर्गीय वास्तवाची प्रतिसृष्टी आपल्या कृतीतून साकारली पाहिजे. कारण, शब्द हे बंदुकीच्या गोळीसारखे असतात. अशा निर्मितीचे प्रयत्न आजवर झाले नाहीत असे नाही. पण ते कमजोर राहिलेले आहेत. म्हणून, उद्याच्या सांस्कृतिक संघर्षाची माझ्यासारखा छोटा कवी वाट पाहतो आहे:

दलितांचा कवी मी श्रमिकांचा रवी आहे।

नव्या व्यवस्थेची मज पृथ्वी हवी आहे॥

 

(लेखक हे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)