संकरव्यवस्थेची सर्वंकष अशी नवी दिशा दाखवणारी कथा

३० डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


प्रणव सखदेव यांनी 'दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट’ या कथासंग्रहात एक नवी संकरव्यवस्था मांडताना प्रत्येक कथेत धोका पत्करलाय. एका नव्या जगाच्या शोधात त्यांची कथा प्रवास करते. कथेच्या नायकाचं नाव म्हणजे वैश्विक संस्कृतीचं चिन्ह म्हणता येईल. संकरच सगळे भेदाभेद मिटवतो. ही संकरव्यवस्था नेमकी काय आहे हे सांगणारी या कथासंग्रहावरची ज्येष्ठ लेखक रवींद्र लाखे यांची फेसबुक पोस्ट.

प्रणव सखदेवचा पहिला कथासंग्रह मी वाचला होता. त्यात सगळं होतं पण मला तो वाचण्यासारखा वाटला नव्हता. नंतर त्याची ९६ मेट्रोमॉल ही कादंबरी वाचली. ही मात्र अफलातून कादंबरी आहे. ऑल्विन टॉफलरच्या फ्युचर शॉकसारखी. आता त्याचा नवा कथासंग्रह ‘दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट’ वाचला. या कथासंग्रहाने मला मानवी जीवनाच्या आशयाचे नवे पैलू दाखवले. प्रणवने प्रत्येक कथेसाठी निवडलेला परिसर किंवा टापू हा वाचकाला नवा आहे. एक नवी संकरव्यवस्था मांडताना प्रणवने प्रत्येक कथेत धोका पत्करलाय. एका नव्या जगाच्या शोधात त्याची कथा प्रवास करते.

हेही वाचा: बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

व्यवस्थेचा भेद नाकारणारी कथा

लेखकाला स्वर्ग-नरक अशी एकमेकांच्या विरुद्ध असलेली व्यवस्था मोडून काढायचीय. त्यासाठी अशा एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या व्यवस्थांच्या दरम्यान एक गुपित रस्ता असतोच. तो रस्ता म्हणजे त्या दोन व्यवस्थांचा एक संकरच असतो. हास्यास्पद वाटणारं वास्तव अधिक हास्यास्पद करून एखादं अद्भुत जग सापडतं का ते पाहायचं म्हणून हा संकर असतो. या व्यवस्था मेल्यानंतरच आहेत असं नाही. जिवंतपणीही आहेत.

एलेक्स नावाचा कुत्रा स्वप्नात येतो. त्याच्या खुनाबद्दल सांगतो. त्या खुनाचा शोध रहस्यकथेच्या अंगानं घेताना माणसाचं अतिशय गुंतागुंतीचं मन आपल्यासमोर निमकर काकूंच्या एकूण जगण्यातून उभं राहातं. पण एलेक्स या कुत्र्याचा खून ही कल्पनाच प्राणीविश्वाला मानवाच्या पातळीवर आणून ठेवणारी आहे.

इथेही प्राणी आणि माणूस हा भेद लेखकाने कसा घालवलाय तर एका प्राण्याचं मरण त्याने माणसाने तयार केलेल्या एका व्यवस्थेत पाहिलंय. निमकर काकूंच्या अखेरच्या निवेदनात त्या म्हणतात, ‘आपण एकाचा जीव घेतला तर आपणही आपला जीव घेतला पाहिजे.’ हा न्याय वरच्या कोटीतला आहे.

अच्चीत गच्ची गच्चीत टाकी

भोग ही गोष्ट कधीच पूर्ण समाधान देऊ शकत नाही. पण रोहनला जास्तीत जास्त स्त्रियांना भोगून सर्व स्त्रीजातीवर सूड उगवायचाय. ‘एखाद्या स्त्रीला नको असलं तरी मी द्यायला तयार होतो ना, तिनं ते घ्यायला हवं. तिनं घेतलं नाही. मग मला घ्यावं लागलं - याला बलात्कार नाही म्हणता येणार.’ लैंगिक संबंधात योग्य न्याय होऊच शकत नाही असं लेखक म्हणतोय.

असंही म्हणता येईल की नात्यांमधे कुणा एकावर अन्याय होतोच. जशास तसं वागायची माणसाला सवय आहे. याला न्याय म्हणता येणार नाही. हे सभ्य आहे? ही तर रानटी, बार्बरियन पद्धत झाली. पण खरंच आपण सुसंस्कृत समाज आहोत का, ज्याच्याकडून योग्य न्यायाची अपेक्षा करता येईल?

‘अच्चीत गच्ची गच्चीत टाकी’ ही एक उत्तम कथा आहे. या कथेची रचना मोण्टाज पद्धतीची आहे असं म्हणता येईल. साधं बोलायचं झालं तर सिनेमॅटिक आहे. ही पद्धत कथेचा आशय अधिक व्यापक करते. रोहनसारखी माणसं जगात असतीलही. प्रत्यक्ष कृती करीत नसले तरी मनात रोहनासारखीच सगळ्या बायका भोगण्याची इच्छा असलेले. या कथेतलं दादाताई हे पात्र अफलातून आहे.

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

खचणारे बहर माथी घेऊन

एखाद्याच्या, विशेषत: तरूण मुलाच्या आत्महत्येवर ‘काय गरज होती त्याला आत्महत्या करायची? मूर्खच आहे’ अशी प्रतिक्रिया देणारे ९९ टक्के लोक या समाजात आहेत. या लोकांना मानसिक आरोग्य म्हणजे काय कळलेलं नसतं. अशा असंवेदनशील समाजात घडणारी आत्महत्या हा एक खून असतो. प्रत्येकाचं मन कमी जास्त संवेदनशील असतं. या कथेतला मानस हा आलोक आणि जान्हवी यांचा तरूण मुलगा इतकाच हळवा आहे.

कथेतलं आलोकच्या तोंडी असलेलं उद्वेगपूर्ण वाक्य लेखकाच्या संवेदनशीलतेची साक्ष देतं. या देशात कोडगेच जन्माला यायला हवेत, नाही का? सक्षम बळकट मनांना अशी हळवी अतिसंवेदनशील मनं कळायला हवीत. त्यांच्या मनाशी एकतानता साधून मनांचा असा व्यापक संकर साधायला हवा. या संग्रहातली ’खचणारे बहर माथी घेऊन’ ही कथा वाचताना माझ्याच मनातले विचार या गोष्टीत आलेले आहेत असं तीव्रपणे जाणवलं.

‘गर्भगळीत’ करणारी श्रद्धा-अंधश्रद्धा

डॉक्टर म्हणतात, ‘ग्रहणाचा गर्भावर परिणाम होतो की नाही माहित नाही. मेडिकल सायन्सला आत्ता कुठे माणसाच्या शरीराचा इतकुसा भाग समजू लागला आहे. तुम्हाला झालेल्या ब्लिडिंगला आम्ही थ्रेटेन्ड मिसकॅरेज असं म्हणतो.’ पुढं त्या नास्तिक वेदाला म्हणतात, ‘सॉरी मला तुम्हा कोणाच्याही श्रद्धा दुखवायच्या नाहीयेत. बट आय डोन्ट नो व्हाय थिस अकर्ड.’ नास्तिक असलेल्या वेदाला डॉक्टरांचं हे वाक्य ऐकून गरगरल्यासारखं झालं.

तिच्या मनात आलं की ‘मेडिकल सायन्स ही देखील एक श्रद्धाच’. यातल्या वेदाच्या मनातल्या शेवटी ‘तीही एक श्रद्धाच?’ या वाक्याचा अर्थ नास्तिक असणं ही एक श्रद्धाच असाही लागू शकतो. शेवटी तिला नास्तिक आणि आस्तिक या दोन व्यवस्थांचा संकर करणारा मधला मार्ग एका उजेडाच्या तिरीपीत दिसतो. हा मार्ग आपल्या गर्भापर्यंत पोचतोय असाही तिला अनुभव येतो. ती गर्भाप्रमाणेच अथांग पोकळीत अधांतरी तरंगत राहते.

हेही वाचा: माणसाच्या उत्पत्तीची सोपी गोष्ट सांगणारं ‘ओरिजिन्स’!

पत्रकार बियासचा लढा

निसर्गाचाच एक भाग असलेला माणूस आज आधुनिकीकरणाची कास धरून निसर्गाच्या विरुद्ध उभा आहे. तो आपण लावत असलेल्या नवनवीन शोधांच्या एवढ्या नशेत आहे की त्याला कळतच नाहीय की आपण निसर्गाचा ऱ्हास करतोय. माणूस आणि निसर्ग या एकमेकांच्या विरूद्ध असलेल्या दोन व्यवस्था झाल्या. इथं या व्यवस्थांच्यामधेही एक गुपित रस्ता आहे. तो हा की निदान कमीत कमी प्रत्येक नदी वाचवणं.

या कथेच्या निवेदिकेचं नाव आहे एका नदीचं. बियास. तिचे आईवडील दोघेही पर्यावरण रक्षणासाठी काम करणारे. बियास नदी आधुनिकीकरणाच्या अतिरेकापायी प्रदूषित झाली होती. तिच्या आईवडलांनी बियास नदीसाठी ’बियास बचाव’ हे आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनातच जन्म झाला मुलीचा म्हणून तिचं नाव ’बियास’ ठेवलं.

बियास ही पत्रकार आहे. यांत्रिकी या कंपनीचा रोबोट जिवंत होतो आणि आपल्या मालकाचा खून करतो. ही बातमी ती तिच्या लीडन्यूज या न्यूज पेपरमधे आणते आणि आधुनिक लोक खवळून तिच्या विरुद्ध घाणेरडा प्रचार सुरू करतात. तिला यामुळे मानसिक त्रास होतो. त्यावर तिचे वडिल म्हणतात, ‘माणूस हा क्रूर प्राणी आहे. तो वर्षानुवर्ष स्त्रीतत्त्वाला ओरबाडतोय. बाईला, मातीला, नद्यांना, वनसंपत्तीला एकूणच पृथ्वीला. पण हे स्त्रीतत्त्व केव्हाना केव्हा बदला घेतंच माणसाच्या या वागणूकीचा.’

तो तिला मिठी नदी कशी मगरमिठी झाली याची गोष्ट सांगतो. बियास उधाणते आणि ती ठरवते की नद्या वाचवणे किंवा एकूण स्त्रीतत्त्व वाचवणे यासाठी लढायचं. एकूण स्त्रीतत्त्व वाचवणे यात अवघ्या विश्वाच्या कल्याणाचा विचार प्रणवने या कथेतून व्यक्त केला आहे.

दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट

बल्लवाचार्य वेदगुरुजी बादशहा जफरला म्हणतात ‘ बादशहा-ए-हिंद, जैसे कोई चित्रकार चित्र निकालते वक्त, गझलकार गझल लिखते वक्त सिर्फ चित्रकार, या गझलकार होता है वैसेही खाना बनाते वक्त खानसामाभी सिर्फ और सिर्फ खानसामा होता है. कल्पकता और कौशल्य को किसी भी धर्ममे बांधकर रखना गैर है’ अत्यंत खूश होऊन बादशहाने ऐलान केलं की ‘आजसे हमारा नाम गुरुजीको दिया जाए. ‘ या कथासंग्रहाच्या शेवटाच्या म्हणजे ‘दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट’ या कथेतलं हे अवतरण आहे. ही कथा म्हणजे या संग्रहाचे प्राण आहेत.

‘ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’ या पुस्तकात दुर्गाबाई म्हणतात की संस्कृत भाषेत संस्कृती हा शब्द नाहीय. संस्कार हा शब्द आहे. कदाचित संस्कार या शब्दावरून संस्कृती हा शब्द आला असावा. तरी बाईंनी संस्कृती शब्दाचा शोध चालू ठेवला. त्यांना संस्कृत शब्द कोषात ‘संस्कृ’ हा शब्द दिसला. मग त्यांनी त्या शब्दाचा पाली भाषेत शोध घेतला तेंव्हा तिथं ‘संस्कृ’चा अर्थ स्वयंपाक करणे असा दिसला. मग मनुस्मृतीतही ‘संस्कृ’चा अर्थ स्वयंपाक करणे असाच आढळला. असा एक अर्थ यातून निघतो की निरनिराळ्या व्यंजनांचा संस्कार होऊन तयार होतो तो पदार्थ म्हणजे संस्कृती.

एका संस्कृतीतल्या स्वयंपाकात वापरल्या जाणा-या व्यंजनाचा उपयोग आपल्या संस्कृतीतल्या स्वयंपाकात वापरल्यावर जो संकर होतो तो स्वयंपाक अधिक चविष्ट होतो. त्याचीच ही दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट आहे.

मराठीतल्या सर्वोत्कृष्ट कथांमधे मी या कथेचा समावेश करेन. अनेक संस्कृतींचा संकर होत गेला तर तयार होणारी संस्कृती वैश्विक असेल. या कथेच्या नायकाचं नाव असं का? म्हणजे दिमित्री हे नाव कुठून आलं. रियाझ हे नाव कळलं कुठून आलं ते. पण संपूर्ण नाव म्हणजे वैश्विक संस्कृतीचं चिन्ह म्हणता येईल. निरनिराळ्या व्यवस्थांच्या दरम्यान एक गुपित रस्ता असतो तो या अशा विरूद्ध संस्कृतीचा संकर घडवतो. हा संकरच सगळे भेदाभेद मिटवतो. ज्यानं मानव जातीचं कल्याण होणार आहे.

हेही वाचा: 

एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा

कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह

मराठी जगात दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असताना संपेल कशी?