भारताच्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंमधे जागतिक स्तरावर चमकण्याची क्षमता आहे हे यापूर्वी अनेक वेळा सिद्ध झालंय. दीपिका कुमारी ही अशा खेळाडूंपैकीच एक. गेल्या बारा वर्षांमधे दीपिकाने आपल्या कामगिरीच्या जोरावर जागतिक तिरंदाजी क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवलाय.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आंब्याचं झाड दिसले की त्यावरचे आंबे दगडाने पाडण्याचा मोह टाळता येत नाही. आंब्याची झाडं भरपूर असतील तर तुम्हाला अशा कृत्यांपासून सहसा कोणी रोखत नाही. याच छंदातून एखाद्याचं करिअर घडू शकतं, असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिचं करिअर अशाच छंदामधून समृद्ध झालंय.
झारखंडमधल्या एका छोट्या गावात राहणार्या या महिलेने पॅरिस इथं झालेल्या वर्ल्डकप सिरीजमधे सोनेरी हॅट्ट्रिक करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. या यशाने टोकियोला होणार्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतही आपण पदक मिळवू शकतो, असा आत्मविश्वास तिने निर्माण केला आहे.
या स्पर्धेसाठी तिने वैयक्तिक कौशल्य आणि टीम अशा दोन्ही प्रकारात पात्रता निकष पूर्ण केलेत. जागतिक स्तरावर आतापर्यंत एक डझन सुवर्ण पदकांसह तिने जवळजवळ तीन डझन पदकांची लयलूट केलीय. तिसाव्या वर्षीही तिरंदाजीसारख्या खेळात आवश्यक असणारी एकाग्रता, अचूकता, चिकाटी आणि कणखर मनोधैर्य असे सर्व गुण तिच्याकडे आहेत.
यापूर्वी दोन वेळा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत तिला पदकांपासून वंचित राहावं लागलंय. तरीही यंदाची तिची कामगिरी लक्षात घेता पदकांच्या व्यासपीठावर भारताचा तिरंगा ध्वज ती फडकावणारच, अशीच सगळ्यांना खात्री आहे.
हेही वाचा: लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'
अॅथलेटिक, बॉक्सिंग, तिरंदाजी या क्रीडा प्रकारात भारताच्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंमधे जागतिक स्तरावर चमक दाखवण्याची क्षमता आहे हे यापूर्वी अनेक वेळा सिद्ध झालंय. झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, मणिपूर या राज्यांमधून अनेक गुणवान तिरंदाज भारताला मिळालेले आहेत. दीपिका कुमारी अशा खेळाडूंमधूनच पुढे आलीय.
तिचे वडील शिवनारायण महातो हे रिक्षा चालक तर आई गीता ही नर्सिंगचं काम करायची. रांचीपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका छोट्या खेडेगावात तिचं बालपण गेलं. गावाजवळ असलेल्या आंब्याच्या वनात इतर सवंगड्यांच्या बरोबर ती आंबे पाडायला जायची.
तिची चुलत बहीण विद्या कुमारी ही टाटा तिरंदाजी अकादमी प्रशिक्षण घ्यायची. तिच्याकडचा धनुष्य-बाण पाहून आपणही या खेळात प्रावीण्य मिळवावं, असं तिला वाटलं. पण स्पर्धांसाठी आवश्यक असणार्या पहिल्या दर्जाचे धनुष्य-बाण घेणं तिच्या पालकांसाठी खूप खर्चिक होतं. दीपिका ही कमालीची जिद्दी मुलगी होती. तिने बांबूपासून धनुष्य आणि बाण तयार करत सराव सुरू केला.
दीपिकाचा उत्साह पाहून विद्याकुमारीने तिला भरपूर मदत केली. २००५ ला दीपिकाला घरापासून २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका तिरंदाजी अकादमीत प्रवेश मिळाला. घरापासून थोडं लांब असलेल्या या अकादमीत दीपिकाने प्रशिक्षण घेणं हे तिच्या पालकांना काळजीमुळे पटलं नव्हतं. पण त्याकडे दीपिकाने दुर्लक्षच केलं.
इथल्याच प्राथमिक ज्ञानाचा उपयोग करत तिने जिल्हास्तरावर स्पर्धांमधे भरपूर बक्षिसं मिळवली. त्यांची रक्कम साधारणपणे शंभर ते पाचशे रुपये दरम्यान असली तरी तिच्यासाठी ही रक्कम खूप मोठी आणि महत्त्वाची होती. कारण तिच्या खेळासाठी प्रत्येक रुपया महत्त्वाचा होता. ‘संघर्षाविना फळ नाही' असं नेहमी म्हटलं जातं.
तिला अकादमीत प्रवेश मिळाला खरा; पण ‘घी देखा लेकीन बडगा नही देखा’, अशीच तिची अवस्था झाली होती. एक तर ही अकादमी तिच्या घरापासून दोनशे किलोमीटर अंतरावर होती. तिथं अंघोळीची आणि टॉयलेटची व्यवस्था नव्हती. झाडाझुडपांच्या आड जाऊन प्रातर्विधी करायची सोय होती. ही अकादमी म्हणजे जंगलातील एक ठिकाण होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी तेथे जंगली जनावरांचा मुक्त संचार असे.
साहजिकच रात्रीच्या वेळी आपल्या खोलीच्या बाहेर पडू नये असा तिथे दंडकच घालण्यात आला होता. तिरंदाजीत करिअर करायचं हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवत दीपिकाने या सार्या गोष्टी निमूटपणे सहन केल्या. गुलाबाचे फूल घेताना काटे बोचणारच हे तिला पक्कं माहीत होतं. अशा संघर्षातूनच आणि अनेक आव्हानांना सामोरं जात तिच्या करिअरचा पाया रचला गेला.
हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं
तिचं खेळातलं कौशल्य टाटा अकादमीचे प्रशिक्षक धर्मेंद्र तिवारी यांच्या नजरेतून सुटलं नाही. त्यांनी तिला आपल्या अकादमीत प्रवेश दिला. या अकादमीतला प्रवेश दीपिकाच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. तिवारी यांच्या सखोल मार्गदर्शनामुळेच दीपिकाच्या कौशल्याला योग्य दिशा मिळाली. आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आवश्यक असणार्या तांत्रिक बाजूंचं तिला मार्गदर्शन मिळालं.
खेळातले बारकावे आणि नियमावलीबद्दल तिवारी यांनी तिला मार्गदर्शन केलं. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळेच दीपिकाने सतत यशाची चढती कमान ठेवली. २००९ ला जागतिक युवा स्पर्धेत तिने सोनेरी कामगिरी केली. त्यावेळी ती जेमतेम पंधरा वर्षांची होती. गेल्या बारा वर्षांमधे दीपिकाने आपल्या कामगिरीच्या जोरावर जागतिक तिरंदाजी क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. भारताच्या दृष्टीने तिरंदाजीमधलं ते एक हुकमी नाणं ठरलंय.
दीपिकाचा जीवनसाथी अतनू दास अव्वल दर्जाचा तिरंदाज असून त्यानेही आंतरराष्ट्रीय स्तरावर भरपूर पदकं जिंकली आहेत आणि येत्या ऑलिम्पिकसाठीही त्याची निवड झालीय. दीपिका आणि अतनू हे एकमेकांसाठी अतिशय शंभर नंबरी साथीदार आहेत. कोणत्याही खेळात सर्वोत्तम यश मिळवण्यासाठी तुमची देहबोली त्याला अनुकूल असली पाहिजे, असं नेहमी म्हटलं जातं.
दीपिका आणि अतनू यांची देहबोली तिरंदाजीसाठी अतिशय अनुकूल आहे आणि घरातही सतत ते एकमेकांच्या खेळ आणि तंदुरुस्तीबद्दल नेहमीच चर्चा करत असतात. प्रशिक्षकांच्या नजरेत न येणार्या खेळातल्या चुका या दोघांना पटकन लक्षात येतात आणि त्या सोडवणं सोपं जातं. आपण एकमेकांचे जवळचे गुरू असल्याची त्यांची भावना आहे.
मैदानावरच्या चार वर्षांच्या मैत्रीचं रूपांतर त्यांच्या लग्नात झालं आणि त्याचा फायदा त्यांना कोरोनाच्या काळामधे खूप झालाय. या काळात घरातच राहून त्यांना शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती भक्कम करण्याकडे अधिक लक्ष देता आलं. तिरंदाजीत अव्वल यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेली एकाग्रता आणि अचूकता वाढवण्यासाठी पूरक व्यायामावर जास्त भर देता आला.
हेही वाचा: कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी
अनेक खेळाडूंच्या यशस्वी कारकिर्दीत मानसिक तंदुरुस्ती तज्ज्ञांचा महत्त्वाचा वाटा असतो. दीपिका आणि तिचा जोडीदार अतनू या दोघांच्या यशात महाराष्ट्रातल्या मानसिक तंदुरुस्ती तज्ज्ञ जान्हवी भांब्रे हिने महत्त्वाची भूमिका बजावलीय. २०१७ पासून दीपिका आणि २०१८ पासून अतनू यांना तिचं मार्गदर्शन मिळतंय.
वर्ल्डकप सिरीजमधे दीपिकाला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनुभवी खेळाडूबरोबर सामना करण्याची संधी मिळाली होती. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना तिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही मिळवलंय. साहजिकच तिचं मनोधैर्य उंचावलं.
अगोदरच्या ऑलिम्पिक स्पर्धांमधला अनुभव आपल्या गाठीशी असल्यामुळे आता मात्र टोकियोतल्या ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण करण्याचाच तिचा निर्धार आहे. हा निर्धारच तिला ऑलिम्पिक पदकापर्यंत पोचवायला मदत करेल अशी आशा आहे.
दीपिकाने वर्ल्ड चॅम्पियनशीप, वर्ल्डकप सिरीज, आशियाई चॅम्पियनशीप, आशियाई क्रीडा स्पर्धा या स्पर्धांमधे पदकांची लयलूटच केलीय. वर्ल्ड चॅम्पियनशीपमधे दोन रौप्य. वर्ल्डकप सिरीजमधे ९ सुवर्ण, १३ रौप्य, ५ कांस्य. सर्वोत्तम तिरंदाज या किताबासह राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण मिळालंय.
तसंच आशियाई क्रीडा स्पर्धेत एक कांस्य पदक मिळालं. तर आशियाई चॅम्पियनशीपमधे एक सुवर्ण, २ रौप्य, ३ कांस्य पदकं मिळालीत. २०१२ ला अर्जुन पुरस्कार. तर २०१४ ला दीपिकाला एफआयसीसीआयचा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा तर २०१६ ला तिला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलंय.
हेही वाचा:
'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!
दाढी वाढवून गुरुदेव होता येत नाही आणि खादी वापरून महात्मा
एका शिक्षकाला बियरने चीनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं, त्याची गोष्ट
जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं