वेरूळ, दौलताबादला चाललात, मग इथली अंगणवाडी नक्की बघा!

२९ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ७ मिनिटं


वेरूळची लेणी, दौलताबादचा किल्ला आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. इथलं है इतिहासवैभव बघण्यासाठी दरवर्षी जगभरातून पर्यटक येतात. पण आता या परिसरात जाण्याचं आणखी एक निमित्त लोकांनीच तयार केलंय. इथल्या जुन्यापुरान्या अंगणवाड्या बोलायला लागल्यात. पालकांचा नर्सरीकडचा ओढा या अंगणवाड्यांकडे वळलाय. या सगळ्यांमागची ही स्टोरी.

‘पाऊस आला रे आला, धारा झेला रे झेला..’,

‘ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार’,

‘नकोत दु:खे नकोत आसू, सदा मुखावर दिसू दे हासू..’

कधी आवर्जून अंगणवाडी बघायला जा, तिथे हे बोबडे बोल कानी पडतील. तिथलं चित्र म्हणजे, काही पिल्लं घाबरीघुबरी होऊन बसलेली, कोणी रडवेली, कुणी खोडकर, तर कुणी अखंड धिंगाणा घालणारी. शिक्षणाची, खेळाची अक्षरं गिरवण्याचा हा काळ. शाळेत पावलं टाकण्यापूर्वीचं हे शिक्षण पूर्व प्राथमिक शिक्षण. शालेय शिक्षणाची गोडी निर्माण होण्याचा हा काळ आहे. त्यासोबतच मुलांची शारीरिक, बौद्धिक वाढ व्हावी, एकमेकांत मिसळून हळूहळू त्यांचं सामाजिकीकरण व्हावं हा यामागचा हेतू.

अंगणवाड्यांचा हेतू काय होता?

शिक्षणतज्ज्ञ गिजूभाई बधेका (१८८५ ते १९३९) यांनी अशा शाळापूर्व बालशिक्षणाचा पाया रोवला. पुढे अनुताई वाघ, ताराबाई मोडक यांनी या अंगणवाडी प्रणालीवर अधिक संशोधन केलं. केंद्र शासनानं एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून याला व्यापक रूप दिलं. शुन्य ते सहा वर्षांपर्यंतच्या लहानग्यांची देखभाल आणि विकास करणारी ही केंद्रं अंगणात किंवा परसदारात कार्यरत असतात.

खेडोपाडी, वाड्यावस्त्यांवर, शहरातल्या झोपडपट्यांत ही केंद्र कुपोषण, अनारोग्य, मातामृत्यू यांच्या विरोधात लढण्यासाची मोठी जबाबदारी घेऊन उभी आहेत. ही अंगणवाडी केंद्रं केवळ लहान मुलांसोबतच त्यांची आई, किशोरवयीन मुलींसाठीही महत्त्वाची ठरतायंत. खासगी प्री स्कूल एज्युकेशनच्या नावाखाली सुरू झालेली चकचकीत नर्सरी आज गावखेड्यातही आकर्षणाचा विषय ठरतेय. बहुतांश पालकांचा ओढा तिकडंच आहे. पण या नर्सरींचं गणित काही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येताना दिसत नाही. दुसरं म्हणजे अंगणवाड्यांच्या स्थापनेमागे जसा आरोग्यदायी हेतू आहे, तसं काही या नर्सरीच्या बाबतीत होताना दिसत नाही.

सरकार, आपण सगळ्यांनी केलं काय?

बऱ्याच पालकांची अंगणवाडीबद्दलची अनास्था, खुद्द सरकारचंच इतक्या चांगल्या अभियानाकडं झालेलं दुर्लक्ष या सगळ्या बाबींमुळे अंगणवाडी केंद्रांना नुसतंच भात वाटप केंद्राचं स्वरूप आलंय. याच एक बोलकं उदाहरण म्हणजे, पुण्याच्या नवी खडकी येरवडा परिसरातली जनतानगरची अंगणवाडी.

इथल्या अंगणसेविका, कर्मचारी कष्ट घेतात. पण शासनानं चार दशकं उलटून गेली तरी अद्याप या अंगणवाडीला स्वत:चा निवारा दिला नाही. लोकांनीही एकत्र येऊन सामाजिक जबाबदारी म्हणून काही केलं नाही. एका समाजमंदिरात अंगणवाडीचा प्रयोग फेल करण्याचा घाट घालणं सुरू आहे. तिथे कधी कुणाचं लग्नकार्य असलं की मग अंगणवाडीला सुट्टी दिली जाते.

सरकार ‘स्वच्छ भारत’चा नारा देतंय. पण सरकारला अजून प्रत्येक अंगणवाडीत स्वतंत्र टॉयलेटची सोय करणं जमलं नाही. संडास, लघवी आली की इथल्या मुलांना उघड्यावरच जावं लागतं. कर्मचारी, सेविकांच्या मानधनाचा प्रश्न तर अजून सुटला नाही. त्यामुळं त्यांचीपण नाराजी आहे. अशा साऱ्या गर्तेत अंगणवाडी केंद्रं अडकली आहेत. कुपोषण, अनारोग्याच्या विरोधातली आपली लढाई हरण्यातलं हे एक महत्त्वाचं कारण होऊन बसलंय.

आशेचा नवा किरण

ही झाली अंगणवाड्यांची आपल्या सगळ्यांना दिसणारी ठळक बाजू. वाईट बाजू. आणि सगळंच असं काही. पण या सगळ्या परिस्थितीतही आशेचे किरण वाटावेत, असे काही प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहेत. मिशन म्हणून अंगणवाडी चालवणाऱ्या, त्यात नवनवे प्रयोग करणाऱ्या, कितीही संकटं आली तरी माता आणि बालकांच्या आरोग्याच्या कामापासून न हटणाऱ्या प्रयोगशील पर्यवेक्षिका मनीषा कदम यांचं काम उल्लेखनीय, कौतुकास्पद आहे.

मनीषाताईंनी स्वत:ला आपल्या कामात इतकं झोकून दिलंय की यांच्या डोक्यात सतत अंगणवाडी हाच विचार असतो. एका मोठ्या अभियानाला केवळ भात वाटप केंद्राचं आलेलं स्वरूप त्यांनी बदलून टाकलंय. आणि आपल्या अंगणवाड्या स्वच्छ, निरोगी, कुपोषणाच्या विरोधात लढणाऱ्या, माता आणि किशोरवयीन मुलींना आधार वाटणाऱ्या बनवल्या.

एमएसडब्ल्यू अर्थात सामाजिक कार्य विषयात एमए झालेल्या मनीषाताई औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यात अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून कामाला आहेत. नोकरी एके नोकरी असं न करता त्यांनी आपल्या कामात प्रयोगशीलता आणली. त्यांच्या कामाची सुरवात पैठणपासून झाली. तिथून बदली होऊन त्या दौलताबाद विभागात आल्या. दौलताबाद परिसर म्हणजे प्रसिद्ध पर्यटन केंद्र.

कामाला अशी झाली सुरवात

देशविदेशांतले अनेक पर्यटक इथे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. ज्या परिसराच्या पर्यटनाची ख्याती जगभर आहे, तो परिसर बालआरोग्याच्या बाबतीत मात्र मागास होता. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नागरिक, काही अपवाद वगळता अधिकारी इकडे फिरकायचेदेखील नाहीत. याच परिसरात वडगाव कोल्हाटी हे एक गाव. कोल्हाटी समाजाची इथे लोकवस्ती. लोकसंख्या भरपूर पण अंगणवाडी मात्र एकच.

इथल्या बालकांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची, आरोग्याची हेळसांड होत होती. ही परिस्थिती बदलणं केवळ शासकीय अनुदानावर शक्य नव्हतं. मुलांसाठी अंगणवाडीत काही पूरक साधनं खरेदी करायला शासनाकडून वर्षाला एक हजार रूपये दिले जातात. त्यात काहीच होणारं नव्हतं. यात काहीतरी बदल व्हावा. या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. इथल्या बालकांना, मातांना कुपोषणाच्या समस्येपासून दूर ठेवावं. इथल्या लहानग्यांच्या आयुष्याचा पाया भक्कम व्हावा या विचारांनी मनीषाताईंनी काम करायचं ठरवलं.

आपल्या प्रयोगाविषयी त्या सांगतात, ‘वडगाव कोल्हाटी गावात असणाऱ्या अंगणवाडीची अवस्था फार चांगली नव्हती. जूनं बांधकाम होतं. त्याला किमान रंगरंगोटी करून घ्यावी. थोडीफार डागडूजी करून घ्यावी असं ठरवलं. माझ्या कामाची सुरवात मी सकाळी सात साडेसातलाच करायचे. लोकसहभागातून अंगणवाडीत नवनवे प्रयोग राबवण्याविषयी सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, गावकरी यांना सांगितलं. त्यासाठी चार पैसे गोळा करायचा विचार मांडला. बालविकासाचं आणि अंगणवाडीचं महत्त्व समजावून सांगितल्यावर गावकरी हळूहळू तयार व्हायला लागले.’

लोकचळवळीतून उभारली डिजिटल अंगणवाडी

लोकसहभागाबद्दल सुरवातीला साशंक असलेले लोकचं आता आपल्या गावातल्या अंगणवाडीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी खूप सक्रीय झालेत. याविषयी मनीषाताई पुढे म्हणाल्या, ‘सरपंचांच्या मदतीनं आम्हाला रंगकाम करून मिळालं. आजूबाजूला बारा तेरा किलोमीटर परिसरात फिरले. खूप प्रयत्न करून आम्ही २३ हजार रुपयांचा निधी गोळा केला. त्याचा वापरही खूप काटकसरीने केला. मुलांसाठी वेगवेगळ्या पानाफुलांचे चार्ट तयार केले. किचनचीही खूप दूरवस्था झाली होती. ते चांगलं करून घेतलं. मदतनीसला अॅप्रन आणून दिला. मुलांना एकसारखे कपडे आणले. ओळखपत्र तयार केली. त्यांच्यासाठी टिफीन पाण्याच्या बाटल्या आणल्या. हे सगळं मिळालेल्या निधीतून केलं.’

देशातल्या पहिल्या डिजिटल अंगणवाडीविषयी मनीषाताई सांगतात, ‘अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर आमची अंगणवाडी एका मोठ्या व्यावसायिकाने पाहिली. दुर्लक्षित खोलीला आम्ही सुसज्ज, स्वच्छ आणि प्रसन्न अंगणवाडी बनवल्याचं त्यांनी प्रत्यक्ष येऊन बघितलं. त्यानंतर त्यांनी आमच्या अंगणवाडीला आनंदाने टीवी आणि वीसीआर भेट दिला. २००८-०९ साली ही आमची मॉडेल अंगणवाडी तयार झाली. बालकांना, गरोदर मातांना सकस आहार देणारी, मातांचं किशोरवयीन मुलींचं प्रबोधन करणारी, विविध अद्ययावत सुविधा असणारी, जागतिक दर्जाचे निकष पूर्ण करणारी खेडेगावातली ही आमची डिजिटल अंगणवाडी ठरली. देशातली ही पहिली डिजिटल अंगणवाडी.’

वडगाव कोल्हाटीतल्या या यशानंतर मनीषाताईंनी मागे वळून बघितलंच नाही. स्वच्छ आणि सुंदर अंगणवाड्या बनवण्याचा ध्यास घेतला. ज्या अंगणवाड्या एकेकाळी दुर्लक्षित होत्या. लोकांनी, अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती त्या अंगणवाडी बघायला आता अधिकारी, लोकांची गर्दी होऊ लागलीय. २ ऑक्टोबर २०१२ ला तीन अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळालं. ही चळवळ आता लोकचळवळी झालीय.

यश बघण्यासाठी देशभरातून ओघ

याविषयी मनीषा ताई म्हणतात, ‘आमच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर तालुक्यातले, जिल्ह्यांतले आणि आता तर परराज्यांतूनही आमच्या या उपक्रमाचा अभ्यास करण्यासाठी अधिकारी, पर्यवेक्षक येतात. मंत्री, लोकप्रतिनिधी यांनीही या अंगणवाडीला भेट देऊन कौतुक केलं.  मीही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या प्रयोगाबद्दलचं सादरीकरण करते. काही लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या प्रयत्नांमुळे मला ही संधी मिळाली. आमच्या प्रयोगाला मिळालेलं यश बघून राज्यभरात ही लोकचळवळ उभी करण्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका आणि कर्मचारी वर्ग मोठ्या जोमाने कामाला लागलाय. दीड हजारहून अधिक अंगणवाड्या आज आयएसओ मानांकन मिळालंय. त्याची सुरवात आमच्या धडपडीतून झालीय आणि अशी धडपड आता इतरही ठिकाणी व्हायला लागलीय हे बघून समाधान वाटतं.’

मनीषाताईंचा ध्यास हा काही केवळ अंगणवाड्यांना आयएसओ प्रमाणपत्र मिळवून देणं नाही. तर स्वच्छ आणि सुंदर अंगणवाडी बनवणं, माता आणि किशोरवयीन मुलींना आधार वाटणारं केंद्र बनवण्याच्या या कामामधे त्यांनी स्वतःला पार झोकून दिलंय. फुलंब्री तालुक्यात जन्माला येणारं मुलं किमान तीन किलोचं असेल यासाठी प्रयत्न होताना दिसतायंत. 

त्यासाठी गरोदर मातांच्या बैठका घेतल्या जातात. किशोरवयीन मुली आपल्या समस्या सांगतात. त्यांच्या डोक्यातले, मनातले आरोग्याबाबतचे अनेक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न मनीषाताई करतायंत. गरोदर मातांशी बोलताना स्वत:च्या अनुभवाचे बोल सांगून त्यांना विश्वासात घेतात. त्यांच्या मते, माता उच्चशिक्षित असली, तरी तिला बालसंगोपनाची पुरेशी, योग्य माहिती असेलच असं नाही. सहा महिन्यांपर्यंत आईचंच दूध बाळाला पाजायचं, दुसरं काहीही द्यायचं नाही, या बद्दलची माहिती अनेकींना नसते. 

गरोदर मातेसाठीची दशपदी

बाळाच्या निरोगी वाढीसाठी बालसंगोपनाचे धडे दिले जातात. आईच्या दुधाचं महत्त्व किती आणि कसं आहे? बाळाला सहा महिन्यांनंतरचा आहार कसा द्यावा? तो घरच्या घरी कसा बनवावा? कमीत कमी खर्चात अधिक पौष्टिक आहार कुणीही घराच्या घरी तयार करू शकतो, हे सगळं त्यांनी तिथे कृतीत उतरवलंय. 

लग्नातल्या सप्तपदीसारखी गरोदर मातांसाठी दशपदी तयार करण्यात आलीय. यामधे दिवसातून चारवेळा थोडं थोडं जेवणं, हिमोग्लोबिन वाढवणं, वेळेवर आरोग्य तपासणी करून घेणं, मानसिकदृष्ट्या सक्षम राहणं, भाजीपाला, दूध, गुळ यांचा खाण्यात अधिकाधिक वापर करणं आदी आरोग्यविषयक गोष्टींचा या समावेश आहे.

अनेकदा गरोदर बायका वेगवेगळ्या कारणांमुळे दिलेल्या गोळ्या वेळेवर घेत नाहीत. वेळेवर गोळ्या घेण्यासाठी मनीषाताई गरोदर मातांना आग्रह करतात. तसंच उलटतपासणी म्हणून त्या घरोघरी जाऊन गोळ्यांची रिकामी पाकिटंही गोळा करतात. आरोग्याविषयक समस्या, समज-गैरसमज याविषयी चर्चा करण्यासाठी त्यांनी महिन्यातले चार शनिवार ठरवलेत. पहिल्या शनिवारी किशोरवयीन मुलींची बैठक, दुसऱ्या शनिवारी गरोदर मातांची बैठक, तिसऱ्या शनिवारी स्तनदा मातांशी संवाद, तर चौथ्या शनिवारी कुपोषित मुलांच्या मातांच प्रबोधन केलं जातं.

हे सगळं नक्की बघायला हवं

मनीषाताईंच्या प्रयत्नांना आता यश येताना दिसतंय. एकात्मिक बाल विकास योजनेच्या उद्दिष्टांना इथे मूर्त रूप आल्याचं दिसतं. सहा वर्षांखालील बालकांच्या पोषण आहाराच्या आणि आरोग्याच्या दर्जा सुधारणा झालीय. बालकांच्या मानसिक, सामाजिक, शारीरिक विकासाचा पाया घातला गेलाय. मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षणातच शाळेची गोडी लागलीय. त्यामुळे शाळेच्या पटावरून होणारी गळती थांबलीय. 

वेगवेगळ्या उपक्रमांमुळं लहाग्यांना लागलेला शाळेचा लळा, टुमदार आणि सजवलेली अंगणवाडीची खोली, पौष्टिक आहार, मातांची किशोरवयीन मुलींची अंगणवाडीकडे वाढलेली ये जा, पालकांना वाटणारं अंगणवाडीचं आकर्षण या सर्वांमुळं दौलताबाद परिसरातल्या अंगणवाड्या सुसज्ज झाल्यात. हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून जगभरात नावाजलेला होताच. पण तो आता बालकांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणातल्या प्रयोगशीलतेमुळेही ओळखला जातोय. त्यामुळे दौलताबादला गेलात तर बालविकास आणि माताविकासाचा हा आगळावेगळा प्रयोग नक्की बघा! इथेच आपलं भविष्य आहे.

(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत.)