गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाचे खरे शिष्य शिवाजी महाराजच शोभतात. गीतेचे पांग शिवरायांनीच फेडले. बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समर भूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो... प्रबोधनकारांची ही मांडणी वाचायलाच हवी दगलबाज शिवाजी लेखाच्या तिसऱ्या भागात.
आधी वाचा : दगलबाज शिवाजी : भाग १
आधी वाचा : दगलबाज शिवाजी : भाग २
विश्वासघात, बेइमान, खून, अत्याचार, जाळपोळ इत्यादी गोष्टी पौराणिकी ग्रंथांच्या किंवा शाब्दिक वादाच्या क्षेत्रात अत्यंत अमानुष मानलेल्या असल्या, तरी राजकारणी क्षेत्रांत त्यांची सदगुणांतच गणना होत असते. शांतीसाठी महायुद्ध ही शब्द योजना तरी किती परस्परविरोधी? रक्तपात टाळावे म्हणून रक्तपात. चोऱ्या बंद व्हाव्या म्हणून घरादारांवर दरवडे. राजावर प्रेम करावयास शिकवण्यासाठी राजद्रोहाच्या खटल्याची सत्रे. ही वाक्ये सकृद्दर्शनी नागव्या विरोधाभासाची दिसतात. पण त्यातच वास्तविक राजकारणी दगलबाजीच्या सदगुणांचे खरे बीज आहे.
नदीच्या मुळाप्रमाणे आणि ऋषीच्या कुळाप्रमाणे कोणत्याही राजसत्तेचे मूळ शोधण्यात अर्थ नाही. या मुळात कसकसली खते पडलेली असतात, त्याचे पृथःकरण भल्याने करू नये. म्हणूनच राजकारणपटू आंग्ल मुत्सद्दी एडमंड बर्क याने `सर्व राजसत्तांच्या उगमांवर पावित्र्याचा पडदा सोडून देणेच श्रेयस्कर आहे’ असा इषारा दिलेला आहे. राजकारणांत कितीही घातपात आणि दगलबाजी असली, तरी अखेर ते विजयी व्हावे लागते. ते विजयी झाले तरच त्या दगलबाजीवर आणि घातपातावर पडदा पडतो.
इंग्रेजीत एक सूत्र आहे, `One murder makes a villain, thousands a warrior’ एक खून केला की माणूस खुनी ठरतो, आणि त्याने हजार खून पाडले की तो वीर योद्धा म्हणून गणला जातो. या छोट्या सूत्रांत बडा वेदान्त आहे. स्वदेशाच्या स्वातंत्र्यांसाठी राजकारणी दगलबाजीने झगडणाराला यशापयशाची पर्वा नसली, तरी त्याची केव्हाहि हमी देता येत नाही. बोलून चालून ती सट्टेबाजी. `सरळ पडे दान, त्याची जगात ताठ मान’, `दान पडे वाकडे, त्याच्या जिवावर साकडे.’
हिंदुंची राजनीति पडत्या प्रतिस्पर्ध्यांचा सन्मान राखते, तर प्रतिस्पर्धी पराभूत होताच आंग्ल राजनीति त्याला रसातळाला नेते. भारतीय महायुद्ध संपल्यावर विजयी पांडवांनी धारातीर्थी पतन पावलेल्या कौरवांना श्रद्धापूर्वक तिलांजुली आणि पिंडदान केले. इंग्रेजाच्या सांकृतिक इतिहासांत श्रद्धेची ही भावनाच नसल्यामुळे, ते कधी आपल्या पराभूत प्रतिस्पर्ध्याला पिंडदान तर करणार नाहीतच, पण दुसरा कोणी ते करील तर तेही त्यांच्या प्रवृत्तीला परवडत नाही. नेपोलियन, जोन ऑफ आर्क, शिवाजी वगैरे थोरथोर राष्ट्रवीर वीरांगनाबद्दल आंग्लेतिहासकार जे इतक्या क्षुद्रतेचे आणि उपहासाचे उद्गार काढतात, त्याचे मूळ या त्यांच्या आनुवंशिक संस्कृतीत आहे. यात शिवाजी दगलबाज ठरला तर त्यातहि त्या राष्ट्रवीराचा सन्मानच होत आहे कारण शिवाजी विजयी दगलबाज होता.
हिंदुस्थानांत एक वेळ दगलबाज आर्यांनी कमदगलबाज अनार्यांना पादाक्रांत केले. त्यानंतर, हिंदू राज्यकर्त्यांची दाणादाण उडवून मोंगलांनी आपली दगलबाजी वरचढ ठरविली. पुर्तुगेज, फ्रेंच, डच आणि इंग्रेज यांमध्येही परस्पर दगलबाजीच्या शर्यती लागून, त्यात अखेर इंग्रेजाचा घोडा पहिला आला. काही वर्षे दख्खनच्या मुसलमानीशाह्या `आम्ही पट्टीचे दगलबाज’ म्हणून महाराष्ट्रभर आपल्य सत्तेचा धुमाकूळ घालीत होत्या. शिवाजीने बोलबोलता त्या सत्तेला उद्धस्त करून खुद्द दिल्लीच्या काळजाला हात घातला आणि मुसलमानांपेक्षा आम्ही मऱ्हाठी दिढी दुपटी दगलबाज आहोत, याची जाहीर नौबद रायगडावरून ठोकली.
पुढे मऱ्हाठशाही दगलबाजीचा धौशा पेशव्यांनी थेट अटकेला नेऊन भिडविला. अखेर इंग्रेजांच्या मार्जार-तपश्चर्येवर नियतिदेवीची बहाल मर्जी झाली. त्यांनी मऱ्हाठे, मोंगल, सीख, राजपूत इत्यादि सर्व दगलबाजोपदगलबाजांना आपल्या तंत्रशक्तीने चीत करून ब्रिटीश सत्तेच्या बिनमुखी स्थापनेने, चालू युगात. इंग्रज म्हणजे दगलबाजाग्रणी ऊर्फ मास्टर डिप्लोमॅट्स हा सिद्धांत बिनतोड प्रस्थापित केला. आज इंग्रेजाच्या दगलबाजीला जोड नाही आणि तोडही नाही. आज तिला अवघे त्रिभुवन थोडके पडले आहे. सर्व जगातले राजकारण आज इंग्रेजी दगलबाजीच्या पाणपोयीवरच आपल्या उलट सुलट पेचांचे पाणी पीत असते. या पाण्याला पाणी पाजण्याचे पाणी आज कोणांतही नसल्यामुळे, इंग्रजेतर सर्व राष्ट्रे पाण्यापेक्षा पातळ झालेली आहेत.
हेही वाचा : तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?
यावर कित्येक अशी शंका काढतील की जी कामे नीतिग्रंथांत अकर्मे अथवा कुकर्मे म्हणून गणली जातात, ती उघड माथ्याने आचरून नरपति, हयपति, छत्रपति, चक्रवर्ति इत्यादि अत्युच्च पदाला पोहचणाऱ्या पुरुषांना थोर का मानावे? केवळ ते जबरदस्त सत्ताधीश बनतात म्हणून की काय? नीति, न्याय, सदाचार यांना लाथाडून मिळविलेल्या श्रेष्ठ पदाची महति जगाने काय म्हणून वानावी, आणि इतिहासाने ती मानावी? हव्या त्या अमानुष अत्याचारांवर व घातपातांवर केवळ राजकारणाची सफेदी चढताच त्यांच्या क्रौर्याची आणि राक्षसीपणाची तीव्रता वितळून जाते, तर मानवतेचा सुरक्षितपणा म्हणजे एक भयंकर धोक्याचा सौदाच म्हटला पाहिजे!
वाटेल ते कुकर्म राजकारणाचा शिक्का पडताच, चलनी नाण्याप्रमाणे जर जगाच्या बाजारात बिनतक्रार चालते, तर नीतिशास्त्र म्हणजे नाटक का तमाशा? सत्कर्म ते सत्कर्म आणि बदकर्म ते बदकर्म! सकृद्दर्शनी ही शंका वाजवी दिसते. परंतु – त्यात एक `परंतु’ आहे आणि या `परंतु’चे कोडे शेकडा ९९ प्रापंचिकांना उलगडत नसल्यामुळे, कर्म कोणते आणि अकर्म कशाला म्हणावे, याचा समाधानकारक निर्णय त्यांना लावता येत नाही. संसाराच्या रोजच्या क्षुद्र दलमलीतसुद्धा `हे बरे का ते खरे’ `असे करू का तसे करू’ आणि `कसे करू काय करू’ याचा माणसाला उलगडा होत नाही मोठमोठ्या पंडितांचीहि निर्णयशक्ती पुष्कळ वेळा लंजूर पडते.
अहिंसा सत्य, अस्तेय, कायावाचामनाची शुद्धता आणि इंद्रिय-निग्रह ही पांच सनातन नीतिधर्माची तत्त्वे खरी; परंतु त्यांच्याहि आचरणात अपवादांची अनेक स्थळे आहेत. सामान्य नियम आणि अपवाद यांचा पायाशुद्ध आणि विवेकमान्य विचार नीतिशास्त्राने मुळीच केलेला नाही, असे खास नव्हे. अहिंसा परमो धर्मः ही गोष्ट कितीहि खरी असली तरी जगाच्या व्यवहारात कर्तव्याची अशी अनेक क्षेत्रे आहेत की तेथे हिंसा हाच परम धर्म ठरविणे प्राप्त असते; आणि नीतिशास्त्र त्यालाच आपली मान्यता देते. संसार – मग तो एका कुटुंबाचा असो वा विशाळ राष्ट्राचा असो, त्यांत नित्य भेटणाऱ्या कर्माकर्मांची त्रांगडी कशी सोडवावी, याचा बालबोध उलगडा अखिल मानवतेला व्हावा एवढ्याचसाठी श्रीमदभगदवद्गीताशास्त्र अवतरले आहे.
सर्व उपनिषदरूपी कामधेनूंचे अमृतमय दूध घुसळून, श्रीकृष्ण भगवंताने गीतारूपी आत्मप्रबोधक नवनीत काढले कै. बाळ गंगाधर टिळक यांनी अत्यंत कुशलतेने त्या नवनातिंत आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेची पत्रीची खडीसाखर मिसळून `गीतारहस्य’ नामक स्वादिष्ठ आणि खमंग असा षोडस रसी मावा तयार केला. त्यांतील `कर्मजिज्ञासा’ नामक प्रकरणावरून सत्यअसत्यांची व हिंसाअहिंसेची गीतोक्त मीमांसा येथे सारांशाने नमूद करीत आहो.
नीतिशास्त्र कितीही कडकडीत असले, तरी त्यातही अपवादांचा विवेकाने विचार केलेला आहे. सामान्य नियमाला अपवाद हे असायचेच. सत्य बोलावे हा परम धर्म. त्याविषयी वादच नाही. परंतु, आजूबाजूचा कसलाही विचार न करता, परिस्थिती प्रसंग आणि परिणाम यांची दखल न बाळगिता, केवळ परमोच्च धर्म म्हणून सत्य बोलणारा माणूस सत्याग्रही असला तरी पुष्कळ प्रसंगी स्वतः गाढव तर ठरतोच, पण इतरांच्याही नाशाला अगर घाताला कारण होतो.
गाईच्या मागे कसायी लागला आहे. पळत पळत गाई आपल्या दृष्टीसमोर आडोशाला लपली. इतक्यात `गाई कोठे लपली?’ म्हणून कसायी तुम्हाला विचारू लागला. तर त्या वेळी सत्याग्रहाच्या दिमाखाने तुम्ही सत्य सांगून गाईची हत्या करवाल, का असत्य सांगून तिचा प्राण वाचवाल? काही मनुष्ये दरोडेखोरांच्या हातून निसटून, तुमच्या देखत दाट रानात कोठेतरी दडून बसली.
मागाहून तलवारी परजीत दरवडेखोर येऊन तो मानसे कोठे गेली, असे विचारू लागले, तर काय जबाब द्याल? सत्य बोलाल का धडधडीत `मला माहीत नाही’ असे असत्य बोलून त्या गरीबांचा प्राण वाचवाल? सत्य बोलणे हा परमोच्च धर्म, तर निरपराधी प्राण्याची हिंसा होत असेल तर त्याला हवे ते करून प्रतिबंध करणे, हाही सत्याइतकाच परमोच्च धर्म! मग दोहोंपैकी कोणता मार्ग पत्करावा?
हेही वाचा : शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?
समजा, अखिल महाराष्ट्राच्या गुलामगिरीचे पाश कसे तोडावे, या एकाच ध्येयाला वाहून घेतलेले शिवाजी महाराज डोंगरी किल्ल्यांच्या एका गुप्त खलबतखान्यात काही मसलत करीत बसले आहेत. बाहेर टेहळणीसाठी एक घोंगड्या गुराखी बसविलेला आहे. इतक्यात एक विजापूरचा कोणीतरी चिरुट सिगारेटखान तेथे येतो आणि तलवार काढून विचारतो, `बताव कहा है मरगठ्ठा सिवाजी’ तर त्या घोंगड्या टेहळ्याने, `सत्य सदा बोलावे’ म्हणून शिवाजीचा चटकन् पत्ता सांगून मोकळे व्हावे, का कानावर हात ठेवून त्या चिरुटखानाच्या तलवारीला बळी पडावे? नीतिशास्त्रातला विवेक दुसऱ्या प्रकाराला संमति देतो. `सत्य बोलणे हे प्रशस्त होय; पण सत्यापेक्षाही सर्व भूतांचे ज्यांत हित असेल, ते बोलावे. सर्व भूतांचे ज्यात अत्यंत हित तेच माझ्या मते खरे सत्य होय.’
चिरूटखानाच्या क्रोधाला टेहळ्या बळी पडला तर त्यात विशेष काय उत्पात घडणार? काही नाही. एक सोडून लाख टेहळे मिळतील पण कोट्यवधी मऱ्हाट्यांच्या राष्ट्रीय भवितव्यतेचा विश्वकर्मा शिवाजी दुसरा मिळणे शक्यच नाही. शिवाजी ठार झाला की महाराष्ट्र मेला अशा महत्त्वाच्या राष्ट्रनायकाला जर त्या टेहळ्याने दाखविला, तर त्याची ती वाणी अथवा करणी असत्याच्या व नीच नृशंसत्वाच्या सदराखाली येऊन साऱ्या जगाच्या छीःथूःला कारण होती.
शांतिपर्वात भीष्म युधिष्ठिरास सांगतात, `न बोलता मोक्ष म्हणजे सुटका होण्यासारखी असेल तर काही झाले तरी बोलू नये; आणि बोलणे अवश्यच असेल तर, किंवा न बोलल्यामुळे दुसऱ्यास शंका येण्याचा संभव असेल तर, त्या वेळी सत्यापेक्षा खोटे बोलणे अधिक प्रशस्त, असे विचारांती ठरलेले आहे.’ इंग्रेजी नीतिशास्त्रवेत्ते याच मताला पुष्टी देतात. तात्पर्यं, नीतीचे सामान्य नियम काहीही असले, तरी त्यातही अपवाद असतात आणि आपल्या बोलण्याने किंवा वर्तनाने सार्वजनिक ऊर्फ सर्वभूतहितावर होणाऱ्या बऱ्यावाईट परिणामांवरून त्यांतील विवेका विवेक शोधला पाहिजे.
शिवाजीचे ध्येय काय होते? शिवाजी काय मुसलमानांचा द्वेष्टा होता? मुळीच नाही. तो कोणाचाच द्वेष्टा नव्हता. शिवाजीची मायभूमी गुलाम होती. त्या गुलामगिरीचा तो द्वेष्टा होता. आणि गुलामगिरीचा द्वेष करून, तिला रसातळाला नेण्याचा यत्न करणे, हा तर प्रत्येक मनुष्याचा निसर्गदत्त अधिकारच आहे. लौकिकी धर्मापेक्षा हा राष्ट्रस्वातंत्र्याचा धर्म उद्दीपित करणे, हे मोठे कौतुकास्पद कार्य होय.
शिवाजीला हे महत्कार्य पार पाडावयाचे होते. महाराष्ट्र मऱ्हाठ्यांचा. त्यावर इस्लामी सत्ता काय म्हणून? मऱ्हाठ्यांच्या राजकारणी स्वयंनिर्णयाचे हे इस्लामी मक्तेदार कोण? यांची मक्तेदारी आम्हाला साफ नको. मी मऱ्हाठ्यांना दास्यमुक्त करीन. या उदात्त महत्त्वाकांक्षेने बालवयातच फुरफुरलेल्या शिवाजीला प्रत्यक्ष कार्य करताना येणाऱ्या संकटांचा, अखिल महाराष्ट्राच्या भवितव्यतेच्या जबाबदारीकडे एकाग्र लक्ष ठेऊन, बनेल तसा फडशा पाडणे कर्तव्यप्राप्तच होते. त्याने अफझुलखानाचा कोथळा फोडला तो, तो मुसलमान होता म्हणून नव्हे. अशी समजूत करून घेणे हा गाळीव गाढवपणा होय.
अफझुलखानाच्या स्वारीचा उद्देश, त्याने विजापुरास मारलेली पैज. येताना वाटेत केलेले अत्याचार आणि शिवाजीविरुद्ध रचलेला व्यूह न जाणण्याइतका शिवाजी बावळट नव्हता. अफझुलखान म्हणजे महाराष्ट्राच्या उदयोन्मुख स्वातंत्र्यावर प्रस्थापित अदिलशाही सत्तेने फेकलेला बांबगोळाच होय, ही त्या तरुण राष्ट्रवीराची बालंबाल खात्री पटल्यामुळेच, शिवाजी आपल्या कर्तव्याची दिशा ठरवूनच, त्याच्या डावाशी प्रतिडाव खेळला, आणि अखेर अतुल्य प्रसंगावधानाने त्याने त्याला त्याच्याच युक्तीने गारद करून, शिवाजीचा महाराष्ट्र स्वातंत्र्याचा उद्योग म्हणजे सहजगत्या टाचेखाली विझणारी ठिणगी नव्हे, हे त्याने विजापूरच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले.
शेक्सपियरच्या हॅम्लेटला गीताशास्त्राचे पाठबळ नव्हते, म्हणून त्याच्या `जगावे का मरावे?’ या शंकेचे पर्यवसान दुःखपर्यवसायी झाले. हिंदुजन गीतेशी बेइमान झाले, म्हणून आज ते साऱ्या जगाच्या पखालीचे बैल बनले आहेत. प्रत्येक राष्ट्रसंसाऱ्यापुढे `जगावे का मरावे?’ हाच प्रश्न नेहमी पडत आलेला आहे आणि तो सोडविण्याच्या कुशलतनेचे त्या त्या राष्ट्राच्या उन्नति अवनतांचा इतिहास रंगविलेला आहे. आज प्रत्येक गुलाम राष्ट्रापुढे हाच प्रश्न आहे, आपल्यापुढे तोच आहे. शिवाजीपुढे तोच होता. आणि अर्जुनापुढेही तोच होता.
हेही वाचा : प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत
अर्जुनाला सुद्धा कर्म कोणते आणि अकर्म कोणते, हाच मोह पडला होता. त्याने मन साधुत्वाच्या कल्पनेने वितळु लागले होते. आणि राजकारणपटु मुत्सद्याग्रणि श्रीकृष्णाने वेळीच त्याच्या भ्रमाचे निरसन केले नसते, तर अर्जुनाच्या कपाळी नामर्द षंडत्वाचा काळिमा कायमचा लागला असता. भारतीय महायुद्ध हिंदूहिंदूंतले होते. एकाच राजघराण्यातल्या दोन `चुलत’ तटातले होते. आप्तस्वकीयांतील रक्तपाताचा प्रसंग. कौरव किंवा पांडव यांपैकी कोणातरी एकाच विध्वंस झाल्याशिवाय भरतखंडाच्या राष्ट्रीय भवितव्यतेचा महत्त्वाचा प्रश्न सुटणारा नव्हता.
अर्जुनाच्या समोर सारा गोतावळा युद्धासाठी सज्ज उभा. भीष्म, द्रोणासारखे पूज्य गुरुवर्यही सामन्याला समोर. अहिंसा परमो धर्मः! मग यांच्यावर शस्त्र चालवावे की नाही? हा सारा गोतावळा ठार मारून मी मिळवणार काय? भारत साम्राज्य? त्यापेक्षा संन्यास काय वाईट? युद्धातील रक्तपात व अत्याचार हे कर्म का अकर्म? असल्या लौकिकी विचारांनी अर्जुन भांबाऊन गेला. त्याला राजकारणी दगलबाजी म्हणजे मोठे पाप वाटू लागले. तो साध्या संसारी माणसाप्रमाणे महायुद्धाच्या उद्देशाकडे व त्यातल्या अत्याचारांकडे पाहू लागला. त्यामुळे नीति, न्याय, धर्म, सत्य यांची विकृत रूपे त्याला दिसून, कर्तव्याकर्तव्याचा त्याला विवेकच उरला नाही.
मिथ्या साधुत्वाच्या कल्पनेने अर्जुनाच्या पौरुषत्वाला अविवेकाची लागत असलेली वाळवी झाडण्यासाठी श्रीकृष्णाला किती तरी प्रयत्न करावे लागले. नीती सांगितली, विवेक पढवला. अखेर दमदाटीसुद्धा केली, तेव्हा कोठे हे सव्यसाठी धनंजय युद्धाला प्रवृत्त झाले. आता शिवाजीकडे पाहा. `हिंदवी स्वराज्य व्हावे हे श्रींच्या मनात फार आहे.’ या ध्येयाच्या सिद्धीसाठी झगडतांना शिवाजीवर अनेक प्राणघातक व ध्येयविध्वंसक प्रसंग आले. परंतु, प्रत्येक मुकाबल्याला तो आपल्या कर्तव्याचा मार्ग स्पष्ट आखूनच त्याला बेधडक स्वतः तोंड देत गेला.
शाहिस्तेखानावरील मुकाबला घ्या, अफझुलखानाच्या दगेबाजीवर केलेली मात घ्या, शहाजी राजाच्या सुटकेसाठी केलेले कारस्थान घ्या, आगऱ्याहून निसटण्याची योजना घ्या, काय वाटेल तो प्रसंग घ्या, त्यात कर्तव्याची स्पष्ट कल्पना करून निधड्या छातीने शिवाजी त्याचा फडशा पाडीत गेला. अर्जुनाप्रमाणे शिवाजी कधी भांबवला नाही. कधी संन्यास घ्यायला उठला नाही. बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समर भूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझुलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो.
काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू या क्षूद्र कल्पनेला बळी पडून, विहित कर्तव्याला बगल मारून पळू पाहणारा बगलबाज अर्जुन पहा आणि भेटीचे ढोंग करून दगा देण्यास आलेल्या दगलबाज अफझुलखानाला त्याच्याच युक्तीने गारद करणारा कर्तव्यतत्पर सवाई दगलबाज शिवाजी पहा, म्हणजे कर्तव्याकर्तव्याचें कोडे थोडे तरी सुटेल. अफझुलखान ठार मारल्याशिवाय किंवा त्याच्या हाती शिवाजी जिवंत किंवा मेलेला सापडल्याशिवाय; त्या मुकाबल्याचा निर्णयच लागणारा नव्हता. अर्थात शिवाजी मारीन किंवा मरेन असा अटीतटीचा सामना देण्याच्या तयारीनेंच प्रतापगड चढला; आणि त्याच्या अलौकिक प्रसंगावधानाने त्याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली.
हिंदवी स्वराज्याच्या प्राणप्रतिष्ठेसाठी स्वतःचा प्राण देणे अथवा अफझुलखानाचा प्राण घेणे, यापेक्षा तिसरा मार्गच शिवाजीपुढे नव्हता. अर्थात ते कर्तव्य त्याने मोठ्या कुशलतेने पार पाडून, `योगः कर्मसुकौशलम्’ या गीतोक्तीप्रमाणे राजकारणी दगलबाजांतील योगीराज ही आपली कीर्ती जगजाहीर केली. श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला, पण ती प्रत्यक्ष आचरणात आणून महाराष्ट्राचा राष्ट्रधर्म भगवद्गीतेत आहे, हे सप्रमाण सिद्ध केले शिवाजीने. गीतेचे पांग पांडवांनी फेडले नाहीत, ते शिवाजीने फेडले.
महाभारतीय इतिहासाला आपल्या बुद्धिप्रभावाने रंगवून चिरंजीव करणाऱ्या दगलबाज श्रीकृष्णाला अर्जुनापेक्षा दगलबाज शिवाजी हाच खरा शिष्य व अनुयायी लाभला, यांत मुळीच संशय नाही. अर्थात ``यत्र योगेश्वर: कृष्णः’’ हा श्लोक या पुढे यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र शिवराय भूपति।। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।। असाच वाचला पाहिजे, बोला, दगलबाज शिवाजीचा जयजयकार!
हेही वाचा :
शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश
तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?