अफजलखानाचा कोथळा काढला यात दगलबाज शिवरायाचं काय चुकलं?

१९ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ९ मिनिटं


शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला ही दगाबाजी होती, असा आरोप १९२०च्या दशकात जोरात होत होता. महाराष्ट्रात शिवरायांच्या इतिहासातून स्वातंत्र्यप्राप्तीची प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात होता. त्याला अशा आरोपांनी खीळ घालण्याचा प्रयत्न इंग्रजी आणि इंग्रजधार्जिणे इतिहासकार करत होते. त्याला प्रबोधनकारांनी कडक उत्तर दिलंय. वाचुया, दगलबाज शिवाजी लेखाच्या या दुसऱ्या भागात. 

आधी वाचा: दगलबाज शिवाजी : भाग १


शिवाजीवर अहिन्दूंचे आरोप तरी काय आहेत? याची यादी प्रथम घेऊ या. शिवाजीवर पहिला आणि ठळक आरोप म्हणजे राजद्रोहाचा. त्याने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध म्हणे बण्ड उभारले. कोणत्या तरी प्रस्थापित राजसत्तेला मूठमाती देऊन तेथे नवीन सत्ता स्थापणाऱ्या कोणत्याही चक्रवर्तीची आणि सम्राटाची या आरोपातून सुटका होणे शक्य नाही. इंग्रेजांनी तरी मऱ्हाठी साम्राज्य घशात घालताना काय अशा मोठ्या हुतुतूच्या लढाया दिल्या, तर युद्धांतील विजयाच्या निर्णयावर त्यांची या आरोपातून सुटका होते! त्यांनी तर मराठ्यांच्या घरात शेकडो कटांची पोखरण घालून, आज याला फोड उद्या त्याला बनव, परवा तिसऱ्यालाच चवथ्याच्या उरावर घाल, अशाच घालमेली केल्या ना!

मग इंग्रेजांनी मऱ्हाठ्यांचा राजद्रोह केला, अशी भाषा का पुढे येत नाही! तर आज हिंदुस्थानांत इंग्रेजी राज्य जबरदस्त आहे. नवीन राज्ये कमवणारांवर राजद्रोहाचा आरोप करणाऱ्या मतिमंद मूर्खांनी इतके तरी लक्षात ठेवावे की नवीन देऊळ बांधतांना जुन्या देवळाला आमूलाग्र उलथून पडावेच लागते. ब्रिटीश रक्ताच्या ब्रिटीशांनीच अमेरिकेतून ब्रिटीश सत्तेची उचलबांगडी करून नवीन संयुक्त अमेरिकन संस्थानांची स्थापना केली. मग जॉर्ज वॉशिंटन हा सुद्धा मोठा दगलबाज राजद्रोही मानला पाहिजे.

हेही वाचा : लोकशाही मुल्यांमुळेच रयतेला शिवशाही हवीहवीशी

नंबर २ – शिवाजीनें अफजुलखानाचा `खून’ केला. जणू काय अफजुलखान म्हणजे एकादा बावला किंवा श्रद्धानंदच! नंबर ३ – शिवाजी आग्र्याच्या बादशाही कैदेतून पळाला, म्हणून तो दगलबाज, असले हे आरोप केवळ बुद्धिभ्रष्टता अगर जातिवंत दुष्टावा यातूनच निर्माण होत असतात. राजद्रोह दगलबाजी विश्वासघात इत्यादी आरोप करणारे शहाणे स्वतःची भूमिका तर विसरतातच, पण हे आरोप कोणी कोणावर कोठे केव्हा आणि का करावे, याचा विवेकही त्यांच्या गावी नसतो. 

मुसलमानांनी शिवाजी विरुद्ध हात बोटे चोळली तर त्यात काहीतरी वाजवीपणा आहे. कारण, शिवाजीने दक्षिणेतल्या मुसलमानी सत्तेच्या चांदताऱ्यालाच आचंद्रार्क अर्धचंद्र दिला! पण इंग्रज म्हणजे न्यायाचा सागर आणि हिस्टॅरिकल परस्पेक्टिवचा आगर! त्यांनी शिवाजीवर खुनाची आणि दगलबाजीची एवढी आग का पाखडावी? असा एकसुद्धा इंग्रेज इतिहासकार आढळत नाही की ज्याने अफझुलखानाच्या वधाचा पराचा पारवा करून शिवाजीवर शिव्यांची लाखोली वाहिलेली नाही.

प्रतापगडच्या मुकाबल्यात अफझुलखानाने आपल्या प्रतिज्ञेच्या संकेताप्रमाणे शिवाजीचाच कोथळा काढला असता, तर त्याविषयी निस्पृहपणाची मिजास मारणाऱ्या इंग्रेज इतिहासकारांनी काय उद्गार काढले असते, याची कल्पनासुद्धा बरीच मनोरंजक होईल. इंग्रेज हा असा एक विलक्षण प्राणी आहे की त्याला इतरांच्या डोळ्यांतील कुसळ चटकन दिसते, पण स्वत:च्या डोळ्यातील मुसळ मात्र मुळीच दिसत नाही. न्यायबुद्धीची यांची घमेंड जगप्रसिद्धच आहे; परंतु त्यात एक मख्खी आहे. आपमतलबासाठी इंग्रेजी न्याय कधी पृथ्वीइतका फुगेल, तर कधी सुईच्या डोळ्यांतून सफाईंत निसटून टाचणीच्या टोकावर तांडवनृत्य करील.

शिवाजी एक वेळ राहू द्या; बोलून चालून तो हिंदू. पण नेपोलियन बोनापार्ट तर युरपियनच ना? लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी युरपस्थ राजेशाहीला नेस्तनाबूद करणाऱ्या सवाई शिकंदर नेपोलियन चक्रवर्तीला विसाव्या शतकातले इंग्रज इतिहासपंडित जर बाबू चष्मावाल्याच्या वर्गात ढकलतात, तर १८व्या आणि १९व्या शतकातल्या यांच्या व्यवसाय पूर्वजांनी शिवाजीला उनाडटप्पू दरोडेखोराच्या सदरांत घातले, तर त्यात काय नवल? तरी बरे की इतरांवर घाणेरडे आरोप करणाऱ्या या आंग्ल चिकित्सकांच्या ब्रिटन राष्ट्राच्या साम्राज्यवर्धनाच्या खटपटी अगदीच काही धुतल्या तांदळाच्या नव्हत्या.

शिवाजीवरील खुनाच्या आरोपाचे खण्डन करणांरे विलायती व गावठी वकील पाहिले तर त्यांची नंदीबैलातच गणना करावी लागेल. यांचा डिफेन्स आणि विधाने पाहिली तर रडू येण्यापेक्षा हसूच फार येते. काय म्हणे शिवाजीने आत्मसंरक्षणासाठी वाघनखाचा उपयोग केला. आणखी काय? तर प्रथम वार कोणी केला, यावरच वादविवादाची धुमश्चक्री. आणि अफझूलखानाने ज्या अर्थी, ज्या पक्षी, ज्या अन्वये, शिवाजीला प्रथम बगलेत दाबून त्याच्या मस्तकावर प्रथम तलवार चालवुन आगळीक केली, त्या अर्थी त्या, पक्षी, त्या अन्वये, शिवाजीने आत्मरक्षणार्थ वाघनख चालविल्यामुळे, खुनाचा आरोप त्यावर सिद्ध होत नाही. जणू काय, अफजूलखानाच्या खुनाबद्दल फाजलखानाने फिर्याद दिली आहे. अदिलशाहीच्या शिफारसीने इंग्रेजी सेशन कोर्टात शिवाजीवर खटला चालू आहे आणि हे विलायती गावठी बॅरीस्टर शिवाजीच्या तर्फे ब्रिटिश इंडियन पिनल कोडांतील कलमांवर आपल्या वकीलाईची कसरत करीत आहेत! 

शिवाजी हा कोण, त्याचे ध्येय काय, कर्तव्यक्षेत्र कोणते, त्याच्या कृत्यांची परीक्षा कोणत्या दृष्टिकोनाने केली पाहिजे, इत्यादि महत्त्वाच्या मुद्यांची आणि या वकीलांची फारकतच असल्यामुळे, त्यांनी साध्या संसाऱ्याला लागू पडणाऱ्या नीतिनियमांच्या कक्षेत या राष्ट्रसंसाऱ्याला ओढावे, यांत त्यांच्या बुद्धिमांद्याशिवाय विशेष काहीहि निष्पन्न होत नाही. राष्ट्रसंसाऱ्यांना कर्तव्याकर्तव्याची जी बिकट त्रांगडी सोडवावी लागतात, ती ते कोणत्या भूमिकेवरून कशी सोडवितात, याचे परोक्ष ज्ञान या लौकिकी नीतिवंतांना नसल्यामुळेच, ते `जन्माला आला हेला, कसा तरी जगून मेला’ अशा साध्यासुध्या संसाऱ्याच्या भूमिकेवरून शिवाजीसारख्या राष्ट्रसंसाऱ्याच्या कर्माकर्माचे परीक्षण करण्याच्या पोरकट फंदांत पडतात. 

ही क्षुद्र बुद्धीची उर्फ नीतीची चाड बाळगणारांनी खुशाल धंदेवाईक पुराणिक म्हणून मिरवावे. पण त्यांनी स्वराज्यसंस्थापक राष्ट्रवीरांच्या चारित्र्याची चिकित्सा करू नये. ते त्यांचे क्षेत्र नव्हे तो त्यांचा अधिकार नव्हे. वाकड्या दरांत वांकडी मेढ ठोकणारेच पुरुषोत्तम राष्ट्रवीर होऊ शकतात. ते साधुसंताचे आणि `सत्य सदा बोलावे’ वाल्यांचे तोंड नव्हे. साधुवृत्तीने आणि संसारी नीतीने राज्ये कमाविल्याचा दाखला इतिहासात नाही.

राज्याची प्राणप्रतिष्ठा म्हणजे टाळकुट्या साधुसंतांची भजन-प्रतिष्ठा नव्हे. त्यांतल्या त्यात गुलाम बनलेल्या देशाची महिरलेली मनोवृत्ति चैतन्यपूर्ण करून परकीय सत्तेच्या मुडद्यावर स्वराज्याचा पाया उभारणारा वीर साधुवृत्तीचा असून भागतच नाही. असे आजपर्यंत कधी कोठे घडले नाही, पुढे कधी कोठे घडणार नाही. `एका गालावर कोणी चापड मारली तर लागलाच दुसरा गाल पुढे कर’ या क्रिस्त धर्माज्ञेप्रमाणे युरपस्थ क्रिस्तीजन अक्षरशः वागते, तर त्यांना हिंदुस्थानचे साम्राज्य कधीच मटकावतां आले नसते. महंमद गिझनी पासून तो थेट बाबर हुमायून पर्यंतचे लोक जर नुसते माळा ओढणारे आणि नमाज पडणारे मुल्ला मौलवी असते तर मोंगल साम्राज्याची स्थापना होतीच ना.

हेही वाचा : राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड

त्याचप्रमाणे सत्य, नीति, वचन, इमान असल्या साधुवृत्तीच्या फाजील फंदांत रजपूत जर निष्कारण गुरफटले नसते, तर त्यांचाही अधःपात इतक्या लवकर खास झाला नसता आणि शिवाजी जर दगलबाजांतला दगलबाज, लुच्चातला लुच्चा, खटांतला सवाई खट आणि उद्धटांतला दिढी दुपटी उद्धट नसता, तर त्यालाही मऱ्हाठी स्वराज्य यावज्जन्मांत स्थापन करता आले नसते. नेहमीचा व्यवहार पाहिला तरी सतीच्या घरी बत्ती आणि वेश्येच्या घरी झुले हत्ती, हाच प्रकार चालू असतो. सत्य, न्याय, समता, प्रामाणिकपणा इत्यादी तत्त्वे पुराणांसाठीच जन्माला आलेली आहेत. लिहिण्याबोलण्यांत त्यांची फोडणी फार खमंग लागते. 

वकिलांचे वाडे विद्धत्तेच्या विजयावर वसले जातात काय? स्मृतिग्रंथांत वकिलांच्या वृत्तीविषयी घातलेले नीतिनिर्बंध जर अक्षरशः पाळले जाते आणि विद्यमान सरकारांनी ठरविलेल्या वकीली फीच्या कोष्टकांतच जर त्यांचे द्रव्यप्राप्तीचे प्रमाण मर्यादित राहते, तर बाराबंदी बंडी, मांड पंचा आणि गांधी टोपी पलीकडे एकाहि वकिलाचे ऐश्वर्य फुगले नसते. नोकरी चाकरी किंवा अर्थोत्पादनाचा कसलाही लौकिकी धंदा न करता, फक्त `देशभक्त’, म्हणून व्याख्यानबाजी आणि लेखनबाजी करीत जगणाऱ्या अनेक ब्राह्मण लोकांनी ठिकठिकाणी मोठमोठे वाडे बांधले आहेत आणि सावकाऱ्याही सुरू केल्या आहेत, त्या काय साऱ्या `वन्दे मातरम,’ राष्ट्रगीत पारायणाच्या तात्कालीक फलश्रुत्याच मानायच्या की काय? नीतिनियमांची पुराणे आणि लौकिकी व्यवहारांची गुप्त अर्धगुप्त वा उघडगुप्त धोरणे, यांचा समन्वय लावण्याचे काम म्हणजे या जगातला एक ब्रह्मघोटाळाचा होय.

तात्पर्य, लौकिक व्यवहार जसा दिसतो, तसा वास्तविक मुळीच नसतो, म्हणूनच बावळट माणूस बोलता बोलता सपशेल फसतो. जीवो जीवस्य जीवनम्. मोठ्या माशाने धाकट्या मासोळीला मटकावून जगावे. ज्ञान्यांनी अज्ञान्यांची घरेदारे लुटून आपले वाडे शृंगारावे. जबरदस्तांनी कमकुवतांना जिंकून दास बनवावे. सत्य, न्याय, प्रेम, अहिंसेची कास बळकट धरणाऱ्या नामर्द षंढांना युक्तिबाज, दगलबाज बाजीरावांनी हासत हासत चिरडून जमीनदोस्त करावे. ज्याच्या हाती शिकार त्याने पारधी म्हणून मिरवावे. हाच जेथे सृष्टीत चाललेल्या `जगण्याच्या धडपडी’चा आत्माराम, तेथे एका चोराने दुसऱ्या चोरावर दगलबाजीचा आरोप करावा. ही तरी दगलबाजीच नव्हे काय?

दगलबाज नाही कोण? दुनियाच जेथे जातिवंत दगलबाज, तेथे दगलबाजीशिवाय जगणारे प्राणी म्हणजे षंढ, हिजडे, नामर्द, विद्वान आणि गुलाम हेच होत. या लोकांशिवाय, नेटका प्रपंच करून मरण्यापूर्वी वेळ सापडलाच तर परमार्थ विवेकाचा फेरफटका करणारे छोटे दगलबाज संसारी, रोजच्या संसारांतल्या जगण्याच्या धडपडीत जे जे उत्पात करतात, त्यांचा विचार केला म्हणजे उलट्या काळजाच्या रंडीबाज राजकारणांतल्या बड्या दगलबाज दिग्गजांच्या उत्पातांचे प्रमाण सहज कळून येईल. साध्यासुध्या संसारांत एकमेकांच्या मुंड्या मुरगाळल्याशिवाय जर संसाऱ्यांना जगताच येत नाही; कापड मोजतांना गजाला आणि माल तोलताना तराजूला हिसका दिल्याशिवाय जर आमच्या व्यापारांतला अपमृत्यू टळत नाही; तर कोट्यावधी लोकांच्या संसाराच्या बरेवाईटपणाचा जिम्मा घेणाऱ्या राजकारणी संसाराच्या नायकाला शक्तीयुक्तीबुद्धीची ठेवणे कसल्या मनोवृत्तीच्या साच्यातून ओतून काढणे अगत्याचे असते, याची कल्पनाच करावी.

जित-जेतृत्वाची घडामोड घडविणारे राजकारण हेच मुळी जेथे हरामखोरीच्या सट्टेबाजीचे क्षेत्र, त्या क्षेत्रांत स्वदेशाच्या भवितव्यतेचे खेळखेळणाऱ्या खेळाडूंनी, इंद्रधनुष्यालाही चक्कर येईल असा भरंसाट चित्रविचित्र रंगांत, हरामखोरीची आणि दगलबाजीची जुव्वेबाज रंगपंचमी खेळू नये, तर काय `सत्य वद धर्मं चर’ वाल्या बेदर्द गोसावड्याप्रमाणे राखेच्या ढिगाराची फाल्गुनी पौर्णिमा करावी? जगात आजपर्यंत अशी एकही राज्यसत्ता झालेली दाखविता येणार नाही की जिचा पाया दगलबाजीवर उभारलेला नाही. 

सत्यव्रताची आणि न्यायाची मिजासच मारायची, तर एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राला, गोऱ्या लोकांनी काळ्या लोकांना, आणि पाश्चिमात्त्य लोकांनी पौर्वात्य लोकांना हव्या त्या उपायांनी जिंकून गुलाम करायचे, हा तरी कोठल्या गावचा न्याय? माणसांनी माणसांना ठेचून त्यांच्या गुलामगिरीवर स्वतःच्या जेतृत्वाची शेखी मिरविणे, हीच मुळी सृष्टीच्या नियमांची जेथे धडधडीत पायमल्ली, तेथे त्याच गुलामगिरीचे लोण सफाईत परतविण्यासाठी कोणी काट्यानेच काटा काढला, तर त्यांत दगलबाजी ती कसली? जगाची रहाटीच जर उलट्या पावलांनी चालत आहे तर सुलटे चालण्यांत शहाणपणा कोणता?

हेही वाचा : शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?

करत्याची करणी आणि मारत्याची तलवार हीच जगाच्या जगण्याच्या धडपडीची गुरुकिल्ली आहे. याच गुरुकिल्लीने शिवाजीने महाराष्ट्राच्या नशिबाला चिकटलेली इस्लामी गुलामगिरी उध्वस्त करून, आपल्या मातृभूमीला हिंदवी स्वराज्याचे स्वातंत्र्य दिले. यात चुकले कोठे? दगलबाजी ती कसली? अत्याचार कसले? खून तरी कसले? आणि विश्वासघात तरी कोठे घुसले? खटास खट भेटे, तेव्हाच मनीचा संशय फिटे. हिंदू लोक आचंद्रार्क मुसलमानी सत्तेचे गुलाम राहणार काय? शिवाजीच्या या प्रश्नाला तत्कालीन प्रस्थापित राज्यसत्तेने `होय होय होय’ अशा मगरूरीच्या प्रतिध्वनीचे उत्तर दिले. त्यावर `कल्पांत करीन, पण ही मगरूरी टिकू देणार नाही. हिंदू स्वतंत्र झालाच पाहिजे.’ अशी शिवाजीने धडाडीची उलट सलामी दिली.

हिंदु-स्थान आणि त्यावर राज्य-सत्ता म्हणे मुसलमानांची! या दगलबाज परिस्थितीचा नायनाट करण्यासाठी शिवाजीला सवाई दिढी दुपटी दगलबाज बनल्याशिवाय गत्यंतरच नव्हते. प्रस्थापित मुसलमानी राज्यसत्तेचा विध्वंस हीच ज्यानें आपल्या कर्तव्याची दिशा ठरविली, ज्या कर्तव्यांत त्याने आपल्या वैयक्तिक स्वार्थाचा आमूलाग्र संन्यास केला आणि ज्या कर्तव्यसिद्धांवर कोट्यावधी जीवांचा ऐहिक मोक्ष अवलंबून होता, त्या कर्तव्यासाठी त्या गुलामगिरीचा कण्ठ काडकन् फोडतांना, अफझुलखानाचा काय, पण शिर्के, मोरे, जाधवासारखे स्वजातीय कंटक आडवे येताच, त्यांचेही खून पाडणे, शिवाजीच्या राष्ट्रधर्माला आणि राजकारणी नीतीला मुळीच विसंगत नव्हते.

फार काय, पण विजापुराहून अफझुलखान आला, त्याच प्रतिज्ञेने व तयारीने शिवाजीचा प्रत्यक्ष बाप जरी आला असता, तरी हिंदवी स्वराज्यस्थापनेच्या महत्कर्तव्यासाठी शिवाजीने त्याचाहि कोथळा फोडून, आपल्या हाताने आपल्या मातोश्रींच्या कपाळचे कुंकू पुसायला कमी केले नसते. राष्ट्रोद्धाराच्या पवित्र कर्तव्यक्षेत्रात ध्येयाच्या सिद्धीसाठी `आडवा आला की काप’ हाच जेथे नीतीचा दण्डक आहे, तेथे `मातृदेवो भव, पितृदेवो भव’ या संसारी लोकांच्या आंबटवरणी नीतीचे नियम काय होत? दगलबाजीशिवाय राज्यसत्ता नाही आणि उलट्या काळजाशिवाय राजकारण नाही. स्वराज्यस्थापनेसाठी आणि परदेश जिंकून साम्राज्यवृद्धी करण्यासाठी आजपर्यंत दगलबाज्या केल्या नाहीत कोणी? सर्वांनी केल्या. कोणीही नाकाला जीभ लावण्याचा खटाटोप करू नये. 

स्वतंत्र अमेरिकन संस्थानांची प्राणप्रतिष्ठा; ब्रिटीश रक्ताच्या लोकांनी ब्रिटीश सत्तेला उलथूनच केली ना? कोठे गेला तो रक्ताचा जिव्हाळा त्या वेळी? आर्यांनी जसा अनार्यांचा बीमोड करून हिंदुस्थानात तंगड्या पसरल्या, तद्वत् याच अमेरिकन वसाहतवाल्यांनी रेड इंडियनांच्या कत्तली व विध्वंस केला, तो शुद्ध युनिवर्सल ब्रदरहूडच्याच भावनेने काय? मुसलमानांनी सत्तामदाच्या धुंदीत हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचे बरेच तिखटमिठाचे वर्णन आपण बखरी; नाटके, कादंबऱ्यांतून वाचतो. परंतु पोर्तुगीज, डच, इंग्रेज, फ्रेंच या क्रिस्ती राष्ट्रांच्या अरेरावांनी हिंदुस्थानात केलेल्या अत्याचारांपुढे ते कःपदार्थ ठरेल. 

पुर्तुगीजांचा प्रपितामह वास्को द गामा याने आपल्या दुसऱ्या सफरीत झामोरीनच्या वतीने स्वागत देण्यास आलेल्या ब्राह्मण वकिलाचे कान कापून तेथे कुत्र्याचे कान शिवले. आपल्या पुर्तुगीज राष्ट्राचा दरारा दाखविण्यासाठी बेसावध कालीकट बंदरावर तोफांचा भडीमार केला. बंदरांतील जहाजे लुटून, त्यांच्या ८०० नावाड्यांचे नाक कान कापले सोट्यांनी दात पाडले. तोडलेले सर्व अवयव ताटात भरून त्या ब्राह्मण वकिलाबरोबर `याची भाजी करून खा’ या निरोपासह झामोरीनकडे पाठविले. 

शिवाजीने अशा प्रकारची राक्षसी कृत्ये कधी कोठे केलेली असल्यास त्याच्या निंदकांनी खुशाल पुरावे पुढे आणावे. आल्फान्सो आल्बुकर्कने तिमय्या गरसप्पा नावाच्या देशद्रोही हिंदू राजाच्या मदतीने गोवा काबीज केल्यावर, आपल्या सत्तेचा वचक दाखविण्यासाठी तेथल्या मुसलमान रहिवाशांची व निरपराधी बायकामुलांची सर्रास कत्तल करून दिल्लीच्या नादीरशहालाहि लाज आणली. क्रिश्चन धर्माच्या प्रसारार्थ उरल्यासुरल्या अनाथ मुसलमान विधवांची पोर्च्युगीज पुरुषांबरोबर बळजबरीची लग्ने ठोकून, गोव्यातील लोकविश्रुत हाफकास्ट पोर्च्युगीज प्रजा निर्माण केली. 

वेढ्यात सापडलेल्या किंवा लढाईत जिंकलेल्या वृद्ध, मुले व स्त्रियांबद्दल शिवाजीचा दयावंत दण्डक मशहूरच आहे. हिंदू देवळांच्या विध्वंसनासाठी नोरोन्हाने केलेली साष्टीतली कत्तल क्रिस्ती धर्माच्या व येशू क्रिस्ताच्या `प्रेमपूर्णत्वा’ला कशी काय साजली शोभली, हे क्रिस्ती धर्ममार्तडांनीच सांगावे. मुसलमानांच्या मशिदीबद्दल शिवाजीने हेच क्रिस्ती धोरण ठेवले असते, तर म्युझिक बिफोर मॉस्क मशिदीपुढे वाद्यांचा प्रश्न आज निघालाच नसता. पण शिवाजी म्हणजे हिंदुधर्माचा मूर्तिमंत मोहरा! 

पवित्र कुराण हाती पडताच तो त्याची पालखीत वाजतगाजत सन्मामपूर्वक परतवणी करीत असे. दक्षिणेतील कित्येक मशिदींना शिवाजीने दिलेली वर्षासने आजही चालू आहेत. दुसरे पुर्तुगेज अरेराव म्हणजे आजविडो साहेब `हिंदुस्थानात त्याने केलेला दुष्टपणा अतर्क्य आहे. सिलोनांतील जयप्राप्तीत त्याने आयांकडून त्यांची मुले जात्यात घालू दळिली, शिपायांकडून काही मुले भाल्याचे टोकांवर नाचवून, त्यांचे हाल पाहून तो आनंद मानी.’ धर्मप्रसारासाठी साधूंचे पेहराव केलेल्या क्रिश्चनांची राजकारणी कृष्णकृत्ये आम्ही पामर हिंदूने काय वर्णन करावी?

पुर्तुगेज आणि डचांपेक्षा फ्रेंच आणि इंग्रेज जरा विशेष शहाणे. दगडापेक्षा वीट मऊ यांनीही अत्याचार केले नाहीत, असे नाही. पण, डावपेचाच्या दगलबाजीवर यांचा भर विशेष. शारीरिक अत्याचारांपेक्षा बौद्धिक अत्याचारावर त्यांची धोरणे फार. रॉबर्ट क्लाईव्हने वाटसन साहेबाची खोटी सही करून उमीचंदाला तर धडधडीत बनावट दस्तऐवजाने फसविले. वॉरन हेस्टिंग्जने अयोध्येच्या बेगमांचा केलेला छळ व इतर अत्याचार तर जगप्रसिद्धच आहेत. लॉर्ड डलहौसीने कलमांच्या फटकाऱ्याने आणि तू नाही तर तुझा बाप अशा सबबीवर मोठमोठी देशी राज्ये भराभर ब्रिटीश सत्तेच्या पचनी पाडली. ५७व्या बंडातल्या हिंदी लोकांवरील इंग्रेजी अत्याचारांनी पुर्तुगेज डचांच्या आठवणीलाहि मागे सारले. परवाची जालियनवाला बागेची कत्तल म्हणजे आंबोयनाचीच प्रतिमा नव्हे काय?

हेही वाचा : शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी

या सर्व अत्याचारांच्या कृतघ्नतेपुढे आणि क्रौर्यापुढे शिवाजीने केलेला अफझुलखानाचा वध म्हणजे ढेकूण चिरडण्याइतकाच क्षुद्र ठरेल. शिवाजीवर किंवा सर्रास हिंदू नृपतींवर दगलबाजीचे आरोप करणाऱ्या इंग्रज इतिहासकारांना रॉबर्ट क्लाईव्ह, वॉरन हेस्टिंग्ज, लॉर्ड डलहौसी इत्यादि अनेक राजकारणी महापुरुषांची कारस्थाने साजरी गोजरी वाटण्याचे आम्हाला तरी एवढेच कारण दिसते की, त्यांनी `दगलबाजी’ या ऊर्दू-मराठा शब्दाला `डिप्लोमसी’ हा एक गोंडस इंग्रजी शब्द प्रचारात आणलेला आहे. त्याच्या पोटात स्वर्गनरकासह सारे विश्व पचनी पडले तरी त्याला अजीर्ण म्हणून कधी व्हायचेच नाही.

डिप्लोमसी ऊर्फ दगलबाजी ही राज्यक्रांतीची जीवनदेवता आहे. हिच्या उपासनेने स्वराष्ट्राच्या भाग्यसिंधूला अपरंपार भरती आणणाऱ्या सर्व डिप्लोमॅटांची क्षुद्र लौकिकी नीतीच्या चव्हाट्यावर चिकित्सा करणे चिकित्सकांच्या क्षुद्र मनाचे द्योतक होय. डिप्लोमॅट ऊर्फ राजकारणी दगलबाजांना संसारी नीतीच्या दण्डकाखाली खेचले, तर पृथ्वीवरील कोणत्याही चक्रवर्ती नृपतीच्या आणि लोकशाहीब्रुव राज्यसत्तेच्या तोंडाला फासायला काळ्याशिवाय दुसरा रंगच उरणार नाही.

अर्थात् स्वराज्य-संस्थापक आणि साम्राज्य-प्रसारक राष्ट्रवीरांच्या चारित्र्याकडे पहाण्याची ही दृष्टीच चुकीची आहे स्वदेशाच्या सौभाग्याचे आणि स्वातंत्र्याचे अत्युच्च आणि व्यापक ध्येय साधण्यापलीकडे राष्ट्रवीरांना स्वतःचा स्वार्थ असा काहीच नसतो. स्वार्थाचा संन्यास करू कोट्यवधी स्वदेश बांधवांच्या हितासाठी झगडतांना, त्यांच्या हातून घडतील त्या बऱ्या वाईट कृत्यांची परीक्षा संकुचित अशा संसारी नीतीच्या दुर्बिणीतून करणे सपशेल चुकीचे आहे. पुष्कळ वेळा राष्ट्रसेवेच्या व्यापक ध्येयासाठी झगडणाऱ्या जातीवंत क्षुद्रांकडून अमानुष कृत्ये घडतात, नाही असे नाही. म्हणून काय या साऱ्या स्वराज्य व स्वधर्म सेवकांना क्षुद्र लेखायचे? हे अत्याचार त्यांनी काय स्वार्थासाठी केले? स्वार्थच मानायचा तर तो इतका महासागरासारखा आहे की, त्यांत त्यांच्या दोषांचे प्रमाण म्हणजे दर्यामें खसखस!

पुढे वाचा : दगलबाज शिवाजी भाग : ३

हेही वाचा : 

शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश

तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

लोकशाही मुल्यांमुळेच रयतेला शिवशाही हवीहवीशी

महात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख