दादरा-नगर हवेलीचा सामना शिवसेना जिंकू शकते का?

२७ ऑक्टोबर २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा-नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी गेल्यावर्षी मुंबईत आत्महत्या केली होती. ३० ऑक्टोबरला या जागेसाठी पोटनिवडणुक होईल. ही लढत प्रामुख्याने शिवसेना आणि भाजप यांच्यात होतेय. मोहन डेलकर हे तब्बल ७ वेळा इथून खासदार म्हणून निवडून आलेत. त्यांच्या पत्नी कलाबेन या स्वतः शिवसेनेच्या उमेदवार असल्यामुळे या इंटरेस्टिंग लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानं बॉलिवूड ढवळून निघालं होतं. मीडिया-सोशल मीडियात दिवस रात्र हे प्रकरण गाजत होतं. राजकीय पक्ष एकमेकांवरच्या आरोप-प्रत्यारोपांमधे दंग होते. त्यावरून महाराष्ट्रात राजकीय धुळवडीचं चित्र पहायला मिळालं होतं.

यादरम्यान केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा-नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनीही आत्महत्या केली होती. थेट मुंबईतल्या एका हॉटेलात त्यांनी आत्महत्या केल्यामुळे हे प्रकरणही बरंच गाजत होतं. सुशांतसिंगच्या आत्महत्येवरून महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारला धारेवरून धरणाऱ्या भाजपलाच थेट टिकेचं लक्ष केलं जातं होतं.

मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमधे दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचंही नाव आलं होतं. नियम डावलून पटेल यांची प्रशासक म्हणून  निवड केल्यामुळे केंद्र सरकारवर टीका केली जात होती. ३० ऑक्टोबरला इथं लोकसभेची पोटनिवडणुक होतेय. इथून ७ वेळा खासदार राहिलेल्या डेलकर यांच्या पत्नी कलाबेन स्वतः शिवसेनेच्या उमेदवार असल्यामुळे या इंटरेस्टिंग लढतीकडे लक्ष लागलंय.

हेही वाचा: २२० पारचा नारा देणाऱ्या भाजपला अपयशाचं तोंड का बघावं लागलं?

मोहन डेलकर यांचा राजकीय प्रवास

मोहन डेलकर यांचा जन्म १९ डिसेंबर १९६२ला दादरा-नगर हवेलीची राजधानी सिल्वासा इथं झाला. त्यांचे वडील संजीभाई डेलकर हे १९६७मधे काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले होते. १९६९ला काँग्रेस पक्ष फुटला आणि संजीभाई, मोरारजी देसाई आणि के. कामराज यांच्या नेतृत्वातल्या सिंडिकेट काँग्रेसमधे सामील झाले. पण १९७१च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

संजीभाई यांचा मुलगा असलेल्या मोहन डेलकर यांची कामाची सुरवात सिल्वासा इथल्या एका कामगार संघटनेतून झाली. १९८८मधे आदिवासी विकास संघटनेची स्थापना करत त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी लढा उभा केला. १९८९मधे त्यांची पहिल्यांदा अपक्ष खासदार म्हणून लोकसभेत एण्ट्री झाली. पुढे १९९१ आणि १९९६ला ते काँग्रेसकडून लोकसभेत निवडून गेले. तर १९९८मधे भाजपकडून लोकसभेत गेले. तर १९९९ला अपक्ष आणि २००४ला त्यांनीच स्थापन केलेल्या भारतीय नवशक्ती पक्षाकडून निवडून आले.

२००९ला ते पुन्हा काँग्रेसमधे आले. पुन्हा काँग्रेसपासून वेगळे झाले. २०१९ला लोकसभेची निवडणूक जिंकली. मोहन डेलकर ७ वेळा लोकसभेवर निवडून गेले. लोकांनी त्यांना भरभरून पाठिंबा दिला. लोकसभेतल्या आदिवासी प्रश्नांशी संबंधित वेगवेगळ्या समित्यांवर त्यांनी कामही केलं होतं.

मुंबईत केली होती आत्महत्या

केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली होती. मरीन ड्राइवच्या हॉटेल 'सी-ग्रीन साऊथ'मधे त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी १५ पानांची एक सुसाईड नोटही लिहिली होती. त्यात दादरा-नगर हवेलीच्या बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नाव आली होती.

त्यांच्या आत्महत्येनंतर एका नावाची फार चर्चा झाली ती म्हणजे इथले प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांची. प्रशासनाकडून त्यांना सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न झाला. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी त्यांना पटेल यांच्याकडून अपमानित करण्यात आलं. त्यांच्यावर दबाव टाकल्याचं डेलकर यांनी या सुसाईड नोटमधे म्हटलं होतं. तशाच प्रकारचे आरोप डेलकर यांच्या कुटुंबियांनीही केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहम्मद फैजल केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीपचे खासदार आहेत. तर पटेल यांच्याकडे लक्षद्वीपच्या उपराज्यपाल पदाचीही जबाबदारी आहे. घटनात्मक पदावर असूनही पटेल आपला धार्मिक आणि राजकीय अजेंडा राबवत असल्याचा गंभीर आरोप फैजल यांनी त्यांच्यावर केला होता. विशेष म्हणजे पटेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात गृह खात्याचे राज्यमंत्री होते.

हेही वाचा: कोल्हापूरकरांनी आमचं ठरलंय म्हणत आठ आमदारांना घरी बसवलं!

पत्नीला शिवसेनेकडून उमेदवारी

मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा-नगर हवेली लोकसभेसाठी पोटनिवडणूक होतेय. ३० ऑक्टोबरला निवडणूक तर २ नोव्हेंबरला निकाल लागेल. मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर या शिवसेना पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात. त्यांनी ७ ऑक्टोबरला शिवसेनेत प्रवेश केल्यावर त्यांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती.

१९५४ला दादरा-नगर हवेली पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त झाला. १९६१ला केंद्रशासित प्रदेश म्हणून हा भाग भारताशी जोडला गेला. दादरा-नगर हवेलीच्या उत्तरेला गुजरात तर दक्षिणेला महाराष्ट्र ही राज्यं आहेत. इथल्या प्रमुख भाषाही गुजराती आणि मराठी या आहेत. इथं एकूण लोकसंख्येच्या ६२.२४ लोकसंख्या ही आदिवासी समाजाची आहे.

हा आदिवासीबहुल भाग असल्यामुळे मोहन डेलकर यांच्यामागे ही ताकद सातत्याने उभी राहिली. त्यांच्या पत्नी कलाबेन डेलकर स्वतः निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे त्याचा फायदा शिवसेनेला होईल असं म्हटलं जातंय. त्यामुळेच शिवसेनेनं इथं ताकद लावलीय. खासदार संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्याकडे पोटनिवडणुकीची जबाबदारी आहे. तसंच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही इथं प्रचारसभा घेतलीय.

लढत भाजप आणि शिवसेनेत

शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांच्या विरोधात भाजपकडून महेश गावित आणि काँग्रेसनं महेश धोडी यांना मैदानात उतरवलंय. महाराष्ट्रात सत्तेत असलेले काँग्रेस आणि शिवसेना इथं एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही भाजपच्या उमेदवारासाठी सभा घेतायत.

'आपल्या लोकप्रिय नेत्याला आत्म्यहत्येसाठी प्रवृत्त करणं हे हत्येपेक्षा कमी नाही. अशा गुन्हेगारांना शिक्षा करावी लागेल. त्यांना उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. ज्या विचारांनी मोहन डेलकर यांना तुमचा लोकप्रिय नेता बनवलं तोच विचार मीही पुढे घेऊन जाईन.' असं म्हणत कलाबेन डेलकर या प्रचार सभांमधून मतदारांना भावनिक साद घालतायत.

ही लढत प्रामुख्याने शिवसेना आणि भाजप यांच्यातच  होईल. मराठी मतदारांची १८ टक्के मतं असल्यामुळे त्यावर शिवसेनेचा डोळा आहे. अनुसूचित जातीसाठी हा मतदार संघ राखीव असल्यामुळे आणि भाजपनेही इथं आदिवासी उमेदवार दिलाय. त्यामुळे मोहन डेलकर यांचा इथला करिष्मा, दादरा-नगर हवेलीचे प्रशासक पटेल यांच्याबद्दलचा रोष, सहानुभूतीची लाट अशा सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असतील.

हेही वाचा: 

सत्ता संघर्षाच्या पेचात देवेंद्र फडणवीस एकाकी

तर नितीन गडकरीच होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!

तरुण भारतच्या निशाण्यावर संजय राऊत की उद्धव ठाकरे?

शिवसेना-भाजपमधला सध्याचा पेच निव्वळ सत्तेपुरता नाही, तर

शिवसेनेची संधी हुकल्याने हा असेल सत्तेचा सगळ्यात सोप्पा फॉर्म्युला