कोरोना काळातल्या शैक्षणिक पर्वातली आव्हानं

१२ ऑक्टोबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत.

शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आनंदाचं, जडणघडणीचं मुख्य ठिकाण. पालकांचं आधारस्थान. रिक्षा, वॅन, स्कूल बसचालकांचं पोटापाण्याचं साधन. संस्थाचालकांची कृतिशीलता, नियोजनाचं ठिकाण आणि समाज विकासाचं केंद्र आहे. आता शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या आहेत आणि संपूर्ण समाजात आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे.

लगेच समोर येणारे सजीव घटक म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक आणि सेवक आणि निर्जीव घटक म्हणजे पाठ्यपुस्तकं, वह्या, बाक, दप्तरं, गाड्या, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, पायाभूत सुविधा असे आहेत. या सर्व घटकांची खरी कसरत आणि कसोटी आता आहे.

कोरोना अजून पूर्णत्वाने गेलेला नाही. तो वातावरणातून कधीही जाणारही नाही. त्यामुळे त्यापासून पूर्वप्रतिरक्षा कशी करायची तसंच त्याच्यामुळे मुलांच्या मनात निर्माण झालेली भीती किंवा पालकांमधे असलेली दहशत कमी कशी करायची आणि आपलं काम व्यवस्थितपणे कसं सुरू ठेवायचं, हे आव्हान शाळांना आता पेलायचं आहे.

घाबरून किंवा निराश होण्याचं कारण नाही. कारण, पृथ्वीतलावरचा बुद्धिमान जीव म्हणून माणसाचा उल्लेख केला जातो. आपण हे आव्हान घेऊया, झेलूया आणि पेलूया. काय करावं लागेल यासाठी? कोणती काळजी घ्यावी लागेल? नियोजनात काय करायला हवं? कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावं लागेल? किती वेळ द्यावा लागेल? अशा अनेक दृष्टिकोनातून आपल्याला यासंबंधी सखोल विचार करायला हवा.

लक्ष्य १०० टक्के उपस्थितीचं

शाळेसमोर पहिलं आव्हान आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणं. शाळा सुरू झालेल्या आहेत; पण बहुतांश शाळांमधे १० ते २० टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली आहे. ही उपस्थिती वाढवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा शाळेतल्या सर्व घटकांनी म्हणजेच मुख्याध्यापक, शिक्षक, सेवक यांनी सर्वेक्षण करण्याची गरज आहे.

जे विद्यार्थी अनुपस्थित आहेत, त्यांचे नेमके प्रश्न काय आहेत, हे त्यांच्या पालकांशी समन्वय साधून माहीत करून घेऊन त्यावर तोडगा काढणं आणि विद्यार्थी शाळेमधे कसे येतील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. शहरांमधून वाहतूक, दळणवळण ही पहिली समस्या आहे. यासाठी रिक्षा, वॅन, स्कूल बसचालक, मालकांशी मुख्याध्यापकांनी-शिक्षकांनी सातत्याने चर्चा करून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासंबंधी त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे. त्यांच्या मनात सकारात्मक विचार रुजवले पाहिजेत.

अनेक विद्यार्थ्यांमधे कंटाळा किंवा आळस निर्माण झाला असण्याचीही शक्यता आहे. तो दूर कसा करायचा, याचा विचार मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी करणं गरजेचं आहे. त्यामुळे सुरवातीच्या ८-१० दिवसांमधे शाळांमधून विद्यार्थ्यांची उपस्थिती १०० टक्के कशी होईल हे यासाठी प्रयत्न करावे लागतील. अर्थात, हे साध्य करायचं असेल तर शाळेमधे काही गोष्टी नव्याने कराव्या लागतील.

हेही वाचा: डिसले गुरुजींकडून आपली शिक्षणव्यवस्था काय शिकणार?

विद्यार्थ्यांना काय हवंय?

विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे काही उपक्रम शाळांनी आयोजित केले पाहिजेत. उदाहरणार्थ, विनोदी कथाकथन, उत्तम प्रकारच्या सीडी दाखवणं, यूट्यूबवर असणारे चांगले कार्यक्रम एलसीडीच्या माध्यमातून स्क्रीनवरून विद्यार्थ्यांना दाखवणं, वर्गात घेता येतील असे मानसशास्त्रीय खेळ घेणं, छोटे छोटे संगीताचे कार्यक्रम आयोजित करणं.

विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त बोलण्याची संधी देणं अशा गोष्टींचं नियोजन करून शाळेचं वातावरण जर हलकंफुलकं ठेवलं, तर विद्यार्थी पटसंंख्या आणि उपस्थिती वाढवायला याची निश्चितच मदत होईल.
विद्यार्थी शाळेत का येतो किंवा पालक विद्यार्थ्यांना शाळेत का घालतात, याचं मुख्य कारण आहे त्या विद्यार्थ्याला विविध विषयांचं ज्ञान मिळणं भाषा, गणित, समाजशास्त्र, विज्ञान या विषयांवर प्रभुत्व मिळवणं यासाठी विद्यार्थी शाळेमधे येतात.

शिक्षकांचं पूर्वनियोजन आवश्यक

पालकांचा मुख्य दृष्टिकोन लक्षात घेऊन आपल्याला जेवढा वेळ दिला आहे त्या-त्या वर्गावर जाऊन खणखणीत पद्धतीने शिकवलं पाहिजे. विद्यार्थी शिक्षकांकडून शिकण्यासाठी आसुसलेले आहेत. विद्यार्थी शिक्षकांशी चर्चा करण्यासाठी खूप उद्युक्त झालेले आहेत.

विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून खूप संबोध समजलेलं नाहीत. कोणतीही संकल्पना किंवा घटना कानांनी ऐकून नुसती समजते. त्यापेक्षा डोळ्यांनी पाहून जास्त समजते आणि प्रत्यक्ष कृतीतून किंवा सहभागातून सर्वात चांगली समजते, हे शिक्षणाचं मूलभूत तत्त्व आहे.

ऑनलाईनच्या माध्यमामुळे विद्यार्थी या मूलभूत तत्त्वापासून दीड वर्ष वंचित आहेत. त्यामुळे वर्गात शिक्षकांनी शिकवताना काही कृती करणं, विद्यार्थ्यांचा सहभाग घेणं, काही प्रयोग करून दाखवणं, शैक्षणिक साधनांचा वापर करणं, आपल्या पाठामधे रंजकता कशी आणता येईल याचा विचार करणं हे पूर्वनियोजन अत्यंत आवश्यक आहे.

शिक्षकांचं शिकवणं जर प्रभावी, कल्पक, परिणामकारक आणि रंजक असेल, तर विद्यार्थी आपोआप, नकळत शिक्षणाकडे आकर्षित होणार आहे. त्यामुळे नव्याने सुरू झालेल्या शालेय जीवनामधे शिक्षक हा कणा असणार आहे.

हेही वाचा: ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास घेणाऱ्या शिक्षकांना ‘नितळी’च म्हणायला हवं

विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीचा प्लॅन

विषयज्ञान मिळवण्याबरोबरच विद्यार्थी शाळेत शारीरिक तंदुरुस्तीसाठीही आलेले असतात किंवा कोरोनाने आपल्याला कोणता धडा दिलेला आहे हे जर आपण समजून घेतलं, तर या नव्याने सुरू झालेल्या शाळांमधे वेळापत्रकात आमूलाग्र बदल करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कसं प्राधान्य देता येईल, यासाठी वेळापत्रकात कसा वेळ देता येईल याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे.

विद्यार्थी शाळेमधे आल्यानंतर तिथे त्यांची प्रतिकारकशक्ती वाढवायची असेल, विशेषतः कोरोनावर मात करायची असेल, तर योग, मुद्रा, ध्यान आणि विविध प्रकारचे प्राणायाम हे घटक रोज विद्यार्थ्यांकडून करून घेतले पाहिजेत. पूर्वप्रतिरक्षा म्हणून याची नितांत आवश्यकता आहे. विद्यार्थ्याला गणित, विज्ञान, इंग्रजी कमी प्रमाणात आलं तरी एकवेळ चालेल; पण त्याचे आरोग्य किंवा तब्येत मात्र १०० टक्के उत्तमच असली पाहिजे, हा विचार आपल्या मनात सदैव असला पाहिजे.

महात्मा गांधींनीसुद्धा जीवन-शिक्षण म्हणजेच आधी जीवन, मग शिक्षण असा संदेश दिलेला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांची तब्येत उत्तम राहण्यासाठी त्यांना आहारसवयी, आरोग्यसवयी यासंदर्भात योग्य त्या तज्ज्ञ व्यक्तींची किंवा डॉक्टरांची व्याख्यानं आयोजित करून मार्गदर्शन करणं ही आजची खरी गरज आहे.

लेखन, वाचन आणि कॅलक्युलेशन

शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता उत्तम प्रतीची असली पाहिजे. यासाठी शाळांना समुपदेशनाचा आधारही घ्यावा लागेल. वैयक्तिक समुपदेशन न करता सामूहिक समुपदेशनाचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना नकळत सल्ले दिले गेले पाहिजेत. कोरोनामुळे त्यांच्या मानसिकतेचं खच्चीकरण काही प्रमाणात झालंय ते आपल्याला उंचवायचं आहे.

ऑनलाईनच्या पार्श्वभूमीवरून विद्यार्थ्यांना आता ऑफलाईन शिक्षण मिळणार आहे. ऑफलाईन शिक्षणामधे शिक्षकांनी मूलभूत संबोधावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. उदाहरणार्थ, कोरोना काळात सर्वत्र काही चर्चा ऐकण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थी घरी असल्यामुळे त्यांची लेखनक्षमता कमी झालेली आहे. याचा आपल्याला विचार करता येईल का आणि वर्गात रोज विद्यार्थ्यांचे लेखन घेता येईल का, हे पाहावं लागेल.

सर्व भाषांचं डिक्टेशन विद्यार्थ्यांना देऊन एक महिनाभर ही अनुभूती द्यावी. यामधून नेमकं कोणत्या विद्यार्थ्याचं लेखन कसं आहे हे शोधून काढावं. ज्याचं लेखन उत्तम आहे त्याच्या लेखनाचा वेग वाढवावा. असे लेखनाचे विविध पैलू आपल्याला अध्यापनातून घ्यावे लागतील.

लेखनाबरोबरच विद्यार्थ्यांची वाचनक्षमता आणि कॅलक्युलेशन अ‍ॅबिलिटी कितपत आहे याचाही अंदाज घ्यावा. या जर तीन गोष्टी विद्यार्थ्यांना उत्तम आल्या, तर त्यांना सर्व विषय वाचून समजणार आहेत. फक्त गणित आणि भौतिकशास्त्र यासाठी आपल्याला अधिक कष्ट घ्यावे लागतील.

हेही वाचा: तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ

शिक्षणातलं आधुनिक तंत्रज्ञान

ऑफलाईन शिक्षण पद्धतीमधे ऑनलाईनचा अजिबातच समावेश करणार नाही, असा अट्टाहास शिक्षकांनी धरू नये. कारण, इथून पुढच्या काळामधे ऑनलाईन + ऑफलाईन अशी संमिश्र शिक्षण पद्धती सुरू राहणार आहे.

ऑनलाईन शिक्षण ही एक आपल्याला मिळालेली पर्वणी आहे. या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरचं ज्ञान देऊ शकतो, असा विचार शिक्षकांनी करून त्या-त्या वयोगटानुरूप काय काय शिकवता येईल याचा अभ्यास केला पाहिजे. त्याचं पूर्वनियोजन करून, हे भाग डाऊनलोड करून ते विद्यार्थ्यांना पाठवले पाहिजेत.

प्रत्यक्ष वर्गात शिकवताना मल्टिमीडिया, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, इंटरनेट याचा वापर केला पाहिजे. तसंच गृहपाठाच्या वह्या करण्याऐवजी विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या प्रश्नपेढ्या देता येतील आणि त्यांची उत्तरंही ऑनलाईन माध्यमातून मागवता येतील. अर्थात, हे सगळं करण्यासाठी शिक्षकांना शाळेव्यतिरिक्त काही वेळ खर्ची घालावा लागेल. शिक्षकांशिवाय काहीही होणार नाही, हे शिक्षण क्षेत्रातलं मूलभूत, गाभाभूत तत्त्व आहे हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.

लोकसहभागामधून शिक्षण

दीड वर्षानंतर शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय गोष्टींतून काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. यातला पहिला निर्णय म्हणजे सुट्ट्यांची संख्या कमी करणं. दिवाळीची सुट्टी फक्त एक आठवडा केली, तर ११ दिवस शिक्षणाचे मिळू शकतील. याप्रमाणे नाताळची सुट्टी, मे महिन्याची सुट्टी कमी करून आपल्याला विद्यार्थ्यांना न्याय देता येईल का, याचा विचार करण्याची गरज आहे.

परीक्षा नावाच्या घटकासाठी शाळेच्या शैक्षणिक वर्षातले जवळपास ८० दिवस खर्ची पडतात. आपल्याला ही पद्धत बंद करून काही वेगळ्या पद्धती आणता येतील का, याचा विचार शासनाने करण्याऐवजी प्रत्येक शाळेने करावा. कारण, प्रत्येक शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांची भौगोलिक स्थिती, मानसिक स्थिती वेगवेगळी आहे. पुढचा मुद्दा म्हणजे आपल्या शाळेच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवणं.

लोकसहभागामधून प्रत्यक्ष विविध कला असणारे कलाकार शाळेत बोलवावेत. मनुष्यबळाचा वापर करावा, उपक्रमांसाठी निधी समाजातून उभा करावा, सीएसआर फंडांचा जास्तीत जास्त सदुपयोग व्हावा या सर्व प्रशासकीय गोष्टींवर आता शाळांनीच प्रयत्न केले पाहिजेत. शासनावर फार अवलंबून राहू नये. शाळेने स्वतःचा आराखडा तयार करावा आणि तो अंमलात आणावा. ही कोरोनाने आपल्याला दिलेली शिकवण आहे.

हेही वाचा: 

ऑनलाईन क्लासपासून मुलांचे डोळे वाचवा

कशी करायची ई-लर्निंग प्लॅटफॉर्मची निवड?

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

राष्ट्रीय कन्या दिन :  तारा मनाच्या का मूक होऊ लागल्या?

कोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात?

(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ असून त्यांचा लेख दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)