कोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा

१८ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


अमेरिकेतल्या एलिझाबेथ यांना फ्लूसारखी लक्षणं दिसू लागली. त्यांनी तात्पुरती औषधं घेतली आणि घरीच आराम केला. त्यांचा ताप उतरला. पण आपल्याला कोरोना असेल अशी शंका त्यांना आली. तपासणी केली असताना त्यांचा रिपोर्ट चक्क पॉझिटिव आला! कोरोनाचा संसर्ग होऊन त्यातून बऱ्या झालेल्या एलिझाबेथ यांची ही गोष्ट वाचायलाच हवी.

आपल्याला कोरोना वायरस झाला तर? या विचारानं सध्या अनेक जण धास्तावलेत. एका अर्थानं हा विचाराचा कोरोना आहे. कोरोनावर लसही उपलब्ध नाही. असं असताना कोरोना झाला म्हणजे आता मृत्यू अटळ असाच अनेकांचा समज असतो. पण कोरोनाला घाबरायची अजिबात गरज नाही! योग्य काळजी आणि उपचार घेतले तर कोरोना झाला तरी त्यातून आपण सहीसलामात बाहेर येऊ शकतो. अमेरिकेच्या एलिझाबेथ श्लाइडर यांच्या उदाहरणातून हेच तर दिसून येतं!

अमेरिकेच्या वॉशिंग्टन जिल्ह्यातल्या सिएटल शहरात एलिझाबेथ राहतात. अमेरिकेत कोरोना वायरसचे सर्वाधिक बळी या वॉशिग्टनमधेच गेलेत. वॉशिंग्टन हे अमेरिकेतलं सगळ्यात मोठं शहर आहे. एलिझाबेथ यांनाही कोरोनाची लागण झाली होती. पण त्यांनी योग्य उपचार घेतले आणि त्या त्यातून पूर्णपणे बऱ्या झाल्या. एलिझाबेथ यांनी स्वतःहून आपल्या फेसबूक अकाऊंटवर आपली स्टोरी शेअर केलीय. डेलीमेल यासारख्या अनेक वेबसाईटवरसुद्धा कोरोनाशी शास्त्रीय पद्धतीनं पंगा घेण्याची त्यांची ही स्टोरी प्रसिद्ध झालीय.

हेही वाचा : विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करता, पत्रकार सांगतेय स्वानुभव

अंगात अचानक भरला १०३ डिग्री ताप

या बातमीनुसार, एलिझाबेथ या ३७ वर्षांच्या बायोमेडिकल इंजिनयर आहेत. २५ फेब्रुवारीच्या आसपास त्यांना फ्लूची लक्षणं जाणवू लागली. तीन दिवसांपूर्वी त्या एका पार्टीला गेल्या होत्या. ‘मी सकाळी झोपेतून उठले तेव्हा मला खूप थकवा जाणवू लागला. त्या मागील आठवडा मी खूप धावपळीत काढला होता. मला वाटलं, त्यामुळेच थकवा आला असेल. मी नेहमीप्रमाणे आवरलं आणि ऑफिसात हजर झाले.’ एलिझाबेथ सांगतात. त्या एका बायोटेक्नॉलॉजीकल कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात.

पण ऑफिसला गेल्यावर दुपारपर्यंत त्यांचं डोकं दुखू लागलं. त्यानंतर सटकून ताप भरला आणि अंगही दुखायला सुरवात झाली. त्यांनी घरी जायचा निर्णय घेतला. त्या घरी आल्या आणि झोप काढली. झोपेतून उठल्यावरही अंगात १०३ ताप असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ‘त्यानंतर मला थरथरायला लागलं. खूप थंडी वाजू लागली. मग मला फार काळजी वाटू लागली.’ एलिझाबेथ.

एका मेडिकलच्या दुकानातून एलिझाबेथ फ्लूवर काम करणारी औषधं घेऊन आल्या. आपल्या एका मित्राला फोन करून त्यांनी याची माहिती दिली. इमरजन्सी आलीच तर कुणी सोबत असावं, म्हणून त्या मित्राला सांगून ठेवलं. पण काही दिवसांनी ताप कमी होऊ लागला.

हेही वाचा : केरळनं तुटवडा बघून स्वतःचं सुरू केली मास्क, सॅनिटायझरची निर्मिती

घरीच केली तपासणी

अशातच, त्या फेसबूक पाहत होत्या. तेव्हा एका पोस्टमधून आपण ज्या पार्टीला गेले होतो त्या पार्टीतल्या अनेकांना असाच त्रास होतोय हे त्यांना लक्षात आलं. हे कळल्यावर एलिझाबेथ यांना शंका वाटू लागली. पार्टीतले जवळपास ५ ते ६ जण फ्लूसारखी लक्षणं जाणवत असल्यानं डॉक्टरांकडे गेले होते. पण त्यातल्या कुणालाच श्वास घ्यायला त्रास होत नव्हता. किंवा खोकलाही येत नव्हता. म्हणून डॉक्टरांनी त्यांना कोरोना टेस्टसाठी पाठवलं नव्हतं हेही एलिझाबेथ यांना कळालं. वॉशिंग्टनमधे जवळपास दोनशे लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून दोनेक डझन लोकांचा जीव गेलाय.

आता आपणंही डॉक्टरकडे गेलो तरी आपली कोरोना टेस्ट होणार नाही हे त्यांनी ओळखलं. पण आपल्याला कोरोना झाला आहे की नाही हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी त्यांनी एका रिसर्च प्रोग्राममधे भाग घेतला. हे संशोधन करणाऱ्यांनी एलिझाबेथ यांच्या घरी एक तपासणी किट पाठवलं. या किटला नेझल स्वॅब किट असं म्हणतात. म्हणजे माणसाच्या थुंकीतून त्याच्या शरीरात असणाऱ्या वायरसची तपासणी केली जाते.

एलिझाबेथ यांनी ही तपासणी केली आणि आपलं सॅम्पल त्या संशोधकांकडे परत पाठवलं. एलिझाबेथ सांगतात, ‘त्या रिसर्च कोऑर्डिनेटरने ७ मार्चला मला फोन केला आणि कोविड-१९ म्हणजेच कोरोनाच्या तपासणीत माझे रिझल्ट पॉझिटिव आले असल्याचं सांगितलं.’ थोडक्यात, एलिझाबेथ यांना कोरोनाची लागण झाली होती. ‘कोरोनाच्या रूग्णांची असते तितकी गंभीर माझी परिस्थिती नव्हती. त्यामुळे हे ऐकल्यावर मला थोडं आश्चर्यच वाटलं,’असं एलिझाबेथ म्हणतात.

हेही वाचा : कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

पण घाबरायची गरज नाही

स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना आणखी ७ दिवस घरीच आराम करा असा सल्ला दिला. गर्दीच्या ठिकाणी अजिबात जाऊ नका, असंही बजावलं. डॉक्टरांच्या सूचनांचं काटेकोर पालन केल्यानंतर एलिझाबेथ आता ठणठणीत झाल्यात. ‘घाबरू नका. तुम्हाला वायरसची लागण झालीय असं तुम्हाला वाटलं तर तपासणी करून घ्या. फार गंभीर लक्षणं नसतील तर घरीच आराम करा. भरपूर पाणी प्या आणि आराम करा,’ असा सल्लाही एलिझाबेथ आपल्याला देतात.

कोरोना वायरसला घाबरण्याची गरज नाही. पण सोबतच त्याबाबतीत निष्काळजीपणाही करू नये हाच एलिझाबेथ यांचा आपल्याला सल्ला आहे. वयस्कर म्हणजेच म्हातारे लोक, लहान मुलं, गरोदर महिला आणि डायबेटीस, बीपी रूग्ण यांनी विशेष काळजी घ्यायची गरज आहे, हे तर आपण बातम्यांमधून वाचतच असतो. शिवाय, ज्यांना गंभीर लक्षणं दिसतायत त्यांनीही तातडीनं हॉस्पिटलमधे जायची गरज आहे. घरी आराम करणं आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं हे तात्पुरते उपाय असू शकतात.

हेही वाचा : 

सोनाली बेंद्रेः कॅन्सरशी पंगा घेणारी लढवय्यी

सगळ्यांनाच मास्क वापरण्याची गरज आहे का?

स्त्री सन्मानासाठी दाढीमिशा लावून काम करणाऱ्या शास्त्रज्ञ

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे? 

आपण कोरोनापेक्षा भयंकर वायरसशी लढलोय, त्यामुळे कोरोना से डरोना!

सरकारी हॉस्पिटलमधे बाळंत होणाऱ्या या आयएएस महिलेने आदर्श घडवला