सरकारच्या विमा पॉलिसी, कोरोना काळातलं सुरक्षा कवच

१९ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


तिसर्‍या लाटेची शक्यता विचारात घेऊन केंद्र सरकारने कोरोना उपचाराला कवच देणार्‍या विमा पॉलिसीचा कालावधी मार्च २०२२ पर्यंत वाढवलाय. कोरोना रक्षक आणि कोरोना कवच विमा पॉलिसी या बर्‍यापैकी स्वस्त विमा योजना आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधित पेशंटची संख्या वाढत चाललीय. त्यामुळे आता अशा प्रकारच्या पॉलिसीची खरेदी करून कोरोनाच्या उपचाराला विमा सुरक्षा कवच घेणं गरजेचं आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे संकेत मिळतायत. भारतात नवीन वेरियंट ओमायक्रॉनने धडक मारली आहे. महाराष्ट्रातही ओमायक्रॉन बाधित पेशंटची संख्या वाढत चाललीय. त्यामुळे सरकार आणि आरोग्य विभागाकडून उपचाराची पुरेशी व्यवस्था केली जात आहे. कोरोनाचा नवीन वेरियंटही फुफ्फुसात संसर्ग पसरवत असल्याचं काहींनी सांगितलंय.

संसर्गापासून वाचायचं तर सगळ्यांनी सुरक्षेच्या उपायांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. लस घेणं, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, गर्दी टाळणं यासारख्या गोष्टी करायला हव्यात. पण एखादा व्यक्ती बाधित असेल तर त्यासाठी पुरेसे पैसे हाताशी असणं गरजेचं आहे.

हेही वाचा: या आजींनी आत्ता कोरोनाला आणि १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूलाही हरवलंय

विमा पॉलिसीची कालावधी वाढवला

ज्यांच्याकडे पैशाची अडचण आहे, त्यांना काही प्रमाणात अडचणी येऊ शकतात. पण लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. कारण, सरकारने कोरेाना उपचाराला कवच देणार्‍या विमा पॉलिसीची कालावधी मार्च २०२२ पर्यंत वाढवलाय.

एखादा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर त्याने कोरोना कवचसारखी विमा पॉलिसी खरेदी करणं गरजेचं आहे. विमा नियामक संस्था ‘इर्डा’ने विमा कंपन्यांनाही कोरोनाशी संबंधित सर्व दावे तातडीने निकाली काढावेत, असं म्हटलंय.

दोन प्रकारच्या विमा पॉलिसी

प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट लक्षात असेल. दुसर्‍या लाटेचा हल्ला एवढा तीव्र होता की, बेड अपुरे पडले होते. ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती. अशावेळी काही खासगी हॉस्पिटलनी अव्वाच्या सव्वा रक्कम आकारून लोकांकडून पैसे वसूल केले. त्यामुळे गरीब लोकांना उपचार करणं कठीण गेलं.

त्या सगळ्या परिस्थितीत लोकांना उपचाराचा खर्च मिळवून देण्यासाठी विमा नियामकनेे सर्व विमा कंपन्यांना कोरोना रक्षक आणि कोरोना कवच नावाची विमा पॉलिसी लाँच करायला सांगितलं. विमा कंपन्यांनी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कोरोना रक्षक आणि कोरोना कवच पॉलिसी लाँच केली आणि लोकांच्या अडचणी कमी केल्या.

तिसर्‍या लाटेची शक्यता पाहता सरकारने या शॉर्ट टर्म पॉलिसीचा कालावधी वाढवून तो मार्च २०२२ पर्यंत केलाय. या पॉलिसीला मार्च २०२२ पर्यंत खरेदी करता येऊ शकतं आणि त्याचं नूतनीकरण करता येईल. त्यामुळे आता अशा प्रकारच्या पॉलिसीची खरेदी करून कोरोनाच्या उपचाराला विमा सुरक्षा कवच घेणं गरजेचं आहे.

हेही वाचा: ईबोलापासून नायजेरियाला वाचवणाऱ्या डॉक्टरच्या सन्मानाबद्दल अबोला

दोन्ही पॉलिसींची वैशिष्ट्यं

‘इर्डा’च्या निर्देशानुसार विमा कंपन्यांनी कोरोनाच्या उपचाराला कवच देण्याच्या उद्देशाने कोरोना रक्षक आणि कोरोना कवच यांसारख्या पॉलिसी बाजारात आणल्या आहेत. किमान ५० हजार आणि कमाल ५ लाख रुपयांपर्यंत कवच असणार्‍या या पॉलिसीचा हप्ता हा ४४७ रुपयांपासून सुमारे ५५०० दरम्यान आहे. या कवचामधे हॉस्पिटलचा दैनंदिन खर्च, औषधं, डॉक्टरची फी, हॉस्पिटलच्या इतर खर्चाचा समावेश केलेला असतो.

जर एखाद्या व्यक्तीचं वय ३५ असेल तर त्याला ४५० रुपयांच्या हप्त्यावर ५० हजारांचं कवच मिळेल. याशिवाय पॉलिसीचा कालावधी साडेतीन महिन्यांपासून ९.५ महिन्यांपर्यंत ठेवण्यात आला आहे. जर बाधित व्यक्ती घरात राहून उपचार करत असेल तर त्यावरही तत्काळ दावा मिळेल. पण यासाठी पेशंटला सरकारमान्य केंद्रावर कोरोनाची टेस्ट करावी लागेल. त्यात घरातच चौदा दिवसांपर्यंत उपचार करण्याची सवलत देण्यात येते.

सगळ्यात स्वस्त पॉलिसी

कोरोना रक्षक आणि कोरोना कवच विमा पॉलिसी या बर्‍यापैकी स्वस्त विमा योजना आहेत. सर्वसाधारण ३१ ते ५५ वयोगटातली कोणतीही व्यक्ती केवळ २२०० रुपयांचा हप्ता देऊन अडीच लाखांपर्यंत कवच मिळवू शकते. पती-पत्नी आणि मुलांसाठी ४७०० रुपयांचा हप्ता भरावा लागतो.

कोरोना रक्षक आणि कोरोना कवच विमा पॉलिसीसाठी घेण्यात येणारा हप्ताही एकरकमी असतो आणि जवळपास सर्वच कंपन्यांचा हप्ता सारखाच असतो. याशिवाय कोरोना रक्षक आणि कोरोना कवच विमा पॉलिसीच्या अटी आणि संरक्षणही जवळपास सारखंच असतं. यात फरक असला तरी तो खूपच किरकोळ असतो.

हेही वाचा: 

थंडीच्या दिवसात कोरोनाला कसं ठेवायचं दूर?

कोरोना लसीच्या स्पर्धेत कोण पुढे, कोण मागे?

आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे जातात कोविड १९ चे पेशंट?

कोरोनाची लस बनवणाऱ्या भारतातल्या तीन संस्था जग गाजवतात

लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?

(दैनिक पुढारीतून साभार)