कॉ. कुमार शिराळकर : मला न कळलेला माझा मित्र

०६ ऑक्टोबर २०२२

वाचन वेळ : ९ मिनिटं


मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कॉ. कुमार शिराळकर यांचं नुकतंच निधन झालंय. आदिवासी, शेतकरी, मजूरांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला होता. कुमार यांचं एकूण जगणं आणि चळवळीतल्या धडपडीविषयी त्यांचे एकेकाळचे सहकारी दीनानाथ मनोहर यांनी मनोविकास प्रकाशनच्या दिवाळी अंकात एक लेख लिहीला होता. त्यांनी फेसबुकवर शेअर केलेला हा लेख इथं देत आहोत.

कुमारची आणि माझी पहिली भेट झाली ती सोमनाथला. आता तर मला तो घटनाक्रम स्पष्ट आठवतही नाही. बहुधा ६९ - ७० मधे बाबा आमटे मुंबईत गेले होते, तिथं त्यांना कुमार भेटायला आला. त्यावेळी त्यानं सोमनाथला काही दिवस राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती बातमी बाबा सोमनाथला बाबांनी आम्हाला सांगितली. आम्हाला आणखीर एक साथीदार लाभावा ह्या इच्छेने किंवा चांगली नोकरी सोडून इथं येऊ इच्छिणारा हा कोण इंजिनियर आहे हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने असेल, मी त्याला पत्र लिहिलं, आणि त्यानं मला उत्तर पाठवलं. नंतर आमची सोमनाथला भेट झाली. तेव्हापासून आमचा संवाद, गेली चार तपं, चालू आहे.

काही वेळा त्यात व्यत्यय आले, काहीवेळा काही काळापुरते आम्ही एकमेकाच्या रेंजच्या बाहेरही गेलो. पण कडाक्याचं भांडण कधी झालं नाही. आणि आमच्यातला संवाद टिकून राहिला. याचं श्रेय कुणाला या मुद्यावर तुलनाच करायची तर, माझ्यापेक्षा कुमारलाच याचं श्रेय द्यावं लागेल. हा माणूस आपल्याशी हातचं राखून बोलतो, सावधानतेने बोलतो, मोकळा होत नाही, असं वाटायचं. या वाटण्याला कारण त्यावेळचं राजकीय, सामाजिक वातावरण होतंच पण त्याचा काहीसा स्वयंभू स्वभाव हेही कारण होतं.

कुमारची डावी बाजू

कुमार सोमनाथला आल्यानंतर काही दिवसांनीच बाबा आमटे परत भिवंडीला काही कार्यक्रमासाठी गेले होते. तिथं त्यांना नव्यानं स्थापन झालेल्या सर्वसाधारणपणे नक्षलवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पक्षाशी संबंध असलेली एक विदेशी तरूणी भेटली आणि बाबांना तिनं सांगितलं, 'माय बॉईज आर वर्कींग देअर इन सोमनाथ.' तोपर्यंत कुमार, मी, अजीत आणि तिथं आलेल्या पोरांमधे 'आम्ही' अशी एक ओळख आकारात यायला लागली होती. त्यामुळे आपल्याला माय बॉईज म्हणणारी ही कोण शहाणी, अशी माझी प्रतिक्रिया होती.

या बॉईजमधे तिला कोण कोण अभिप्रेत होतं हे कळणं सहज शक्य नव्हतं. खरं तर त्यावेळी माझ्या कुवतीनूसार भारतीय क्रांतीच्या संदर्भात आमची आपसात चर्चाही झाली होती. त्यात कुमार मुख्यत: युक्रांदच्या डाव्या बाजूला आहे, पण नक्षलवादी विचारांचा नाही हे लक्षात आलं होतं. तरीही तिथं आलेल्यामधे नवीन कुमार तिथं आला होता, शिवाय तो मुंबईहून तिथं आला होता, त्यामुळे त्या बॉईजमधला एक तो असावा असं वाटणं साहजिक होतं.

काही दिवसांनी आम्ही दोघंही मुंबईला ही तरुणी ज्या गटाशी संबंधित होती, अशा गटाच्या एका व्यक्तीला भेटलो, आणि त्यावेळी कुमारनी जी मतं मांडली त्यातून त्याचा या मंडळीशी छुपा किंवा उघड कुठलाच संबंध नाहीये, अशी माझी खात्री झाली.

हेही वाचा: किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?

स्वभावात बोलकेपणा, अबोलपणाही

सोमनाथला चोवीस तास आम्ही बरोबर होतो, महारोगी पेशंट सोबत भाताच्या बांध्यांमधे गुडघा गुडघा गाऱ्यात उतरून काम करत होतो, जंगलात भटकायला जात होतो, रात्री शेतात राखणीला जाऊन माचीवर झोपत होतो, बाबांशी गप्पा तर रोजच होत होत्या. संध्याकाळी चकाट्या पिटत बसत होतो. या सहवासात मी कळत, न कळत हे बघत होतो, की हा माणूस स्वत:च्या भूतकाळात अटकणारा नाही, मला कारलं आवडत नाही, मला रोज सकाळी आंघोळ केल्याशिवाय चालत नाही, अशा आपल्या सवंयीचे आपण गुलाम असल्याबद्दल तो कौतुकानं सांगत नाही.

आपण एका जातीचे आहोत असं वाटायला लागलं, पटायला लागलं. अगदी चोवीस तास आम्ही तिघंच सोबत होतो, आणि अनोळखी अशा भामरागड क्षेत्रात भटकंती करत होतो तेव्हा खरं जवळून पाहता आलं परस्परांना. या पैदल टूरमधे, पाऊलवाटा कुठे पोचतात हे माहीत नाही, माडीया, गोंडांची भाषा येत नाही, आपल्या पाठीवर महिन्याचं राशन, ज्याचं ओझं रोज कमीकमी होतयं याचं वाढतं दु:ख अनुभवावं लागतंय, अशा वेळीही आपली विनोदी बुद्धी शाबूत राखणारा दोस्त भरवशाचा आहे असं मनाला पटलं.

आपलेपणाचं नातं उभ्या आडव्या धाग्यांनी विणलं जाऊ लागलं. आणि पुढे शहाद्याच्या श्रमिक चळवळीतही, मी त्याच्यापेक्षा वयानं आणि एकूण जगाचा, जगण्याचा अनुभव जास्त असूनही चळवळीत त्याचं दादापण मी मान्य करून टाकलं. त्या घटनेला आता ४५ वर्ष झाली आहेत. पण अजूनही कुमार ही काय व्यक्ती आहे हे मला सांगता येणार नाही. तो मला कळलाय असं मी म्हणणार नाही. याचा अर्थ त्याचं जगणं बेभरवशाचं आहे असं बिलकूल नाही. त्याच्या जगण्याला एक वैचारिक खुंटा आहे हे निर्विवाद खरं आहे.

कोणत्या गोष्टी तो करणार नाही, कोणत्या गोष्टी त्याला पसंत पडणार नाहीत, याबद्दल नव्वद टक्के योग्य ठरेल असा अंदाज बांधणं अशक्य आहे, असं बिलकूल नाही. पण तरीही सामान्यपणे सामान्य माणसं जसा विचार करतील तसा तो करत नाही, तसा वागत नाही, त्याच्या प्रायोरिटी वेगळ्या असतात. पण हे लक्षात यायलाही हे संबंध बरेच दीर्घकालीन आणि जवळचे व्हावे लागले. त्याला कारण त्याच्या स्वभावातला आखीव, रेखीव बोलकेपणा किंवा अबोलपणा.

कुमार एक गूढ रसायन

शहाद्याला स्वत:ला क्रांतीकारक समजणारी आम्ही मंडळी आपसात गप्पा मारताना आपल्या भूतकाळाबद्दल, आपल्या कुटुंबियांबद्दल, आपल्या बालपणाबद्दल, आपल्या मैत्रिणींबद्दल थोडक्यात 'मी'पणाबद्दल बोलायला आणि जाणून घ्यायला उत्सुक असायचो. कुमार स्वत:बद्दल, स्वत:च्या बालपणाबद्दल, नातेवाईकांबद्दल क्वचितच बोलत असे. गंमत म्हणजे तेव्हा आमच्यात, आपल्या कुटुंबियांशी, आई, वडील, भावंडांंशी सर्वात संबंध ठेवणारा तोच होता, असं मला आठवतंय.

मला तर मित्रांचीही वैयक्तिक माहिती जाणून घ्यायची फारशी उत्सुकता नसायची, व्यक्तिगत प्रश्न विचारण्याचं मला त्याकाळी आवडायचंही नाही. कुमारच्या आईवडलांची आणि बहिणींची माहिती मला विजय कान्हेरेकडून पहिल्यांदा कळली. याचा अर्थ कुणी विचारलं तर तो माहिती द्यायला टाळायचा असं नाही. पण मार्क्सवादावरची पुस्तकं, इपीडब्लूमधले लेख, डाव्या विचाराच्या लेखकांचं ललित लेखन या विषयात तो कसा मोकळेपणी उमलून बोलायचा.

वैयक्तिक विषय निघाला, की तो मिटायचा. म्हणजे खाडकन् दरवाजा बंद नाही करून घ्यायचा, तर अलगद पाकळ्या मिटून घेणाऱ्या फुलासारखा, की लाजाळूच्या पानांसारखा. अशा या माणसाला कुठल्या कॅटेगरीत टाकावं हे मला अजूनही उमजलेलं नाही, एका अर्थानं कुमार हे रसायन मला अजूनही एक गूढ आहे, असं म्हणावं लागेल.

हेही वाचा: जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?

न कळलेला माणूस

आता काही दिवसांपूर्वीचीच घटना. हल्ली तो नाशिकहून निघणाऱ्या लोकसंपर्क दैनिकाशी संबंधित आहे, म्हणजे लोकसंपर्क सुरू करण्याचा निर्णय घेणाऱ्या, आणि त्या कामाची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतलीय अशा मंडळीतला तो एक आहे. त्या विषयी मोबाईलवर बोलताना, त्यानं सहजच तो दहा तारखेला नंदुरबारला येतोय, असं सांगितलं. मग आलास की भेटूया. लोकपर्यायच्या स्वरूपाबद्दल बोलूया, असं मी त्याला सुचवलं. तसं निश्चित कधी, किती वेळ असं काही ठरलं नाही, तशी गरजही नव्हती. पण भेटायचं असं मात्र ठरलं.

आठ तारखेला मी परत त्याच्याशी बोललो, म्हणालो, 'कुमार अरे येताना माझ्या विज्ञान कथा संग्रहाची प्रिंट कॉपी पुण्याला आहे ती घेऊन येशील का?' त्यानं ताबडतोब होकार दिला, पण 'माझं दहा तारखेचं येणं कॅन्सल झालंय, मी बाराला धुळ्याला येतोच. तेव्हा येतो नंदुरबारला घरी.' असं त्यानं सांगितलं. त्याप्रमाणे बारा तारखेला सकाळी तो हजर झाला, प्रिंट कॉपी माझ्या ताब्यात दिली, तास दीड तास आम्ही गप्पा मारल्या. त्यानंतर तो निघाला.

तो आता नंदुरबारमधल्या पार्टीच्या कार्यालयावर किंवा अक्कलकुंवा, तळोदा इथं कुठे तरी जाणार असेल, हे गृहीत धरून तो निघाला तेव्हा मी त्याला 'बस स्टॅन्डवर जाणार का?' असं विचारलं. 'नाही आता धुळे रोडवरच्या चौकात जातो, तिथं धुळ्याची बस थांबते ना,' असं म्हणून तो रस्त्याला लागलाही. तो बराच पुढे गेल्यावर त्याच्या बोलण्याचा अर्थ माझ्या लक्षात आला, आणि मी स्तिमितच झालो. त्याचा अर्थ असा होता की, त्याचं त्यादिवशी नंदुरबारला काहीही काम नव्हतं. तो धुळ्याला काही कामानिमित्त आला होता. धुळ्यापासून पुढे नंदुरबारपर्यंत तो केवळ मला प्रिंट आऊट देण्यासाठी आला होता.

त्या कथासंग्रहाची सॉफ्ट कॉपी माझ्या कॉम्प्युटरवर आहे, त्या प्रिंट आऊट कॉपीची मला अर्जंट गरज नाहीये, मी पुण्याला आल्यावर ती प्रिंट आऊट मला देऊ शकत होता, कुरियरनं पाठवू शकत होता, तुला अर्जंटली हवी आहे का? असं विचारू शकत होता, हे सर्व सोपे पर्याय त्याच्यासमोर होते. पण या माणसानं हे सोपे पर्याय सोडून केवळ अर्जंट आऊट पोचवण्याकरता, धुळे ते नंदुरबार येऊन परत जाण्याचं ठरवलं होतं. कित्येक क्षण मी त्याच्या दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो. कॉम्रेड कुमार शिराळकर हा माणूस आपल्याला कळलेला नाही, एवढंच मी स्वत:ला परत एकदा सांगितलं आणि मी रूटीन कामाला लागलो.

कलंदर कशाला म्हणायचं?

कुमार कलंदर जीवन जगलाय का? क्षणभरही न घोटाळता मी आणि त्याचे जवळचे मित्र, नाही असंच उत्तर देतील. पण त्याला ओखळणाऱ्यातल्या अनेकांना तो कलंदर वाटेल हेही खरं आहे. तो इतरांपेक्षा वेगळा दिसतो, वागतो, आपल्याला अपेक्षित असा जगत नाही, म्हणून त्याला कलंदर म्हणायचं का?

सामान्यपणे ज्यांना कामानिमित्त वेगवेगळ्या गावांना जावं लागतं, ते आपला टूर प्लॅन बनवतात. अगदी प्लॅन जरी बनवला नाही तरी, पुढच्या मुक्कामाच्या गावी जाण्यासाठी सोयीची बस किती वाजता आहे? दुपारचं जेवण कुठे घ्यायचं? रात्री झोपण्याची व्यवस्था कुणाकडे करता येईल? आणि सुप्रभातीचे कार्यक्रम कुठे उरकता येतील? याचा विचार तरी भटकंती करणारी माणसं करतात. कुमार या बाबतीत एकदम निष्काळजी आहे. तरीही तो कलंदर आहे असं मी म्हणणार नाही. तो जे कपडे घालतो त्याविषयीही तो असाच बेफिकीर असतो. आता बेफिकीरी हा कलंदर व्यक्तीचा एक गुणविशेष असतो, यात काहीच शंका नाही. पण तो स्वतः सर्वच बाबतीत बेफिकीर नाहीये.

तो इंजिनियर आहे, काही काळ त्यानं एका राष्ट्रीय पातळीवरच्या इंडस्ट्रीमधे नोकरीही केलीय. व्यवस्थित नोकरी केली असती, त्याची ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती, कामातली तल्लीनता, नक्कीच तो अधिकारपदावर पोचू शकला असता. सुखाचं, संसारी माणसाचं जीवन जगू शकला असता. तसं जगणं त्यानं केवळ नाकारलं नाही, तर लाभलेलं सोडून दिलं. हे सगळं कलंदरच माणूस करू शकतो ना? पण तरीही मी त्याला कलंदर माणूस म्हणणार नाही.

हेही वाचा: शंकर भाऊ साठे : १६ पुस्तकं लिहणारे अण्णाभाऊंचे भाऊ

जगण्याची वेगळी शैली

तो सामान्यच माणूस आहे. सामान्यासारखा जगणारा. सामान्य माणसाप्रमाणेच सामान्य जीवन जगणारा. आपल्या सारखाच जिंदगीका सफर करणारा. आपल्यासारखाच प्रवाहपतीत. तसं तर आपण सर्वच प्रवाहपतीत आहोत. पण त्यातही प्रकार आहेत.

१) सामान्यपणे आपण बहुसंख्य लोक प्रवाहाबरोबर वहात जाणं मान्य करतो

२) आपल्यातल्या काही जणांना केवळ प्रवाहाबरोबर वाहण्यात समाधान नसतं, ते जास्त वेगानं पोहून इतरांपेक्षा जास्त पुढे जाण्यासाठी धडपडतात, प्रवाहाबरोबरच पण पुढे. सर्वात पुढे

३) काही थोड्यांचा प्रवाहाबरोबर वाहत जाण्यालाच तत्वत: विरोध असतो, ते प्रवाहाच्या उलट दिशेनं पोहण्याची धडपड करत, खाली जात राहातात, परत वर जातात.

४) काहीजण असे असतात, ज्यांना किनाऱ्यावर कुठे पोचायचं आहे हे माहीत असतं, मग ते कधी प्रवाहाबरोबर हात मारीत, कधी काहीच न करता, कधी प्रवाहाच्या उलट पोहत किनाऱ्याकडे त्यांच्या इच्छित स्थळी सरकत राहतात.

५) काहीजण इतरांसारख्या सगळ्याच गोष्टी करतात, उलटं पोहता पोहता, लहर आली म्हणून अंग ढिलं सोडून ते प्रवाहात वाहण्याचा अनुभव घेतात, लहर आली वेग वाढवण्याचाही प्रयत्न करतात, कधी किनाऱा जवळ दिसला, किनाऱ्याकडे जाण्याचा सर्वशक्ती एकवटून प्रयत्न करतात, आणि किनाऱ्याजवळ आल्यावर मागंही फिरतात. मनाची लहर फिरली की काहीही करायचं, आणि जे काहीही करायचं ते जीव ओतून करायचं.

१ ते ४ प्रकारांना मी काही नावं देणार नाही. पाचवा प्रकारच्या प्रवाहपतीतांना मी कलंदर म्हणेन. कॉम्रेड कुमार शिराळकर कुठल्या गटात बसतो. मला वाटतं ते नं. ४ गटातला आहे. त्यानं किनाऱ्याला कुठे लागायचं आहे हे ठरवलं आहे. या किनाऱ्यावर त्याच्या स्वप्नातला प्रदेश असायला हवा असं त्याचा विश्वास आहे.

आपण प्रवाहासोबत चाललोय, की उलट्या दिशेनं हात मारतोय, कशा पद्धतीनं जगतोय, कसे वागतोय, कुठल्या स्टाईलने पोहतोय हा या गटातल्या माणसांच्या दृष्टीने गौण प्रश्न आहे. तसं पाहिलं तर त्याची प्रत्यक्ष जीवनशैली पाहिली तर या चौथ्या प्रकारातल्या प्रवाहपतीत आणि कलंदर प्रवाहपतीत यांच्या जगण्याच्या शैलीत साम्य वाटेल. पण ते साम्य भासमय आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

कुमारची कामातली तल्लीनता

शहादा चळवळीचे ते धामधुमीचे दिवस होते. शहादा, तळोदा तालुके पेटले होते. बेकायदेशीरपणे ज्या आदिवासींच्या जमीनी हडप केल्या गेल्या होत्या ते आदिवासी शेतकरी, ग्राम स्वराज्य समितीच्या, सर्व पक्षीय नेत्यांचा, आणि कुमारसारख्या कार्यकर्त्यांचा नैतिक पाठिंबा मिळाल्याबरोबर, त्यांचा नेता अंबरसिंग सुरतवंती याच्या नेतृत्वाखाली, जीवावर उदार होऊन मैदानात उतरले होते. त्या दिवशी ग्राम स्वराज्य समितीच्या कार्यालयात सकाळपासून हे वातावरण आपल्या खांद्यावर लेऊन खेड्यातून अनेक स्त्रीपुरूष आले होते.

अंबरसिंग आतमधे पहाडपट्टीच्या लोकांना घेऊन गुफ्तगू करत बसला होता. मोड गावांतल्या तरुणांना पोलिसांनी पकडून नेलं म्हणून त्या भागातले काहीजण आले होते. शहाणे गावची पावरा मंडळी वनखात्याचे गार्डस गावातला बकरा पळवल्याची तक्रार घेऊन आले होते. मोइद्याला आदल्या संध्याकाळी, पीक संरक्षण सोसायटीच्या बंदुका, लाठ्या, काठ्या घेतलेल्या वॉचमन्सच्या टोळीला गाववाल्यांनी कसं खदडून लावलं, याचं रोमहर्षक वर्णन काही लोक ऐकवत होते.

आम्ही सगळेच कार्यकर्ते एक्साईट झाले होतो. आणि या गोंधळातच कुमारभाऊ भिंतीला पाठ लावून मांडीवर पॅड ठेवून आपल्या मोठ्या सुवाच्य अक्षरात, आदिवासी शेतमजूरांच्या स्थितीवर म.टा.साठी किंवा लोकसत्तासाठी लेख लिहित होते. एकटाकी, खाडाखोड न करता, खाली कार्बन ठेवून. मी त्याला आदल्या रात्रीच्या रोमहर्षक प्रसंगाच्या चर्चेत खेचण्याचा प्रयत्न केला. शांतपणे त्यानं सांगितलं, 'दिन्या, हा लेख आजच पाठवायला हवा. वीस मिनिटात लेख संपवून मी जाईन त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनला. मालदारांनी खोटा एफआयआर दाखल करण्याआधी आपल्या लोकांनी तक्रार नोंदवलेली बरी.

आणीबाणीनंतर प्रत्यक्ष वास्तवात आणि भासमय वास्तवात बरेच राजकीय बदल झाले, संघटनेतले काहीजण पक्षात गेले, काहीजण दुसऱ्या डाव्या गटात. काहीजण बाहेर पडले. संघटनेचं रूप विशविशीत झालं.

हेही वाचा: सारं काही समष्टीचा एल्गार

कौटुंबिक जबाबदाऱ्या, चळवळही

गेल्या वर्षी मी पुण्याला होतो, त्याचवेळी कुमारही पुण्यात होता. आमचं भेटण्याचं ठरलं. त्यापूर्वी त्याच्या आयुष्यातला काही काळ फार ताणतणावात गेले होते. वडील गेले, नंतर बहिणीचा आजार वाढला, तीही गेली. हॉस्पिटलमधे असलेल्या मेहुण्याची शुश्रूषा करण्याची जबाबदारी त्यानं निभावली. त्या काळात कौटुंबिक अडचणींंमुळे पक्षाच्या कामाला आपण पुरेसा वेळ आणि उर्जा देऊ शकत नाही, हे लक्षात अाल्यावर त्यानं आपल्याला जबाबदारीतून काही काळ मुक्त करावं असं सांगून कौटुंबिक जबाबदाऱ्यांत जास्तीतजास्त वेळ दिला.

यात अनपेक्षित काही नव्हतं. चळवळीचं काम कुमार जितक्या तळमळीनं, निष्ठेनं करतो तितकीच तो आपल्या कुटुंबाचीही काळजी घेतो, हे त्याच्या सर्वच मित्रांना माहीत होतं. कुटुंबाशी असलेल्या आपल्या नात्यात त्यानं कधीही अंतर येऊ दिलं नव्हतं. अर्थात नातेवाईकांच्या अपेक्षा असतात म्हणून त्यानं आपल्या तत्वाला न पटणाऱ्या गोष्टी केल्या असतील हीही शक्यता नाही. हे मला इथं मुद्दामून अधोरेखित करावसं वाटलं, कारण आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षेकरता जी उर्जा आणि वेळ द्याया लागतो, त्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळल्यामुळे मर्यादा येत असतील तर आपल्या जवळच्या आप्तांना दूर लोटणारी तथकथित यशस्वी माणसं आपल्याला पाहायला मिळतात.

समष्टीचा मुक्तिवादी कॉम्रेड

कुमार एका मार्क्सवादी विचार मानतो, मार्क्सवादी विचारांच्या चौकटीत या देशात साम्यवादी व्यवस्थेकडे जाणारी समाजवादी राजवट यावी म्हणून कार्यरत असलेल्या पक्षाचा तो निष्ठावान कार्यकर्ता आहे. त्या पक्षाची शिस्त म्हणून, किंवा एक राजकीय नैतकिता म्हणून असेल, आमच्यात कधी मार्क्सवादी पक्षासंघटनेच्या संदर्भात चर्चा होत नाही.

पक्षकार्यासंबंधी माझी विधानं ही माझ्या निरीक्षणातून आकारात आलेली आहेत. ती शंभर टक्के बरोबर असतीलच असं नाही. पण मला एक निश्चित माहीत आहे की, कुमारची पहिली आणि अखेरची निष्ठा ही जगातल्या तमाम आज ज्या माणसांना सुरक्षित, सन्मानित आणि सुखी जीवन नाकारलं गेलंय त्यांच्यासाठी आहे. त्यासाठी त्यानं जी जीवनशैैली स्विकारली आहे, ती स्वयंअनुशासनाची आहे.

कलंदर शब्दाचा मान्यताप्राप्त खरा अर्थ आहे तरी काय? हे बघायचं म्हणून मराठी शब्दरत्नाकर या शब्दार्थकोशात बघितलं. तिथं कलंदर शब्दाचा अर्थ–योगी, छंदिष्ट असा दिला आहे. कॉम्रेड कुमार शिराळकरला कलंदर म्हणायचंच असेल तर छंदिष्ट असं निश्चितच म्हणता येणार नाही, योगी म्हणता येईल. पण हा योगी, स्वत:च्या मुक्तीसाठी नाही तर समष्टीच्या मुक्तीसाठी आपल्या मर्यादित उर्जेचा जास्तीतजास्त उपयोग करण्याचा प्रयत्न करतोय. या अर्थानंच केवळ कॉम्रेड कुमार शिराळकर याला कलंदर म्हणता येईल.

हेही वाचा: 

मी बंडखोर कसा झालो सांगतायत राजा ढाले

चळवळीच्या यशाचे मापदंड आज बदलतायत

ग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंनी लोककलेला आधुनिक रुप दिलं

एन. डी. पाटील यांचं जीवन, सामाजिक संघर्षाचं एक धगधगतं अग्नीकुंडच

शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा