ऑलिम्पियाड स्पर्धेत अवतरली बुद्धिबळपटूंची मांदियाळी!

२० ऑगस्ट २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतानं खुल्या गटात आणि महिलांमधेही ब्राँझ मेडल जिंकलं. वैयक्तिक विभागात सात मेडल पटकावत आपला स्वतंत्र ठसा उमटवला. सर्वोत्कृष्ट आणि शानदार संयोजन, देशांचा विक्रमी प्रतिसाद, शेवटपर्यंत चुरशीनं झालेल्या लढती, चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अर्थातच भारताला मिळालेलं घवघवीत यश हे लक्षात घेतलं, तर ही स्पर्धा भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी दिशादर्शकच ठरणार आहे.

बुद्धिबळात अनेक वेळा विश्वविजेतेपद मिळवणारे मॅग्नस कार्लसन, विश्वनाथन आनंद, अनिस गिरी, फॅबिआनो कारूआना, लेक्सी शिरोव यांच्यासारख्या श्रेष्ठ खेळाडूंचं कौशल्य बघण्याची संधी फारच दुर्मिळ असते. चेन्नईत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेमुळे चाहत्यांना ही संधी प्राप्त झाली. ही स्पर्धा खर्‍या अर्थानं बुद्धिबळपटूंची मांदियाळी ठरली.

घरच्या वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत भारतानं खुल्या गटात ब्राँझ मेडलची कमाई केली. महिलांमधेही भारतानं ब्राँझ मेडल जिंकलं. या दोन टीम मेडलबरोबरच भारतानं वैयक्तिक विभागातही दोन गोल्ड, एक सिल्वर आणि चार ब्राँझ अशी सात मेडल पटकावत खर्‍या अर्थानं या स्पर्धेत आपला स्वतंत्र ठसा उमटवला.

सर्वोत्कृष्ट आणि शानदार संयोजन, देशांचा विक्रमी प्रतिसाद, शेवटपर्यंत चुरशीनं झालेल्या लढती, चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अर्थातच भारताला मिळालेलं घवघवीत यश हे लक्षात घेतलं, तर ही स्पर्धा भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी दिशादर्शकच ठरणार आहे.

बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा इतिहास

मुळातच बुद्धिबळाची ऑलिम्पिक स्पर्धा असते, हे अनेकांना माहीत नाही. १९२४मधे आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमधे बुद्धिबळाचा समावेश करण्याबद्दल बुद्धिबळ संघटक प्रयत्नशील होते.

पण त्यावेळी हौशी आणि व्यावसायिक खेळाडू यांची स्वतंत्र विभागणी करणं शक्य नव्हतं, हे लक्षात आल्यामुळे ऑलिम्पिक संघटकांनी बुद्धिबळाच्या समावेशाचा प्रस्ताव अमान्य केला. योगायोगानं त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेची स्थापना करण्यात आली आणि पहिल्याच वर्षी त्यांनी अनधिकृत बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचं आयोजन केलं.

या स्पर्धेत मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे बुद्धिबळ संघटकांचा उत्साह वाढला आणि त्यांनी १९२७पासून अधिकृतरीत्या ऑलिम्पियाडचं आयोजन सुरु केलं. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. १९५७पासून महिलांसाठी स्वतंत्ररित्या या स्पर्धेचं आयोजन केलं जातंय.

हेही वाचा: ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम

भारताचं यशस्वी संयोजन

चेन्नईत आयोजित करण्यात आलेल्या ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचं संयोजनपद खरं तर रशियाकडे होतं. २०१९मधे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्डकप स्पर्धेबरोबरच ही स्पर्धा घेण्यात येणार होती. ही स्पर्धा पुढे ढकलण्यात येऊन मॉस्कोत २०२०मधे या स्पर्धेचं संयोजन केलं जाणार होतं; पण कोरोनाच्या कारणास्तव ही स्पर्धा होऊ शकली नाही.

त्यानंतर रशियानं युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे ही स्पर्धा इतर देशात आयोजित करण्याचं ठरवलं. आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणार्‍या भारतीय बुद्धिबळ संघटकांनी ही स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दाखवली आणि सुदैवानं आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघानं त्याला मान्यताही दिली, त्यामुळेच भारतात प्रथमच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं.

संयोजनपद मिळाल्यानंतर ही स्पर्धा शानदार स्वरूपात आयोजित करण्याची जिद्द संयोजकांनी दाखवली. भारतामधल्या बुद्धिबळाचं माहेरघर समजल्या जाणार्‍या चेन्नई शहरातच ही स्पर्धा आयोजित करण्याचं निश्चित झालं. खुल्या गटात १८४ देशातल्या १७३७ खेळाडूंचा, तर महिला गटात १६० देशातल्या ९३७ खेळाडूंचा सहभाग हा विक्रमी प्रतिसाद भारतीय संयोजकांबद्दल परदेशी खेळाडूंमधे असलेला विश्वास सार्थ ठरवणारा आहे.

बुद्धिबळात रंगलं चेन्नई

या स्पर्धेच्या निमित्तानं चेन्नई शहर अक्षरशः बुद्धिबळमय झालं होतं. शहरातले रस्ते आणि कठडे काळ्या पांढर्‍या चौकोनांच्या साहाय्यानं रंगवण्यात आले होते. विमानतळापासून स्पर्धकांच्या निवासापर्यंत अनेक ठिकाणी स्वागताचे फलक लावण्यात आले होते. प्रत्येक खेळाडूचं हार घालून स्वागत करण्यात आलं.

शहरात अनेक ठिकाणी मोठ्या आकाराचे बुद्धिबळपट आणि सोंगट्या ठेवण्यात आल्या होत्या. कोणालाही बुद्धिबळाचा आनंद घेता येईल, अशीच तिथं व्यवस्था करण्यात आली होती. स्पर्धेच्या ठिकाणी नामवंत खेळाडूंचे फोटो असलेले फलक लावण्यात आले होते. परदेशी स्पर्धकांना त्यांच्या नेहमीच्या खाद्यपदार्थांचा आनंद घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

तसंच स्पर्धकांसाठी फावल्या वेळात मनोरंजनाचे कार्यक्रम, स्मृतिचिन्हे आणि इतर भेटवस्तूंचं प्रदर्शन, बुद्धिबळाविषयी वेगवेगळ्या भाषेतल्या पुस्तकांचं दालन अशा सोयीही तिथं होत्या. एरवी क्रिकेटपटूंचे फोटो, सह्या घेण्यासाठी चाहत्यांमधे जशी चढाओढ बघायला मिळते, तशीच चढाओढ स्पर्धेच्या ठिकाणाजवळ आणि खेळाडूंच्या निवासापाशी पाहायला मिळाली. खर्‍या अर्थानं परदेशी खेळाडूंबरोबरच भारतीय खेळाडूही ‘सेलिब्रेटी’ झाले होते.

हेही वाचा: क्रिकेटच्या पिचवर रंगतोय सतरंगी प्रेमाचा किस्सा

अष्टपैलू विश्वनाथन आनंद

आनंद हा भारतामधल्या बुद्धिबळाचा युगकर्ता मानला जातो. पाचवेळा विश्वविजेतेपद मिळवणारा आनंद अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक स्पर्धांमधे चमकदार कामगिरी करत असतो. बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचं आयोजन त्याच्या शहरात म्हणजेच चेन्नईत करण्यामधे त्याचाही सिंहाचा वाटा आहे.

भारतीय खेळाडूंसाठी तो वेळोवेळी सल्लागार म्हणूनही सहकार्य करत असतो. त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा म्हणजे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघावर उपाध्यक्ष म्हणून झालेली त्याची निवड. आनंद हा क्रीडा क्षेत्रातला सेलिब्रेटी मानला गेला असला, तरीही अजूनही त्याचे पाय जमिनीवरच आहेत.

ऑलिम्पियाड स्पर्धेच्या वेळी त्यानं नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी दिली. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या उपाध्यक्षपदी त्याच्या नियुक्तीचा भारताच्या युवा खेळाडूंना खूप फायदा होणार आहे. अनेक जागतिक स्पर्धांचं आयोजनपदही भारताकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महिला बुद्धिबळपटूंचं यश

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा जर परदेशात झाली असती, तर भारताला पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी फक्त एकच टीम पाठवता आली असती. यजमानपद भारताकडे असल्यामुळे भारताला दोन्ही गटात प्रत्येकी तीन टीम उतरवण्याची संधी मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा भारताच्या युवा खेळाडूंना मिळाला.

महिला गटात भारताचं गोल्ड मेडल हुकलं. शेवटच्या फेरीत भारत ‘अ’ टीमला अमेरिकेविरुद्ध १-३ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांना ब्राँझ मेडलवर समाधान मानावं लागलं. अर्थात भारतीय टीमच्या द़ृष्टीनं ही कामगिरीही कौतुकास्पदच आहे. भारतीय टीमच्या या विजयात या टीमचे प्रशिक्षक आणि पुण्याचे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या कुशल मार्गदर्शनाचा महत्त्वाचा वाटा आहे.

तीन महिन्यांहून जास्त काळ या टीममधल्या खेळाडूंनी सराव केला होता. भारताच्या या टीममधल्या खेळाडू आर. वैशाली आणि तानिया सचदेव या दोघींनीही वैयक्तिक विभागात ब्राँझ मेडल जिंकलं. भारताच्या ‘ब’ आणि ‘क’ टीमनी अनुक्रमे आठवं आणि अकरावं स्थान घेत उल्लेखनीय यश संपादन केलं.

भारताच्या ‘ब’ टीममधली खेळाडू दिव्या देशमुखने ब्राँझ मेडलवर नाव कोरलं. यंदा महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपद मिळवणार्‍या या महाराष्ट्राच्या खेळाडूकडून खूप मोठ्या अपेक्षा मानल्या जातायत. ऑलिम्पियाडमधे तिच्याबरोबरच ईशा करवडे, सौम्या स्वामीनाथन या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अनेक अनपेक्षित निकाल नोंदवले.

हेही वाचा: दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं

द्रोणावली हरिकाची कमाल

खेळासाठी अनेक गोष्टींचा त्याग करण्याची वृत्ती भारताच्या अनेक खेळाडूंमधे पाहायला मिळते. महिला टीममधली खेळाडू द्रोणावली हरिका ही आठ महिन्यांची गर्भवती असूनही या स्पर्धेत उतरली होती. ही स्पर्धा चेन्नईतच होणार, असं कळल्यानंतर तिनं तिच्या वैयक्तिक वैद्यकीय तज्ञांकडून या स्पर्धेत खेळण्यासाठी परवानगी मिळवली.

तिच्या जिद्दीला खरोखरच सलाम म्हटला पाहिजे कारण कधी कधी बुद्धिबळाचा डाव तीन-चार तासांपेक्षा जास्त वेळ चालतो. तरीदेखील तिनं या स्पर्धेत नेहमीच्या शैलीनं सफाईदारपणा दाखवला आणि भारताला ब्राँझ मेडल मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.

तिच्याबरोबरच संयोजकांचंही विशेष कौतुक केलं पाहिजे. स्पर्धेच्या सभागृहाच्या बाहेरच त्यांनी सुसज्ज सुविधा असलेली रुग्णवाहिका आणि वैद्यकीय तज्ञांचा ताफा ठेवला होता. एवढंच नाही, तर ज्या टेबलावर तिचा सामना होता, त्या टेबलाच्या बाजूंना जाड स्पंज चिकटवण्यात येत होता.

भारतीय खेळाडूंची विशेष कामगिरी

उदयोन्मुख खेळाडू डी. गुकेश ही भारतासाठी यंदाच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडनं दिलेली मोठी देणगी म्हणावी लागेल. भारताला तीन संघ उतरवता आले, त्यामुळेच गुकेशला त्याचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत त्यानं वैयक्तिक विभागात सोनेरी कामगिरी केली. ही कामगिरी करताना त्यानं फॅबिआनो कारूआना, लेक्सी शिरोव, गॅब्रियल सर्गीसन यांच्यावर नोंदवलेले विजय बुद्धिबळ पंडितांना थक्क करणारे होतं.

त्यानं या स्पर्धेत २७०० मानांकन गुणांचाही टप्पा ओलांडला. त्यानं निहाल सरीन, आर. प्रज्ञानानंद आणि महाराष्ट्राचा रौनक साधवानी यांच्या साथीत भारताच्या ‘ब’ टीमला ब्राँझ मेडल मिळवून दिलं. वैयक्तिक विभागात निहाल यानं गोल्ड मेडल, तर प्रज्ञानानंद यानं ब्राँझ मेडल पटकावलं. अर्जुन एरिगेसी यानं रुपेरी यश संपादन केलं.

प्रज्ञानानंद याची बहीण वैशालीनेही ब्राँझ मेडल जिंकलं. भारताला यापूर्वी २०१४मधे तिसरं स्थान मिळालं होतं. भारतीय टीमला पुरुष आणि महिला या दोन्ही गटांमधे नेत्रदीपक कामगिरीबद्दल विशेष कपही देण्यात आला. या स्पर्धेतल्या कौतुकास्पद कामगिरीमुळे भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावरच्या अनेक मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धांची दारं खुली होणार आहेत.

हेही वाचा: 

 

जमाना मीमचा आहे!

मनातला रावण काढायची ‘ऊर्मी’ देणारा स्वदेस

आपले पूर्वज नॉनव्हेज खायचे, दारू प्यायचे का?

जगात सर्वात जास्त वापरलं जाणारं इमोजी कोणतं?

तुमचा फेसमास्क WHO नं सांगितल्यासारखा आहे का?

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)