ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि वि. रा. शिंदे यांचे चरित्रकार प्रा. गो. मा. शिंदे यांचं १६ एप्रिलला वृद्धापकाळाने सोलापूरात निधन झालं. ८८ वर्षांच्या पवार सरांच्या जाण्यानं व्यासंगी समीक्षक आणि उत्तम मार्गदर्शक हरपल्याची भावना सगळीकडून व्यक्त होतेय. सरांचे औरंगाबादमधले मित्र सुधीर रसाळ यांनी आपल्या ‘लोभसः एक गाव, काही माणसं’ या पुस्तकात त्यांचं व्यक्तिचित्र उभं केलंय. त्याचा हा संपादित अंश.
वेगवेगळ्या ठिकाणच्या सरकारी महाविद्यालयांत मराठी लेक्चररच्या तीन जागा १९५९ला निघाल्या होत्या. यासाठीचे इंटर्व्ह्यू मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजला घेण्यात आले. त्यावेळी माझी औरंगाबाद आणि पवारांची अमरावतीला एकाच वेळी निवड झाली. त्यावेळी पवारांनी केलेला पारंपरिक पोषाख चांगलाच लक्षात राहिलेला. पण त्यांच्याबद्दल विशेष काही वाटलं नव्हतं.
काही वर्षांतच गो. मा. पवारांची बदली औरंगाबादच्या गवर्न्मेंट कॉलेजला झाली. त्यावेळी पवारांनी भेटीचा निरोप पाठवला. मी भेटायला फार उत्सुक नव्हतो. पण पवारांशी भेट होताच त्यांचं जुनं चित्र क्षणातच पुसून गेलं. धरधरीत नाक, तेजस्वी डोळे, काहीसा लांबट देखणा चेहरा, उंच सडसडीत शरीरयष्टी, केसांचा मधोमध भांग पाडलेला आणि चेहऱ्यावर प्रसन्न हसू. त्यांचं हे चित्र पुढे कधीच बदललं नाही.
औरंगाबादला आल्यानंतर ते एका महिन्यातच औरंगाबादकर झाले. मराठवाडा द्विसाप्ताहिकाचे संपादक अनंत भालेराव, मराठी विभागाचे प्रमुख प्रा. भगवंत देशमुख, प्रा. तु. शं. कुळकर्णी, प्रा. म. द. पाध्ये, प्रा. चंद्रकांत भालेराव, कधीतरी बीडहून येणारे नरेंद्र चपळगावकर आणि मी असा मित्रपरिवार होता. यात पवार कधी सामील झाले कोणाला समजलंही नाही. तसंच अनंत भालेराव मराठवाडा साहित्य परिषद चालवत होते. त्यांच्या मैफिलीचा, कार्याचा आणि चर्चांचा पवार सहजपणे एक भाग बनून गेले. पवारांनी सगळ्यांची घरगुती नावं सार्वजनिक केली. त्यामुळे हा मित्रपरिवार अधिकच घट्ट झाला. मी बापू, पवार तात्या आणि चपळगावर नाना या आमच्या मैत्रीच्या त्रिकुटास गंगाधर गाडगीळांनी ‘बंडु बिलंदर ठरतो’ पुस्तक अर्पण केलेलं.
माझी आणि त्यांची मैत्री दिवसेंदिवस फुलत होती. पवारांची मैत्री ही फक्त एका व्यक्तिपुरता नसून ते माझ्या घरातल्या प्रत्येकाचे मित्र झाले होते. पुढं आम्हा दोघांच्या लग्नानंतर मी टिचर्स क्वॉटर्समधे रहायला आलो. त्यावेळी आमचं दोन वेगवेगळ्या घरातलं एकच कुटुंब बनलं.
मराठीच्या प्राध्यापकाचा इतर क्षेत्राशी काही संबंध नसतो असं सर्वसाधारण मत असतं. मात्र पवारांचा इतिहास, राजकारण आणि तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास होता, त्यावरुनच त्यांनी आपली मतं बनवलेली.
म्हणूनच समाजप्रबोधन संस्थेनं त्यांच्याकडून ‘विवेकनिष्ठ जीवनदृष्टी’ पुस्तक लिहून घेतलं. यात त्यांनी फ्रॉईडचं मनोविश्लेषण आणि विवेकवाद यांच्या आधारानं जीवनदृष्टीची तर्कशुद्ध मांडणी केली. एका मराठी प्राध्यापकाचं तत्त्वज्ञानावरचं पहिलं पुस्तक.
नागपूरचे तत्त्वज्ञानाचे प्रा. डी. वाय. देशपांडे आणि प्रा. मे. पु. रेगे यांनी औरंगाबादच्या तत्त्वज्ञान परिषदेची जबाबदारी पवारांना दिली. तर पवारांच्या चौरस अभ्यासामुळं त्यांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी सोळा सदस्यांची मर्यादा असलेल्या साहित्य संस्कृती मंडळाचं सदस्य बनवून घेतलं. त्या मंडळाचे पवार एकमेव तरुण सदस्य होते.
औरंगाबादच्या साहित्य परिषदेच्या कार्यवाह पदाची जबाबदारी पवारांनी तीन वर्ष सांभाळली. त्यावेळी त्यांनी अनेक साहित्य उपक्रम राबवले. त्यानंतर मराठवाडा द्विसाप्ताहिकाचं रुपांतर दैनिकात झालं, या दैनिक परिवाराचे पवार सदस्य बनले. मराठवाड्याच्या दिवाळी अंकाचं स्वरुप आणि त्याचा आराखडा बनवण्यात पवारांचा मोठा हात होता.
१९७३च्या निवडणुकांच्यावेळी सर्वपक्षीय नेत्यांच्या मुलाखती घेऊन भारताचं चित्र जनतेसमोर उभं करायचं ठरलं. त्यावेळी मुलाखती सविस्तरपणे लिहून घेण्याचं काम त्यांनी चोखपणे पार पाडलं. तसंच पवार नेत्यांना मार्मिक आणि अडचणीत टाकणारे प्रश्न विचारून नेमकी उत्तर काढून घेत.
सरकारी नोकरीसाठी जमलेल्या बेकार तरुणांवर १९७४मधे गोळीबार झाला. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात तरुणांचं उग्र आंदोलन पेटलं. यावर पवारांनी वर्तमानपत्रात लेख लिहिले. त्या लेखात त्यांनी उपाययोजना सुचवल्या आणि काही सूचना केल्या, ‘कुटुंबातील पुरुष नोकरीत असतील तर पत्नीस सरकारी नोकरीत घेऊ नये.’ या लेखावरुन खूप टीका झाली.
पवारांमधले गुण हे एखाद्या संपादकासारखे होते. म्हणूनच अनंत भालेराव मराठवाडा दैनिकाच्या संपादक पदावरुन निवृत्तीचा विचार करताना संपादक पदाची सुत्रं गो. मा. पवारकडे देण्याचा विचार त्यांनी केलेला. मात्र पवारांना आणि मला लिहिण्याचा खूप कंटाळा. लिहिण्यासाठी नेहमी टाळाटाळ करत असू. त्यामुळे वृत्तपत्र व्यवसायास ते पूरक नाही हे समजलं. पवारांना राजकारण आणि समाजकारण यात कितीही रस असला तरी ते साहित्याला पहिलं प्राधान्य देत.
पवारांनी साधारण १८ वर्षं मेहनतीनं विनोदाच्या स्वरुपावर मूलगामी, सैद्धांतिक संशोधन केलं. हा अभ्यास करताना त्यांनी प्रत्यक्ष जीवनातल्या विनोदाचाही विचार केला. यातून त्यांनी विनोदात्मकतेच्या सुखात्म जाणीवेचा सिद्धांत मांडला.
सुखात्म जाणीव अभिव्यक्ती वैशिष्ट्यांसह प्रकट झाली की विनोद निर्माण होतो. यावरुन त्यांनी विनोदातल्या अभिव्यक्ती वैशिष्ट्यांची मीमांसा केली. विनोदाला मानवी जीवनसंवर्धक मूल्य असून विनोदाची श्रेष्ठता या मूल्यावर ठरते, असा निष्कर्ष त्यांनी काढला. पवारांना चिं. वि. जोशी, वा. म. जोशी यांच्या विनोदाचा दर्जा श्रेष्ठ वाटतो.
हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी पाश्चात्य देशांमधल्या महत्त्वाच्या विनोदमीमांसक तत्त्वज्ञानी आणि समीक्षकांच्या भूमिका मांडल्या. त्यामुळे पाश्चात्य देशातले विनोदविषयक दृष्टीकोन अभ्यासकांना मराठीतून उपलब्ध झाले.
पवारांचा ‘विनोद: तत्त्व आणि स्वरुप’ हा प्रबंध ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. या प्रबंधाचे परीक्षक विनोदी लेखक पु. ल. देशपांडे आणि समीक्षक मं. वि. राजाध्यक्ष होते. अभिप्रायार्थ दोघांनीही विशेषत: पु. ल. देशपांडेंनी पवारांनी मांडलेल्या सिद्धांताचं तोंडभरून कौतुक केलं.
विनोदमीमांसेबद्दल खूपच दरिद्री असलेल्या मराठी समीक्षेचं हे दारिद्र्य पवारांच्या या ग्रंथानं खूपच कमी झालंय.
गो. मा. पवारांवर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या जीवनावर आणि विचारांवर पवारांनी साधारण ३४ वर्ष संशोधन केलं. महर्षी शिंदेंच्या विचारांना आध्यात्मिक बैठक आहे. पवारांचा दृष्टीकोनही मानवकेंद्रित आहे. त्यांच्या आचारविचारांत करुणा आहे. महर्षी शिंदे आणि गो. मा. पवार यांच्या भूमिकांतील साम्यामुळे पवर महर्षी शिंदेंकडे ओढले गेले असावेत. मात्र पवार ध्यात्मिक असले तरी धार्मिक नव्हते. त्यांनी घरात धार्मिक विधी केल्याचं, देवळात गेल्याचं, मूर्तीसमोर हात जोडल्याचं आठवत नाही. पण पूजा, भजन, कीर्तन यास त्यांनी कधी विरोध केला नाही.
महर्षी शिंदे हे पवारांच्या पत्नीचे म्हणजे सुजाता वहिनींचे आजोबा. लग्नानंतर शिंदेविषयीची माहिती त्यांच्या वाचनात आली. त्यांच्या जीवनानं आणि कार्यानं पवार प्रभावित झाले.
संपूर्ण समाजसुधारणेचा विचार करणारे, धर्मामधली कोळिष्टकं झाडून त्याला आधुनिकरुप देऊ पाहत होते. त्यासाठी त्यांनी ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाजाच्या प्रसाराच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतलं. अस्पृश्यांच्या विकासासाठी, जातिभेद निर्मूलनासाठी, अनिष्ठ रुढींची इतिहासातली पाळमुळं शोधून त्यावर उपाय सुचवणारे महर्षी शिंदे हे अभूतपूर्व सुधारक, संशोधक आणि विचारवंत होते. त्यांची दखल महाराष्ट्रानं घेतली नाही म्हणून ते अस्वस्थ झाले.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं जीवन आणि कार्य नव्याने महाराष्ट्रासमोर आणणं हे पवारांचं जीवनकार्य बनलं. महर्षी शिंदे भारतात आणि युरोपात जिथे जिथे गेले तिथे पवारांनी भेटी दिल्या. त्यांच्या संबंधित तसेच त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांमधील कागदपत्रांचा तपास केला. आपलं रोजचं विद्यापीठाचं काम सांभाळून या कामासाठी राबले. या अभ्यासकाळात त्यांनी महर्षी शिंदेंच्या जीवन, साहित्य आणि कार्यावर ७ पुस्तकं लिहिली. या दीर्घकाळ अभ्यासातून त्यांच्या जीवनाची, कार्याची, विचारांची चिकित्सा आणि मूल्यमापन करणारं चरित्र लिहिलं.
पवारांनी ३३ वर्षे अध्यापनाचं काम केलं. त्यांनी संशोधन आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेतून मराठी अभ्यासकांची एक पिढीच घडवली. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. भास्कर चंदनशीव, डॉ. बाबूराव गायकवाड, डॉ. वासुदेव सावंत, डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. रोहिणी तुकदेव, डॉ. राजन गवस यांना पवारांनी घडवलं.
कॉलेजात पवारांचा विद्यार्थीप्रिय असा लौकिक होता. वर्गातल्या लेक्चरसाठी ते तयारी करून येत. त्यांचं व्याख्यान संथ आणि एकसुरी होतं. पण गुंतागुंतीचे विषय सोप्पे करून, तार्किक नाती स्पष्ट करत. त्यामुळे श्रोते किंवा विद्यार्थांचं लक्ष आपोआप त्यांच्या बोलण्याकडे खेचलं जाई.
शिवाजी विद्यापीठातूवन पवार निवृत्त झाल्यानंतर सोलापूरला स्थायिक झाले. मी एकदा त्यांना भेटायला गेलो. तेव्हाही तिथे त्यांना विद्यार्थी, विद्यार्थांचे विद्यार्थी भेटायला येत होते.
(लेखक हे ज्येष्ठ समीक्षक आहेत. साभार - राजहंस प्रकाशन.)