‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’ हा प्रकार आयसीसीनं सुरू केलाय. २०२३ मधे त्याला मूर्त रुप येईल. यात चार दिवसांच्या टेस्ट क्रिकेट घेण्याचा घाट घातला जातोय. अशा प्रकारची टेस्ट मॅच ही कल्पनाच काहींना सहन होत नाहीय. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचे आजी माजी खेळाडू या निर्णयाला नापसंती दर्शवतायंत. तर काही जण या निर्णयाचं स्वागतही करत आहेत.
परिवर्तन ही काळाची गरज असते असं म्हटलं जातं ते खरंय. परिवर्तनाचे हे वारे सध्या क्रिकेटमधे जोरदार वाहत आहेत. ट्वेंटी ट्वेंटी ओवरचं क्रिकेट आता चांगलंच रूळलंय. वन डे क्रिकेट अंगवळणी पडल्यासारखंच आहे. या सगळ्यात मात्र पाच दिवसाचं कसोटी क्रिकेट जुनं पुराणं ठरू लागलंय. प्रेक्षकांचा प्रतिसादही तसा आटलाय. पाच पाच दिवस क्रिकेट मॅच चालते. एवढा वेळ आता सर्वांसाठी अडचणीचा ठरायला लागलाय.
प्रेक्षकांना मॅच पाहण्यासाठी पाच दिवस द्यावे लागतात. प्लेअर्सना सुद्धा पाच दिवसांचा सामना तणाव वाढवणारा वाटतोय. तर क्रिकेट मंडळ अधिकाधिक मॅचेसचं आयोजन करण्यासाठी उत्सुक आहे. म्हणूनच यावर आता शक्कल निघते आहे ती कसोटी सामना चार दिवसांचा करायचा. चार दिवसांच्या मॅचमुळे अगदी वर्षभर क्रिकेट सुरू राहील असा दावा केला जातोय. आता लगेचच या दृष्टीनं पावलं उचलली जाणार आहेत.
‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’ हा प्रकार इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल अर्थात आयसीसीनं सुरू केलाय. २०२३ मधे नव्यानं हा चॅम्पियनशीपचा प्रकार सुरू होईल. तेव्हा सरळ चार दिवसांच्या टेस्ट क्रिकेट घेण्याचा घाट घातला जातोय. २०३१ मधे ही चॅम्पियनशीप निकाली ठरेल. २०१५ ते २०२३ साठीची चॅम्पियनशीप स्पर्धा सध्या सुरू आहे. टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या देशांतल्या या स्पर्धेतून आयर्लंड, झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान या टीमना बाजूला ठेवलं गेलंय.
हेही वाचा: अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानींच्या मृत्यूने तिसरं महायुद्ध होणार?
चार दिवसांची टेस्ट मॅच ही कल्पनाच आता काहींना सहन होत नाहीय. त्यात विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचे आजी माजी खेळाडू नापसंती दाखवतायंत. ऑस्ट्रेलिया टेस्ट टीमचा कॅप्टन टीम पेन, स्पिनर नाथन लियॉन, माजी टेस्टटेटर आणि आताचा ट्रेनर जस्टीन लॅंगर, माजी टेस्टटेटर ग्लेन माग्रा यांनी जाहीरपणे आपण परंपरागत क्रिकेट मानणारे आहोत असं सांगितलं.
आम्हाला बुरसटलेल्या विचारांचे मानलं तरी हरकत नाही, पण टेस्ट मॅचही पाच दिवसांचीच हवी असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे एकंदर या सगळ्या प्रकारात वेगवेगळे मत प्रवाह पुढे येत आहेत.
क्रिकेटमधल्या परंपरा मोडून त्यात बरंच नवीन आणण्यात ऑस्ट्रेलियाच अद्याप आघाडीवर होती. १९७७ साली कॅरी पॅकरनी अनेक नवीन गोष्टी आणल्या त्यात रात्रीचे क्रिकेट, पांढरा चेंडू, रंगीत कपडे, टॉससाठी सोन्याचं नाणं. ते तबकात ठेऊन आणणाऱ्या ललना असे सगळे प्रकार त्याने केले आणि त्यातले नंतर सर्वच स्वीकारलं गेलं.
आता रात्रीच्या टेस्ट मॅचही घेतल्या जातायंत. बॉल पांढऱ्याबरोबर गुलाबी सुद्धा झालाय. वन डे मधे खेळाडू रंगीत कपड्यातच असतात. आयपीएल सारख्या स्पर्धेत चिअर्स गर्ल्स सुद्धा ठेवल्या जातात. इंग्लंडनं काही वर्ष परंपरागत पांढऱ्या कपड्यातच वन डे क्रिकेट खेळायचा बाणा दाखवला होता. पण त्यांनाही नंतर झुकावं लागलं. रात्रीच्या टेस्ट मॅचबद्दल भारतानं निरुत्साह दाखवला होता.
नुकताच कोलकत्याला असा सामनाही भारत आणि बांगला देश यांच्यात झाला. अशा तऱ्हेनं ऑस्ट्रेलियाने आणलेले सगळे बदल हळूहळू आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारले गेलेत. पण आता चार दिवसांच्या टेस्ट मॅचला मात्र ऑस्ट्रेलियातून तीव्र विरोध होतोय.
विरोध होतोय पण तो तसा चुकीचा नाहीय. याचं कारण पाच दिवसांचा सामना असतो म्हणून त्याला टेस्ट क्रिकेट म्हणतात. प्रत्येक खेळाडूच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाच दिवस घेतली जाते. बॅटसमननं चिवटपणे पीचवर टिकायचं असतं. हवामान, बॉलिंग, फिल्डींग, टीमची परिस्थिती या सगळ्या गोष्टी आव्हानात्मक असतात. म्हणून जो बॅटसमन याला पुरून उरतो त्याचं कौतुक होतं. त्याचं बॉलरशी चालणारं द्वंद्व थरारक आणि लक्षवेधक असतं.
बॉलर सतत बळीच्या शोधात असतो. त्याचे चेंडू बॅटसमनला वारंवार चकवून जातात. फिल्डर, विकेटकिपर यांना मैदानावर घाम गाळावा लागतो. हे सगळं बघणारा प्रेक्षक दंग होऊन जातो. टेस्ट क्रिकेट कंटाळवाणं होतंय. मॅचेस पाच दिवस खेळूनही अनिर्णीत रहातात. अशा तक्रारी नेहमी केल्या जातात. पण या खेळाचे सच्चे पाईक, जाणकार पाच दिवसांच्याच क्रिकेटला खरं क्रिकेट मानतात.
हेही वाचा: साहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच!
टेस्ट क्रिकेट सुरू झालं तेव्हा तीन दिवसांच्याच मॅचेस व्हायच्या. नंतर चार दिवसांचेही झाले. विशेष म्हणजे शंभर मॅचेस असेही झालेत. जे दिवसांची मर्यादा न ठेवता झालेत. सहा दिवसांच्या टेस्टही झाल्यात. गंमतीचा भाग असा आहे की तीन दिवसांच्या मॅचमधे सरासरी २७० ओवर टाकली गेलीत. इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड दरम्यान एका टेस्टमधे तब्बल ४२१ ओवर टाकली गेली होती.
पूर्वी दहा तास सुद्धा खेळ चालायचा. वेळकाढूपणा व्हायचा नाही, तर अमर्याद कालावधीच्या १०० टेस्टपैकी ४ टेस्ट मॅच अनिर्णीत राहिल्याचीही अजब नोंद आहे. याच कारणही विचित्र आहे. या चारही टेस्टच्या वेळी पाहुण्या टीमला त्याची बोट पकडायची असल्यानं सामना थांबवावा लागला होता. तेव्हा चार दिवसांच्या क्रिकेट मॅच ही काही नवीन गोष्ट नाही.
भारतातचे माजी टेस्ट कॅप्टन दिलीप वेंगसरकर, माजी टेस्ट अंपायर पिलू रिपोर्टर यांनी या संकल्पनेचं स्वागत केलंय. त्यांचं म्हणणंय की, यामुळे खेळ आकर्षक होईल. पण राजू कुलकर्णीसारखा माजी क्रिकेटपटू या संकल्पनेवर नापसंती व्यक्त करतो. चार दिवसांच्या सामन्यात बॅटसमन विरुद्ध बॉलर यांचं द्वंद्व रंगणारच नाही, ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम मोडलाही जाणार नाही, द्रविड, पुजारा सारखे बॅटसमन निर्माण होणार नाहीत, असं राजू म्हणतात.
मर्यादित ओवरच्या मॅचसाठी जे डावपेच वापरले जातात तेच टेस्टमधे येतील. फटकेबाजीला ऊत येईल. बॉलर धावा रोखण्याकडे लक्ष देईल. पाच दिवसांमधे कसा जरा मोकळेपणा मिळतो, तो चार दिवसांत नसेल. सगळी घाई घाई होईल अशी शक्यता आहे. इंग्लंडचा विकेटकिपर जेस बट्लर यानं मात्र टेस्ट क्रिकेट जिवंत रहाण्यासाठी अशा युक्तीची गरज असल्याचं म्हटलंय. चार दिवसांच्या टेस्ट मॅच काळाची गरज असल्याचं मत ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटनेचे प्रमुख केव्हिन रॉबर्ट यांनी व्यक्त केलंय.
परंपरागत क्रिकेटशी सध्या चांगलीच छेडछाड सुरू आहे. सारं काही प्रेक्षकांसाठी चाललंय असं म्हणत खरं तर क्रिकेटचा धंदा जोरात चालावा यासाठी जी चाणाक्ष धंदेवाली मंडळी घुसलीत त्यांचा हा सगळा उद्योग आहे. आजकाल टेस्ट मॅचेस निकाली होण्याचं प्रमाण चांगलं वाढलं होतं. वनडे आणि ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटचा गहिरा परिणाम झाला होता.
बॅटसमन आक्रमक असायचे. दिवसभरात तीनशे धावा ही गोष्ट आता कौतुकाची राहिली नव्हती. याचा अर्थ एवढाच आहे टेस्ट मॅचेसची संख्या वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर झटपट क्रिकेटच्या मॅचेस वाढवण्यासाठी ही सगळी उपाययोजना आहे. पूर्वी कसोटी सामन्यात विश्रांतीचा दिवशी असायचा. आता एक दिवसच कमी केला जाणार आहे.
हेही वाचा:
कपिल देव: भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणारा 'देव'
अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी
निर्भया: बलात्काऱ्यांचं डेथ वॉरंट ते फाशी दरम्यान काय होणार?
एनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था?