माणूस चंद्रावर पोचला त्याला आता बरोबर ५० वर्ष झाली. ही त्यावेळची सगळ्यात मोठी घटना होती. ज्या चंद्राची पूजा होत होती त्यावर माणूस जाऊन आला. त्यामुळे लोकांमधे याबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं. आता भारताचं चांद्रयान २ या मोहिमेला २२ जुलैला सुरवात होतेय. हे पहिलं अंतराळयान आहे, जे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे.
भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चांद्रयान २ तांत्रिक कारणामुळे १५ जुलैला रद्द झालं. आता हे उड्डाण २२ जुलैला म्हणजेच सोमवारी होईल. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी अंतराळयान उड्डाण घेणार असल्याची माहिती इस्रोने ट्विटरवरून शेअर केलीय. हे उड्डाण आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरवरून चंद्रावर झेपावेल. खरंतर ही मोहीम २०१७ ला होणार होती. पण ती २०१८ पर्यंत पुढे ढकलण्यात आली. आणि आता एप्रिल, जून करत करत शेवटी २२ जुलैला या मोहिमेचा शुभारंभ होतोय.
भारताने २२ ऑक्टोबर २००८ ला पहिल्यांदा चंद्रावर आपलं यान पाठवलं. त्यातून आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजली ती म्हणजे चंद्रावर पाण्याचा अंश असण्याचे काही पुरावे. त्यामुळे पुढच्या मोहिमेसाठीचा मार्ग यावरुनच बनला. आता तब्बल १० वर्षांनी पुन्हा चांद्रयान मोहिम होतेय. १५ जुलैला होणारं उड्डाण अंतराळयानाच्या इंजिनमधे हेलियम वायूची गळती झाल्यामुळे रद्द झालं.
यात गंमत म्हणजे आपल्याला जनरल नॉलेजमधे नेहमी विचारला जाणारा प्रश्न. चंद्रावर सगळ्यात पहिलं पाऊल कुणी ठेवलं, नील आर्मस्ट्रॉंग. आणि याच घटनेला यंदा ५० वर्ष पूर्ण होताहेत. मायकल कॉलिन्स आणि बझ अलड्रिनसुद्धा अपोलो ११ या अंतराळयानात होते. त्यांचं उड्डाण १६ जुलै १९६९ ला झालं आणि ते २१ जुलै १९६९ ला परतले. आणि आपण येत्या २२ जुलैला एक महत्त्वाकांक्षी उड्डाण घेणार आहोत.
हेही वाचा: स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ
इस्त्रोने आपल्या वेबसाईटवर या मोहिमेचं उद्दिष्ट स्पष्ट केलंय. चंद्राचा उगम आणि चंद्र बनण्याची प्रक्रिया कशी झाली हे शोधणं, लुनर सरफेस म्हणजेच चंद्राचा पृष्ठभाग आणि ज्वालामुखी, भूकंपामुळे तयार झालेली जमीन यांचा अभ्यास. महत्त्वाचं म्हणजे आपण यंदा चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर जाणार आहोत. हा भाग नेहमीच सावलीत असल्याचा दिसतो. मग इथे काय असेल बर्फ, थंडी असेल? पूर्वी यावर सोलर एनर्जी असल्याचं सांगितलं गेलं होतं. त्याचे आता काही पुरावे सापडतात का हे शोधलं जाणार आहे.
त्याचबरोबर द वॉशिंग्टन पोस्टने त्यांच्या बातमीत म्हटलंय की, या मोहिमेमुळे चंद्राचा नकाशा तयार करायला मदत होऊ शकते. आणि मॅग्निशिअम, अॅल्युमिनिअम, सिलिकॉन, कॅल्शिअम, टाइटेनिअम, आयरन आणि सोडिअम या घटकांचं अस्तित्व तपासता येईल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या खड्ड्यांमधे बर्फाच्या स्वरुपातल्या पाण्याचा तपास करता येईल. ही सगळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न या मोहिमेतून होणार आहे.
हेही वाचा: पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी
भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर जाणारा भारत चौथा देश ठरेल. त्यासाठी रोवरचा वापर केला जाणार आहे. विक्रम लँडरच्या आत प्रग्यान रोवर असणार आहे. या लँडरला 'विक्रम' असं नाव देण्यात आलंय. विक्रम म्हणजे शौर्य. आणि महत्त्वाचं म्हणजे भारतीय अंतराळ विकास कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांना मानवंदना देण्यासाठी हे नाव ठेवण्यात आलंय.
या मोहिमेचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ही मोहीम पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून होणार आहे. चांद्रयान २ चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरच्या क्षेत्रात पोचणारं आणि माहिती गोळा करणारं पहिलं अंतराळयान ठरणार आहे. याआधी या भागात कोणतंही यान गेलेलं नाही. तसंच या मोहिमेवर हजारहून अधिक शास्त्रज्ञ काम करताहेत. त्यापैकी ३० टक्के महिला आहेत. आणि रितु क्रिधल आणि एम. वनिथा या दोघी या मोहिमेचं नेतृत्व करताहेत, असं द हिंदू वर्तमानपत्राने आपल्या बातमीत म्हटलंय.
हेही वाचा: राकेश शर्मांच्या बायोपिकमुळे बॉलीवूडमधे नवी ‘स्पेस’?
जिओसिंक्रोनस लाँच वेईकल म्हणजेच जीएसएवी मार्क ३ हे सर्वशक्तिमान रॉकेट अंतराळयानाला घेऊन उड्डाण करेल. आणि पुढच्या १६ मिनिटांमधे यानाला पृथ्वीच्या कक्षेबाहेर नेईल. पुढे यान ५३ किंवा ५४ दिवसांचा प्रवास करेल. आणि पृथ्वी ते चंद्राच्या पृष्ठभागापर्यंत ३.८४ लाख किलोमीटरचा टप्पा गाठेल, असं एअर अँड स्पेस एड्युकेशन वेबसाईटवर सांगितलंय. हे भारतातलं सगळ्यात मोठं ६४० टनांचं रॉकेट आहे. याला सोशल मीडियावर बऱ्याच जणांनी 'बाहुबली रॉकेट' असंही नाव दिलंय.
लँडरचं वजन १४०० किलो आणि लांबी ३.५ मीटर आहे. यात ३ पेलोड असतील. चंद्रावर यान उतरल्यानंतर वादळसदृश्य परिस्थिती निर्माण होईल. अशावेळी लँडरचा उपयोग रोवरला स्थिर करण्यासाठी होईल. मोहिमेचा दुसरा भाग ऑर्बिटर असेल. याचं वजन ३५०० किलो आणि लांबी २.५ मीटर आहे. याच्यासोबत ८ पेलोड असतील. ऑर्बिटर या पेलोडसह चंद्राची परिक्रमा करेल. तिसरा भाग रोवर असून याचे वजन २७ किलो आहे. आणि रोवर हे सोलर एनर्जीवर चालेल आणि आपल्या ६ चांकांसह चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन येथील काही नमुने गोळा करेल.
पृथ्वीपासून चंद्राचं अंतर जवळपास ३ हजार ८४४ लाख किमी आहे. त्यामुळे पृथ्वीवरुन कोणताही संदेश पाठवल्यास तो चंद्रावर पोचण्यास काही मिनिटं वेळ लागेल. तसंच सोलर रेडिएशनचाही यानावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सिग्नल कमकुवत होऊ शकतं. सर्व गोष्टी व्यवस्थित चालू राहणं हे आपल्यापुढे आव्हानच आहे.
हेही वाचा:
प्रति परमेश्वर सुपरस्टारला कोणी विचारत नाही तेव्हा
जगात सर्वात जास्त वापरलं जाणारं इमोजी कोणतंय?