सनातन्यांनो, धर्माधिकाऱ्याला धर्म शिकवू नकाः न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी

०४ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


‘त्या सनातनवाल्यांना सांगा मी धर्माधिकारी आहे. त्यामुळं धर्माच्या दृष्टीने काय योग्य आणि अयोग्य हे ठरवायचा अधिकार ही मलाच आहे.’ असं सनातन संस्थेला बजावलं होतं, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी. गुरुवारी ३ जानेवारीला त्यांचं निधन झालं. त्यांची आठवण सांगितलीय ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी. त्यांच्या फेसबूक पोस्टचं हे संपादित रुपांतर.

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं गुरुवारी निधन झालं. ख्यातनाम सर्वोदयी नेते दादा धर्माधिकारी यांचे ते सुपुत्र. १९४२च्या छोडो भारत आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. वकिलीचं शिक्षण घेतल्यानंतर १९७२ ते १९८९ या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. काही काळ ते प्रभारी मुख्य न्यायमूर्तीही होते.

न्यायदानाच्या क्षेत्रात असतानाच ते अनेक गांधीवादी संस्था, संघटनांमधेही सक्रीय होते. त्यांनी सरकारी संस्था, समित्यांवरही काम केलं. २०१४ मधे धर्माधिकारी यांच्या समितीनेच बारबालांवर पूर्णपणे बंदी आणण्याची शिफारस राज्य सरकारला केली होती. मराठी, गुजराती आणि हिंदीत त्यांची जवळपास १६ पुस्तकं आली. भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा कारकीर्दीचा गौरव केला.

ईटीवी भारत या प्रस्तावित इंटरनेट टीवी चॅनलचे मुंबई ब्युरो चीफ प्रमोद चुंचूवार यांनी धर्माधिकारी यांची एक आठवण फेसबूकवर शेअर केलीय. ते राज्य सरकारच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालयात सहाय्यक संचालक पदावर काम करत असताना त्यांचा धर्माधिकारी यांच्याशी संपर्क आला होता. तेव्हा घडलेली ही घटना प्रमोद चुंचूवार यांच्याच शब्दात.

 

नागपूर लोकमतमध्ये नोकरी करताना चंद्रशेखर धर्माधिकारी सरांना अनेकदा वाचलं आणि ऐकलं होत. मुंबईत मंत्रालयात नोकरी करताना २००७-०८ मधे त्यांच्याशी पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटीचा योग आला. निमित्त होतं, अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित अनिष्ट आणि अघोरी प्रथाविरोधी कायद्याचं. तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने हा कायदा केला असला तरी कायद्याबद्दल मोठ्या प्रमाणावर अपप्रचार झाला होता. त्यामुळे त्याला अनेक धर्मविषयक संघटना विरोध करत होत्या.

सनातन संस्था राज्यभर विविध घटकांना हाताशी धरून या कायद्याविरोधात मोहीम राबवत होती. या पार्श्वभूमीवर सरकारी प्रचार यंत्रणा असलेल्या आणि मी नोकरी करत असलेल्या माहिती आणि जनसंपर्क खात्याने या विषयावर जनजागृती करायचं ठरवलं. तत्कालिन महासंचालक मनिषा पाटणकर म्हैसकर यांनी या विषयावर योग्य व्यक्तीची मुलाखत घ्या, असे आदेश दिले.

आकाशवाणीवर माहिती आणि जनसंपर्क विभागाचा ‘दिलखुलास’ हा मुलाखतीवर आधारित कार्यक्रम सुरू होता. कुणाची मुलाखत घ्यायची याचा शोध घेतल्यावर नाव पुढे आले चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी तज्ञांची समिती नेमण्यात आली होती. तिचे अध्यक्ष धर्माधिकारी सर होते.

ते मंत्रालयाच्या समोरच राहत होते. मी `दिलखुलास` कार्यक्रमाच्या निर्मात्यापैकी एक होतो. त्यामुळे माझ्यावर त्यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. आचार्य दादा धर्माधिकारी यांचे पुत्र, स्वतः स्वातंत्र्यसैनिक असलेल्या एवढ्या मोठया व्यक्तींशी काय बोलायचं या विचारानेच मला दडपण आलं.

मी त्यांच्या भेटीची वेळ मागितली आणि विषयही सांगितला. त्यांच्याशी भेटून सरकारच्या वतीने मुलाखतीसाठी वेळ देण्याची विनंती केली. तसं पत्रही त्यांना दिलं. त्यांनी लगेच होकार दिला. मी कुठला आहे ही चौकशी केली. मी चंद्रपूरचा आहे, हे सांगितल्यावर तर विशेष आपुलकीने त्यांनी माझं स्वागत केलं. चार भागांची त्यांच्या अप्रतिम मुलाखतीची मालिका आम्ही रेकॉर्ड केली. विविध माध्यमातून या मुलाखतीची आम्ही जाहिरातही केली.

पहिला भाग सकाळी प्रसारित झाल्यावर अनपेक्षितपणे आमच्या महासंचालक कार्यालयाला या मुलाखतीचा निषेध नोंदवणारे फॅक्स येऊ लागले. अधिक चौकशी केल्यावर कळलं, की हे सारे सनातन संस्थेचे उद्योग आहेत. राज्यातील सर्व प्रमुख आकाशवाणी केंद्रांनाही या मुलाखतीचे पुढील भाग प्रसारित करू नये, असे इशारेही सनातनकडून देण्यात आले होते.

मुंबई आकाशवाणीकडून पुढील भाग प्रसारित करायचे की नाही याची विचारणा होत होती. हे कमी की काय म्हणून सनातनचे एक शिष्टमंडळ माहिती महासंचालक मनिषा पाटणकर म्हैसकर यांना भेटायला येऊन धडकलं. माझे वरिष्ठ आणि मला मनिषा मॅडमने बोलावून घेतलं. आम्ही सारी परिस्थिती सांगितली. निर्णय जाहीर केला. ‘हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळं मुलाखतीचे सर्व भाग प्रसारित होतील.’ त्यानुसार आम्ही आकाशवाणी केंद्राला कळवलं.

मनिषा मॅडमच्या ऑफिसात तोवर वाट बघत असलेल्या सनातनच्या शिष्टमंडळाला बोलावण्यात आलं. त्यांनी अपेक्षेप्रमाणे सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन कायदाच कसा चुकीचा आहे. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांची मुलाखत कशी चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. हे सांगून त्यांनी ही मुलाखत थांबवण्याची मागणी केली. त्यावर मनिषा मॅडमने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

ते ऐकत नाहीत असे दिसल्यावर, ‘आम्ही राज्य सरकारची बाजू मांडणाऱ्या खात्याचे अधिकारी आहोत. कायदा विधिमंडळाने पारित केलाय. तुमचा विरोध असेल तर तुम्ही योग्य त्या मंचावर नोंदवा आणि आम्हाला आमचे काम करू द्या’, असं त्यांना सुनावलं.

आम्ही या मुलाखतीस विरोध करू, असा इशारा देऊन हे शिष्टमंडळ बाहेर पडलं. मात्र ते मंत्रालयात रेंगाळले. नंतर त्यांनी मला गाठलं. ‘तुम्ही हिंदू आहात. तुम्ही तरी असे कार्यक्रम आयोजित करायला नको होता,’ असं ते मला म्हणायला लागले.

‘हा कायदा ब्राम्हणविरोधी आणि हिंदू धर्मविरोधी आहे. धर्माधिकारी हे ब्राम्हण असूनही ते या कायद्याचे समर्थन करतात. खरेतर त्यांनी विरोध करायला हवा. आम्ही त्यांचा राज्यभर निषेध नोंदवू,’ असा इशारा त्यांनी मला दिला. मी महासंचालक मनीषा मॅडम यांना तात्काळ हा प्रकार कळविला. त्यांनी याची गंभीर दखल घेत मला धर्माधिकारी यांना भेटायला पाठवलं.

तेव्हा ऐंशीच्या घरात असलेल्या धर्माधिकारी यांना सनातनवाले काही करणार तर नाही ना, अशी चिंता सतावू लागली. त्यामुळे मुलाखतीचे पुढचे भाग प्रसारित करायचे की नाही, यावर त्यांचंही मत विचारण्याच्या सूचना मला करण्यात आल्या.

दरम्यानच्या काळात मुलाखतीच्या निमित्ताने मला त्यांना अनेकदा भेटता आलं. एकदा मला त्यांनी छत्रपती शाहू महाराज हे कसे महान होते हेही समजावून सांगितलं होतं. घरगुती हिंसाचाराविरुद्ध सर्वप्रथम महाराजांनी कायदा कसा केला हे त्यांनी मला त्या कायद्याच्या प्रतीसह समजावून सांगितलं होतं.

मी दुपारीच त्यांच्या घरी पोचलो. त्यांना घडलेला सारा प्रकार सांगितला आणि पुढील भाग प्रसारित करायचे की नाही, याची विचारणा केली. त्यावेळेस त्यांच्यातील एक सच्चा निडर गांधीवादी प्रकट झाला. `मी सनातनच्या धमक्यांना भीक घालत नाही. त्यांना घाबरत नाही. त्यांना जे करायचं ते करू द्या. मात्र मुलाखत थांबवू नका,` असं बाणेदार उत्तर त्यांनी दिलं.

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हिंदू धर्म आणि ब्राम्हणविरोधी आहे या सनातनच्या आक्षेपांवर त्यांनी दिलेलं हे उत्तर तर मी कधीही विसरणार नाही. ‘त्या सनातनवाल्यांना सांगा मी धर्माधिकारी आहे. त्यामुळं धर्माच्या दृष्टीने काय योग्य आणि अयोग्य हे ठरवायचा अधिकार ही मलाच आहे,’ हे त्यांचं उत्तर आज त्यांच्या निधनाचं वृत्त कळल्यावर मेंदूत सतत घुमत होतं.

आदरणीय धर्माधिकारी सरांना विनम्र अभिवादन.