भगतसिंगांची फाशी रोखण्याचा गांधींजींनी प्रयत्न केला का?

२८ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


भगतसिंगांना.वयाच्या तेविसाव्या वर्षी फाशी देण्यात आली. त्यांच्या फाशीला महात्मा गांधी जबाबदार आहेत, असं सांगणारा एक प्रवाह आहे. आज २८ सप्टेंबर. शहीद भगतसिंग यांची ११२वी जयंती. यानिमित्तानं भगतसिंगांच्या फाशीविषयी भगतसिंगांचे भाचे, अभ्यासक आणि जेएनयूमधील निवृत्त प्राध्यापक चमनलाल यांची मतं आपल्या सगळ्यांनी समजून घेण्यासारखी आहेत.

भगतसिंगांनी मार्क्स वाचला होता. चार्ली चॅप्लिनचे सिनेमे ते पाहायचे. त्यांना दूध प्यायला आवडायचं. कुठंही असलं तरी त्यांच्या खिशात इंग्रजी डिक्शनरी असायची. भगतसिंगांच्या अशा अनेक गोष्टी आपल्या कानावर पडत असतात. कधी कुठल्या चर्चेत ऐकलेल्या असतात. व्हॉट्सअप आल्यापासून तर अशी एक ना अनेक प्रकारची माहिती आपल्यापर्यंत येते. बऱ्याचदा ती माहिती खरी आहे, की नाही हे आपल्याला समजत नाही.
 
२८ सप्टेंबर १९०७ ला पंजाबच्या लायपूर जिल्ह्यात भगतसिंगांचा जन्म झाला. जालियानवाला बाग हत्याकांडानंतर भगतसिंग यांना खूप दुःख झालं. या घटनेनेच त्यांचं आयुष्य बदलून गेलं. १९२६ मधे त्यांनी हिंदूस्थान नौजवान सभेची स्थापना केली. त्यानंतर दोन वर्षांनी जॉन सॅन्डर्स या ब्रिटीश अधिकाऱ्याची भगतसिंगांनी हत्या केली.

भगतसिंग आणि भटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधानसभेवर बॉम्बहल्ले केले आणि स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले. त्यानंतर दोन वर्ष भगतसिंग तुरूंगात होता. या काळात त्यांनी काही नोंदी लिहिल्या. या नोदींचं नंतर प्राध्यापक चमनलाल यांनी संपादन केलं. या नोंदींचं ‘भगतसिंगांच्या जेलमधील नोंदी आणि इतर लिखाण’ या नावाखाली इंग्रजी पुस्तक प्रकाशित केलं.

चमनलाल हे निवृत्त प्राध्यापक आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी हिंदीचे प्राध्यापक म्हणून काम केलं. भगतसिंग, हिंदी कांदबरी आणि दलित साहित्य या विषयांत त्यांचा हातखंडा आहे. भगतसिंगांवर त्यांनी ८ पुस्तकं लिहिली. १०० हून जास्त भाषणं दिली. यासोबतच भगतसिंगांवर भगतसिंग स्टडी या ब्लॉगवर ते नियमित लेखन करत असतात.

हेही वाचा : शिवसेना, भाजप युतीचं नेमकं ठरलंय तरी काय?

भगतसिंगांसाठी गांधींजींनी काहीच केलं नाही. भगतसिंगांची फाशीची शिक्षा रोखणं गांधीजींना शक्य होतं. पण जाणुनबुजुन त्यांनी भगतसिंगची फाशी रद्द केली नाही, असा आरोप केला जातो. मार्क्सवादी भगतसिंग आणि अहिंसावादी महात्मा गांधी यांच्याबद्दल अनेक उलटसुलट गोष्टी बोलल्या जातात. पण खरी वस्तुस्थिती वेगळी आहे आणि गांधींना बदनाम करण्यासाठी या अफवा पसरवल्या जात असल्याचं गांधी समर्थकांकडून सांगितलं जातं.

संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या गांधी-आयर्विन करारात भगतसिंगांला माफी देणं हा प्रमुख मुद्दा होता. गांधींनी वारंवार विनंती करूनही भगतसिंगांला घाबरलेल्या ब्रिटीश सरकारनं त्यांना फाशी दिली, असा गांधी समर्थकांचा या आक्षेपावरचा दावा असतो.
 
या सगळ्या उलटसुलट चर्चेवर प्रा. चमनलाल यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर मांडणी केलीय. गांधी आणि भगतसिंग यांच्याविषयी ते  बोलले. या मुलाखतीतले महत्त्वाचे पाच मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

१)    भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना असं वाटत होतं की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गांधींच्या मार्गाचा वापर केला तर तडजोड करावी लागेल. त्यामुळे हाती काहीही लागणार नाही. ‘साबरमतीचा संत’ असा शब्दांत भगतसिंगांनी गांधींचा उल्लेख केलाय.

२)    गांधींचा लोकांवर असणारा प्रचंड प्रभाव पाहून भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना आश्चर्य वाटायचं. गांधींबद्दल त्यांना आदर वाटत होतं. स्वातंत्र्यासाठी बंड करणाऱ्या क्रांतिकारकांनी लोकांशीही नातं जोडावं यासाठी भगतसिंग त्यांना गांधींचा आदर्श दाखवत. पण समाजात बदल घडवण्यासाठी गांधीजी जो मार्ग वापरायचे त्याने काहीही साध्य होणार नाही असं त्यांना वाटायचं.

३)    भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांची शिक्षा रद्द करण्याची मागणी मान्य केल्याशिवाय गांधींनी गांधी-आयर्विन करारावर स्वाक्षरी करायला नको होती, असं म्हणणाऱ्यांनाही चमनलाल उत्तर देतात. ‘गांधींनी फाशी रद्द करण्याचा मुद्दा लावून धरला असता तरी भगतसिंगांसारख्या क्रांतिकारकाला अशा प्रकारे केलेली तडजोड मान्य झाली नसती,’ असं ते म्हणतात.

४)    आपल्याला फाशी झाल्याशिवाय भारतीय त्यांच्या स्वातंत्र्यासाठी जागे होऊन लढणार नाहीत असं भगतसिंगांचं मत होतं. याविषयी स्वतः भगतसिंगांनीही आपल्या लिखाणात भूमिका स्पष्ट केलीय. पण तरीही भगतसिंगांची फाशी रद्द करण्यासाठी गांधींनी नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्याइतके प्रयत्न केले नाहीत असं म्हणण्याला वाव आहे.

५)    गुन्हा कितीही मोठा असला तरी फाशीची शिक्षा देणं गांधींना पटत नसे. भगतसिंगांच्या बाबतीत त्यांची ही नैतिकता त्यांनी ठामपणे मांडली नाही. त्यावेळी फाशीच्या शिक्षेला विरोध करण्याच्या भूमिकेत गांधींनी तडजोड करायला नको होतं.

हेही वाचा : 

आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारा १९४२ चा लढा नेमका होता कसा?
माणिकराव जाधवांनी शरद पवारांना ईडीच्या फेऱ्यात कसं अडकवलं?
सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन
लग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी