कॅलेंडर माणसाला वर्तमानात राहायला शिकवतं!

०१ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


नवीन वर्ष म्हटलं की नवं कॅलेंडर आलंच. या कॅलेंडरमधेही अनेक वेगवेगळे ट्रेंड आहेत. पूर्वी कॅलेंडरवर देवदेवतांचे फोटो छापले जायचे. आता तिथपासून आपण थेट एका पानात संपूर्ण वर्ष मावेल अशा कॅलेंडरपर्यंत येऊन पोचलोय. इतिहास आणि भविष्याचा वेध घेणारं कॅलेंडर माणसाला वर्तमानात राहायला शिकवत असतं.

नवीन वर्ष आलं की कॅलेंडरला खूपच मागणी येते. घरोघरी भिंतीवर नवं कॅलेंडर झळकू लागतं. आजकाल अनेक कंपन्या, दुकानं अगदी पेपरवालेसुद्धा कॅलेंडर छापू लागलेत. तारीख आणि वार याबरोबरच आणखी वेगळी माहिती देण्याकडे त्यांचा कल असतो. पूर्वी कॅलेंडरचा साचा ठरलेला होता. महिना, तारीख आणि वार एवढंच सांगणारं आणि आकड्यांशी निगडीत असं कॅलेंडर घरोघरी दिसायचं. मग त्याच्या जोडीला चित्रं देण्याची शक्कल काहींनी लढवली आणि कॅलेंडरनं कात टाकली.

आकड्यांपेक्षा चित्रांनाच महत्त्व

आता तर काही कंपन्या एका कॅलेंडरसाठी लाखो रुपये खर्च करतात. अगदी झुळझुळीत, ग्लॉसी पानांचं सुंदर कॅलेंडर ग्राहकांसाठी तयार होतं. ही असली कॅलेंडर सामान्यांना बघायलाही मिळत नाहीत. मोठे उद्योगपती आपलं कॅलेंडर सर्वांपेक्षा आकर्षक आणि लक्षवेधक ठरेल यासाठी आटापिटा करताना दिसतात.

कॅलेंडरमधल्या आकड्यांपेक्षा त्यावरच्या चित्रांवरच जास्त भर दिलेला असतो. ही चित्रं म्हणजे मॉडेल्सचे फोटो असतात. या मॉडेल्सना कमीतकमी कपड्यात आणि शरीर प्रदर्शन करताना दाखवलं जातं. त्यासाठी ‘कसबी’ फोटोग्राफर काही महिने आधीपासून तयारी करत असतो.

तो एखादं प्रेक्षणीय स्थळ शोधून काढतो. त्या ठिकाणी या मॉडेल्सचं फोटोशूट केलं जातं. आता तर माहितीतल्या स्थळांवर शूट करण्याऐवजी निर्जन, फारसं माहीत नसलेल्या स्थळावर जायची टूम निघालीय. कॅलेंडरवर आपली छबी येण्यात या मॉडेलनाही आपला सन्मान वाटतो.

मॉडेलऐवजी सामान्य महिलांचे फोटो छापावेत

ऑलिम्पिकच्या काळात खेळाडूंना कॅलेंडरवर झळकवण्याची युक्ती ऑस्ट्रेलियामधे वापरली गेली. यासाठी बहुतेक महिला ऍथलेटिक, स्विमर, जिमनॅस्ट यांचाच वापर केला गेला. पण त्यांचे फोटो मॉडेल्सनाही लाजवतील असे अनावृत्त होते. त्यामुळे ही कॅलेंडर गाजली. त्यानंतर अशाप्रकारची कॅलेंडर तयार करण्याचं पेवच फुटलं.

गंमत म्हणजे आज याच ऑस्ट्रेलियात आता वेगळं वारं वाहू लागलंय. तिथल्या अनेक नोकरदार महिलांनी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात नुकतीच एक फेरी काढली आणि कॅलेंडरवर मॉडेल्स आणि खेळाडूंचे फोटो येण्याऐवजी आपल्यासारख्या सामान्यांचे फोटो येण्याचा आग्रह धरलाय. कारण का?

तर खेळाडू आणि मॉडेल यांचा बांध कमनीय असतो त्यात विशेष ते काय? नोकरी करून, घर सांभाळून फिगर राखणाऱ्यांना कॅलेंडरवर आणलं तर इतरांनाही प्रोत्साहन मिळेल. शिवाय खेळाडू, मॉडेल्सना बघून येणारा न्यूनगंडही टळेल. ऑस्ट्रेलियातल्या महिला कॅलेंडरसाठी काय करतात बघू!

हेही वाचा : २०१९ चा निरोपः जगाच्या सारीपाटावर परिणाम करणाऱ्या पाच घटना

जुनं कॅलेंडर फेकून देऊ नका

आपल्याकडे कॅलेंडर हा प्रकार कमालीचा लोकप्रिय आहे. पण ऑस्ट्रेलियाएवढा नाही. आपल्याकडे आधी कॅलेंडरवर बहुतेक देवदेवतांचेच फोटो असायचे. फोटोफ्रेम करण्याजोगी ही चित्रं इंद्र शर्मा, रघुवीर मुळगावकर अशा चित्रकारांची असायची. आज कितीतरी घरांत या चित्रकारांनी काढलेली कॅलेंडर्स फोटो फ्रेम होऊन पुजली जात असल्याचं आपल्याला दिसेल.

मुळगावकरांनी काढलेला दत्त तर विलक्षणच! प्रत्यक्ष दत्तगुरू असेच दिसत असावेत असं आपल्याला त्यावरून वाटेल. अशी त्यांची कला होती. विशेष म्हणजे अलीकडेच या अशा जुन्या कॅलेंडर्सना भरपूर किंमतीत विकत घेण्यासाठी काही संस्था आणि व्यक्ती पुढे आल्या होत्या.

कॅलेंडरवरचं चित्र ही सुद्धा एक कलाच आहे. शिवाय हे कॅलेंडरवरचं चित्र टीशर्ट किंवा स्त्रियांच्या टॉपवर छापून त्यापासून भरपूर पैसा कमवण्याचं तंत्रही आता काहींनी शोधलंय. असे टीशर्ट विशेषतः परदेशात लोकप्रिय होताहेत. त्यामुळे जुनी कॅलेंडर्स अडगळीत किंवा कचऱ्यात फेकून देण्याचा जराही विचार करू नका.

देवदेवतांची चित्र असलेल्या पुठ्ठ्याच्या कॅलेंडरला तारखांचा ठोकळा ठोकलेला असे. आज अशी कॅलेंडर पुन्हा विकत मिळायला लागलीयत. काहींनी देवदेवतांच्या चित्राऐवजी देखावे आणि महिलांची नाही तर लहान मुलांची चित्रंही कॅलेंडरसाठी वापरायला सुरवात केलीय. कामुक हावभाव दाखवणाऱ्या स्त्रियांची चित्रं असणारी कॅलेंडर्स तरुण वर्गात लोकप्रिय झाली. विशेषतः हॉस्टेलवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खोल्या या अशा कॅलेंडरनी भरून जायच्या.

कोकण रेल्वेवरचं खास कॅलेंडर

चित्रांना महत्त्व आल्यावर कॅलेंडरमागचा मूळ उद्देश जरासा मागं पडल्यासारखं झालं होतं. पण ‘कालनिर्णय’सारख्या कॅलेंडरनी एक प्रकारची क्रांतीच घडवली. बऱ्याच घरात धार्मिक सणवार आणि पूजाअर्चा या दृष्टीने पंचांगाची गरज असते. ही गरज बऱ्याच प्रमाणात कॅलेंडर भागवू लागल्याने ‘कालनिर्णय’चा खप जबरदस्त वाढला. या कालनिर्णयाची जाहिरात करताना नट आणि नट्या टीवीच्या पडद्यावर दिसू लागल्या आणि मग अशी कॅलेंडर काढण्याची स्पर्धाच लागली.

काहींनी ‘महाराष्ट्र दर्शन’ ही युक्ती वापरली. त्यांचं पाहिलं कॅलेंडर हे महाराष्ट्रातल्या महान व्यक्तींची चित्रं असलेलं होतं. यात लोकमान्य टिळक, बालगंधर्व, लता मंगेशकर, सुनील गावस्कर अशा एकूण १२ व्यक्तींची चित्रं होती. ‘महाराष्ट्र दर्शन’पासून प्रेरणा घेऊन मग आणखी वेगवेगळा विषय घेऊन कॅलेंडर छापली गेली.

तिथी आणि वार याच्यासह रेल्वे टाईम टेबल, विविध लेख, विविध पदार्थांच्या रेसीपी आणि त्यांच्या पद्धती अशी बरीच माहिती देणारी कॅलेंडर्स आजही तुफान लोकप्रिय आहेत. ‘महालक्ष्मी दर्शन’ हे कॅलेंडर तर निव्वळ कोल्हापूरच्या महालक्ष्मीला वाहिलेलं आहे. ते ही प्रचंड लोकप्रिय आहे.

विषयांची महाराष्ट्राला कधीच उणीव जाणवलेली नाही. अशीच आठवण आहे ती मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘आज दिनांक’ या सांजदैनिकाच्या कॅलेंडरची. हे कॅलेंडर चक्क तेव्हा येऊ घातलेल्या कोकण रेल्वेवर आधारित होतं. आपल्या गावाला जाणारी रेल्वे नेमकी कुठं कुठं थांबणार आहे, याचा नकाशा मिळतोय म्हणून हे कॅलेंडर लोकप्रिय झालं होतं. ‘वडे, सागुती आणि आज दिनांक’ अशी या कॅलेंडरवरची घोषणाही वेधक ठरली होती.

हेही वाचा : राष्ट्रपती राजवटीसाठी तत्पर असणारे राष्ट्रपती सिनेमाबद्दल उदासिन का?

एका पानात बसेल असंही कॅलेंडर

काही कंपन्यांची कॅलेंडर आजदेखील अशीच लोकप्रिय आहेत. त्यादृष्टीने नाव घेता येतील ती एअर इंडिया आणि इंडियन एअर लाईन्सची. त्यांची कॅलेंडर्स भारत दर्शन आणि जगभरातल्या काही प्रेक्षणीय स्थळांचं, फुलांचं-फळांचं, प्राण्यांचं दर्शन घडवणारी असतात. क्वचित माणसाचंही. या कॅलेंडरवर खूप मेहनत घेतली जाते हे जाणवतं.

बारा महिन्यांत चित्रातून एकच विषय मांडण्याचा प्रयत्न असतो. या कंपन्या आपल्या उद्योधंद्याशी निगडीत आणि देशाचं प्रतिबिंब ज्यातून दिसेल असे विषय बहुधा निवडतात. सध्या बहुतेक बँका आपल्या योजना कॅलेंडरद्वारा दाखवतात. नुसत्या आकड्याच्या कॅलेंडरमधे त्यांच्याकडून योजनांची माहिती द्यायचा त्या प्रयत्न करतात.

माणसाचा आयुष्यभराचा सोबती

डॉक्टरवर्गासाठी औषधी कंपन्या वेगळ्या स्वरुपाचे कॅलेंडर काढतात. कॅलेंडरचे नानाविध प्रकार आता रूढ आहेत. मोठ्या आकड्यांच्या कॅलेंडरपासून ते वर्षानुवर्ष चालतील अशी टेबलावरची कॅलेंडरही आलीत. कागदाबरोबर पुठ्ठा, प्लास्टिक, धातू, लाकूड यांचा वापरही आता कॅलेंडरसाठी होऊ लागलाय. पॉकेट कॅलेंडर्स उपलब्ध आहेत. एका पानात अख्ख्या वर्षाची तारीख, वार सांगेल असंही कॅलेंडर आता बाजारात मिळतं.

इतिहास आणि भविष्याचा वेध घेणारं कॅलेंडर माणसाला वर्तमानात रहायला शिकवतं. प्रत्येक तारखेला घडलेल्या महत्वाच्या घटना माणसाला इतिहास शिकवतात आणि आपल्याला येणाऱ्या काळात काही महत्वाच्या गोष्टी करायच्या असतील तर त्याची नोंदसुद्धा आपण कॅलेंडरवर करून ठेऊ शकतो.

रॉबिन्सन क्रुसो नामक एक खलाशी त्याचं जहाज बुडाल्याने एका निर्मनुष्य बेटावर पोचला होता. त्यालासुद्धा कॅलेंडर तयार करण्याची गरज वाटली होती. त्याने त्याच्या परीने कॅलेंडर तयार केलं होतं. थोडक्यात कॅलेंडर हे माणसाचा सोबती झालाय. जोपर्यंत भूतलावर माणूस राहील तोवर कॅलेंडर त्याच्या सोबत असणारच आहे.

हेही वाचा :

प्रत्येक माणसात सांताक्लॉज असतोच!

२०१९ चा निरोपः आपला मोबाईल कसा बदलला?

‘बॉम्बे सुपरस्टार’ म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामी

२०१९ चा निरोप : गेल्या वर्षभरात स्त्रियांच्या जगात काय काय झालं?