आयपीएलच्या लिलावात अदाणींना हरवणारा सीवीसी ग्रुप नक्की कोण?

२६ ऑक्टोबर २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या आयपीएलसाठी दोन नव्या टीमची घोषणा झालीय. यात सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती अहमदाबाद टीमची. त्याची मालकी आपल्याकडे यावी म्हणून अदाणी ग्रुप प्रयत्नशील होता. पण सीवीसी कॅपिटल ग्रुपने ५१६६ कोटींची बोली लावत त्यांना मात दिलीय. अदाणींना टक्कर देणाऱ्या या सीवीसी ग्रुपने जगभरातल्या क्रीडा उद्योगात मोठी गुंतवणूक केलीय.

जगभरात क्रीडा क्षेत्रातून एक मोठी अर्थव्यवस्था उभी राहतेय. वेगवेगळ्या टीम, खेळाडूंवर होणारा खर्च, त्यातून होणारी आर्थिक उलाढाल सगळं काही डोळे दिपवणारं आहे. भारतातल्या आयपीएलच्या मॅच हे या आर्थिक उलाढालीचं एक महत्वाचं केंद्र बनत चाललंय. बडे उद्योपती, जाहिराती, टीवीवरचे स्टार यात उतरल्यामुळे त्यातून कोट्यवधींचा फायदा बीसीसीआय सारख्या संस्थेला होतो. त्यामुळेच आयपीएलची श्रीमंती वाढताना त्याबद्दल कुतूहलही निर्माण होत जातंय.

२५ ऑक्टोबरला बीसीसीआयनं पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या आयपीएलसाठी दोन नव्या टीमची घोषणा केलीय. पुढच्या वर्षी एकूण १० टीम या क्रिकेटच्या मैदानात असतील. दुबईत लागलेल्या बोलींमधे सीवीसी कॅपिटल ग्रुपनं अहमदाबाद टीम तर आरपी संजीव गोयंका ग्रुपनं लखनौला खरेदी केलंय. एकूण १० ग्रुपमधे या टीम खरेदीची चुरस पहायला मिळाली. गोयंका ग्रुपनं ७०९० कोटींची पहिल्या क्रमांकाची बोली जिंकली असली सर्वाधिक चर्चेत राहिला तो उद्योगपती गौतम अदाणींना टक्कर देणारा सीवीसी ग्रुप.

हेही वाचा: आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी

सीवीसी ग्रुप चाळीशीत

१९६८ मधे अमेरिकन बँकिंग कंपनी असलेल्या सिटी कॉर्पची स्थापना झाली. व्यावसायिक गुंतवणूक हा सिटी कॉर्पचा महत्वाचा उद्देश होता. हळूहळू या कंपनीचा विस्तार होत गेला. १९८१मधे सीवीसी कॅपिटल या नव्या गुंतवणूक कंपनीची स्थापना झाली. व्यावसायिक गुंतवणूक आणि गुंतवणूक सल्लागार म्हणून या कंपनीने काम करायला सुरवात केली. हा ग्रुप सुरवातीला सिटी कॉर्पची युरोपियन ब्रँच म्हणून ओळखला जायचा.

१९९६मधे सीवीसी कॅपिटल ग्रुपनं सिटी कॉर्पपासून वेगळं होत स्वतंत्रपणे काम करायला सुरवात केली. २००० मधे सीवीसी ग्रुप युरोपातली एक प्रसिद्ध गुंतवणूक कंपनी म्हणून नावारूपाला आली. लंडनमधल्या लक्झमबर्ग इथं तिचं मुख्यालय आहे. ही कंपनी उभी करण्यात स्टीव कोल्ट, डोनाल्ड मॅकेंझी, रॉली वॅन रॅपर्ड यांचं मोठं योगदान आहे.

१९८१मधे स्थापन झालेल्या ही कंपनीला ४० वर्ष झाली आहेत. सीवीसी ग्रुपकडे जवळपास १२५ बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. जगभरातल्या ७३ कंपन्यांमधे या ग्रुपनं गुंतवणूक केलीय. तर युरोप, आशिया आणि अमेरिकेसोबत जगभरात सीवीसीची २५ कार्यालयं, ३०० गुंतवणूकदार, ३ लाखच्या आसपास कर्मचारी काम करत असल्याचं कंपनीच्या साईटवर वाचायला मिळतं.

अनेक क्षेत्रांमधे गुंतवणूक

युरोपातली एक मोठी गुंतवणूक कंपनी म्हणून सीवीसी नावाजली जातेय. आशियायी कंपन्यांमधे जवळपास ७५० मिलियन डॉलर इतकी गुंतवणूक सीवीसीनं केलीय. तर नोव्हेंबर २००५ आणि मार्च २००६ या काळात कंपनीने 'ऑटो रेसिंग चॅम्पियनशिप'मधल्या फॉर्म्युला वन ग्रुपचे ६३.४ टक्के शेयर विकत घेतलेत.

२००७ला कंपनीने अमेरिकेत पाय रोवायला सुरवात केली. 'लॉजिक वायरलेस' ही वायरलेस उद्योग क्षेत्राला अनोखं तंत्रज्ञान देणारी एक महत्वाची कंपनी. फेब्रुवारी २०१५ला या बड्या कंपनीत पहिल्यांदा सीवीसीने गुंतवणूक केली. तर अवास्ट सॉफ्टवेअर ही एक आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा कंपनी आहे. यातही सीवीसीने आपली गुंतवणूक केलीय.

रेल्वे, वीज क्षेत्रात आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या पीकेपी एनर्जेटिका या कंपनीचे शेअर सप्टेंबर २०१५ ला सीवीसीनं विकत घेतले. तसंच कायदेशीर सेवा देणारी जगातली मोठी कंपनी 'युनायटेडलेक', युरोपातल्या कापड उद्योगातला ब्रँड असलेल्या 'टेंडम', पाळीव प्राण्यांची खाद्य उत्पादनं आणि सेवा देणारी अमेरिकेची 'पेटको' अशा अनेक कंपन्यांमधेही सीवीसीनं जोरदार गुंतवणूक केलीय.

हेही वाचा: क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट

गुंतवणूक क्रीडा उद्योगातली

सीवीसी ग्रुपच्या गुंतवणुकीतून आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रही सुटलेलं नाहीय. फॉर्म्युला वन ग्रुपचे ६३.४ टक्के शेअर घेणं ही सीवीसीची गुंतवणूक म्हणून क्रीडाक्षेत्रातली पहिली एण्ट्री होती. २०१२मधे टीका होऊ लागल्यामुळे सीवीसीनं हे शेअर ३५.५ टक्क्यांवर आणले. बाईक रेसिंगमधल्या मोटो जीपी, रग्बी, ब्रूएन स्पोर्ट्समधल्या गुंतवणुकीसाठी या कंपनीने अब्जावधी डॉलर्स खर्च केलेत.

स्पेनची प्रसिद्ध फुटबॉल टीम असलेल्या ला लीगाचे १० टक्के शेअर सीवीसीने ऑगस्टमधे विकत घेतलेत. त्यासाठी स्पेनमधल्या ४२ क्लबपैकी २ तृतीयांश क्लबचा पाठिंबा आवश्यक होता. ४ क्लबनी याला विरोध केला. त्यावरून वादही झाल्याचं 'स्क्रोल' या वेबसाईटने म्हटलंय. तर त्याआधी फेब्रुवारी महिन्यात सीवीसीनं 'इंटरनॅशनल व्हॉलीबॉल फेडरेशन' यांच्यासोबत भागीदारी करत 'व्हॉलीबॉल वर्ल्ड'ची घोषणा केलीय.

टेनिसमधेही भागीदारी मिळावी यासाठी ही कंपनी प्रयत्नशील असल्याचं रॉयटर्स या न्यूज एजन्सीचं म्हणणं आहे. 'सॅन अँटेनियो स्पर्स' ही अमेरिकन बास्केटबॉल टीम या क्षेत्रातली एक महत्वाची टीम म्हणून ओळखली जाते. त्यात १५ टक्के भागीदारी मिळावी यासाठी सीवीसीकडून प्रयत्न केले जातायत.

अहमदाबाद टीमवर ताबा

क्रीडा क्षेत्रामधून गेल्या काळात एक मोठी अर्थव्यवस्था उभी राहिलीय. त्यातच आयपीएल हे या आर्थिक उलाढालीचं महत्वाचं केंद्र बनलंय. पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या आयपीएलसाठी बीसीसीआयनं दोन नव्या टीमची घोषणा केली. त्यात लखनौ आणि अहमदाबादसाठी अदाणी ग्रुप, आरपी संजीव गोयंका, उदय कोटक, ऑल कार्गो लॉजिस्टिक यांच्यात प्रचंड स्पर्धा होती.

भारतातले श्रीमंत उद्योगपती गौतम अदाणी यांचा ग्रुप अहमदाबाद टीमसाठी प्रयत्नशील होता. त्याची मालकी अदानी ग्रुपकडे येईल अशा चर्चाही रंगत होत्या. त्यांना पर्याय नाही असं म्हटलं जात होतं. पण हा दावा फोल ठरला. सीवीसी कॅपिटल ग्रुपने ५१६६ कोटींची बोली लावत अदाणी ग्रुपला मात दिली. पहिल्यांदा क्रिकेट क्षेत्रात प्रवेश केला.

सीवीसीनं याआधीही आयपीएलमधे एंट्रीचे प्रयत्न केले होते. त्यासाठी दिल्ली आणि राजस्थान रॉयलशी चर्चा सुरू होती. पण तो प्लॅन फिस्कटल्याचं 'टाईम ऑफ इंडिया'नं आपल्या एका लेखात म्हटलंय. आता मात्र थेट अदाणींसारख्या बड्या उद्योगपतीला टक्कर देत अहमदाबाद टीमवर सीवीसीनं ताबा मिळवलाय.

हेही वाचा: 

लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला

रवीचंद्रन अश्विन : फॉरमॅटप्रमाणे रंग बदलणारा सरडा

विराट कोहलीच्या माथ्यावर ‘३६’चा शिक्का लावणारी टेस्ट सिरीज