काट्याच्या शर्यतीत भारताचा जावई झाला इंग्लंडचा पंतप्रधान

२५ जुलै २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


बोरिस जॉन्सन यांनी २४ जुलैला इंग्लडचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. भारताचा जावई असलेले जॉन्सन सगळ्यात वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. इंग्लंड सध्या ब्रेक्झिटच्या पेचप्रसंगात अडकलाय. अशा पेचाच्या परिस्थितीत जॉन्सन यांच्या खांद्यावर देशाचा कारभार आला.

युरोपियन देशांमधे काही घडलं की संपूर्ण जगाचं लक्ष तिकडे वळतं. बुधवारची घटनाही तशी महत्त्वाचीच आहे. इंग्लंडच्या नव्या पंतप्रधानांनी काल शपथ घेतली. हे नवे पंतप्रधान कोण आहेत? इंग्लंडची राजधानी लंडनचे माजी महापौर आणि हुजुर पक्षाचे नेते बोरिस जॉन्सन. पंतप्रधान पदासाठी त्यांची स्पर्धा विद्यमान परराष्ट्र मंत्री जेरेसी हंट यांच्याबरोबर होती. पण ४५ हजार ४८७ मतांनी त्यांचा विजय झाला.

भारताचे जावई

जॉन्सन यांना ९२ हजार १५३ मतं मिळाली तर हंट यांना ४६ हजार ६५६ मतं मिळाली. आता जॉन्सन पंतप्रधान पदावर विराजमान झालेत. त्यांच्याबद्दलची एक गोष्ट आपल्याला माहितीय का? ते भारताचे जावई आहेत. ते कसं बरं? जॉन्सन हे घटस्फोटित आहेत. पण त्यांची बायको मरिना भारतीय वंशाची आहे. ती लेखक खुशवंत सिंह यांची पुतणी आहे. तर मरिनाच्या आईचा म्हणजे दीप सिंह यांचा बीबीसीचे पत्रकार चार्ल्स व्हिलर यांच्याशी २००८ मधे घटस्फोट झाला.

त्यानंतर दीप सिंह यांनी खुशवंत सिंह यांचे लहान भाऊ दलजीत सिंह यांच्याशी लग्न केलं. आता तशी मरिना पंजाबीच. ती भारतात खूप फिरलीय. तिचं लग्न झाल्यानंतर जॉन्सन खूपदा भारतात येऊन गेलेत. दोघं अनेकदा भारतात येऊन राहिलेत. जॉन्सन यांनी तर कित्येकदा मस्करीत स्वत:ला भारताचं जावईसुद्धा म्हटलंय.

इंडिया टुडेने दिलेल्या एका बातमीनुसार, जॉन्सन यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पक्ष कार्यकर्ते, नेत्यांच्या बैठकीला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, माझे भारताशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी वैयक्तिक संबंध आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्या मैत्रीत पुढे वाढ होईल.

हेही वाचा: ट्रम्पतात्यांचा दोस्त नरेंद्र मोदींना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी झटका

ब्रेक्झिटसाठी ५२ टक्के मतदान गरजेचं

जॉन्सन यांनी बुधवारच्या शपथविधीत एक महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला. तो म्हणजे ब्रेक्झिटचा. ३१ ऑक्टोबरच्या आत ब्रेक्झिट मिळवणार असा निश्चयही केलाय. त्यांनी ट्विटरवरुनसुद्धा याबद्दल सांगितलंय. ब्रेक्झिट म्हणजे ब्रिटनची एक्झिट. पण कशातून एक्झिट घ्यायचीय? तर आपण अमेरिका आणि युरोप असं सतत बोलत असतो. तर युरोप खंडातल्या देशांचा युरोपियन युनियन आहे. ज्यात अनेक छोटे-मोठे देश आहेत. या युरोपियन युनियनमधून ब्रिटनला बाहेर पडायचंय.

युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनच्या संसदेत ५२ टक्के टक्के मतदान बाहेर पडण्याच्या बाजूने झालं तर शक्य होईल. त्याचबरोबर बाहेर पडताना युनियनसोबत एक करार करण्यात येईल. त्या कराराचा मसुदा बनवण्यातच बरीच वर्षं गेली. खरंतर मार्च महिन्यात प्रक्रिया पूर्ण होणार होती. पण ही एवढी संवेदनशील गोष्ट आहे की त्यावर सातत्याने फेरविचार सुरू आहे.

हेही वाचा: जी २० परिषद नेमकी काय आहे? आणि तिथे जाऊन मोदी काय करणार?

जॉन्सन ब्रेक्झिट घडवतीलच

जागतिक मंचावर इंग्लंड नेहमीच युरोपियन युनियनबरोबर असणार आहे. तसंच अनेक आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय आणि संरक्षण या मुद्द्यांवर ते एकत्रच काम करणार आहेत. इंग्लंडचं बाहेर पडण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या देशाच्या व्यापारावर मोठ्या प्रमाणात फरक पडत होता. इंग्लंड युरोपियन युनियनमधे असल्यामुळे युनियनच्या कस्टम ड्युटी, नियम लागत होते. त्यामुळे सातत्याने इंग्लंडला वेगळा देश म्हणून त्यांना जे मिळायला हवं ते मिळालं नाही.

तसंच इतर देश डबघाईला आल्यामुळे ब्रिटनवर त्याचा मोठा परिणाम झाला. आणि इंग्लंडचा पाऊंड सातत्याने घसरत राहिला. अशावेळी इंग्लंडसमोर आपला देश सावरू की दुसऱ्या देशाला वाचवू अशी परिस्थिती आली. त्याचबरोबर इंग्लंडमधल्या कायद्यांमधे, कोर्टातल्या खटल्यांमधे युरोपियन युनियन हस्तक्षेप करू लागला. त्याचा नागरिकांवर वाईट परिणाम होऊ लागला. म्हणूनच इंग्लडला युनियनमधून बाहेर पडायचंय.

ब्रेक्झिटच्या नव्या मसुद्यावर माजी पंतप्रधान टेरेसा मे यांनी सही केली होती. मात्र आता पुन्हा नव्याने मसुदा बनेल किंवा हाच मसुदा घेऊन संसदेत मतदान होईल. या सगळ्या गोष्टी येत्या काळात समजतील. जॉन्सन यांच्याकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. त्यांच्या मते या माणसाकडे ब्रेक्झिट घडवून आणण्याची पॉवर आहे. आणि ते हा मसुदा संसदेतून पास करून घेतीलच.

हेही वाचा: उत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा?

पींएम जॉन्सनबद्दलच्या ५ गोष्टी

आता नवीन पंतप्रधानांबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलाय. त्यांच्या खासगी गोष्टींपासून ते त्यांचं राजकारणातला चढता क्रम तसंच ते भविष्यात काय करतील. पण आपल्याला त्यांच्याबद्दल काही इंटरेस्टींग गोष्टी माहिती आहेत का?

१. जॉन्सन यांचे आजोबा तुर्की होते तर त्यांची आजी रशियन. पुढे ते इंग्लंडला स्थायिक झाले. म्हणूनच बोरिस हे त्यांचं नाव रशियन आहे.

२. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी १९८७ ते २००५ पर्यंत पत्रकारिता केली. त्यांनी अमेरिकेतल्या द टाईम्स मासिकातून आपल्या पत्रकारितेला सुरवात केली. वॉर रिपोर्टींगसुद्धा केलं. लंडनला आल्यावर त्यांनी पॉलिटिकल बीटवर काम केलं. २००१ मधे ते खासदार म्हणून निवडून आले तरी त्यांनी ४ वर्ष संपादकीय सल्लागार म्हणून काम केलं.

३. जॉन्सन २००८ मधे लंडनचे महापौर बनले. आणि त्यांनी सगळ्यात पहिला निर्णय दारू बंदीचा घेतला. सार्वजनिक जागेत दारू पिण्याबाबत सरकारचं झिरो टॉलरन्स असेल असं म्हणत त्यांनी सार्वजनिक ठिकाणी दारू बंदी घोषित केली.

४. २०११ ला लंडनमधे दंगल झाली होती. त्यावेळचे महापौर जॉन्सन कॅनडाला गेले होते. शहरात एवढी गंभीर परिस्थिती असतानाही जॉन्सन तीन दिवसांनी आले. यामुळे त्यांना लोकांचा रोष सहन करावा लागला होता.

५. जॉन्सन यांना इंग्लंडमधलं मोस्ट कॉन्ट्रोवर्शिअल मॅन म्हणूनही ओळखलं जातं. ते एलजीबीटीक्यू हक्कांसाठी लढलेत म्हणूनही त्यांना चर्चेचा भाग व्हावं लागलं. तसंच खून, दंगली यामधेही त्यांचं नाव घेतलं जातं. तसंच त्यांनी मरिनाच्या आधी आणखी दोन लग्न केली होती. आणि आता ते आपल्या गर्लफ्रेंडसोबत म्हणजेच कॅरी सायमंड्ससोबत राहात आहेत.

हेही वाचा: 

खरं तर ओबामा महाराष्ट्रात घडायला हवे होते

प्रिय मोदीजी, आम्ही देशाच्या भविष्याबद्दल चिंतेत आहोत

माहिती अधिकारात बदल करुन सरकारला काय साधायचंय?

जेंडर इक्वॅलिटीमधे भारताला १०८ वा नंबर देणारी संस्था कोणती?

परदेशात जायचंय, मग स्वस्तातलं विमान तिकीट बुक कसं करणार?