एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

२२ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


कवी व्यंकटेश चौधरी यांचा ‘एक शून्य प्रतिक्रिया’ हा दुसरा कवितासंग्रह आलाय. चौधरी हे नांदेड इथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करतात. चौधरींची कविता व्यक्तिगत जीवनातही एक माणूस म्हणून कुठल्याही दांभिकतेशिवाय जगणाऱ्या, जगण्यातलं आणि लिहिण्यातलं अंतर शून्य असणाऱ्या कवीची कविता आहे.

सुमारे १५ वर्षांच्या प्रदीर्घ अवकाशानंतर कवी व्यंकटेश चौधरी यांचा 'एक शून्य प्रतिक्रिया' असं चिंतनगर्भ शीर्षक असलेला दुसरा कवितासंग्रह शब्दालय प्रकाशनाकडून आलाय. या संग्रहात पाच उपविभागात एकूण ७७ कविता आहेत. ढोबळमानाने आपल्याकडे कवितासंग्रह प्रकाशित झाला की त्याची स्त्रीवादी, दलितवादी, ग्रामीणवादी अशा प्रकारात सुरवातीला वर्णी लावून नंतरच त्यावर बरंवाईट भाष्य अथवा समीक्षा केली जाते.

त्याअर्थाने 'एक शून्य प्रतिक्रिया' या काव्यसंग्रहाचं वर्गीकरण अमूक एखाद्या गटातटात करता येणार नाही. कारण संग्रहात आलेल्या कविता एकाचवेळी कृषीनिष्ठ ग्रामीण जगण्याचे ताणेबाणे मांडतात, त्याचवेळी त्या शहरी जाणिवांची एकांडी कसरतही उजागर करतात. तेव्हा ही कविता महानगरीय जाणिवांचाही उद्गार वाटते. व्यवस्थेचा एक पिचलेला घटक म्हणून काहीएक मानव्यभावाशी नातं टिकवून ठेवताना होणारा भ्रमनिरास व्यक्त करताना ती नोकरशाहीचा पोकळ सांगाडा चव्हाट्यावर टांगते.

एकाचवेळी कवी मैत्रसंबंधातल्या मतलबी मुखवट्यांचा पर्दाफाश करतो, त्याचवेळी जैवसंबंधांच्या फोलपणाचा विरागी साक्षात्कारही वारंवार कवितेत डोकावतो. तेव्हा ही दुहेरी घुसमट व्यक्तिगततेकडून सामाजिकतेकडे जात एकूणच मानवीसंबंधाचं मतलबीपण उघड करणारी ठरते. भुईबद्दल अत्यंत कनवाळूपणे बोलणारी ही कविता बाईबद्दलही अतिव आदरभावाने व्यक्त होत जाते.

काही व्यक्तिचित्रं रेखाटणाऱ्या कविताही संग्रहात आल्यात. त्याअर्थाने या कवितेतला आशय सर्वस्तरीय जाणिवांच्या बहुपदरी आयामातून झिरपलेला आहे. म्हणून संग्रहाचं वर्गीकरण थेट ग्रामीणवादी अथवा महानगरीय करण्याचा निर्णायकपणा टाळून यातील जाणिवांचा एकेक पदर त्या त्या भूमिकेतून समजून घेणं कवितेसाठी न्यायोचित ठरेल.

'मन्याडीच्या काठावरून' या उपविभागात आलेल्या कविता स्थितिशील शहरी वास्तव्यात राहणाऱ्या नोकरदार कवीची गावगाड्याशी नाळ जोडून ठेवताना होणारी काहिली मांडतात. ‘आज कामीन ढव उघडा आणि, कुठंकुठं एकदोन चलमे, ढोरावासराची सोय म्हणून, खवंद झालेल्या नदीच्या पात्रात’ अशा ओळींतून कवीच्या शेताशिवारावरून वाहणारी मन्याड नदी ही फक्त एक भौगोलिक वैशिष्ट्यं उरत नाही, तर ती एक जैव प्रतिमा होत गावखेड्याच्या जगण्याचा अभिन्न भाग म्हणून कवितेत येते. असे प्रतिमासेंद्रीयत्व कवितेला जास्त वास्तववादी बनवत नेणारे ठरते.

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

‘कुठं स्लॅबमधून ठिबकलं तर सीलिंगचा शो जाईल याची काळजी असते आम्हाला, अन् पाऊस नाही म्हणून बाप पोळतो आहे उन्हाच्या जाळानं’ या ओळी तसंच ‘ओरबाडून मायमातीचा तुकडा पावसाळी आभाळासकट, हिसकावलंत डोक्यावरचं वीतभर छप्पर, नागड्या रानाचा घे भरपूर भोग म्हणत, थोडा अवकाश द्यायला हवा होता तुम्ही त्याआधी, अखेरचं व्यक्त व्हायला, नैसर्गिक न्यायतत्व म्हणून तरी’ आणि ‘ओतले आयुष्य, परी देह जाईनाच खोल’ या ओळी कुणबिकीच्या अस्मानी सुल्तानीच्या बरबादीची जातिवंत कैफियत मांडतात.

व्यवस्थेच्या क्रमशः शोषणप्रक्रियेत सदासर्वकाळ मौन बाळगणारे संधीसाधू कंपू, 'ब्र' उच्चारणाऱ्याला कूटनीतीने एकटं पाडतात, अशांना गर्भित इशारा देताना कवी म्हणतो, ‘दहशतवादाचा अनुभव, जगतेय आपली माती, नामशेष होईल लवकरच सृजनाचा इतिहास.’ काळ सोकावण्याची भीती व्यक्त करताना खबरदारी म्हणून ‘जळमटांचा नायनाट करायला हवा’ असंही कवीला वाटतं.

'संपलं आहे दशक ', ' तपासणी', 'शाप', 'मौन', 'सल्लागार' , 'नियंत्रण', 'अनस्थेशिया' या सगळ्या कविता दांभिकतेवर प्रखर भाष्य करताना जगण्याबोलण्यातल्या विरोधाभासावर बोट ठेवतात. ‘साला या मेंदूची चाकंच काढून टाकली पाहिजेत’,  ‘बर्फ झालाय सगळा जगण्याच्या प्रवाहाचा, तो वितळूच नये कधी इतकं गार करण्याची व्यवस्थाही सगळ्या दिशेनं होत आहे’ अशा ओळींतून कवितेने एकप्रकारचा विद्रोही स्वर कमावलाय.

हेही वाचा: हैदर अली आणि टिपू सुलतान यांना न्याय देणारा इतिहास

'एक झाड एक दोर'मधे शेतकऱ्याची अगतिकता, कणसातल्या दाण्यावरचा हिशोब, कर्जमाफीचं नाट्य आणि यातून हळूहळू वेढून घेणारं कृषीजनांचं वैफल्य ‘निराशा इतकी सोयरी कधी झाली?’ या तुटलेपणातून उमटलेल्या ओळींमधे स्पष्ट दिसते.

‘ढोरागत खपून वाढवली नात्यांची पिलावळ, मजबूत झाली हाडंपेरं, तशी आपसुक गुरगुर कुठून आली’ हे शल्य व्यक्त करतानाच कवी विचारतो की, ‘आपण नाही विचारले कधी प्रतिप्रश्न आपल्या बापाला, त्याच्या झाडपणाबद्दल, याचा अर्थ आपल्याला प्रश्न पडले नव्हते, असा मात्र खचितच नाही’ या ओळी बदलत्या नव्या पिढीला एक संयमी प्रश्न विचारतात तेव्हा ही कविता फक्त भूतकाळात रमणारी नाटस्टॅलजिक नसते तर काळाच्या संक्रमणाची साक्षीदार होते. शिवाय त्यातील बऱ्यावाईटाला वैचारिक जाब विचारून ताळ्यावर आणणारं सक्षम पालकत्वही पेलते.

बाईलेकींच्या कवितेत कवी आई, लेक, सहचरी यांच्या माध्यमातून नुसताच भावनिक स्त्रीवाद मांडत नाही तर  ‘माय रानभर पसरली राखंत, रान राखण्याचा तिचा रिवाज, सुटला नाही मरणानंतरही’ अशा अल्पाक्षरी कवितेतून कितीतरी व्यापक सहजाणिवांचा अवकाश मितव्ययी शब्दकळेत पकडतो. या उपविभागातली 'माय' ही कविता खरंतर एकूणच संग्रहाचं मोठं सामर्थ्यस्थळ म्हणून अधोरेखित करता येईल.

मुक्त काव्यरचनेबरोबरंच 'जगत राहिलो मी' सारखी 'गझल' रचना आणि 'वांबाळ', 'बरे केले देवा', 'मागणे' या कवितांचा 'अभंग' स्वरूपाचा बंध संग्रहाला रचनाबंधाच्या दृष्टीनेही वैविध्य देतो. ‘धाड बाप्पा आता,ओलेते आभाळ, करूनी वांबाळ, शीत करा’ आणि ‘तरीही माधवा| बक्षिसली धग| धरोनिया तग| उभे आम्ही’, ‘आता या पिंडास। शिवो न कावळा| जीव हा बावळा। शांत होई’ अशी अभंगरचना थेट तुकारामाच्या कळवळ्याच्या जातकुळीचे स्मरण देते.

'चलमा',  'किरान उडी', 'चिंदूक', 'खवंद', 'चिपाड', 'वांबाळ' अशी समृद्ध बोली या कवितेला खास मन्याडीच्या काठावरूनवाला बाज मिळवून देते.

हेही वाचा: आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

संग्रहाचं आणखी एक सामर्थ्यस्थळ म्हणून मुखपृष्ठाचा आवर्जून उल्लेख केल्याखेरीज हा पुस्तक परिचय पूर्ण होऊच शकत नाही. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी या जाणत्या कलावंताचं वेधक मुखपृष्ठ स्वतःच एक गूढ कविता असल्याचं वाटतं. कुठल्यातरी चक्राकार आवर्तनावर हिंदोळणारी व्यक्ती 'आत्म'च्या केंद्राकडून समष्टीच्या परिघादरम्यान अहर्निश झोके घेताना मुखपृष्ठावर चित्तारलीय, ही अमुर्तता शीर्षकाचाच अन्वयार्थ प्रकट करणारी वाटते.

मलपृष्ठावरील कवितेच्या ओळी या चित्राला आणि संग्रहाच्या शीर्षकाला पूरक अशाच आहेत. ‘उगवून आलंय एक उफराटं झाड, घशाच्या पोकळ नळीत, पायाखाली फांद्या आणि मस्तकावर मुळं नाचवित' ही प्रतिमा डोळ्यापुढं एक चित्र उभं करते, या दृश्यात्मकतेतच त्या ओळींचं खरं सामर्थ्य आहे.

अनेकदा प्रतिक्रिया देऊन झाली की आपण रिते होतो. पण प्रतिक्रिया न देता हा आवर्त रेटत नेत मस्तकावरचं 'खाली फांद्या, वर मुळं असणारं उफराटं झाड' वागवत शून्य प्रतिक्रिया पेलणं जास्त अर्थवाही असतं हेच या उपरोधजन्य शीर्षकातून प्रतित होते.

'शब्दालय' प्रकाशनाची एक देखणी आणि तितकीच कसदार निर्मिती म्हणून व्यंकटेश चौधरी यांच्या 'एक शून्य प्रतिक्रिया' चे साहित्यजगतात आवर्जून स्वागत करायला हवं! व्यक्तिगत जीवनातही 'एक माणूस' म्हणून कुठल्याही दांभिकतेशिवाय जगणाऱ्या, जगण्यातलं आणि लिहिण्यातलं अंतर शून्य असणाऱ्या कवीची कविता कशी असते हे अनुभवण्यासाठी म्हणूनतरी हा संग्रह नक्कीच वाचायला हवा!

हेही वाचा: 

आजच्या हिंदीत नाही भारताला एकसंध ठेवण्याची ताकद

महाराष्ट्रात दिवाळीआधीच फुटणार विधानसभा निकालाचे फटाके

सरकारच्या हस्तक्षेपामुळे एलआयसीची विश्वासार्हता धोक्यात आलीय?

अथर्व अंकोलेकरः शेवटच्या ओवरमधेही विकेट काढणारा जिद्दी बॉलर