‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

२२ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे.

प्रसाद कुमठेकर यांची ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ ही बहुचर्चित कादंबरी नुकतीच वाचली. म्हटलं तर ही कादंबरी. म्हटलं तर हा कथासंग्रह. म्हटलं तर ही व्यक्तिचित्रं. एक वेगळाच फॉर्म लेखकाने वापरलाय. यात ३१ ष्टोऱ्या आहेत. लघुकथेसारखी दीड ते अडीच पानांची एक ष्टोरी. प्रत्येक ष्टोरीचा निवेदक हा वेगळा. हे निवेदक वेगवेगळ्या वयोगटातले आणि वेगवेगळ्या स्तरातले आहेत.

उदगिरी बोलीभाषा हे कादंबरीचं वैशिष्ट्य

पुस्तकात ष्टोऱ्या वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा एकमेकाशी संबंध आहे. त्यामधे एक सूत्र आहे. म्हणूनच या रचनाबंधाला कादंबरी असं म्हणता येईल. मराठीत बहुधा कादंबरीचा निवेदक एकच असतो. वि. स. खांडेकरांनी ‘ययाती’ या कादंबरीत ययाती, शर्मिष्ठा, देवयानी या तिघांच्या निवेदन आणि दृष्टिकोनातून गोष्ट सांगितली. इथे तर प्रत्येक ष्टोरीचा निवेदकच वेगळा आहे. निवदेकाची भाषाशैली वेगळी आहे.

कादंबरीतला हा वेगळा प्रयोग आपल्याला वाचायला मिळतो. असे प्रयोग करताना कादंबरी फसण्याची शक्यता असते. पण कुमठेकरांनी यात यश मिळवलं. याला कथेकरी फॉर्म म्हणता येईल. हा आपल्या मातीतलाच फॉर्म आहे. जातककथा, लीळांशी नातं सांगणारा हा वाङ्मय प्रकार.

पूर्णपणे उदगिरी बोलीचा वापर हे या कादंबरीचं एक ठळक वैशिष्ट्य आहे. ही भाषा लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातली. लातूर, उस्मानाबादी बोलीसोबतच आणि कन्नडचा या बोलीवर प्रभाव दिसतो. बोलीभाषेचा इतका सुंदर वापर खूपच कमी कादंबऱ्यांतून झालाय. उदगिरी बोली लेखकाने खूप बारकाईने आणि तिच्या अंगभूत वैशिष्ट्यांसह वापरलीय. उच्चारानुसारी लेखनामुळे बोलीचा लहेजा सांभाळण्यात लेखक यशस्वी झालाय. कादंबरीच्या शेवटी शब्दार्थांचं परिशिष्टही जोडलंय. त्यामुळे या बोलीचा परिचय नसणाऱ्या वाचकालाही समजायला अडथळा येत नाही.

हेही वाचा: आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

लेखकाने तठस्थपणे लिहिलंय

पुस्तकातल्या या ष्टोऱ्या खूपच गंमतीशीर पद्धतीने सांगितल्यात. त्यामुळे कुठंही कंटाळवाण्या वाटत नाहीत. या ष्टोऱ्यांमधे ह्युमरही आहे आणि त्याखाली दडलेली करूणाही. लेखकाने आजचं वास्तव खूपच समंजसपणे आणि प्रत्ययकारी पद्धतीने मांडलंय. यात दोन पिढ्यांमधला मूल्यसंघर्ष, अलीकडच्या काळात गावात झालेले बदल दिलेत. वास्तवाचा आरसा दाखवणं एवढंच काम निवेदक करत नाही, तर प्रत्येक निवेदकाला स्वतःची मतं आहेत.

लेखक परंपरेतल्या सगळ्याच गोष्टींचं उदात्तीकरण करत नाही. जे आऊटडेटेड आहे ते सोडून द्यायची त्याची तयारी दिसते. मराठी लेखकांमधे विशेषतः ग्रामीण लेखकांच्या लेखनात जो भाबडेपणा दिसतो, तो या पुस्तकात कुठेच दिसत नाही किंवा सगळंच टाकाऊ आहे, असा उद्दाम अभिनिवेशही नाही. यासाठी लेखकांनं तटस्थतेनं भवतालाकडे पाहणं आवश्यक असतं. असा तटस्थपणा प्रसाद कुमठेकर यांनी साधलाय.

लाठ्याकाठ्या न घेता होणारी वाटणी 

‘भिजकं घोंगडं’ या ष्टोरीतले भाऊ गावकडे मिळून राहतात. यातले बाकीचे शहरात तर एक गावात असतो. घर एकत्र ठेवल्याचा त्यांना अभिमानही असतो. पण शहरात शिकलेली त्यांची मुलं प्रॅक्टिकल. जे आमचं आहे ते आम्हाला देऊन टाका; असं मुलं म्हणतात. शेवटी व्हायचा तो इमोशन ड्रामा होतोच. मुलं वाटणी करून घेतात आणि काही झालंच नाही असं एकमेकांशी गप्पा मारत एकाच चुलीवर केलेलं आनंदानं जेवतात. लाठ्याकाठ्या न घेताही वाटणी होऊ शकते हे गावातल्या लोकांसाठी नवीनच.

या ष्टोरीचा शेवट यादृष्टीने बघण्यासारखे आहे. ‘पर असं वाटन्यायचं भिजकं घोंगडं घरच्यांच सगळ्यांनी मिळून बकिटीबाहीर काढून, त्येला व्यवस्थित पिळून असं दाराम्होरल्या दोरीवर व्यवस्थित वाळत घातलेलं घर, त्यांनी पहिल्यांदाच पाहत आस्तीन.’

बदलते दृष्टिकोन, बदलती मानसिकता, बदलता गाव हे सगळं लेखकाने खूपच अचूकतेने टिपलंय. 

हेही वाचा: अपना बाजारची गोष्टीः सक्सेसफूल सहकार मॉडेलची कहाणी

नव देशीवादी कादंबरी

कादंबरीची अर्पणपत्रिका लक्ष वेधून घेते. ही अर्पणपत्रिका मला एक स्वतंत्र कविताच वाटते. मितव्ययी लेखनशैली हे या लेखकाचं आणखी एक वैशिष्ट्य. जे नजरेत भरण्यासारखं आहे. कवितेत असतो तसा गोळीबंद आशय प्रत्येक ष्टोरीत दिसतो. काही प्रतिमा आणि रूपकही यात आलीत. जीवनाकडे पाहण्याची पूर्वग्रहरहित आणि मिष्किल दृष्टी असल्याशिवाय असं लेखन संभवत नाही.

उदगीर परिसराची भाषिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक वैशिष्ट्यं नोंदवणारी ही नव देशीवादी कादंबरी आहे. ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या कादंबरीने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढून खूप पुढे नेऊन ठेवलं. यासाठी लेखक प्रसाद कुमठेकर यांचे अभिनंदन.

कादंबरीचं नाव: बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या (दुसरी आवृती)

लेखक: प्रसाद कुमठेकर 

प्रकाशक: पार पब्लिकेशन्स

पानं: १२०

किंमत: १८० ₹

हेही वाचा: 

तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

आधुनिक जगात प्रबोधन हेच समाजाला नवी दिशा देईल

महाराष्ट्रात दिवाळीआधीच फुटणार विधानसभा निकालाचे फटाके

सरकारच्या हस्तक्षेपामुळे एलआयसीची विश्वासार्हता धोक्यात आलीय?

अथर्व अंकोलेकरः शेवटच्या ओवरमधेही विकेट काढणारा जिद्दी बॉलर