कलेची पुनर्घडण : संगीत क्षेत्राला जमिनीवर आणणारं पुस्तक

१८ फेब्रुवारी २०२३

वाचन वेळ : ७ मिनिटं


गायक टी. एम. कृष्णा हे कर्नाटकी संगीत परंपरेतलं एक महत्वाचं नाव. त्यांच्या 'री-शेपिंग आर्ट' या पुस्तकाची सगळीकडे चर्चा झाली. या पुस्तकाचा 'कलेची पुनर्घडण' या नावाने मराठी अनुवादही आलाय. कला म्हणजे काय? कला आणि समाज यांचं नातं, कलेचं काळानुरूप बदलणं अशा अनेक गोष्टींवर हे पुस्तक भाष्य करतं. त्याचवेळी या क्षेत्रातल्या सनातनी प्रवृत्तीलाही आरसा दाखवतं.

कला आपल्या स्वातंत्र्याची अस्सल अनुभूती देते. मग या अनुभवाचं क्षेत्र विशाल करणं हे कलावंतांचं कर्तव्य नाही का? बुद्धीच्या मर्यादा ओलांडणारं संगीत थेट हृदयाला जाऊन भिडतं. पण सर्वसामान्यांना सभागृहात जाऊन गायन ऐकणं, हे आवाक्याबाहेरचं असतं. हातावर पोट असणाऱ्यांसाठी तर कला आणि करमणूक शक्यच नसते.

कृष्णा यांनी कष्टकऱ्यांपर्यंत संगीत पोचवलं. साथीदार घेऊन ते अचानक रस्त्यावर, रेल्वेत आणि बसमधे जाऊन गाणं म्हणू लागले. खेड्यात आणि शहरात सार्वजनिक ठिकाणी गायन करणारे डोंबारी, जोगी आणि तृतीयपंथी यांच्या सोबत राहून त्यांची गायनकला समजावून घेतली आणि त्यांच्या सोबत गाणं सादर केलं.

समुद्रात नावा हाकताना सहजस्फूर्त गाणारे कोळी मैफलीतल्या गाण्याला कसा प्रतिसाद देतात, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी चेन्नईच्या कोळीवस्तीत जाऊन संगीताच्या अनेक मैफली सादर केल्या. त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी मन:पूर्वक संवाद साधला. यातून ते लोककला आणि मंचीय कला यांच्या खोलात गेले.

ते म्हणतात, 'मी समुद्र किनारी गायन सादर करतो, तेव्हा तिथं फेरफटका मारायला आलेले मध्यम वर्गीय, मासेमारी करणारे कोळी, फुगे-खेळणी-भजी विकणारे, तिथं थांबलेले रिक्षाचालक, असे बहुरंगी लोक उपस्थित होत. न कळत जमलेले आणि जाणीवपूर्वक आलेले श्रोते कलेचा अनुभव घेत होते. तिथं सर्वकाही उत्स्फूर्त होतं. कोणी ऐकण्यात दंग होऊन कमाई विसरून जात होतं. कोणी काम करत ऐकत होतं.'

हेही वाचा: भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या

संगीत प्रसाराविषयीचं विवेचन

पारंपरिक अवकाश ओलांडून मैफलींचं सादरीकरण करणं हेच कृष्णा यांचं मोठं सांगीतिक विधान आहे. १९६०च्या दशकात पाश्चात्त्य संगीताला रस्त्यावर आणून ‘बीटल्स’ गटानं सांस्कृतिक बंड पुकारलं होतं. पथनाट्य चळवळ, भित्तिपत्रकातून साहित्य आणि चित्रकलेचं सादरीकरण, सिनेमाचा कॅमेरा स्टुडिओतून बाहेर येणं ही त्या काळाचीच देण आहे.

त्याच मार्गावर निघालेल्या कृष्णा यांना कला म्हणजे काय? कला आणि समाज यांचं नातं कसं आहे? कला ही काळानुरूप बदलत आहे का? कलेचं अध्यापन आणि प्रसार यांचं स्वरूप कसं आहे? यावर अखंड संशोधन आणि प्रत्यक्ष कामातून 'री-शेपिंग आर्ट' हे पुस्तक साकार झालं. पत्रकार, लेखक आणि अनुवादक शेखर देशमुख यांच्यामुळे या महत्त्वाच्या पुस्तकाचा ‘कलेची पुनर्घडण’ हा अनुवाद मराठीतून उपलब्ध होत आहे.

‘तृप्तीचा आणि मुक्तीचा अनुभव देणारी कला हे एक गूढच आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्व-भावानुसार त्याची कलेची व्याख्या बदलत जाते. ‘कला ही जीवनावश्यक बाब आहे की चैन?’ असं निरूपण करून कृष्णा संगीत प्रसाराविषयी विवेचन करतात.

कलेतल्या समतेसाठी धडपड

राजे, जमीनदार, राजकारणी, नोकरशहा, मंदिरांचे व्यवस्थापक आणि इवेंट मॅनेजर यांच्यामुळे संगीत लोकांपर्यंत पोचलं. साहजिकच कलेचे आश्रयदाते आणि मध्यस्थ यांच्या आवडीअनुसार कला सादर होत गेल्या. कलेच्या प्रसारकांना विस्ताराच्या कक्षा ओलांडण्याची इच्छाच नव्हती. त्यामुळे श्रोतृवर्ग मर्यादितच राहिला. कष्टकरी वर्ग आणि जातीच्या उतरंडीतल्या खालच्या स्तरातल्या लोकांना ज्ञानापासूनच नाही तर कलेपासूनही वंचित ठेवण्यात आलं.

कृष्णा म्हणतात, 'सार्वजनिक जीवनात संस्कृती ही आपला पासपोर्ट ठरत असते. संस्कृतीच धर्मापलीकडे जाऊन आयुष्यावर प्रभाव टाकत असते.' संस्कृतीचं उत्कट प्रकटन म्हणजे कला, हे खरंच आहे. पण कलाकृतींवर ताबा मिळवून किंवा अति महत्त्व देऊन कलेचं मूल्यमापन केलं जातं. जात आणि लिंग यात भेदभाव करणारी संस्कृती सर्वत्र रुजली आहे. ही वेदना घेऊन कृष्णा कलेमधे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणण्याची वाट आणि चाल शोधत निघालेत.

'कलेची पुनर्घडण' हा कलेमधे समता प्रस्थापित करण्याचा जाहीरनामा आहे. २०१६ला या असामान्य कार्याचा रॅमन मेगॅसेसे पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्या सन्मानपत्रात, 'भारतामधे खोलवर रुजलेल्या सामाजिक भेदभावाच्या जखमांवर कलेची फुंकर घालून, जात आणि वर्गाचे मोठे अडथळे ओलांडण्याची आणि संगीत सर्वांपर्यंत पोचवण्याची महत्त्वाकांक्षा घेऊन चालू असलेल्या कार्याचा गौरव!' असं नमूद केलं होतं.

मागास जातींच्या कलेचं संशोधन

या पुस्तकात कृष्णा यांनी दक्षिण भारतातल्या कर्नाटक संगीत आणि सादिर अर्थात भरतनाट्यम्‌चा प्रथमावतार कला आणि त्यातलं राजकारण टोकदारपणे मांडलं आहे. कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ राज्यातलं संगीत आणि नृत्यकलेची परंपरा ही इतर मागासवर्गीय जातींनी जतन केली आहे. कृष्णा यांनी या कला आणि त्यांचा प्रसार याचं सखोल संशोधन केलंय.

यक्षगानाशी साधर्म्य असणारी ‘कट्टाइकट्टू’ आणि ‘टेराकट्टू’ ही नृत्य-नाट्यकला तामिळनाडूतल्या छोट्या गावांतून अजूनही प्रचलित आहे. ग्रामदेवतेला प्रसन्न आणि शांत करण्यासाठी ही कला सादर केली जाते. वन्नार-धोबी आणि पांडाराम या जातींनी ही कला जपून ठेवली आहे. पण या कलेला भरतनाट्यम आणि कथकली एवढी सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठा मिळू शकली नाही.

हेही वाचा: प्रभाकर कारेकरांच्या गायकीवर खुद्द दिलीपकुमारही फिदा असायचे

कर्नाटक संगीत, भरतनाट्यमवर पुरुषांचा ताबा

एके काळी कर्नाटक संगीत आणि सादिरच्या सादरीकरणात, देवदासी स्त्रियांना मानाचं स्थान होतं. त्या काळात सादिर आणि भरतनाट्यमचा मुक्त प्रसार झाला. या कलेचे गायक, वादक, शिक्षक आणि नृत्यांगना प्रामुख्यानं इसाई वेल्लालार या जातीच्या होत्या. त्यांनी कलेच्या प्रसारात बाधा आणली नाही.

कलेचे आश्रयदाते, वादक आणि गायक यातल्या पुरुषांनी देवदासींचं शोषण चालू केलं आणि त्यांनी देवदासींना वेश्या ठरवून टाकलं. कलावंतांना मिळालेल्या हीन वागणुकीमुळे ते कलेपासून दूर होत गेले. पुढे कर्नाटक संगीत आणि भरतनाट्यम कलांवर पुरुषांनी ताबा मिळवला.

पुरुष नृत्यगुरू होऊन ब्राह्मण स्त्रियांना भरतनाट्यमचे धडे देऊ लागले आणि श्रेष्ठ कलावंत त्या कलेपासून बाहेर फेकले गेले. त्यानंतर नृत्य आणि संगीतात एकही देवदासी दिसली नाही. त्यातल्या कित्येक जणी हलाखीत मरण पावल्या.

कर्नाटकी संगीतातला कर्मठपणा

‘सादिर’ ही संज्ञा कालबाह्य होऊन ‘भरतनाट्यम’ रूढ झाली. हा कलेमधला वर्चस्ववाद व्यक्त करताना लेखक त्यामुळे कलेचं अपहरण कसं होत गेलं, हेही दाखवून देतात. 'आपण जातव्यवस्था आणि धर्माबद्दल तावातावाने बोलत असतो. पण संस्कृतीमधल्या स्त्रीच्या स्थानाची चुकूनही चर्चा करत नाही. वास्तविक पाहता, आपल्याकडच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इमारत ही लिंगभेदाच्या पायावर उभी राहिली आहे.'

अशा संकुचित वातावरणातल्या कर्नाटक संगीताच्या अध्यापनातल्या सनातनीपणावर कृष्णा यांनी जोरदार हल्ले चढवले आहेत. ते म्हणतात, 'संगीत शिकणाऱ्या मुलींनी पवदाई-दावनी असा साडीचा प्रकार किंवा सलवार कमीज घालणं बंधनकारक आहे. मुलींच्या कपाळावर कुंकू आवश्यक आहे. काही शिक्षक तर मुलांना धोतर नेसून येण्याचा आग्रह धरतात.'

'कर्नाटक संगीत क्षेत्रातला हा कर्मठपणा समाजासाठी घातक आहे. त्यातून पुढच्या पिढ्यांच्या माथी, कालबाह्य आणि सदोष नैतिकता मारली जाते. मनाला खुलेपणा येऊ न देता बंदिस्त केलं जातं आणि भेदभाव रुजवला जातो. प्रश्न विचारायला सक्त मनाई केली जाते. शिवाय त्यामुळे कलेचं अध्यापन आणि प्रसार याचं क्षेत्र खुजं केलं जातं.'

हिंदुस्थानी संगीत एक पाऊल पुढे

इथं हिंदुस्थानी अभिजात संगीत क्षेत्रातलं वेगळंपण दिसून येतं. या गुरू-शिष्य परंपरेत हिंदू-मुसलमान असा भेद नव्हता. गायनाच्या अध्ययन आणि अध्यापनात जातपात आड येत नव्हती. गानमहर्षी विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी दरबारातलं गायन सामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी लाहोर इथं ५ मे १९०१ला गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यामुळे संगीताची ‘राजाश्रय ते लोकाश्रय’ ही वाटचाल सुकर होत गेली.

त्या काळातल्या सनातनी वातावरणाला न जुमानता गायक पुरुषांनी स्त्रियांनाही संगीताची तालीम चालू केली होती. पलुस्करांनीच पुढाकार घेऊन २१ डिसेंबर १९२१ला हिराबाई बडोदेकरांची जाहीर मैफील आयोजित केली. बैठकीत गायन सादर करणाऱ्या गानहिरेमुळे पुढे अनेक गायिका तयार होऊ शकल्या. सामाजिक सुधारणांबाबत हिंदुस्थानी संगीत एक पाऊल पुढेच होतं.

अनेक संगीतज्ञांच्या मते 'हिंदुस्थानी अभिव्यक्तीचं अमर्याद स्वातंत्र्य आहे. त्यात उत्स्फूर्ततेला खूप वाव असल्यामुळे ते सर्जनशील कलावंतासाठी आव्हान असतं. म्हणून हिंदुस्थानी संगीतात काळानुसार बदल होत गेले. कर्नाटकी संगीत हे सनातनी, कर्मठ आणि ठाशीव आहे.’

हेही वाचा: आशाताई जेव्हा रहमानसाठी गातात

दाक्षिणात्य विरूद्ध हिंदी सिनेमा

देशातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण बदलत असताना त्यापासून कलाक्षेत्र दूर राहिलं? याची चिकित्सा करताना त्यांनी दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेसृष्टीची तुलना केली आहे. हिंदी सिने जगत हे उच्च जातींच्या ताब्यात असून ते नायककेंद्री आहे. त्यामुळे हिंदी सिनेमा सामाजिक समस्यांबाबत गुळमुळीत आणि साचेबद्ध असतात.

दलित, आदिवासी, शेतकरी आणि अल्पसंख्य यांचे विषय फारसे नसतात आणि आलेच तर ते वरवरचे असतात. याउलट दाक्षिणात्य सिने निर्मितीमधे बहुविध जाती आल्यामुळे वरचेवर कथनकेंद्री सिनेमा निघत आहेत आणि त्यांना देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

विषमता समजून घेतली

मागच्या ३० तीस वर्षांपासून जंगल आणि आदिवासींची परवड वाढत चाललीय. निसर्गविनाशातून सहजगत्या संपत्ती निर्माण करता येत असल्यामुळे जंगलं नष्ट करून आदिवासींना हुसकावणं हा राष्ट्रीय कार्यक्रम झाला आहे. प्रसार माध्यमं आणि राजकीय नेत्यांनी अस्पृश्य ठरवलेल्या या समस्या कृष्णा यांनी जवळून समजून घेतल्या. ते पर्यावरण चळवळीतले कार्यकर्ते नित्यानंद जयरामन यांच्या सोबत अनेक कामात सामील झाले.

तमीळमधे 'पोरोम्बोकू' म्हणजे सर्वांचं, समष्टीचं! त्यामधे तलाव, नद्या, नाले, कुरणं, पाणथळ जागा आणि समुद्रकिनारे यांचा समावेश होतो. या सार्वजनिक जागांमधूनच सार्वजनिक कलांचा आविष्कार घडत असतो. कृष्णा, अतिक्रमणाच्या विळख्यातून विस्मरणात जाणाऱ्या 'पोरोम्बोकू' रक्षणाच्या मोहिमेत सहभागी झाले.

कोणतीही कला आपल्यामधे आस्था जागवते. असा आस्थेवाईक अनुभव सर्वांपर्यंत पोचवायला हवा. पाश्चात्त्य संगीताच्या सिंफनी सादरीकरणात अनेक कलावंतांच्या कलांचं संमीलन होत असतं. त्यात सामाजिक उतरंडीतल्या वरपासून खालपर्यंतचे सहभागी होतात. त्यामुळे तिथली विषमता दूर होते, असा त्याचा अर्थ नाही.

कला सादरीकरणात समाजातले सर्व घटक एका पातळीवर येतात. ही गोष्ट लोकशाहीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्या दिशेनं भारतानं जावं, अशी कृष्णा यांना आस आहे. त्यामुळे ते देशातलं राजकीय, सामाजिक आणि आर्थिक पर्यावरण उमजून घेत आहेत.

ते विविध सुधारणांबाबत लिहिताना लेनिन, आंबेडकर, गांधी आणि पेरियार यांचे विचार सांगतात. जगातले आणि देशातले अनेक संदर्भ देतात. जातीयतेनं जीर्ण होत चाललेलं आपलं सामाजिक वस्त्र कलात्मकरीत्या विणण्यासाठी, कृष्णा वाचकांना उभे आणि आडवे धागे दाखवत आहेत.

काहीतरी शोधत राहणारा प्रवास

डोळे, कान आणि मन खुलं असणाऱ्या सुजाण लोकांनी कला जतन करण्यासाठी एकत्रित कृती करावी, हा उद्देश घेऊन कृष्णा यांनी निबंधलेखन केलं आहे. विषयाची कळकळ, विश्लेषणाचं धैर्य आणि  मांडणीतला प्रामाणिकपणा यामुळे ते वाचकाच्या मनाला थेट भिडतात.

शेवटच्या निबंधात ते लिहितात, 'माझ्या आजवरच्या अनुभवांनी मला माझ्यामधला अपुरेपणा दाखवून दिलाय. सभोवतालचे लोक, धर्म, संस्कृती, राजकारण, समाजकारण यातून मी शिकत आलो आहे. स्थळ आणि प्रसंगानुसार मी कधी समन्वय तर कधी संघर्ष केला आहे. सतत काही शोधत राहणारा हा प्रवास आहे.'

जात, वर्ग, लिंग आणि भाषा यांना ओलांडून उभ्या मानवजातीला आवाहन करणारी संगीत ही एक वैश्विक भाषा आहे. तिला समकालीन करण्यासाठी सर्व भेद मिटवून सर्वांना संगीत सौंदर्याचा आस्वाद घेता यावा, यासाठीच कृष्णा यांचा अट्टाहास आहे.

पुस्तक : कलेची पुनर्घडण
लेखक : टी.एम.कृष्णा / अनुवादक- शेखर देशमुख
प्रकाशक : मधुश्री प्रकाशन, पुणे
पानं : १६७ किंमत : २५०

( साभार - साप्ताहिक साधना )

हेही वाचा: 

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

भारतातली विविधता बाजूला सारून देश एक कसा होणार?

लतादीदींनी मुजरा गाण्यासाठी होकार दिला, कारण खय्याम

आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट