‘बॉम्बे सुपरस्टार’ म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामी

२९ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज २९ डिसेंबर. आपल्या अभिनयानं एका पिढीला वेड लावणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांची जयंती. ते इतके लोकप्रिय होते की बीबीसीनं त्यांच्यावर ‘बॉम्बे सुपरस्टार’ नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म केली. ही डॉक्युमेंटरी फारच मजेदार आहे. ही डॉक्युमेंटरी म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामीच!

अस्सल सुपरस्टार राजेश खन्ना यांची आज जयंती आहे. त्यांनी मिळवलेली  लोकप्रियता अजब होती. एका संपूर्ण पिढीसाठी आजही त्यांच्या सिनेमांचे दिवस अविस्मरणीय आहेत. राजेश खन्नांनी अक्षरश: सर्व थरातल्या तरुणांना झपाटून टाकलं होतं. त्यांचे सिनेमे ओळीने गर्दी खेचत होते. ‘उपर आका, नीचे काका’ असं त्यांच्याबद्दल बोललं जात होतं. म्हणजे वरती देव आणि जमिनीवर काका अर्थात राजेश खन्ना. हे थोडं अतिशयोक्तीचं वाटलं तरी बऱ्यापैकी त्यात तथ्य होतं. त्यांच्या या लोकप्रियतेची दखल बीबीसी या वृत्तवाहिनीलाही घ्यायला लागली होती. यावरून त्याच्या लोकप्रियतेची कल्पना येईल.

बीबीसीनं राजेश खन्नांवर 'बॉम्बे सुपरस्टार' नावाची डॉक्युमेंटरी केलीय. या डॉक्युमेंटरीच्या शुटींगची गोष्ट फार मजेशीर आहे. डॉक्युमेंटरीच्या आधी बीबीसीचा एक प्रतिनिधी चक्क पाचवेळा काकाच्या बंगल्यावर फेऱ्या मारून रिकाम्या हाताने परत आला होता. हा प्रतिनिधी दुपारी तीन वाजता ‘आशिर्वाद’ या राजेश खन्नाच्या बंगल्यावर गेला. तिथल्या वॉचमनला आपल्याला मुलाखतीसाठी बोलावलं असल्याचं त्याने सांगितलं. पण राजेश घरी नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच तो भेटेल अशी माहिती बंगल्यातल्या नोकरानं त्याला दिली.

परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत थांबूनही राजेश त्याला भेटला नाही. असं पाच दिवस घडलं. मग कुठे राजेश खन्ना त्याला प्रत्यक्ष भेटले. बंगल्याच्या दर्शनी भागात त्यांचे पुरस्कार आणि त्यांच्यावर लिहून आलेल्या दैनिक अंकांची सजावट तेवढी त्याला बघायला मिळाली.

मला ही गर्दी आवडते

बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवेळी ओमप्रकाश यांच्या ‘आपकी कसम’ या सिनेमाचं शुटिंग सुरु होतं. हे सगळं डॉक्युमेंटरीत दाखवलं गेलंय. काश्मीरमधे ‘सुने कहो, कहा सुना’ या गाण्याच्या प्रत्यक्ष शुटिंगवेळी झालेली गडबड बीबीसीने कॅमेऱ्यात पकडलीय. लोकांची अमाप गर्दी. आपल्या भागात राजेश-मुमताज आलेत हे नुसतं ऐकून जमलेली ही गर्दी होती. याची कुणी जाहिरात केली नव्हती.

बीबीसीवाल्यांची कॉमेंट्री फारच कॉमेडी आहे. त्यात ते म्हणतात, ‘काश्मीरमधे ६० हजार लष्करी जवान असतील. त्यातले बहुतेक इथे आले असावेत.’ यावरुन गर्दी केवढी असेल याची कल्पना यावी. शुटिंगदरम्यान लोकांचे सारखे आवाज येत होते. ती गर्दी त्रासदायक होती.

बीबीसी रिपोर्टरनं राजेश खन्नाला आणि मुमताजला विचारलं, ‘तुम्हाला ही गर्दी तापदायक नाही वाटत?’ यावर राजेश म्हणतात, ‘मुळीच नाही. मला ही गर्दी आवडते. त्यांचं प्रेम, त्यांची आस्था मला हेलावून टाकते.’ मुमताजही म्हणते, ‘ही गर्दी आम्ही किती लोकप्रिय आहोत तेच दाखवते नाही का? ही लोकप्रियता आज आहे, उद्या काय असेल हे कुणालाही माहीत नाही.’ खरंतर, मुमताज या शुटिंगवेळी थोडी आजारी होती. तरीही सिनेमात ती उत्साहाने काम करत होती.

हेही वाचा : पानिपतच्या आधी नेमकं काय झालं होतं?

म्हणून सिनेमात संगीत हवंच!

जे. ओमप्रकाश यांची ओळख करून देताना बीबीसीवाल्यांनी म्हटलंय, ‘यांच्या घरावर अलिकडेच इन्कम टॅक्सवाल्यांनी छापा टाकला होता. पण हा निर्माता दिग्दर्शक मोठा आहे. राजेश खन्ना ज्याला हात लावतो त्याचं सोनं होतं. त्यांचा हा सिनेमा प्रेम, द्वेष, संशय अशा वेगवेगळ्या भावना दर्शवणाऱ्या कथेवरचा आहे. यात संगीत तर आहेच. हिंदी सिनेमा संगीताविना पूर्ण होत नाही. गाण्याचं रेकॉर्डिंग आधी होतं. मग त्याचं शूटिंग होतं. लता मंगेशकर ही इथली आघाडीची गायिका आहे.’

जे. ओमप्रकाश यावर खुलासा करतात, ‘आमच्याकडे मूल जन्माला आल्यापासून संगीत सुरु होतं. त्याचं बारसं, जावळ, लग्न या सगळ्या प्रसंगांना संगीत लागतं. म्हणूनच सिनेमात गाणी लागतात. पण इथं पार्श्वगायन असतं. म्हणजे गाणारे गायक गायिका वेगळे असतात आणि पडद्यावरचे कलाकार ओठाच्या हालचाली करून गाणी गात असल्याचा अभिनय करतात.

याबद्दलसुद्धा राजेश, मुमताजला प्रश्न विचारले गेलेत. तेव्हा मुमताज म्हणते, ‘ही पद्धत विचित्र आहे. पण काय करणार. आधीपासून हे चालत आलंय.’ मात्र राजेश म्हणतो, ‘छान वाटतं. जो गायक माझ्यासाठी गातो त्याचा आवाज हुबेहूब माझ्या आवाजासारखा वाटतो. तो चांगला गातो म्हणून त्याने गायचं. मी अभिनय करायचा.’

फिल्मफेअर आणि राजेशमधली खडाजंगी

फिल्मफेअर पुरस्कार सोहळा म्हणजे हिंदी सिनेसृष्टीचा ऑस्कर सोहळा असा अभिप्राय देत बीबीसीवाल्यांनी त्या सोहळ्याची काही दृश्य दाखवताना राजेश विरुद्ध फिल्मफेअर यांच्यात रंगलेलं युद्धही दाखवलंय. त्यावेळचा पुरस्कार राजेशला मिळालेला नसल्यानं तो नाराज होता. त्यानं त्या सोहळ्याच्याच रात्री एका मित्रामार्फत पार्टी ठेवली होती. या पार्टीला कोण कोण येतील याची उत्सुकता त्याला होती.

याचवेळी देवयानी चौबळ ही फटाकडी पत्रकारसुद्धा बोलताना दिसते. देवयानी म्हणते. ‘राजेशची तब्येत बरी नाही असं त्याने सांगितलंय. तो फिल्मफेअरला जाणार की या पार्टीला. सर्वांना उत्सुकता आहे.’ प्रत्यक्षात राजेश आणि डिंपल हे पार्टीत आले.

डॉक्युमेंटरीत दाखवलंय की पार्टीला राजेशच्या चाहत्यांची आणि ओळखीच्यांचीच गर्दी खूप होती. कुणी स्टार्स फारसे आले नव्हते. अशावेळी बीबीसीच्या प्रतिनिधीनं देवयानीला प्रश्न केला, ‘या पार्टीविषयी तू काय लिहिणार?’ देवयानीचे उत्तर, ‘मी खरं ते लिहिणार.’

हेही वाचा : गोव्याला जाण्याआधी निवडा आपल्या आवडीचा बीच

डिंपलशी लग्न म्हणजे स्टंटबाजी नाही

या डॉक्युमेंट्रीमधे राजेश-डिंपल यांच्या लग्न सोहळ्याची काही दृश्यही आहेत. बीबीसीकडून कॉमेंट्री सुरु आहे. ‘राजेशने कोवळ्या डिंपलशी लग्न केलाय. ती एका उद्योगपतीची मुलगी आहे. तिचा एकच सिनेमा आलाय. आता बहुतेक तरुणी वेड्या होतील. आपले केस उपटतील असं वाटतं’, असं तो प्रतिनिधी म्हणत असतो.

या सोहळ्याबाबत देवयानीला काय वाटतं हेही जाणून घेतलंय. राजेशपेक्षा त्याची बायको निम्म्या वयाची आहे. मग हे लग्न टिकेल का? ही सगळी स्टंटबाजी तर नाही? असे प्रश्न तिला विचारले गेले. देवयानी म्हणाली, ‘तो तिच्या प्रेमात पडलाय. तिच्याशी लग्न करणार असल्याचं त्यानं सर्वात पहिल्यांदा मलाच सांगितलं होतं. तेव्हा तो नशेत होता. पण त्याचं प्रेम प्रामाणिक वाटतंय. ही स्टंटबाजी वाटत नाही.’

कार्टर रोडवरच्या राजेशच्या आशिर्वाद बंगल्यातली काही दृश्यं बीबीसीनं घेतलीयत. हा बंगला म्हणजे एक राजवाडा आहे. समोर अरबी समुद्र आहे आणि या बंगल्यात ‘बॉम्बे सुपरस्टार’ राहतो, असं आधीच त्यांनी वर्णन केलंय.

'बॉम्बे सुपरस्टार' डॉक्युमेंटरीमधून बीबीसीने हिंदी सिनेमांची निर्मिती कशी होते यापासून ते या सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या राजेश खन्नाच्या सवयी, आवडी निवडी, त्याचं राहणीमान, त्याचे विचार, त्याचा रुबाब या सगळ्यावर प्रकाश टाकलाय. राजेशचा एकूण त्यावेळचा दृष्टीकोन वेगळाच होता. लोक माझ्यावर प्रेम करताहेत तर मी त्याचा आनंद का घेऊ नये? असं तो म्हणायचा. तो चाहत्यांच्या प्रेमात डुंबलेला दिसतो. काहीही असो बॉम्बे सुपरस्टार ही त्याला दिली गेलेली सलामी आहे.

हेही वाचा :

पुरूषसत्तेचा धर्म उलथवणाऱ्या पेट्रूनियाची गोष्ट

पन्नाशीतला आराधना आज आठवण्याचं कारण काय?

महात्मा गांधी प्रत्येकाला वेगवेगळे उमगतात, त्याची गोष्ट

आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच