कम्युनिस्ट झालो, म्हणून अस्पृश्यांसाठी अस्पृश्य झालो

०१ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


आज १ ऑगस्ट अण्णा भाऊ साठेंचा जन्मदिन. अण्णा भाऊंचं एवढं विपुल साहित्य असूनही त्यांना साहित्यिकाचा दर्जा मिळाला नाही. त्यावर लेखक अंकुश कदम म्हणतात, अण्णा भाऊंसारखा आरपार जगणारा आणि आरपार लिहिणारा कलावंत विटाळवादी मराठी साहित्याला झेपणं त्यांच्या औकातीत नव्हतं.

‘आकाशातून पावसाच्या धारा बरसू लागल्या की, मांगांच्या डोळ्यातून आसू गळू लागत. मजूरीची दारं बंद होवून भूकेची आग पेटे. पोरं रडू लागत. म्हातारी टाचा घासू लागत.तरणी कंबर बांधून पाणी पिवून दिवस रेटीत .जुलमानं जगत. भीक मागणं अपमान वाटणारी ही जात खुशाल भुकेकडे पाहत विचार करी. विचार करकरून दमे आणि मग तिच्यापुढे एकच मार्ग स्पष्ट होई. सर्वजन जमून हत्यारं काढीत आणि भर पावसात, भर मध्यान्ह रात्री घराबाहेर पडत. दुरदूर दुसऱ्याच्या शिवारात शिरत आणि जे हाती लागेल ते ओरबाडून अगदी जीवावर उदार होवून लुटत नि परत येवून त्या भूकेच्या जबड्यात लोटीत. ही तिथं वहिवाट पडली होती. एक दिवस नव्हे तर दरवर्षी सुगी येईपर्यंत पावसाळ्यात त्यांना चोर बनावं लागत होतं. काहींचा सवयीनं तो धंदाच बनला होता. दारिद्र्यात वाईटाखेरीज काय जन्मणार?’

फकिरा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाड.मय, कादंबरी खंड १ पृ.१९२-१९३ मधलं हे कडवं.

‘चिरागनगर म्हणजे छोट्या छोट्या झोपड्यांची दाट वस्ती. सगळीकडे डास आणि माशा गटारपाण्याने वेढलेल्या एका झोपडीत आम्ही पोहचलो. ती झोपडी पाहून मी तर थरारलोच. कोनाडे कोळी कोष्टकांनी भरलेले, इतस्त पडलेले कागद, कोपऱ्यात मॅक्झीम गॉर्कीचा पुतळा. तुटलेल्या कात्यांची एक बाज, त्या बाजेवर अंगात दंडकं, लुंगी घालून महाराष्ट्राचा मॅक्झीम गॉर्की व्यग्र चेहऱ्याने लिहित बसला होता.’

चंद्रकुमार नलगे लिखित अण्णा भाऊ साठे गौरव ग्रंथातलं हे कडवं.

हेही वाचा: अण्णा भाऊंच्या कथेबद्दल आचार्य अत्रे काय म्हणतात?

बहुजनांचं कर्तृत्त्व बहुजनांना चेतावणारं

महाराष्ट्राचा हा मॅक्झीम गॉर्की म्हणजे लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे. अण्णा भाऊंचं हे जन्मशताब्दी वर्ष. या वर्षात अण्णा भाऊंच्या विचार आणि कर्तृत्वाचा जागर सगळेच उच्चरवाने करतील. डावे पुरोगामी विचारांचा जागर घालतील तर उजवे अण्णा भाऊंच्या राजकीय प्रतिकाची जातकेंद्री चर्चा करतील. अलिकडच्या काळात अण्णा भाऊंचे प्रतिक हे मांग जातीच्या प्रेरणेचे प्रतिक म्हणून घडवण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात अण्णा भाऊंच्या प्रेरणा जाती अस्मितेच्या चौकटीत बंदीस्त करण्याचा शास्त्या जातींचा डाव यशस्वी होण्याचा धोका आहे.

भारतातील शास्त्या जाती या उच्चजातीय आहेत आणि याच जातींकडे सांस्कृतिक प्रभुत्व आहे. या जातींना सांस्कृतिक मिरासदारी बाळगत आपले सत्तासंबंध मजबूत करण्यासाठी प्रतिकांचं राजकारण करावं लागतं. जातीसमर्थक प्रतिकं आणि जातीविध्वंसक प्रतिकं या दोन्ही प्रतिकांबाबत सत्ताधारी तसंच सांस्कृतिकदृष्ट्या प्रभुत्वशाली वर्ग कमालीचा जागृत असतो. तो या प्रतिकांची सोयिस्कर घडवणूक करतो. जातीसमर्थक प्रतिके व्यापक स्तरावर प्रक्षेपित केली जातात तर जातीविरोधक प्रतिकांचा अवकाश कमालीचा आक्रसून टाकतात.

भारतात तर या प्रतिकांचा अवकाश जातीपूरताच मर्यादीत केला जातो. छ. शिवाजी महाराजांचं प्रतिक विपरितपणे घडवित दादोजी कोंडदेवांचं प्रतिक घडवलं जातं. मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या तुकोबांच्या वारशाचा कमालीचा विकास करणाऱ्या म. फुलेंच्या भाषेची टिंगल करणाऱ्या चिपळूणकरांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणत. त्यांना सांस्कृतिक प्रेरणेचे प्रतिक बनवलं तर महात्मा फुलेंना माळी जातीच्या अस्मितेत बंदीस्त केलं. टिळक राष्ट्रीय नेते तर डॉ.बाबसाहेब आंबेडकर दलितांचे नेते. अभिजनांचे कर्तृत्व राष्ट्रीय तर बहुजन जातीतली प्रतिकं त्या त्या जातीच्या प्रेरणा म्हणून घडवली जाते.

महाराष्ट्रात अभिजनांचे कार्य महाराष्ट्रभूषणाच्या योग्यतेचं असतं तर दलित बहुजनांचे कर्तृत्व त्या त्या जातींच्या चेतवणारी म्हणून शिक्का मारला जातो. विलास सारंगांनी शास्त्या अभिजन वर्गाच्या परंपरेला विटाळवादी परंपरा म्हटलं. या परंपरेने या मुक्तीवादी प्रतिकांचा अवकाश विस्तारणार नाही याची कायमच खबरदारी घेतली.

हेही वाचा: सगळ्या उत्सवी वातावरणामधे अण्णा भाऊ समजून घेणं राहू नये!

इझमचा आततायी दुराग्रह

कुसुमावती देशपांडे यांनी मराठी कादंबरीचा इतिहास लिहिला त्याबद्दल स्वत: अण्णा भाऊंनी काढलेले उद्गार अभिजन वर्गाचा विटाळवाद अधोरेखित करणारं आहे. एकदा ते बोलताना एकदा म्हणाले होते, ‘बाईंनी एवढा मोठा इतिहास लिहिला. बरा लिहिला, चांगला लिहिला असं पुण्या मुंबईकडं विद्वान साहित्यिक बोलतात. पण बाईंना आमची एकही कादंबरी दिसली नाही. अख्ख्या इतिहासात चुकून नावसुद्धा नाही. हे असं आहे.’

खरं तर मुक्तीदायी परंपरेची प्रतिकं शास्त्या जातींना कधीच सोयीची नसतात. कारण ती जनतेला जागं करणारी असतात. जातीअंताचा पुकारा करणारी असतात. शोषित समुहांना मुक्तीसाठी चेतवण्याची धमक या प्रतिकांमधे असते. अण्णा भाऊ याच परंपरेचं अपत्य होते. त्यामुळे ते आजही आपल्या पूर्वसूरींप्रमाणेच संघर्षाचं प्रतिक आहे. ते जातीत बंदीस्त करण्याचा उजव्या शक्तींचं चलाखीचं राजकारण हे आपल्यासमोरील आव्हान आहे. उजव्या शक्तींचे डावपेच यशस्वी होण्यात डाव्या परंपरेनेही जाणते अजाणतेपणे हातभार लावला. प्राच्य विद्यापंडीत कॉ. शरद पाटील यांनी अण्णा भाऊंची धुळ्यातील भेटीचा प्रसंग सांगितला, ‘मी कम्युनिस्ट झालो, म्हणून अस्पृश्यांत अस्पृश्य झालो’ अशी खंत अणा भाऊंनी कॉ. शरद पाटलांकडे व्यक्त केली होती.

अण्णा भाऊंची ही खंत डाव्या चळवळीत वैचारिक अंतर्विरोधांनी शत्रूभावी विरोधाची जागा घेतल्याचं निदान करतं. डाव्या चळवळीत इझमचा आततायी दुराग्रह बाळगून शिक्के मारण्याची प्रवृत्ती उजव्या परंपरेच्या डावपेचांना ताकद देणारी ठरली.

हेही वाचा: ही पृथ्वी दलिताच्या तळहातावर तरलीय, वाचा अण्णा भाऊंचं गाजलेलं भाषण

अस्पृश्यतेसंबंधी मुकं असल्याची तक्रार

मातंग या अस्पृश्य जातीत जन्मल्यामुळे अभावग्रस्त जगण्याचा संघर्ष अण्णा भाऊंसारख्या साहित्यिक कलावंताला अटळ होतं. ते या जाती समाजाचं आजही वास्तव आहे. अण्णा भाऊ या संघर्षाला सामोरे गेले. मार्क्सवादी कार्यकर्ता म्हणून ते लढत राहिले. लोकशाहिराच्या भूमिकेतून मुक्तीवादी संघर्षासाठी सर्वहारा जनतेला चेतवत राहिले आणि याच संघर्षातल्या माणसांना त्यांनी कथा कादंबऱ्यांतून प्रेरणादायी नायकत्व बहाल केले.

अण्णा भाऊंनी पहिली घुटी इंग्रजी खजिन्यातील लुटीच्या पैशांचीच खाल्ली होती. ही लूट फकीराने केली होती. अण्णा भाऊ फकीराबद्दल लिहितात की, ‘त्याने माझ्यावर उपकार केलेत. त्याच्या पैशाची मी घुटी गिळली होती. सुरती रुपयांच्या दोन ओंजळी तो माझ्यावर उधलून गेला होता. त्याला मी कसा विसरणार? अखेर ज्ञानेशांची, तुक्याची, तीन कोटी मराठी जनतेची जी मराठी भाषा तिचं भांडार लुटून, फकिरावर उधळून त्या दोन ओंजळीची परतफेड करण्याचा प्रयत्न मी केला आहे.’

अण्णा भाऊंनी आपल्या कथा, कादंबऱ्यातून चित्रित संघर्ष वर्गीय आहे. जाती व्यवस्थेने लादलेली अभावग्रस्तता सोसूनही अण्णा भाऊंना जातीसंघर्ष चितारता आला नाही. अण्णा भाऊ कम्युनिस्ट असल्यामुळेच त्यांच्या प्रतिभेला जातीसंघर्ष टीपण्याचे धाडस झालं नाही असा तक्रारीचा सूर अण्णा भाऊंच्या कथा कादंबऱ्यांबद्दल काढला जातो. बाबुराव बागुल अण्णा भाऊंच्या रूपाने दलितांना थोर कथालेखक मिळाल्याचे सांगताना अण्णा भाऊंचे नायक हिंदू धर्माच्या जाती व्यवस्थेवर, अस्पृश्यतेसंबंधी मुकं असल्याची तक्रार करतात.

हेही वाचा: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंनी लोककलेला आधुनिक रुप दिलं

दलित असूनही अण्णा भाऊ कम्युनिस्ट झाले

अण्णा भाऊंनी आपल्या कथा कादंबऱ्यांतून चितारलेला संघर्ष वर्गीय दृष्टीचा असेलही पण फकीरासारख्या कादंबऱ्यातून मातंगांच्या जगण्याचं मांडलेलं वास्तव निव्वळ वर्गीय कसं म्हणता येईल? अण्णा भाऊंना भारतीय समाजातील जातीय शोषण कळत नव्हतं असं म्हणणं अन्याय करणारं आहे. अण्णा भाऊंची मराठी साहित्यातील सर्वश्रेष्ठ कलाकृती ‘फकिरा’ ही कादंबरी अण्णा भाऊंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली. अण्णा भाऊंची ही कृती केवळ बाबासाहेबांविषयी वाटणाऱ्या आदरापोटी केलेली कृती नव्हती तर जातीअंताच्या लढ्याशी जोडून घेण्याचा तो प्रयत्न होता.

जात-वर्ग लढ्याचा समन्वयाच्या भूमिकेचा तो अविष्कार होता. अण्णा भाऊ दलित संकल्पनेला वर्गाच्या कोटीत बघत असले तरी वर्ग संघर्षाची सोडवणूक दलित विद्रोहच करू शकतो याबाबत त्यांची वैचारिक स्पष्टता होती. म्हणूनच पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे हे ठणकावून सांगतात. तर दुसरीकडे ‘जग बदल घालुनि घाव, सांगुन गेले मला भीमराव’ असं म्हणत जाती अंताच्या लढ्याशीही आपलं नातं जाडलं. सत्तरच्या दशकात वादळासारखं अवतरलेल्या दलित साहित्याला प्रेरणा देण्याचं काम अण्णा भाऊंच्याच लेखणीने केलं.

खरंतर मार्क्सवादाचा अभ्यास करून ते मार्क्सवादी बनले नाही. जगण्याच्या हातघाईत ते कम्युनिस्ट बनले. शाळेचा दीडदिवसाचाच अनुभव घेवून वडीलांबरोबर पायी प्रवास करीतच अण्णा भाऊ वाटेगावहून मुंबईत आले. त्यावेळी कम्युनिस्टांची कामगार युनियन जोरात होती. या कामगारांसोबत राहून छोटीमोटी कामे करीतच मार्क्सवादाचे संस्कार झेलले. मुंबई नगरीत येवून अण्णा भाऊ कम्युनिस्टांच्या संस्कारात नसते आले तर नवलच.

कॉ. शरद पाटील यांनी अण्णा भाऊंची कम्युनिस्ट होण्याची अटळता अचूकपणे नोंदवलेली आहे. त्यांनी अण्णाबाऊंच्या साहित्याचे जार-वर्गीय विश्लेषण करताना लिहिलंय, ‘आंबेडकरांनी मुंबईच्या गिरणी कामगारांत या शतकाच्या तिशीअखेर प्रवेश केलेला असला तरी आर्थिक लढे केवळ लाल बावटा युनियन करीत असल्यामुळे तिचे वर्चस्व सत्तरीपर्यंत कायम होते. त्यामुळे दलित असूनही अण्णा भाऊ कम्युनिस्ट झाले.’

हेही वाचा: शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही

माझी मैना’ अण्णा भाऊंनी लिहिलेली छक्कड

अण्णा भाऊंनी लोकशाहिर म्हणून आपल्या प्रतिभेचं घडवलेलं दर्शन अचाटच म्हणावं लागेल. अण्णा भाऊंचा खरा पिंड लोकशाहिराचा. तमाशा, शाहिरीच्या वातावरणात बालपण गेलेल्या अण्णा भाऊंच्या प्रतिभेने लोकशाहिरीच्या रूपात गण, कटाव, लावणी, छक्कड अशा लोकधारेतून अद्भुत अविष्कार केला. म. फुलेंप्रमाणेच अण्णा भाऊंनी तमाशाचा आशय बदलला. तमाशाचा पारंपारिक बाज हा लोकानुरंजनाचा राहिला. लोकांच्या मनाची पकड घेण्याची तमाशा कलेमधे असलेली क्षमता दोघांनीही ओळखली.

म.फुलेंनी सत्यशोधक तमाशात पारंपरिक तमाशाचा आकृतीबंध तसाच ठेवला तरी तमाशाचा पारंपारिक बाज बदलला. पारंपारिक तमाशात गणाच्या लावणीत गणेशाची स्तुती केली जायची. सत्यशोधक जलशांनी निर्मिकाला वंदन करण्याची परंपरा सुरू केली. अण्णा भाऊंनीही लोकनाट्याची सुरूवात गणेशपुजनाऐवजी मातृभूमी, देशभक्त, हुतात्मे यांना वंदन करून करण्याची परंपरा सुरू केली. सत्यशोधक जलशांप्रमाणे अण्णा भाऊंच्या लालबावटा कलापथकांनी लोककलेच्या आधारे जनप्रबोधनाची परंपरा मजबूत केली.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मराठी भाषिक जनतेला अण्णा भाऊंनी प्रतिभावान लोकशाहिराचं अचाट दर्शन घडवलं. अण्णा भाऊ, अमरशेख आणि गव्हाणकर या तीन शाहिरांनी संयक्त महाराष्ट्राचा लढा शिलगावला. अण्णा भाऊंची गाणी आणि कॉ. द. ना. गव्हाणकर, कॉ.अमरशेखांची गायकीने उभ्या महाराष्ट्राला चेतवले. अण्णा भाऊंनी तेरा वगनाट्ये लिहिली. पट्ठेबापुरावांनी मुंबईची लावणी लिहिली. अण्णा भाऊंनीही मुंबईची लावणी लिहिली. अण्णा भाऊंकडे मार्क्सवादी दृष्टी असल्याने त्यांनी आपल्या लावणीतून कामगार, कष्टकऱ्यांच्या मुंबईचं दर्शन घडवलं. ‘माझी मैना’ ही अण्णा भाऊंनी लिहिलेली छक्कड. इतक्या ताकतीची लावणी कोणीच लिहिली नाही.

हेही वाचा: नाना शंकरशेठ होते म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर बनलं

अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात असं न होवो

अण्णा भाऊंनी जवळपास चाळीस कादंबऱ्या लिहिल्या. सात कादंबऱ्यांवर चित्रपट बनले. या चित्रपटांनी मराठी चित्रपटाला बहुजन चेहरा देण्याचं काम केलं असं आघाडीचे साहित्यिक जी. के. ऐनापूरे यांनी लिहिलं, ‘अण्णा भाऊंमुळे सामान्य माणसाचा चेहरा जो खेड्यापाड्यात राहतो. दळणवळणाच्या साधनांपासून दूर आहे असा मराठी चित्रपटाला प्राप्त झाला.’ अण्णा भाऊंनी लिहिलेली कथा मराठी कथाव्यवहाराला आशयाच्या आणि अभिव्यक्तीच्या अंगाने समृद्ध करणाऱ्या आहेत. ब्राह्मणी वर्चस्वाच्या साहित्यपरंपरेनं अण्णा भाऊंचं हे योगदान नाकारणंच पसंत केलं. अण्णा भाऊ जेव्हा लिहित होते तेव्हा मराठीत नवकथेचं युग अवतरलं होतं.

गाडगीळ, गोखले, भावे, माडगुळकर हे नवकथेचे अध्वर्यु ठरले, पण अण्णा भाऊंना या यादीत स्थान मिळू शकले नाही.अण्णा भाऊंनीही असल्या सन्मानाची कधी फिकीर केली नाही.

अण्णा भाऊंचं जगणं आणि लिहिणं आरपार होतं. जे अनुभवास आलं ते शब्दांत मांडलं. अण्णा भाऊंच्या लेखणीची भूमिका स्पष्ट होती. आपण जे जीवन जगतो, ज्या समाजात आपण वावरतो त्याचं दु:ख, दैन्य प्रामाणिकपणे मांडणं हेच त्यांच्या लेखनाचं प्रयोजन. आणि ते त्यांनी आयुष्यभर सांभाळलं. अण्णा भाऊंची साहित्यिक कलावंत म्हणून सर्वहारांच्या मुक्तीशी बांधिलकी होती. त्यामुळे त्यांनी कल्पनेच्या भराऱ्या मारल्या नाहीत. ते म्हणायचे, आपण शाहिरगडी. पुरोहीतपण करायचे माहित नाही. त्यामुळे आपण साहित्यात गाठी मारण्याचा आणि सोडण्याचा धंदा केला नाही.

अण्णा भाऊंसारखा आरपार जगणारा आणि आरपार लिहिणारा कलावंत विटाळवादी मराठी साहित्याला झेपणं त्यांच्या औकातीत नव्हतं. ना त्यांच्या सोयिचं होतं. अनुल्लेखानं मारण्याचं ब्राह्मणी कारस्थानाचे अण्णा भाऊही बळी ठरले. दारिद्र्य, अज्ञान,जात आणि राजकारण हे इतल्या व्यवस्थेनं दलित-बहुजन लेखक कलावंताला दिलेला शाप आहे. त्याच्या ओझ्याखाली आमचा लेखक कलावंत हकनाक बळी जातो असं नारायण सुर्वे यांनी म्हटलं. पण मेल्यानंतरही त्यांची प्रेरणा जाती अस्मितेचं प्रतिक बनवून तिचा क्रांतीकारी आशयच खतम केला जातो. हा लेखक कलावंतांचा किंवा कोणत्याही मुक्तीदायी प्रतिकाचा दुसऱ्यांदा खूनच असतो. अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचं असं न होवो.

हेही वाचा: 

देशभरातले डॉक्टर संपावर जाण्याचं कारण की,

विचारवंतांचं लेटर वॉर हे लोकशाहीचं विदारक वास्तव

लोकमान्य टिळक आणि साईबाबा, गजानन महाराज भेट