शाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला

२५ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज २५ एप्रिल. ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची जयंती. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिनय केला. त्यामुळे एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला. लोकांनीही धर्मभेद विसरुन त्यांची स्थापना थेट आपल्या देव्हाऱ्यात केली. मोडक यांचा धर्म, अध्यात्माचा अभ्यास पाहून वाटतं की कलावंतही अभ्यासू असू शकतो आणि त्यालाही विचार असू शकतात.

कलाकार आपल्यावर किती प्रभाव टाकतात. त्यांच्या प्रभावामुळे आपण जाहिरातीतले प्रोडक्ट घेतो. त्यांनी दिलेल्या सामाजिक संदेशाचा आपल्यावर प्रभाव पडतो. त्यांच्या सिनेमाातले कपडे, मेकअप, स्टाईल, डायलॉग यांचाही आपण प्रयत्न करतो. गेल्या १०० वर्षांत अनेक अभिनेत्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या सगळ्यांनाच प्रभावित केलंय. त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे मराठी, हिंदी सिनेमातले अभिनेते शाहू मोडक. ज्यांचे फोटो आपण कधी कृष्ण तर कधी ज्ञानेश्वर म्हणून पुजलेत. त्यांचा जीवनप्रवासही अगदी सिनेमातल्या गोष्टीसारखाच.

२९ वेळा कृष्णाचा रोल करण्याचा रेकॉर्ड

शाहू मोडक यांचा जन्म २५ एप्रिल १९१८ला झाला. त्यांचा जन्म अहमदनगरच्या मराठी ख्रिश्चन कुटुंबातला. ते फक्त मराठी ख्रिश्चन नाही तर दलित ख्रिश्चन होते. ते १९३२पासून म्हणजेच वयाच्या तेराव्या वर्षापासून सिनेमात काम करू लागले. पहिल्याच सिनेमात त्यांनी कृष्णाचा रोल केला.

गम्मत म्हणजे त्यांच्या सिनेमातल्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी २९ वेळा कृष्णाचा रोल पडद्यावर साकारला. हा एक रेकॉर्डच आहे. यातली आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे शाहूंनी पहिला कृष्णाचा रोल १३व्या वर्षी केलेला आणि ते ५० वर्षांचे झाल्यावरही त्यांनी बलराम श्री कृष्ण या सिनेमात कृष्णाचा रोल केला.

हेही वाचा: ट्रोलबडव्यांनो, कलावंतांना तरी सोडा

सरस्वती सिनेटोन स्टुडियोच्या भालजी पेंढारकर दिग्दर्शित श्याम सुंदर या सिनेमाातून शाहूंनी मोठ्या पडद्यावर एंट्री घेतली. यात त्यांनी आठ गाणी गायली. विष्णू पुराणातल्या श्लोकांचं पठण केलं, अशी माहिती पत्रकार केयुर सेता यांनी सिनेस्तान या वेबसाईटवरच्या लेखात दिलीय. 

त्यांचा कृष्ण पडद्यावर आला त्यावेळी शाहूंचे वडील अहमदनगरच्या चर्चमधे फादर होते. तरीही ते कृष्ण म्हणून पडद्यावर आले आणि नंतर ज्ञानेश्वर बनून, ही माहिती आहे इसाक मुजावर यांच्या संतपटांची संतवाणी या पुस्तकात. शाहूंनी त्यांच्या करियरमधे जवळपास १०० सिनेमे केल्याचा उल्लेख सिनेस्तानमधे आहे. 

शाहू सिनेमातून देव्हाऱ्यात पोचले

सुरवातीच्या काही संतपटांमधून बंगाली संत आणि बंगाली चेहरे दिसले. मग मराठी संत देखील आपला मराठी चेहरा घेऊन १९३६मधे संत तुकाराम आले. प्रभातचा हा सिनेमा सुपरहिट झाला. त्यामुळे प्रभात थिएटरने १९४०मधे शाहू मोडकांना घेऊन संत ज्ञानेश्वरांना आणलं. 

हेही वाचा: रजनीकांतचं पॉलिटिक्स सिनेमातून बोलतंय

संतपटांची संतवाणी या पुस्तकात म्हटलंय, `संत ज्ञानेश्वर सिनेमा आला तो काळ दलितांना मंदिरात प्रवेश मिळत नव्हता. त्यावेळी एका दलित कलावंतानं देवाचा रोल केला. त्याची मूर्ती बनवून मंदिरात स्थापित केली. यापूर्वी आलेल्या देव देवतांवरच्या सिनेमांत काही मुस्लिम आणि पारशी नटांनी काम केलं होतं. मात्र त्यांच्या धर्मावरुन अनेक सनातनी हिंदूंनी नाराजी व्यक्त करत निदर्शनं केली. त्यामुळे काही नटांचं नामकरण करण्यात आलं. मात्र मोडकांच्या नावावरुन ते ख्रिश्चन असल्याचं समजत नसल्यामुळे त्यांच्यावर काही नाव बदलण्याचा प्रसंग आला नाही.` 

दिग्दर्शक एस. फत्तेलाल संत ज्ञानेश्वर सिनेमाचं कास्टिंग करतना शाहूंच्या बोलक्या तेजस्वी डोळ्यांवर आणि त्यांच्या निरागसपणावर भारावून गेले. शाहूंनी या सिनेमासाठी वजन घटवलं होतं, निरागसपणा यावा म्हणून तीन दिवस उपास करून वजन घटवलं.

संत ज्ञानेश्वरांपुढे शाहूंचं दलितपण विसरुन लोकांनी सिनेमाला गर्दी केली. अमेरिकेतही सिनेमा रिलिज केला. हा सिनेमा मुंबईत ३६ आठवडे चालला. लोकांना त्यांचं काम एवढं आवडलं, ते एवढे प्रभावित झाले की शाहू म्हणजे साक्षात ज्ञानेश्वरच, खरे ज्ञानेश्वर असेच असणार असा समज झाला.  मग काय, लोकांनी शाहूंचे फोटो, मूर्ती घरातल्या देव्हाऱ्यात स्थापित करून त्यांची पूजाअर्चा करू लागले. आजही अनेकदा ज्ञानेश्वर म्हणून त्यांचं चित्र पाहायला मिळतं.

हेही वाचा: सेन्सॉर नावाचं मांजर आपल्या आडवं का येतं?

शाहूंनी केलेले अविस्मरणीय सिनेमे

शाहूंना संतपटांचा चेहरा असंही म्हटलं जातं. त्यांनी अशोक फिल्मसचा १९६५ला आलेल्या हिंदी संत तुकाराम सिनेमात तुकाराम साकारले. नंतर १९५७ला आलेल्या देवेंद्र गोयल यांच्या नरसी भगत सिनेमात नरसीचा रोल केला. तर १९७२मधे आलेल्या संत तुलसीदासमधे त्यांनी तुलसीदासांचा रोल केला आणि १९६०च्या भक्तराज सिनेमातही ते दिसले. रंगलोगतर्फे १९६४ला संत ज्ञानेश्वर सिनेमा आला, त्यात शाहूंना ज्ञानेश्वरांच्या वडिलांचा रोल साकारता आला. म्हणजे त्यांना त्यांच्या करियरमधे संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे वडील दोघांचाही रोल करता आला. 

औट घटकेचा राजा या १९३३ला रिलिज झालेल्या सिनेमात शाहूंनी दोन गझल गायल्या. त्यांचा आवाज ऐकून कुंदनलाल सैहगलांनी त्यांना आणखी गाण्यांची ऑफर दिली. शाहूंचा १९३९ला आलेला वी. शांताराम यांचा माणूस हा सिनेमा समांतर सिनेमाांमधला मैलाचा दगड समजला जातो. यात त्यांनी गणपत हवालदार क्रमांक २५५चा रोल केला. यात एक पोलीस एका वेश्येच्या प्रेमात पडतो. ही त्याकाळातली अत्यंत बोल्ड गोष्ट होती. 

लता मंगेशकरांनी सुरवातीच्या काळात काही सिनेमांमधे अभिनय केला. त्यातला आर एस झंकार आणि मंदिर या सिनेमात शाहूसुद्धा होते. 

हेही वाचा: माणसात असलेला काला बंदर कसा काढता येईल?

शाहूंचा वेगवेगळ्या धर्मांवर अभ्यास होता

शाहू मोडक एक कलावंत असूनही त्यांना अध्यात्माचं सखोल ज्ञान होतं. ते धार्मिक विषयांवर प्रवचनही देत. त्यांना लहानपणापासून अध्यात्माची ओढ होती. त्यांनी सर्व धर्मांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी स्वामी विवेकानंदांना गुरू मानलं होतं. त्यांनी त्यांच्या ग्रंथांचा अभ्यासही केला. त्यांनी अमेरिकेतल्या धर्मपरिषदेतही विवेकानंदांचे विचार मांडले. 

शाहू धर्मानं ख्रिश्चन असले तरी ते सर्वच धर्मांचा शास्त्रीय दृष्टीनं विश्लेषण करीत. ते म्हणत धर्मात त्याज्य असं काही नाही, धर्म हे अमृत आहे. ज्याला धर्म नेमकेपणाने समजला त्याचं जीवन अमृतमयच होऊन जातं. शाहू मानवधर्माचे उपासक होते. अशी माहिती शाहूंच्या पत्नी प्रतिभा मोडक यांनी लिहिलेल्या `शाहू मोडक... प्रवास एका देवमाणसाचा` या पुस्तकात आहे.

११ मे १९९३ला शाहू मोडकांचं निधन झालं. त्यानंतर प्रतिभा मोडक यांनी स्वत:ला समाजासाठी वाहून घेतलं. तसंच शाहू मोडकांचं नाव समाजातून कधी पुसलं जाऊ नये म्हणून प्रतिष्ठान स्थापन केलं. याद्वारे विकलांगांना पुरस्कार, आर्थिक मदत, कलाकारांचा गौरव असे कार्यक्रम घेतले जातात.

हेही वाचा: लॅक्मेचा फॅशन वीक किती दिवस बघायचा, आता आपणही उतरलं पाहिजे