भारताच्या शास्त्रीय योगचं रुपांतर मॉडर्न योगात करणाऱ्या इंद्रा देवी

१२ मे २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आपल्याकडे अधूनमधून वेगवेगळ्या गोष्टींचा ट्रेंड येत असतो. ज्याला आपण फॅड असही म्हणतो. सध्या योगाचं फॅड सुरु आहे. योग हा शरीर आणि मन यात बॅलंस साधतो असं आपण खूप ठिकाणी ऐकून, फॉरेनर्सना योगा करताना बघून आपण योगा क्लास लावला असेल. सध्या योगा ट्रेंडमधे आहे खरा पण आपल्याला माहितीय का, इंद्रा देवी या रशियन महिलेने सर्वप्रथम योगा भारतातून पाश्चिमात्य देशात नेला.


भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक फिरायला येतात. भारतीय संस्कृती, राहणीमान याबद्दल परदेशी लोकांना आकर्षण आहे. सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम बघता, भारतीय जीवनपद्धती आयडीयल मानली जात आहे. त्यामुळे योगाचं महत्त्वं अधिकच वाढत आहे. असंच भारताचं आकर्षण रशियाच्या युजीन पीटरसन म्हणजेच इंद्रदेवी यांना झालं होतं. म्हणून त्या भारतात आल्या आणि पहिल्या महिला योग गुरू बनल्या. त्यांना पाश्चिमात्य योगाच्या जननी असं म्हटलं जातं.

आजच्याच दिवशी म्हणजे १२ मे १८९९ ला रशियातल्या रीगा येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बँकेत कामाला होते तर आई समाजकारणात सक्रिय होती. त्या १५ वर्षांच्या असताना साहित्यिक, कवी रविंद्रनाथ टागोर आणि योगी रामचक्र यांची योगावरची पुस्तकं त्यांच्या वाचनात आली. ज्यामुळे त्यांच्या मनात भारतात जाण्याची इच्छा निर्माण झाली.

आणि योगाभ्यास सुरु झाला

पुढे त्यांनी कला क्षेत्रातलं शिक्षण घेतलं. त्यांनी मॉस्कोच्या ड्रामा स्कूलमधे नृत्य आणि अभिनयाचे धडे घेतले. मग त्यांनी अभिनेत्री आणि डान्सर म्हणून काम करू लागल्या. त्या १९२७ ला मुंबईत आल्या. त्यांनी बॉलिवुडमधे काही काळ करिअर केलं. त्यांनी शेर ए अरब सिनेमात पृथ्वीराज कपूर यांच्या सोबत काम केलं. त्यावेळच्या सिनेमांमधून प्रमुख भूमिका केल्या. अभिनय क्षेत्रात करिअर घडवत असतानाच त्यांनी मुंबईतले चेकोस्लोवाकचे काऊन्सलेट जॅन स्ट्रॅक्टी यांच्याशी लग्न केलं.

इंद्रा देवी त्यांच्या नवऱ्यासोबत तिरुमलई कृष्णमाचार्यांना मैसूर पॅलेसमधे भेटल्या होत्या. त्यानंतर काही काळाने त्यांना छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाला. त्यांना काही लोकांनी सुचवले की तुम्ही योगा करा. म्हणून त्यांनी कृष्णमाचार्यांकडे योगा शिकण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यांनी इंद्रादेवींना शिष्य बनवून घेण्यास साफ नकार दिला. महिलांना शिकवत नाही आणि परदेशी महिलेला तर नाहीच नाही असं कारण त्यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा: बोरिवलीच्या आजीबाईच्या बटव्यात दडलंय काय?

पण शेवटी मैसूरच्या महाराजांनी गळ घातल्यामुळे कृष्णमाचार्यांना इंद्रादेवींना योगा शिकवावं लागलं. त्या पहिल्या महिला शिष्य होत्या. त्यावेळी त्या ३० वर्षांच्या होत्या. त्यांनी संपूर्ण एक वर्ष योगाचा अभ्यास केला. यात त्यांनी डाएट, आसानांसहीत संपूर्ण योग दिनचर्या स्वीकारली. काही महिन्यातच त्यांचा प्रकृतीच्या तक्रारी नाहीशा झाल्या. तरिही त्यांनी योगा शिकणं थांबवलं नाही. पुढे त्यांच्या नवऱ्याची बदली चीन झाली त्यामुळे त्यांना चीनला जावं लागलं. इंद्रदेवी जात असताना त्यांना योग गुरु म्हणून काम करण्याची मुभा कृष्णमाचार्यांनी दिली.

पारंपरिक योगातून मॉडर्न योगाकडे

इंद्रा देवी १९३८ ला शांघायला गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा चीनी लोकांना योगाचा परिचय करून दिला. त्या तिथल्या समाजवादी नेत्यांनाही योगा शिकवत होत्या. तसंच त्या अनाथाश्रमांमधे जाऊन योगा शिकवत होत्या. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी योगावर लेक्चर देण्यासाठी जात. 

अचानक १९४६ मधे त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं. मग त्या अमेरिकेला गेल्या. त्यांनी पाश्चिमात्य देशांमधे योगाचा प्रचार करायचं ठरवलं. त्यांनी १९४७ ला हॉलिवुडमधे योगा स्टुडीओ काढला. नंतर त्यांनी फॉरेवर यंग, फॉरेवर हेल्थी हे पुस्तक प्रकाशित केलं.

हेही वाचा: दोनवेळा जेवायचं की दोन तासांनी?

त्या पूर्णपणे पारंपरिक योगा न शिकवता भारतीय शास्त्रीय योगाच्या आधाराने म्हणजेच पंतजलि सूत्रांवर आधारीत मॉडर्न योगा शिकवत होत्या. यात त्या आसनं, श्वासाचं तंत्र आणि प्राणायम प्रामुख्याने शिकवत होत्या. त्यांनी सिने, उद्योग, राजकारण क्षेत्रातल्या दिग्गज मंडळींना योगाचे धडे दिले. त्या प्रत्येकाच्या काम करण्याच्या पद्धतीनुसार आसानं, डाएट सांगत. 

हीच मॉडर्न पद्धत सध्याच्या जिम, फिटनेस स्टुडीओमधे वापरण्यात येत आहे. पाश्चिमात्य देशातून योगा परत आपल्या देशात आला असं जरी आपण म्हणतो खरं मात्र या सगळ्यात भारतीय योगाचं शास्त्र वेळोवेळी दिसून येतं. 

आपण योगाचे वेगवेगळे प्रकार ऐकतो त्यात अष्टांग योगा, विन्यास योगा, पावर योगा, फॅट बर्निंग योगा. तसंच कुस्ती, बॉक्सिंग, मार्शल आर्ट्स, कराटे, एरोबिक्स, झुंबा, मिलिटरी बेस्ड यातलं वर्कआऊट आणि जिम या सगळ्यातही योगाचे अनेक प्रकार आहेत. या सगळ्यातलं थोडं थोडं घेऊन एक व्यायाम प्रकाराचं पॅकेज डिझाइन केलं जातं. याची सुरवात इंद्रदेवी यांनी केली होती. त्यांनी योगाला नवा आकार दिला.

हेही वाचा: थायरॉइडविषयी हे समजून घ्यायला हवंच

जगभरात योगा पोचवला

त्यांनी आंतरराष्ट्रीय योग केंद्राची स्थापना केली. त्या जगभरातल्या योग शिक्षकांचे मेळावे भरवत. शिक्षकांना प्रशिक्षण दिलं. ज्यामुळे त्यांचे शिष्य इतर ठिकाणी जाऊन योगाचा प्रसार करू लागले. यादरम्यान त्यांनी दुसरं लग्न केलं. त्यांच्या सोबत त्या मेक्सिकोला गेल्या. तिथे योग फाऊंडेशनच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर देणं, शिकवणं, गाईड करणं इत्यादी कामं करत होत्या. त्यांनी जगभरात फिरुन योगाचा प्रसार केला.

१९८४ मधे त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं. मग १९८५ मधे त्या अर्जेटिनाला स्थायिक झाल्या. त्यानंतर लगेचच इंद्रा देवी इंटरनॅशनल योगा फेडरेशनचं अध्यक्षपदी विराजमान झाल्या. त्या अर्जेटिनातही योगा फाऊंडेशन चालवत होत्या. त्यांनी योगा इन इंडीया असं पुस्तक लिहिलं. त्यांचे शिष्य त्यांना आदराने आणि प्रेमाने माताजी म्हणून हाक मारत असत. 

आजही जगभरातले लोक योगा फॉलो करतात. याच श्रेय इंद्रादेवींना जातं. त्यांनी भारतीय योगाच्या प्रसाराचा ध्यास घेतला होता, असं मिशेल गोल्डबर्ग यांनी द गॉडेस पोज या पुस्तकात लिहिलं आहे. २५ एप्रिल २००२ मधे इंद्रा देवी १०२ वर्षांच्या असताना वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. पण त्यांनी जगभरात पोचवलेला योगा आजही लोकांच्या जीवनाचा भाग बनलेला आहे. योगाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र यातलं इंद्रदेवींचं योगदान खूप मोठं आहे.

हेही वाचा:

महाराष्ट्रातल्या ४८ जागांवर कोण जिंकणार, कोण हरणार?

भोपाळमधे लागणार सॉफ्ट हिंदुत्व विरुद्ध हार्ड हिंदुत्वाचा निकाल

महाराष्ट्राचं राजकारण समजून घेण्यासाठी ही आत्मचरित्रं वाचायला हवीत