१५० वर्षांपूर्वी २०० शोध लावणारे, भारताचे एडिसन शंकर आबाजी भिसे

२९ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


शंकर आबाजी भिसे यांना जाहिरातीचं यंत्र, ट्रेनला सरकते दरवाजे, रेल्वे स्टेशनांवर स्वयंचलित निर्देशक, बेसलाईन’ औषध अशा संशोधनामुळे जगभरात भारताचे एडिसन म्हटलं जातं. त्यांच्या कामगिरीवरचा अभिधा घुमटकर यांनी इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल विकलीमधे इंडियन एडिसन हा लेख लिहिलाय. त्या लेखाचा अनुवाद मैत्री २०१२ ब्लॉगवर आहे. या लेखाचा आज भिसे यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त हा संपादित अंश.

शंकर आबाजी भिसे यांचा जन्म २९ एप्रिल १८६७ रोजी मुंबईत झाला. त्यांनी आपल्या चौकस वृत्तीने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी घड्याळ कसं चालतं, ते शोधून काढलं. लहानपणी त्यांचा बराचसा वेळ वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करण्यात आणि सायंटिफिक अमेरिकन मासिक वाचण्यात जायचा. त्यातूनच त्यांना प्रख्यात अमेरिकन शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांना प्रत्यक्ष भेटण्याची प्रेरणा निर्माण झाली. पुढे  त्यांना त्यांच्या संशोधनामुळे भारताचे एडिसन म्हणून सन्मानित केलं. जगात त्यांच्या संशोधनाची दखल घेतली गेली.

वडलांचा विज्ञान शाखेला विरोध

भिसेंनी वयाच्या पंधराव्या वर्षी कोळशापासून गॅस निर्माण करणारं यंत्र शोधून काढलं. तरी ते त्यावेळच्या सर्वसामान्य शिक्षणात मागे पडले. संस्कृत विषयाच्या शिक्षकांशी न पटल्यामुळे भिसेंना प्रथम पर्शियन भाषेकडे वळावं लागलं. शेवटी त्यांनी १८८८ मधे मॅट्रिकच्या परीक्षेसाठी मराठी ही दुसरी भाषा म्हणून निवडली. आपल्याला विज्ञान आणि इंजिनियरिंग या विषयात विशेष रुची आहे हे ओळखलं.

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजेच सीकेपी कुटुंबात जन्मलेल्या भिसे यांनी पुण्याच्या कॉलेज ऑफ सायन्समधे प्रवेश घेण्याची इच्छा वडलांना सांगितली. पण वडलांना ते मान्य नव्हतं. त्यांनी भिसेंवर कायद्याचे शिक्षण घेण्याची सक्ती केली. पण त्यांनी आपल्या स्वतःच्या ताकदीवर पुढचं विज्ञानाचं शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि मुंबईच्या अकाउन्टट जनरलच्या ऑफिसात नोकरी धरली. तिथे ते १८८८ ते १८९७ पर्यंत नोकरी करत.

हेही वाचा: स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ

भिसेंचं स्थान अमेरिका, युरोपात

१८८९ मधे मुंबईत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पाचवं अधिवेशन भरलं होतं. त्यातील एका पुतळ्यावर प्रकाशझोत टाकून प्रारंभी त्याचा काही भाग आणि हळूहळू संपूर्ण पुतळा प्रकाशमान करण्याचं एका इटालियन कंपनीचं आव्हान भिसे यांनी स्वीकारलं आणि तसं यशस्वीरित्या करून दाखवलं.

भिसेंनी ऑप्टिकल इल्युजन ऑर मेंटल सायकॉसिस म्हणजे दृष्टीभ्रमाचा अभ्यास केला. त्यामुळे दृष्टीभ्रम आणि दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखण्याचा प्रयोग झवेरीलाल याज्ञिक, राजा रविवर्मा, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांनी पहिलं होतं. त्याची बातमी टाइम्स ऑफ इंडिया आणि अॅडवोकेट ऑफ इंडिया या पत्रात आली. 

भिसेंनी मोरारजी गोकुलदास यांच्या निवासस्थानी केलेला दृष्टीभ्रमाचा प्रयोग मिस्टर वेब यांनी पाहिला होता. नंतर वेबनी त्यावर पत्र पाठवून म्हटलं, भिसेंचं खरं स्थान अमेरिका किंवा युरोपात असायला हवं. पतियाळाच्या महाराजांसोबत ते ऑक्टोबर १८९५ मधे इंग्लंडला गेले. भिसे यांचे मॅंचेस्टर इथल्या फ्री ट्रेड हॉलमधील दृष्टीभ्रमाचे प्रयोग अत्यंत यशस्वी झाले आणि त्यांची प्रशंसा इंग्लंडमधील आघाडीच्या वृत्तपत्रात झाली.

त्या काळात सायंटिफिक क्लबची स्थापना

१९ ऑक्टोबर १८९३ला भिसेंनी मुंबईत सायंटिफिक क्लबची स्थापन केली. यामधे चालणाऱ्या कार्याची माहिती ‘विविध कला प्रकाश’ नावाच्या एका मराठी पत्रिकेत देण्यात येत असे. ही पत्रिका त्यांनी ऑगस्ट १८९४ पासून त्यांनी काही उद्योगपतींच्या सूचनेवरून सुरू केली. या सायंटिफिक क्लबचे सभासद महिन्यातून एका रविवारी वैज्ञानिक प्रयोगांचं आयोजन करण्याच्या हेतूनं जमत.

क्लबची आणखी काही उद्दीष्टं होती. भारतीय उद्योजक सदस्यांची नावं प्रसिद्ध करावी, म्हणजे त्याद्वारे त्यांना संशोधनातून पेटंट मिळण्यात सहाय्य होईल. तसंच त्यांनी निर्माण केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होईल. त्याचबरोबर शास्त्रीय पुस्तकं प्रकाशित केली जावीत आणि तज्ज्ञांकडून देशी औषधांचे परीक्षण होईल.

हेही वाचा: भविष्यात डेटा डिक्टेटरशिपचा धोकाः युवाल नोआ हरारी

प्लेग निर्मुनासाठी दिलं योगदान

१८९६मधे भिसेंची मुंबईच्या फणसवाडी भागातून प्लेग निर्मुलनासाठी नेमलेल्या मुंबईच्या नागरिकाच्या समितीचे एक स्वयंसेवक म्हणून निवड झाली. या साथीमुळे नागरिकांना सक्तीनं आपली घरं सोडून वेगळं राहावं लागत होतं आणि प्लेगचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सक्तीनं लस टोचावी लागे. लोकांमधली रोगाची भीती दूर करावी म्हणून भिसे यांनी शहरात घरोघर फिरून प्रचार केला. गरिबांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी इंग्रज सरकारकडून हिंदू जिमखान्याजवळील एक प्लॉट मिळवला.

प्लेग साथीच्या निर्मुलनासाठी सरकारनं हिंदू, मुस्लिम आणि ज्यू यांची एक संयुक्त समिती नेमली. भिसे त्याचे प्रमुख होते. १८ सप्टेंबर १८९८ला सीकेपी समाजाने भिसे यांचा त्यांनी केलेल्या प्लेगच्या साथीच्या काळातील कार्याबद्दल जाहीर सन्मान केला. याच जातीच्या लोकांनी पूर्वी भिसे यांना समुद्र प्रवास करून परदेशी गेल्याच्या मुद्द्यावरून वाळीत टाकलं होतं.

सरकरता दरवाजा, ऑटोमॅटिक इंडिकेटरचा शोध

१८९८मधे भिसे यांनी सरकता दरवाजा या लावलेल्या शोधाबद्दल मुंबईतल्या एका प्रदर्शनात पुरस्कार मिळाला. त्यांनी त्याचं पेटंट मात्र घेतलं नव्हतं. मात्र मुंबई येथील रेल्वे एजंटनं भिसे यांच्या या शोधाचा उपयोग करण्यास नकार दिला. इंग्लिश इंजिनिअरनं त्याची परीक्षा घेतली तरच आपण हा शोध स्वीकारू असं त्यांचं म्हणणं होतं. आपल्या पेटंटचा अधिकार सुरक्षित ठेवण्याच्या हेतूने भिसे यांनी हा प्रस्ताव फेटाळला.

भिसे यांनी ऑटोमॅटीक स्टेशन इंडीकेशन म्हणजे स्वयंचलित स्थानक निर्देशकाचा शोध लावला. या इंडिकेटरमधे पूर्वीच्या स्टेशनची नावं, गाडी जिथे थांबते ती स्टेशन, पुढं येणारी स्टेशन, प्रवासाचा वेळ हे सर्व दाखवलं जातं. या शोधाचं पेटंट भिसे यांनी भारत सरकारकडून १८९६ मधे मिळवलं आणि विद्यार्थ्यांच्या लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीने हे यंत्र एल्फिन्स्टन हायस्कूलमधील प्रदर्शनात प्रदर्शित केलं. पण इंडियन रेल्वेनं हा इंडिकेटर वापरण्याला नकार दिला. भिसे यांनी प्रवाशांच्या सामानासाठी एका सुरक्षा पेटीचा शोध लावला आणि त्याचं पेटंट त्यांनी १८९७मधे मिळवलं.

हेही वाचा: विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन

पेटंट मिळवणं सोप्पं नव्हतं, तरीही

इंग्लंडमधे कोणत्याही संशोधकाला पेटंट मिळवण्यासाठी मोठी गुंतागुंतीची पद्धत अवलंबावी लागत असे. त्याला आपलं संशोधनाचे मॉडेल, त्याची संरचना आणि त्याच्या उपयुक्ततेचं प्रमाणपत्र या साऱ्या बाबी एखाद्या कायदेशीर तज्ज्ञाकडून सादर कराव्या लागत. मगच पेटंटचे हक्क मिळत असत. त्यामुळे भिसेंना सुरवातीला अनेक अडचणी येत. परंतु दादाभाई नौरोजी यांच्यासारख्यांनी भिसेंमधला यशस्वी संशोधक ओळखून त्यांच्या प्रकल्पांना भरीव आर्थिक मदत केली.

जुलै १८९७ मधे आपल्या वजनमापक यंत्राच्या शोधाबद्दल दहा पौंडांचं इनाम मिळवलं होतं. लंडनच्या सोसायटी ऑफ सायन्स, लेटर्स अन्ड आर्ट्स या संस्थेकडून मिळालं. त्यांनी भिसेंना सभासदत्व बहाल केलं.

१९०१ मधे भिसे यांनी ऑटो फ्लशर या यंत्राचा शोध लावला. या यंत्राच्या सहाय्याने केवळ एक बटन दाबून शौचालयात पाईपवाटे जोरात पाणी सोडलं जाऊन स्वच्छ होत होतं. लंडन महापालिकेनं केवळ या यंत्रासाठी भरमसाठ पाणी लागतं, या सबबीवरून या यंत्राचं मॉडेल वापरण्यास नकार दिला. तरीही भिसे यांनी इंग्लंड आणि अमेरिका इथे पेटंटसाठी अर्ज केले. आज त्यांच्या नावे ५० पेटंट आणि २०० इनव्हेंशन आहेत.

गरज ओळखून यंत्र बनवले

१९०१ मधे भिसेंनी जाहिरात करणाऱ्या यंत्राचा शोध लावला. या यंत्रात एकाहून अधिक जाहिराती क्रमशः निश्चित वेळेत दाखवल्या जाऊ शकत होत्या. त्यात आकार, अक्षरं, रंग आणि रचना बदलण्याच्या सुविधा होत्या. विजेवर चालणारं हे यंत्र हातांनीसुद्धा चालवता येत होतं.

अमेरिकेतल्या मागणीच्या अंदाजानुसार भिसे यांनी एक असं स्वयंचलित यंत्र तयार केलं, की त्यात दुकानातील मालाचं वजन मोजणं, तो एका पिशवीत भरला जाणं आणि  हॅण्डल फिरवल्यावर त्याची नोंद करणं या क्रिया होत असत. भिसे यांनी एक स्वयंचलित सायकल स्टॅंड आणि त्याला जोडून एक कुलूप या यंत्रणेचा शोध लावला होता. त्यांनी शोध लावलेल्या इतर यंत्रात, शर्टावर बटणं लावणं, मसाज करणं, ग्राइण्ड करणं ही कामं करणारी यंत्रं होती. या सर्व यंत्रांना उत्तम प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा: पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी

जगातल्या मुद्रण उद्योगानं भिसो टाईप स्वीकारलं

‘भिसो टाईप’ हे भिसेंनी मुद्रण उद्योग जगताला दिलेली सर्वात मोठी देणगीच. १९०२ मधे शोध लागलेल्या भिसो टाईपच्या चार वैशिष्ट्यांबद्दल एका विज्ञान पत्रिकेत नोंद घेतली गेली. त्या काळच्या मोनो टाईप आणि लिनो टाईपच्या सर्वश्रेष्ठ यंत्रांची तुलना करतांना भिसो टाईपचा वेग अभूतपूर्व असा १५०० ते २००० अक्षरे प्रति तास एवढा होता. यामुळे उर्जेची बचत होत होती तसंच चित्रांचा अंतर्भाव करता येण्याची सुविधा, पाश्चिमात्य आणि पौर्वात्य भाषांमधील शब्दांची निर्मिती करता येणं शक्य झालं होतं.

लंडनच्या एका मुद्रण तज्ज्ञांने भिसो टाईपच्या उच्च गुणवत्तेबाबत अहवाल दिला. १९१० मधे टाटा यांनी लंडन येथील टाटा भिसे इन्वेशन सिंडीकेटचं प्रायोजकत्व स्वीकारलं. मनोरंजन या मराठी मासिकाच्या १९१२ च्या दिवाळी अंकात हरिश्चंद्र तालचेडकर यांचा भिसे यांच्या लंडन येथील कारखान्यावर एक सचित्र लेख आला होता. त्यात भिसे यांनी कित्येक युरोपियन कामगारांना नोकरी दिल्याचं वृत्त मोठ्या अभिमानानं दिलं होतं.

रोटरी तत्वावरील एका मिनिटाला ३००० टाईप निर्माण करणाऱ्या पहिल्या यंत्राचा शोध लावला. भिसेंच्या या शोधक आणि मुद्रण क्षेत्रातील क्रांतिकारक वाटचालीमुळे मुद्रण तंत्र विज्ञान क्षेत्रात एक नवं युग आलं.

औषधांच्या क्षेत्रातही क्रांती केली

मुद्रणातील उच्च प्रतीच्या संशोधनाबरोबर भिसे यांनी औषधविज्ञान म्हणजे फार्माकोलॉजी या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. १९१७ मधे भिसे यांनी ‘शेला’ नावाच्या एका वॉशिंग कम्पाऊंडचा शोध लावला. त्याचे स्वामित्व हक्क त्यांनी एका ब्रिटीश कंपनीला विकून भरपूर फायदा मिळवला. पण ‘बेसलाईन’ या नावाचं औषध. मलेरियाच्या तापावर त्याने गुण येई. या संशोधनामुळे त्यांचं नाव खूप मोठं झालं.

१९१४मधे भिसे यांनी एक लिमिटेड कंपनी स्थापन केली. बेसलाईनच्या निर्मिती आणि विक्रीसाठी एका ब्रिटीश उद्योगपतीला भांडवल पुरवलं. पहिल्या महायुद्धात सैनिकांना होणाऱ्या जखमांच्या इलाजात आणि पाणी शुद्ध करण्यासाठी या औषधाचा उपयोग केला गेला. ब्रिटिश सरकारनं भिसेंना या औषधाचा फॉर्म्युला मागितला असता भिसेंनी तो उघड करण्याचं नाकारलं.

तोंडावाटे  देण्यात येणारं हे औषध १९२७  मधील बहुतेक अमेरिकन मेडिकल जर्नलमधे नोंदवण्यात आलंय. रक्तदाब, आतड्याचे आजार, पायारीया, मलेरिया आणि इन्फ्लूएन्झा अशा अनेक आजारांवर ते गुणकारी असल्याचं नमूद केलं होतं. हे औषध भारतात सर्वत्र उपलब्ध व्हावं आणि तेदेखील स्वस्त दरात म्हणून भिसे यांनी त्याचे घटक भारतीय कंपन्यांना विकून ते भारतात बनवलं जाईल, अशी सोय केली.

हेही वाचा: आहे रे, नाही रे, हीच डिजिटल युगाचीही भाषा

वैश्विक मंदिराचं मॉडेल आणि डिप्लोमॅटिक दुर्गा

भिसेंनी वैश्विक मंदिराची संकल्पना मांडून त्याचं मॉडेल न्यूयॉर्क म्युजियमकडे सादर केलं होतं. यातील कमळाच्या सहा घटात हिंदू, बौद्ध, कन्फ्युशियन, ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम यांची प्रातिनिधिक रचना केली होती.

आपल्याला नवल वाटेल, पण भिसे यांनी नाट्य आणि पटकथा लेखन यातही लक्ष घातलं. त्यांनी 'गार्डन ऑफ आग्रा किंवा डिप्लोमॅटिक दुर्गा' नावाचं नाटकही लिहिलं. यात दुर्गा एक भारतीय मुलगी आणि जॅक एक इंग्लिश मुलगा यांची प्रेमकथा आहे.

भारतीय शास्त्रज्ञाचा सन्मान

२९ एप्रिल १९२७ला भिसे यांच्या वाढदिवसानिमित्ताने, शंभर मान्यवर अमेरिकन नागरिकांच्या उपस्थितीत न्यूयॉर्कमधील एका हॉटेलात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यात भिसे यांचा अमेरिकेतील आघाडीचा भारतीय शास्त्रज्ञ म्हणून भव्य सत्कार करण्यात आला.

भिसे यांच्या विदेशातील चतुरस्र कामगिरीचा कळसाध्याय म्हणजे न्यूयॉर्क अमेरिकन या पत्राच्या विज्ञान विभागाचे संपादक फ्रान्सिस टिटसोर्ट यांनी भिसे यांचा उल्लेख ‘दी इंडियन एडिसन’ अशा शब्दांत केला. वास्तविक भिसे यांना तो मानाचा किताब या पूर्वीच १९०८ मधे अनेक इंग्लिश आणि अमेरिकन जर्नल्सनी बहाल केला होता.

भिसे महाराष्ट्रातल्या पुढील पिढ्यांतल्या वैज्ञानिकांना स्फूर्ती देत आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण झालं नाही तरच नवल होतं.

हेही वाचा: 

पालघरचा भूकंप... कोट्यवधी वर्षांपासून आजपर्यंत!