ग दि माडगूळकर: भूमिकेला माणूसपण देणारा कलाकार

०१ ऑक्टोबर २०२०

वाचन वेळ : १५ मिनिटं


आज १ ऑक्टोबर.  ग दि माडगूळकर यांचा जन्मदिन. गदिमांचं गीतरामायण तर आजही अनेक घरांमधे ऐकू येतं. त्यांनी मराठी हिंदी सिनेमात, साहित्य क्षेत्रात, राजकारणात कार्यरत होते. तसंच ते स्वातंत्र्यलढ्यातही उतरले होते. पण अभिनेते म्हणून त्यांचं कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं.

गदिमांचं नाव माहित होण्याआधीपासूनच माझी आणि त्यांची तोंडओळख झाली. माझ्या मोठ्याईला मुखपाठ होतं गीतरामायण. ‘देवानं दिलेल्या मुखातून देवाचंच नाव बाहेर यावं’ म्हणून ती ते दिवस रात्र घोकत राहायची. आणि ऐकून ऐकून मलासुद्धा गोड वाटायला लागलं. तोंडातसुद्धा बसलं. पुढे मग घरी उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या आत्याच्या पोरानं टेपरिकॉर्डर आणला. आणि सोबत गीत रामायणाच्या कॅसेटी. संध्याकाळी थोडा अंधार पडला की रस्त्यावर असलेल्या पोलवर आकडा टाकला जायचा. जवळ जवळ अर्धी रात्र कुश लव रामायण गाती पासून सुरू झालेलं गीत रामायण, राम जन्मला ग सखी, थांब सुमंता, थांबवि रे रथ, पळविली रावणें सीता, पेटवी लंका हनुमंत, भूवरी रावण-वध झाला, त्रिवार जयजयकार रामा, गा बाळांनो श्री रामायणवर येऊन थांबायचं.

एकूणच सगळं वातावरण भारलेलं असायचं. माझे काका-काकू, आई-बाबा खास गीत रामायण ऐकायला बसत. गावातले त्यांचे मित्र यांच्या तोंडून मग गदिमा, बाबूजी, लता मंगेशकर, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे अशी नावं ऐकायला यायची. तेंव्हा या सगळ्या मंडळींचा संपूर्ण बायोडेटा जरी माहीत नसला तरी त्यांच्या मोठेपणाबद्दल मनात अजिबात डाउट नव्हता. आणि त्यानंतर गीत रामायणाचे अगणित पाठ घरात सुरूच होते. पुढे मग पेपरातून, लोकांच्या सांगण्यातून, टीवीवरच्या कार्यक्रमातून कळत गेलं की गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातला एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम. जो १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ दरम्यान पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाला.

सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र आकाशवाणीवर काम करत. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने गदिमांनी होकार दिला आणि या महाकाव्याचा जन्म झाला. वाल्मीकीं ऋषींनी अंदाजानं चोवीस हजार श्लोकांत आणि कुठे २८ हजारही श्लोक पण लिहून आलंय. जी रामकथा लिहिली तिला गदिमांनी एकूण ५६ गीतांत शब्दबद्ध केली. म्हणूनच गदिमांना आधुनिक वाल्मिकी असं देखील म्हटलं जातं. गीतरामायणाचे दोन वर्जन्स आहेत. पहिल्यात आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या विविध गायकांच्या आवाजातली गीते आणि दुसऱ्या वर्जनमधे सर्वच्या सर्व गीते बाबूजींच्या आवाजात ऐकायला मिळतात.

गदिमांनी ‘गीतरामायणा’इतकंच जोरदार काम श्रीकृष्ण चरित्रावरचं ‘गीतगोपाल’मधेही केलंय. शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरातली सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली काकडआरती गदिमांच्या लेखणीतून उतरलीय. आणि या काकडआरतीसाठी गदिमांनी ‘रामगुलाम’ हे टोपणनाव घेतलं. गदिमांनी आपल्या भारताच्या फ्रीडम फाईटमधेसुद्धा भाग घेतला. तिथंही ‘शाहिर बोऱ्या भगवान’या नावानं काव्य रचलं. अशा एक ना लाख गदिमागोष्टी आणि फोटो- वीडियोसुद्धा पुस्तकात, नेटवर, पेपराच्या पुरवण्यात, टीवीवर सापडतात.

आमच्याच देशी रंगाच्या, आमच्याच आजोबांसारखं पांढरंफेक धोतर आणि कुर्ता घालणारे लांबरुंद भारदस्त दिसणाऱ्या या महामाणसाने माझ्या मनात टोलेजंग वाडा केला. गीतकार, लेखक, कवी, कथाकार अशा कितीतरी वेगवेगळ्या भूमिकांतून त्यांनी मला त्यांचं दर्शन घडवलं. आणि त्यामुळं आता आमची ओळख वाढून बऱ्यापैकी घट्ट झाली. आता मला हा भारी माणूस किती 'लै भारी' आहे याची जाणीव झाली.

हेही वाचा : लेखक कवींनो, कळपात नका राहू, माणसांत मिसळा

गीतरामायणातून माझ्यापर्यंत पोचलेल्या गदिमा नावाच्या गारुडाचं 'मंतरलेले दिवस' हे आत्मचरित्र आमच्या गावच्या गांधी वाचनालयात मला मिळालं त्यात त्यांचं आमच्याचसारखं बारक्या गावात आणि कमी संसाधनात गेलेलं बालपण वगैरे वाचण्यात आलं. मग नंतर तिथेच मी त्यांचे तुपाचा नंदादीप, चंदनी उदबत्ती हे कथासंग्रहसुद्धा वाचले. आमच्या लायब्ररीत माझ्या हाताला व्यंकटेश माडगूळकर यांची पुस्तकं लागली. मी ती वाचायला घेतली ते फक्त गदिमांचे लहानगे भाऊ म्हणून. पुस्तकं वाचल्यावर कळलं की हेसुद्धा 'लै भारी'च लिहतात. थोडक्यात आता मला गदिमा नावाच्या हिमनगाची माहिती झाली होती.

आता मला माहीत झालं की गदिमा सिनेमासाठी ष्टोऱ्यापण लिहतात. तुफान और दिया, दो आँखे बारह हाथ, गूँज उठी शहनाई, नवरंग हे त्यांनी लिहिलेले हिंदी चित्रपट. दूरदर्शन आणि माझ्या परभणीतल्या चुलत्याच्या मेहरबानीने पाहण्यातसुद्धा आले. आणि चुलत्याने 'हा पिच्चर गदिमानं लिहलाय बरं' ही मोलाची माहिती पण दिली. घरात आणलेल्या सेकंड हॅन्ड टेप रिकॉर्डरवर बुगडी माझी सांडली गं, तुझ्या उसाला लागल कोल्हा, ऐन दुपारी यमुनातिरी, असा नेसून शालू नवा आणि पदरावरती मोर जरतारी अशी त्यांची गाणी मी विळरात ऐकत बसत होतो. कॅसेटवर गदिमा असल्यानं कुणी काई म्हणत पण नव्हतं. त्यांची एकापेक्षा एक गाणी असलेली ही कॅसेट मी ऐकून ऐकूनच खराब केली.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मी आजोळी हलगरला गेलो. तिथे दूरदर्शनवर मराठी सिनेमे लागत होते. कायाय उदगीरला. माझ्या गावी त्यावेळी बिदर दूरदर्शन केंद्र दिसायचं. त्यामुळे सगळे कन्नड कार्यक्रम लागत. आणि आजोळी हलगरला, अंबाजोगाई केंद्र त्यामुळे तिकडं मराठी सीरिअल आणि पिक्चर दिसत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारेंचे सिनेमे आवडण्याचा काळ होता. त्यात हफ्त्याला एक हिशोबाने येणाऱ्या टीवीवर कृष्ण-धवल असं लिहून आलेले ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे बघायला बोर वाटायचं. पण बोर होत असतानादेखील मन लावून टीवीने जे समोर लावलंय ते सगळंच बघण्याचा तो काळ.

अधिकाच्या महिना असल्यानं माझे बाबा धोंडे खायला म्हणून त्यांच्या सासरवाडीत म्हणजे माझ्या आजोळी आले. आता जावई माणूस सासरवाडीत दुसरं करणार काय म्हणून तेसुद्धा माझ्यासोबत टीवीच बघू लागले. आणि टीवीवर 'त्या तिकडे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे' गाणं असलेला पिक्चर लागला. त्यात एक ढालगज मिशाळ खानदानी श्रीमंत माणूस त्याच्या मुलीवर प्रेम करणाऱ्या माणसाला लाख रुपये खर्चून दाखवशील तरच माझ्या पोरीशी तुझं लग्न लावेन. अशी अट घालतो. इथे स्टोरी महत्त्वाची. पिक्चर सुरु झाल्यावर जरा वेळानं आलेले आमचे बाबा आरडले ‘पशा गदिमांचा पिक्चर आहे बरं हा. तो मिशी लावलेला माणूस दिसतोय किनी तेच आपले गीतरामायणवाले गदिमा.’

हेही वाचा : प्रभाकर कारेकरांच्या गायकीवर खुद्द दिलीपकुमारही फिदा असायचे

तोपर्यंत सिनेमा लिहणारे गदिमा मला माहीत होते पण प्रत्यक्ष सिनेमात असलेले गदिमा त्यावेळी मी पहिल्यांदा बघितले. सिनेमा होता १९५२ला आलेला राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेला. आणि कथा-पटकथा-संवाद-गीतलेखन या जवाबदारीबरोबर ऍक्टिंगची आघाडी सांभाळणारे ग दि माडगूळकर यांचा लाखाची गोष्ट. श्रीमंत करारी पण विनोदाची झालर लावलेला घरात पाळलेल्या कुत्र्यांना जीव लावणारा आणि मुलीने निवडलेल्या चित्रकार मुलाच्या, राजा परांजपेच्या एक लाख खर्चून दाखवायचं चॅलेंज करणारा मुलीचा बाप. हातात 'एक लाख रुपयाच्या गड्ड्या कोंबून हे खर्चून दाखव,’ अशी हवीहवीशी अट घालणारा मुलखावेगळा बाप गदिमानीं एकदम जोरदार उभा केला. या पिक्चरचा शेवटसुद्धा त्यांच्यावरच झालेला आणि इतके वर्ष झाली तरी गदिमांनी उभा केला तो सर्वार्थाने प्रचंड सहज सुंदर बाप आजघडीला देखील माझ्या दिमागात फिट बसलाय.

गोष्ट पाहण्याआधी गदिमा मला माहीत होतेच. पण त्यांना सिनेमाच्या पडद्यावर पाहिल्यावर तर ते 'माझे' वेरी ओन 'गदिमा' झाले. आधी सांगितल्याप्रमाणे मग जसं जसं त्यांच्याबाबतीत मिळत गेलं तसं बघत-वाचत गेल्यावर कळलं की माझ्या गदिमांनी सुमारे पंचवीस, चोवीस मराठी आणि एका हिंदी चित्रपटांत अभिनय केलाय. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे त्यांचे हे ऍक्टिंगचे गुण शाळेपासूनच होते म्हणे.

मी असं वाचलं होतं की गदिमा औंधच्या शाळेत एक आम विद्यार्थी 'गजानन दिगंबर माडगूळकर' असताना तिथल्या राजाने म्हणजे पंतप्रतिनिधींनी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात त्यांच्यातला विनोदी कलाकार पाहून 'बाळा तू टाकीत जा' असं सांगितलं. चरित्र अभिनेत्री सुलोचनाबाईंनी सुद्धा कुठंतरी म्हटलेलं की प्रफुल्ल पिक्चरमधे असताना म्हणजे सुलोचनाबाईंच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांच्या कानडीटोनवाल्या मराठीची ग दि माडगूळकर सतत नक्कल करत त्यांना रडकुंडीला आणायचे. आणि कमाल बघा 'वऱ्हाडी आणि वाजंत्री'मधे गदिमांनी उभा केलेला धारवाडी मुलीचा बाप तशीच कानडीटोनवाली मराठी तंतोतंत बोलतो आणि यात त्यांच्या पत्नीची भूमिका दस्तुरखुद्द सुलोचनाबाईंनीच निभावली.

विनोदी धाटणीचा पण मराठी कानडी वाद, हुंड्याची वाईट प्रथा अशा ज्वलंत समस्यांचा कथेत चतुराईने उपयोग करून घेतलेला कथा-पटकथा-संवाद-गीत आणि कलाकार सबकुछ गदिमा असलेला 'वऱ्हाडी आणि वाजंत्री' हा राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेला मराठीच्या सुवर्णकाळातील उमदा सिनेमा. मी उदगीरला आमच्या घरच्या ब्लॅक अँड व्हाईट क्राऊन टीवीवर एकट्याने पाहिलेला. कारण आमच्या घरची बाकी मंडळी घरी आलेल्या पाहुण्याच्या मुलांबरोबर मिथुनच्या ‘दाता’ पिक्चरला गेली. आणि मी माझ्या गदिमांचा पिक्चर सोडून दुसरा पिच्चर पाहायला जायचा सवालच नव्हता. आणि यातसुद्धा माझ्या गदिमांचं ऍक्टर म्हणून काम चोख, एकदम चोवीस कॅरटच.

या चित्रपटाचं आणखी एक वैशिट्य म्हणजे सुलोचनाबाई, इंदुमती, विक्रम गोखले, शांता जोग, राजा परांजपे यांसारख्या नावाजलेल्या मराठी कलाकारांबरोबर द मा मिरासदार, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर या विनोदी साहित्यिकांचीसुद्धा भूमिका या सिनेमात होती. एका प्रसंगात हुंड्याची मागणी करणारा मुलाचा बाप विक्रम गोखले. राजा परांजपे जेंव्हा लग्नाच्या बोलणीत अटीवर अटी मुलीच्या बापावर म्हणजे गदिमावर लादत असतो तेव्हा आलेला राग गिळून तो तोंडाद्वारे 'फु' करण्याचा प्रसंग माझ्या गदिमांनी असा काही रंगवलाय की क्या बात है. वाह महागुरूच.

उभ्या महाराष्ट्राचं ताईत असलेले गदिमा पुण्या-मुंबईत वेल-सेटल असले तरी शेवट पर्यंत आपल्या गावाशी नाळ जोडून होते. त्यांच्या शेतात त्यांनी उभारलेल्या घरात 'बामणाच्या पत्र्यात' जाऊन ते लिखाण करायचे. तिथल्या गाववाल्या लोकांशी तासनतास गप्पा मारायचे. त्यांच्यात रमायचे. माणसांची आवड असलेल्या माणसात रमणाऱ्या गदिमांनी मुळात अभिनय करण्यासाठी म्हणूनच चित्रपटसृष्टीचा मार्ग स्वीकारला. लहानपणापासून लिहिण्याची आणि नकला करण्याची आवड होतीच. गदिमांचं अक्षर एक नंबर होतं आणि त्यांनी वि स खांडेकरांकडे लेखनिक म्हणूनही काम केलं. मग १६-१७ व्यावर्षीं त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

‘हंस पिक्चर्स’या चित्रसंस्थेच्या आचार्य अत्रे यांनी लिहलेल्या आणि मास्टर विनायक यांनी दिग्दर्शित केलेल्या ब्रह्मचारी या गाजलेल्या सिनेमासाठी पहिल्यांदा रंग लावला. ब्रह्मचारी या सिनेमात गदिमांनी एक नाही दोन नाही वीस बावीस एक्सट्राच्या भूमिका केल्या. यातल्या काही एक्सट्राच्या छोट्या छोट्या भूमिका मला यूट्युबच्या कृपेने बघायला मिळाल्या ब्रह्मचारीमधला नायक स्वयंपाकाच्या तयारीच्या वेळेला हरवलेला भोपळा शोधत असतो. 'अहो कुणी माझा भोपळा घेतलाय का भोपळा’ असं विचारतो आणि ज्यांना विचारतो त्यात एक दाढी वाढवलेला चेहऱ्यावर थोडे बेंगरूळ भाव झळकवणारा चेहरा दिसतो. हो ला हो करणारी काही सेकंदाच्या भूमिकेतसुद्धा माझ्या गदिमांनी लक्षात राहील असंच काम केलंय.

हेही वाचा : प्रिय `पु.ल.` आजोबा, आम्ही तुम्हाला मिस करतोय

शिल्पा शिरोडकर आणि नम्रता शिरोडकरच्या आजी मीनाक्षी शिरोडकर यात नायिका होत्या. त्यांच्या स्विमिंग कॉस्ट्यूम घालण्यानं तेंव्हा नुसता धुरळा उडवून दिला. तर या मास्टर विनायकांच्या ब्रह्मचारीतुनच गदिमांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातल्या कारकीर्दीचा सुरवात केली. थोडक्यात काय माझ्या गदिमांची चित्रपटातली एन्ट्री ही आधी पडद्यावर झालीय. आणि मग ती पडद्यामागे जाऊन बहरलीय. बहरली बहरली म्हणजे किती?

मी थोडं खोलात जाऊन पाहिलं आणि खात्रीसाठी गदिमांची वेबसाईट पण चेक केली. गदिमांच्या नातवाने म्हणजे सौमित्र माडगूळकरांनी त्यांच्या नावानं एक वेबसाईट काढलीय. त्यात गदिमांनी केलेल्या कामांची संगतवार नोंद आहे. त्यानुसार गदिमांनी सुमारे १४५ मराठी सिनेमागीते, ८० मराठी सिनेमांच्या पटकथा, ४४ मराठी सिनेमांच्या ष्टोऱ्या आणि ७६ मराठी चित्रपटांचे डायलॉग लिहिलेत. आणि सोबतच १० हिंदी चित्रपटांच्या कथा, २३ हिंदी पटकथा आणि ५ हिंदी चित्रपटांचे डायलॉगदेखील लिहिलेत.

सुरवातीला ते नवयुग सिनेमालिमिटेड चित्रसंस्थेत असताना के. नारायण काळे यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून बघायला मिळालं. या काळात मराठी सिनेमाला सूर गवसल्यासारखी स्थिती होती. कोल्हापूर या घडामोडींचं केंद्र झालं. आणि गदिमा तिथेच मंगेशकर कुटुंब ज्या घरात राहत होतं त्याच्या वरच्या मजल्यावर राहात. नुकताच त्यांचा संसारही सुरू झाला होता. पण चित्त सगळं कलेत गुंतलेलं. त्यांना खरं तर अभिनेताच व्हायचं होतं. म्हणून सिनेमात मिळतील त्या भूमिका पत्करल्या. एचएमवीसाठी गाणी लिहिली. शीघ्रकवी लहरी हैदर यांचा प्रभाव पडला आणि शब्द, गाण्यातूनच अन्नपाणी मिळवायचे हे नक्की झाले. इथे असताना आचार्य अत्रे यांच्या सोप्या पण प्रा0सादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला.

पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी आणि पहिला पाळणा या चित्रपटांचा गीतकार म्हणून भूमिका बजावली. आणि मग वी. शांताराम आणि बाबुराव पेंटर यांनी दिग्दर्शित केला. राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी हा सिनेमाआला. पेशवाईतील विख्यात शाहीर आणि कीर्तनकार रामचंद्र जगन्नाथ जोशी अर्थात लोकशाहीर रामजोशी यांचा बायोपिक. या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते गदिमांनीच लिहिली. आणि यात रामजोशीच्या मोठ्या भावाची म्हणजे मुदगल शास्त्र्याची भूमिका त्यांनी मोठ्या झोकात केली.

सोलापूरच्या वेद शास्त्रसंप्पन घराण्यातला लहाना मुलगा राम जोशी, यांचा थोरला भाऊ मुदगल भट कथा-कीर्तने पुराणे सांगत घरची परंपराप्राप्त भिक्षुकीही चालवली. वडील वारल्यावर धाकट्या रामजोशीचा सांभाळ त्यांनीच केला. राम जोशीनेसुद्धा आपल्याप्रमाणे कीर्तन करावं, भिक्षुकी चालवावी, कुळाची कीर्ती वाढवावी अशी इच्छा असलेला मुदगल शास्त्री पण तमासगिरांच्या संगतीने कवनं लावण्या रचण्याच्या नादाला लागलेल्या भावाला मुदगल शास्त्र्यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला. तेव्हा राम यांनी घर सोडून राजरोस तमाशाच्या फड स्वीकारला. आणि विख्यात लोकशाहीर पुढे चालून कीर्तनकार झाला अशी ती कहाणी. यातली शिस्त लावणाऱ्या कडक भावाची मुदगलशास्त्र्याची भूमिका माझ्या गदिमांनी केली.

‘सुंदरा मनामधे भरली’ ही लावणी याच ‘लोकशाहीर रामजोशी’ याच पिक्चरमधली. एका प्रसंगात रामजोशीची भूमिका करणारे जयराम शिलेदार लावणी म्हणत घरात शिरतात तेंव्हा घरच्या पूजेला बसलेला त्यांचा मोठा भाऊ मुदगल शास्त्री 'इथं लावण्या म्हणतोस माझ्या घरात' म्हणून त्याला असा काही जो ढोस देतो की अहाहा. मुदगलशास्त्र्याच्या भूमिकेत गदिमा एकदम जचलेत. आणि यातली गम्मत बघा की रीललाईफमधल्या भूमिकेत त्यांना गाणी लिहण्याचा धंदा फुकाचा वाटतो आणि रिअल लाईफमधे ते स्वतःच महान कवी. यालाच तर खरी ऍक्टिंग म्हणतात. या रामजोशी या चित्रपटाला जोरदार लोकप्रियता मिळाली आणि कवी-लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले.

हेही वाचा : शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही

गदिमा हा गोष्ट सांगणारा माणूस होता. कधी कवितेतून, कधी पटकथेतून-संवादातून. ते गोष्टच सांगत राहिले. माझं गदिमाप्रेम आता बऱ्याच जणांना माहित झालं. त्यात माझ्याच सारखा एक गदिमाप्रेमी मला भेटला तो म्हणजे माझ्या मित्राचा मुत्त्या म्हणजे आजोबा. त्यांना त्यांच्या तरुणपणी पिच्चरचा नाद होता. त्यामुळे मुंबईला पळून जायचा असफल प्रयत्न त्यांच्या गाठीशी होता. त्यांच्याकडे बऱ्याच पिक्चरचा खजिना होता. बसल्याजागी ते ष्टोऱ्या सांगायचे. त्यात त्यांनी मला 'माझी जमीन'बद्दल सांगितलं होतं. एक असा सिनेमाज्यात गदिमांनी फक्त आणि फक्त ऍक्टिंग केली. सामाजिक बांधिलकी असलेल्या भालजी पेंढारकरांचा ‘माझी जमीन’ या चित्रपटाचा विषयसुद्धा कसेल त्याची जमीन हाच होता.

वाडवडिलांनी मिळवून ठेवलेल्या धनिक जमीनदाराची, की जो स्वत: खपतो त्या शेतकऱ्याची? मुत्त्यानं सांगितलं होतं की यात गदिमा मेन हिरोइतकीच जोरदार नायिकेच्या वडिलांची हरबाची भूमिका केली. या पिक्चरची ष्टोरी काहीशी अशी होती की दादासाहेब नावाच्या जमीनदाराच्या भावाचं जयसिंहचं आणि हरबा या सामान्य शेतकऱ्याच्या मुलीचं हरणीचं प्रेम जुळतं. पण हरबा हरणीचं लग्न मारुतीबरोबर करण्याचं ठरवतो. पण मारुती चारित्र्याने चांगला नसतो. त्यामुळे हरणी आणि जयसिंह मारुतीची सगळी कारस्थानं हाणून पडतो आणि लग्न होतं. यात शेतकरी हरबाची भूमिका गदिमांनी खूप सुंदर केली. ती त्यांनी केलीच असणार. कारण जो माणूस मुंबई पुण्याला एवढा फेमस असताना आपल्या गावात शेतात घर बांधतो. आणि महिना महिना तिथे जाऊन राहतो. तिथल्या शेतकऱ्याबरोबर गप्पा मारतो त्यानं ती शेतकरी हरबाची भूमिका समजून उमजून जोरदारच केली असणार यात शंकाच नाही.

गदिमांनी लिहलेलं संथ वाहते कृष्णामाई हे गाणंसुद्धा माझ्या खूप आवडीचं. यात दिसणाऱ्या राजा परांजपेचं आणि गदिमांचं खूप जोरदार सूत्र जमलेलं. तुमच्या पटकथेवर इतरांना राजा परांजपेइतकं यश का नाही मिळवता आलं, असं त्यांना एकदा विचारलं असता गदिमा म्हणाले होते की राजाभाऊ हे परिसासारखे आहेत. त्यामुळे त्यांच्यासारखी किमया इतरांना कशी जमेल? पुढचा काळ होता राजा परांजपे, सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर या त्रिमूर्तीचा. त्यांच्य पहिल्या चित्रपटातली जाळीमंदी पिकली करवंद, झाला महार पंढरीनाथ ही माझी ऑल टाइम फेवरेट गाणी. आणि या पिच्चरची खासियत म्हणजे यात साक्षात पु. ल. देशपांडे आणि गदिमांनी एकत्र मिळून पटकथा आणि संवाद लिहले. कथा गदिमांचे लहानगे बंधू व्यंकटेश माडगूळकर यांची.

पडद्यावर नायकाची ‘किस्ना महारा’ची भूमिका साकारली होती साक्षात पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी आणि तमासगिरणी मोगरीबाईच्या, अँटी हिरोईनवाल्या भूमिकेत होत्या. 'सांगते ऐका'वाल्या हंसा वाडकर आणि सोबत एका लक्षणीय भूमिकेत होते माझे गदिमा. या सिनेमाचं खूप नाव ऐकून होतो पण पहिला काही वर्षांपूर्वी यू ट्युबवर. आणि पाहून चाटच पडलो इतका प्रोग्रेसिव्ह विषय १९५०मधे. सिनेमाची सुरुवातच होते एका निवेदनाने ‘गाव तिथे महारवाडा म्हणतात पण गावची सेवा करणाऱ्या महारांची वस्ती मात्र गावापासून दूर’ आणि सुरु होतं हलवून टाकणाऱ्या 'कथा ऐका दादानू जोहार दादानू जोहार’ या गावचं रक्षणकर्त्या महार वीरांची. अफाट आणि अचाट. यात दलित किसन्याच्या बापाची भूमिका गदिमांनी केली. त्यांना मिळालेल्या स्क्रीन स्पेसचं त्यांनी अक्षरशः सोनं केलं.

गदिमांनी किसन्या महाराच्या बापाची भूमिका अक्षरश: जगली. किसन्या मुंबईला पळून जातो. तिकडून घरातली ढोलकी मी नेलीय त्याची भरपाई मी करून देईन अशी कबुली देणारं आणि स्वतःचा पत्ता सांगणारं खुशालीचं पत्र पाठवतो. ते पञ ऐकत असण्याच्या प्रसंगात, जेंव्हा पत्ता ऐकताना किसन्याच्या बापाला किसन्या तमाशात गेलाय कळतं तेंव्हा बाप झालेल्या गदिमांनी जी काही नाराजी, जो काही विशाद आपल्या अभिनयातून पोचवलाय तो कमालच. जेवायला बसल्यावर 'मी जेवणार, मला मुलाची आठवण येत नाही. माझं काळीज दगडाचं आहे हे सांगताना बापाच्या आतमधे कसा पीळ पडतोय हे नं सांगताही पडद्याबाहेर बघत्या प्रेक्षकाला हेलावून टाकतं. मुंबईला गेलेला किसन्या येत नाही हे पाहून त्याच्या बायकोला त्याचं नाव काढू नकोस दुसरा पाट लाव हे सांगताना स्वतःचाच धाकटा मुलगा जेव्हा त्याच्यावर काठी उगारतो तेंव्हा उभ्या उभ्या मोडून पडलेला भाव जो गदिमांच्या चेहऱ्यावर दिसतो तो अक्षरशः अंगावर येतो.

किसन्याची लहान लहान मुलं रस्त्याने जाताना एका मुलीच्या गळ्यात घातलेला बत्ताशाचा हार बघून आपल्या आज्याजवळ साखर बत्ताशाचा हट्ट करतात तेंव्हा 'हा महाराच्या पोरांनी करायचा हट्ट नव्ह' अशा आशयाचा दम देणारा कातावलेला हतबल आज्जा पाहून पोटात हालतं. पुढचं पाऊल मधील पायरी ओळखून राहावं सांगणारा प्रतिगामी विचाराचा, मुलांवर प्रेम असलेला पण जगराहटीला भिता बाप गदिमांनी जो काही उभा केलाय त्याला तोड नाही. अभिनयाच्या व्याख्येत असं सांगितलं जातंय की जी भूमिका तुम्ही करता ज्याच्या रूपात तुम्ही घुसता त्याच्यासारखं नुसतं भासवणं म्हणजे संपूर्ण अभिनय नाही तर त्याचे मनोविकार समजून घेऊन तशी आपली भूमिका बांधणं म्हणजे अभिनय.

अभिनय या शब्दाची व्याख्या शोधत असताना मला गूगलदेवाच्या सांगण्यावरून मला कळलं की अभिनय या शब्दाचा यौगिक अर्थच मुळी ‘जवळ नेणे’ असा होतो. आणि गदिमा त्यांनी निभावल्या भूमिकेजवळ आपल्या नुसते नेत नाहीत तर ते त्यांची ती भूमिका आपल्यामधे खोलवर नेऊन कुठेतरी ठेवतात. आणि हे करण्यासाठी माणसाच्या विचारात अलौकिकता असावी लागतीय. मी पाहिलेल्या गदिमांच्या प्रत्येक भूमिकेतून ती गोष्ट प्रकर्षाने जाणवते. पुढचं पाऊल या चित्रपटातली गदिमांची भूमिका तर उत्कट आणि सेम टायमाला संयत अभिनयाचा वस्तुपाठच म्हणता येईल. माझ्यामते या शंभर वर्षाच्या भारतीय सिनेमाच्या इतिहासात सर्वात उत्तम चरित्रनायकाच्या भूमिकेमधे गदिमांनी उभं केलेल्या ‘पुढचं पाऊल’ मधील दलित किसन्याच्या बापाच्या भूमिकेला स्थान मिळावं.

गदिमा हे उत्तम चरित्र अभिनेते होते. मी पाहिलेल्या पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, वऱ्हाडी आणि वाजंत्री या प्रत्येक चित्रपटातली त्यांची भूमिका त्यांनी अफाट, अचाटच उभी केली. त्यावरूनंच माझं फक्त मत नाही खात्री झालीय की मुत्त्यानं सांगितलेल्या माझी जमीनमधली असो, बोलविता धनीमधली असो, पेडगावचे शहाणेमधली असो किंवा त्यांनी बाकी जितक्या जितक्या पिच्चरमधे काम केलंय त्या सगळ्या पिच्चरमधल्या माझ्या गदिमांच्या भूमिका कडकच असणार. नैसर्गिक कुठेही ते अभिनय करत आहेत असं नं वाटणारा अभिनय. थोडक्यात माझे गदिमा एकच नंबर होते. गदिमांबद्दल बोलताना सुप्रसिध्द 'गुलजार' एकदा म्हणाले होते म्हणे की 'मला ग दि माडगूळकर म्हणण्यापेक्षा 'गदिमा' हेच नाव जास्त आवडतं, कारण गदिमा म्हटलं की ते मला "माँ की गोदी मे" सारखं वाटतं.’

खरंच  'लेखक' 'कादंबरीकार' 'कवी’ 'कथाकार' 'पटकथाकार' 'संवादलेखक' 'गीतकार' 'निर्माता' आणि 'अभिनेता' अशा सरस्वतीच्या सर्वच्या सर्व क्षेत्रात आपलं नाव कधीही पुसलं नं जाईल इतक्या ठाशीवपणे कोरणारं हजारो वर्षात एखादंच घडणारं असं माझ्या गदिमांसारखं अद्भूत रसायन त्यांच्याच शब्दात त्यांना वर्णायचं तर

ज्ञानियाचा व तुक्याचा

तोच माझा वंश आहे..

माझिया रक्तात थोडा

ईश्वराचा अंश आहे.

हेही वाचा : 

योद्धा मठाधिपती रामदास महाराज कैकाडी

हनी ट्रॅप: पहिल्या वर्ल्ड वॉरपासून ते सोशल मीडियापर्यंत

काँग्रेसच्या विधानसभेसाठीच्या पहिल्या यादीचा अर्थ काय?

घटस्थापना : भारतातल्या कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण

द सोशल डायलेमा: सोशल मीडियाने  आपल्याला विकायला काढलं