आपला आपला अंदाजः महाराष्ट्रात भाजप महायुतीला मोठा फटका

१४ मे २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


महाराष्ट्रातलं चार टप्प्यांतलं मतदान होऊन १५ दिवस झालेत. लोकसभेचा निकाल यायला आता आठ दिवस उरलेत. सगळीकडे कोण जिंकणार याचीच चर्चा सुरू आहे. एकमेकांशी बोलून इवीएममधल्या मतदानाचा अंदाज घेणं सुरू आहे. त्यासाठी कोलाजने अभ्यासक, पत्रकारांना लिहितं केलंय. या लेखात आपला सविस्तर अंदाज मांडत आहेत ज्येष्ठ पत्रकार गिरीश अवघडे. त्यांच्या मते भाजप महायुतीला मोठा फटका बसतोय.

कोलाजवर आपण लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातला कानोसा मांडतोय. यामधे पत्रकार, राजकीय विश्लेषक, अभ्यासक आपला अंदाज मांडताहेत. पहिला लेख येऊन गेलाय. मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य इवीएममधे बंद केलंय. अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगता नाही आले तरी लोकभावना आणि मतदानाची आकडेवारी यांच्या ढोबळ अंदाजातून काही आडाखे बांधलेत. हे शंभर टक्के सत्य, अचूक असतीलच असा मुळीच दावा नाही.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींची त्सुनामी होती. यात महाराष्ट्रातले अनेक दिग्गज वाहून गेले. ४८ पैकी काँग्रेसला केवळ २ तर राष्ट्रवादीला ४ जागा जिंकता आल्या. यंदा आघाडीची स्थिती बऱ्यापैकी सुधारेल असा अंदाज आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळून हा पक्ष महाराष्ट्रात प्रथमच दोन आकडी जागा पटकावेल असं दिसतंय.

सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात या पक्षाचे खासदार असतील. तर दुसरीकडे पक्षसंघटनेतला विस्कळीतपणा आणि तिकीट वाटपात झालेल्या गोंधळांचा काँग्रेसला फटका बसताना दिसतोय. त्यांच्या जागा वाढतील पण त्या अपेक्षेएवढ्या नसतील. सत्ताधारी भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे तर सर्वाधिक नुकसान शिवसेनेचं होताना दिसतंय.

हेही वाचाः प्रस्थापितांना धक्का हा महाराष्ट्रातल्या मतदानाचा ट्रेंड आहे?

पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीच्या मदतीला

काँग्रेस – २

राष्ट्रवादी – ६

भाजप - १

शिवसेना – १

इतर - २ (स्वाभिमानी)

पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वच लढती रंजक झाल्या. सुरवात बारामतीपासून करुयात. भाजपने कमळाच्या चिन्हावर कांचन कुल यांना विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उतरवलं. शिवाय प्रचारासाठी अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रीमंडळ, स्वतः पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री, डझनभर केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय नेते असा फौजफाटा उतरवून भाजपने हवा केली. पण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी सहकार्याचा हात पुढे केला.

त्यामुळे इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर या चार विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर राहण्याची चिन्हं आहेत. खडकवासला इथे भाजपचा उमेदवार बऱ्यापैकी आघाडी घेताना दिसत असला तरी तशी आघाडी स्थानिक उमेदवार असूनही दौंडमधून मिळणार नाही असा अंदाज आहे. परिणामी चांगली लढत देऊनही आणि राष्ट्रवादीची अतिशय खराब कामगिरी गृहीत धरली तरी कांचन कुल किमान ७० हजार मतांनी पराभूत होतील आणि सुप्रिया सुळे पुन्हा एकदा लोकसभेत पोचतील.

शेजारच्या पुण्यात अगदीच एकतर्फी वाटणारी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, प्रवीण गायकवाड यांचं संघटन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा जुना जनसंपर्क यांच्या जोरावर चुरशीची झाली. पर्वती मतदारसंघातून निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेतून झालेलं इनकमिंग काँग्रेसच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. परंतु तरीही कोथरुडमधून मिळालेल्या मताधिक्याच्या जोरावर भाजपचे गिरीश बापट विजयी होतील.

मावळ आणि शिरुर या दोन्ही मतदारसंघातल्या लढती शेवटच्या क्षणापर्यंत रंगल्या. शिरुरमधे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांना चाकणच्या रद्द झालेल्या विमानतळाचा फटका बसण्याची शक्यता असून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विजयी होण्याची शक्यता आहे. तर मावळातली लढत अटीतटीची आहे. इथे अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे उभे आहेत. पार्थ यांना पिंपरी आणि चिंचवडमधे चांगलं मतदान झाल्याचं दिसतं. घाटमाथा उतरल्यानंतर शेकापने त्यांना कशी साथ दिली यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. या लढतीबाबत निश्चित सांगता येत नसलं तरी पार्थ पवार यांच्या तयारीला एडवान्टेज देता येईल.

हेही वाचाः एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?

साताऱ्यात शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांना कडवी झुंज दिली. तरी राजेंचा प्रभाव मोडणं एवढ्यात शक्य नाही. ते पुन्हा एकदा लोकसभेत जातील.

सांगलीत वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पाडळकर यांनी अतिशय कडवी झुंज दिली. धनगर आणि मुस्लीम समाजाची एकगठ्ठा मतं खेचण्यात ते यशस्वी झाल्याचं दिसतंय. पण मतांची ही बेगमी दिल्ली गाठण्यासाठी अपुरी ठरण्याचीच जास्त शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे संजयकाका पाटील हे पुन्हा दिल्ली गाठणार नाहीत हे स्पष्ट दिसतंय. परंपरागत वसंतदादा समर्थकांची मतं, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेलं काम या जोरावर स्वाभिमानीचे विशाल पाटील यांचं पारडं जड दिसतंय. पण तरीही गोपीचंद पाडळकरांनी त्यांना दिलेली लढत दुर्लक्षित करुन चालणार नाही.

हातकणंगलेत स्वाभिमानीचे राजू शेट्टी पुन्हा एकदा संसदेत पोचतील. याखेपेस वंचितच्या उमेदवारांनी त्यांची मतं खाण्याचा उद्योग केला असला तरी त्यांचा विजय त्यामुळे थांबणार नाही. धैर्यशील माने यांना संसदेत जाण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीतली बेदिली खासदार धनंजय महाडिक यांना भोवण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांना एडवान्टेज मिळण्याची शक्यता आहे.

तिकडे सोलापुरात वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी निवडणेकीत उतरुन एकच धमाल उडविली. त्यामुळे काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी तुलनेने सोपी वाटणारी लढत अतिशय अवघड झाली. मुस्लीम आणि दलित समाजाची एकगठ्ठा मतं आंबेडकरांकडे वळली. तर लिंगायत समाजाचं बहुतांश मतदान भाजपच्या उमेदवाराने खेचलं. दुसरीकडे ग्रामीण भागातून शिंदेंना भरभरुन मतदान झालं. शहरातलं परंपरागत मतदान आणि ग्रामीण भागाच्या बेगमीवर शिंदेंचं पारडं जड आहे. पण तरीही या मतदारसंघाबाबत स्पष्टपणे भाकीत करता येत नाही.

तशीच स्थिती माढा मतदारसंघाची आहे. करमाळा, माढा आणि फलटण येथील मतांच्या बेगमीतून राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना लोकसभेत जाण्याचा रस्ता मिळू शकतो अशी स्थिती आहे. परंतु माळशिरस, माणमधलं मताधिक्य आणि खुद्द संजय शिंदे यांच्या मतदारसंघातून झालेली कथित गद्दारी यांच्या जोरावर रणजित निंबाळकर यांनाही एडवान्टेज मिळू शकेल अशीही चर्चा आहे.

महाराष्ट्रातील आणखी एक लक्षवेधी लढत म्हणजे काँग्रेसमधून भाजपवासी झालेले सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप. ही लढत दोन पक्षांमधे न होता पवार विरुद्ध विखे अशी झाली. यात जगताप यांना एडवान्टेज मिळण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातून झालेलं मतदान आणि विखेंविरोधातली नाराजी याचा फटका सुजय विखेंना बसू शकतो. तिकडे शिर्डीतून काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळेंना उमेदवारीची अक्षरशः लॉटरीच लागली. तिथं तिहेरी लढत असून यामधे कांबळे तरुन जातील अशी शक्यता आहे.

हेही वाचाः चला आता आपण राज ठाकरेंना प्रश्न विचारुया

मराठवाड्यात शिवसेनेचं नुकसान

काँग्रेस – ३

राष्ट्रवादी – २

भाजप - २

शिवसेना – १

मराठवाड्यावर शिवसेनेचा वरचष्मा राहिल्याचा इतिहास आहे. परंतु याखेपेस आघाडी इथे चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. आघाडीला उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या पाच जागांवर विजय मिळू शकतो. औरंगाबाद आणि बीडमधल्या बहुचर्चित लढतीत शेवटी युतीचेच उमेदवार विजयी होतील. मतविभाजनाचा फायदा होऊन औरंगाबादेत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा लोकसभेत जातील. बीडमधे गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई पुन्हा एकदा प्रीतम मुंडे यांच्या मदतीस येईल.

नांदेडमधे लढत कठीण असली तरी अशोक चव्हाण बाजी मारतील. हिंगोलीत शिवसेनेने दिलेला बाहेरचा उमेदवार चालण्याची शक्यता कमी आहे. इथे शिवसेना ते भाजप आणि आता काँग्रेसमधे आलेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांना एडवान्टेज मिळू शकतो. जालन्यात भाजपचा ‘बारा भोकशाचा पाना’ पुन्हा एकदा आपली कमाल दाखवू शकतो. ऐनवेळी अर्जुन खोतकरांना मॅनेज करण्यात भाजपला आलेलं यश रावसाहेब दानवेंना दिल्लीत जाण्यास उपयोगी पडेल.

हेही वाचाः महाराष्ट्रातली सर्वात टफ फाईट औरंगाबादेत होतेय

खान्देशात महायुतीला फायदा

काँग्रेस – १

राष्ट्रवादी – १

भाजप - ३

शिवसेना – १

खान्देशात युतीचाच धडाका कायम राहील अशी चिन्हं आहेत. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला अर्थात नंदूरबारला मागच्या खेपेस लागलेला सुरुंग यंदा बुजवण्यात यश येईल. इथून काँग्रेसचे के. सी. पडवी हे अनुभवी नेते विजयी होऊ शकतील. धुळ्यात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे विजयी होऊ शकतात. काँग्रेसचे कुणाल पाटील यांनी त्यांना इथे कडवी झुंज दिली. परंतु बागलाणचे मतदार भामरेंना लोकसभेत पाठवतील. रावेरमधून एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे पुन्हा लोकसभेत जातील.

राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते गुलाबराव देवकर हे जळगावमधून बाजी मारतील. पण नाशिकच्या जागेवर स्वतः छगन भुजबळ यांनी न उतरणं राष्ट्रवादीला महागात पडू शकतं. हेमंत गोडसे इथे बाजी मारतील. दिंडोरी इथून राष्ट्रवादीचे धनराज महाले यांनी चांगली लढत दिली असली तरी इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर झालेली वातावरणनिर्मिती भारती पवार यांना एडवान्टेज देऊन जातेय.

हेही वाचाः जळगावात भाजपचे नेते पक्षाच्या व्यासपीठावर WWF का खेळले?

मुंबई, कोकणमधे काँग्रेस आघाडीच्या शक्यता

काँग्रेस – ३

राष्ट्रवादी – १

भाजप - २

शिवसेना – ५

इतर - १ (बहुजन विकास आघाडी)

कोकणातल्या रायगडमधे धनुष्याची प्रत्यंचा यावेळी जरा जास्तच ताणली गेली. इथून राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे हे विजय मिळवतील. सध्या राजकीय पटलावर त्रिशंकू असणारे नारायण राणे यांना सिंधुदुर्गात फटका बसू शकतो. इथून विनायक राऊन निवडून येतील. पालघरमधली एकी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना सुखावणारी आहे. भिवंडीतून काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना एडवान्टेज आहे. ठाण्यासह मुंबईतल्या बहुतांश मतदारसंघात युतीचेच उमेदवार विजयी होतील. परंतु मुंबई दक्षिण आणि मुंबई उत्तर मध्य मधे काँग्रेसचे उमेदवार बाजी मारू शकतात. मुंबई उत्तरमधे चांगली लढत देऊन उर्मिला मातोंडकर यांना विजयासाठी वाट पहावी लागेल. पण काँग्रेसमधे त्यांना भविष्यकाळ उज्ज्वल दिसतो.

हेही वाचाः एक्झिट अंदाजः मुंबईसह चौथ्या टप्प्यावर राज्य कुणाचं?

विदर्भाचा बालेकिल्ला भाजपसाठी जड

काँग्रेस – ३

राष्ट्रवादी – १

भाजप - ३

शिवसेना – १

इतर - २ (वंचित आणि अपक्ष)

नागपुरात लढत चांगली रंगली. तरी नितीन गडकरी यांची कामं, राष्ट्रीय पातळीवरचा करिश्मा आणि त्यांच्याबाबतला भावी पंतप्रधान असा झालेला छुपा प्रचार यामुळे त्यांना एडवान्टेज देता येईल. नाना पटोले यांनी गडकरींना नागपुरातून बाहेर पडू दिलं नाही हे विशेषत्वाने नमूद करावं लागेल. तब्बल दोन दशकं चंद्रपूरचं प्रतिनिधीत्व करणारे केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोल्यातून बाजी मारतील. तर शिवसेनेत दीर्घकाळ खासदार राहिलेले भावना गवळी आणि आनंदराव आडसूळ या दोघांनाही यंदा पराभवाचा सामना करावा लागेल. यवतमाळमधे काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, अमरावतीत राष्ट्रवादी पुरस्कृत नवनीत राणा यांची बाजू वरचढ आहे. बुलडाण्यात प्रतापराव जाधव यांचं पारडं जड असलं तरी स्वाभिमानीच्या जोरावर राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांना एडवान्टेज देता येईल.

थोडक्यात महाराष्ट्रातल्या ४८ जागांवर भाजप आणि शिवसेनेला गेल्यावेळसारख्या भरघोस जागा मिळणार नाहीत. २०१४ मधे भाजपला २८ तर शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या प्रचाराचा रागरंग आणि मतदानाचा कानोसा घेतल्यास काँग्रेसला सर्वाधिक १२, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी ११ जागा मिळतील. शिवसेनेला दोन अंकी संख्याही गाठता येईल की नाही अशी परिस्थिती आहे. त्यांना ९ जागा मिळू शकतील. तर पाच जागा या इतर पक्षांना मिळतील. महत्त्वाचं म्हणजे यापैकी चार जागा या आघाडीतल्या घटकपक्षांकडेच असतील. एक जागा वंचित बहुजन आघाडीला मिळेल.

हेही वाचाः 

भोपाळमधे लागणार सॉफ्ट हिंदुत्व विरुद्ध हार्ड हिंदुत्वाचा निकाल

दिल्लीत जिंकण्यासाठीच नाही तर दुसऱ्या नंबरसाठीही लढाई

महाराष्ट्राचं राजकारण समजून घेण्यासाठी ही आत्मचरित्रं वाचायला हवीत

अशोक चव्हाणांच्या जागी कोण होऊ शकतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष?

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)