'भुरा' आणि साहित्य क्षेत्रातल्या ट्रोलिंगची लागण!

०७ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


जेएनयूतले तत्वज्ञानाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांचं 'भुरा' हे आत्मकथन सध्या खूप चर्चेत आहे. याच आत्मकथनावर मराठवाडा साहित्य परिषदेनं निबंधवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आत्मकथनाबद्दल थेट घडिव, बेतीव, रचित तसंच डिमांडनुसार लिहिलं गेल्याचा सूर आळवला गेला. हा सूर कसा एकांगी आहे हे सांगणारी प्रा. दिलीप चव्हाण यांची फेसबुक पोस्ट.

एक जानेवारीला मराठवाडा साहित्य परिषदेत प्रा. शरद बाविस्कर यांच्या भुरा या बहुचर्चित आत्मकथनावर नम्रता फालके आणि कौस्तुभ पटाईत यांनी निबंधवाचन केलं. अध्यक्षस्थानी प्रा. जयदेव डोळे सर होते. हा कार्यक्रम फेसबुकवर ऐकला. निबंधवाचनावर बोलणार नाही. कारण तो रिसर्च पेपर नव्हता. त्यामुळे पुराव्याची जबाबदारी नाही. त्यामुळे काय वाटेल ते बोलण्याचं निबंधकाराला स्वातंत्र्य असतं.

पण जयदेव डोळे यांचं अध्यक्षीय भाषण ऐकल्यावर धक्काच बसला. बोलावं की बोलू नये हा विचार करत होतो. पण हा कार्यक्रम मराठावाडा साहित्य परिषदेच्या मंचावर झाला. त्यावर बोललंच पाहिजे. एखाद्या साहित्यकृतीची समीक्षा होणं किंवा टीका होणं वावगं नाही. किंबहुना ती झाली पाहिजे. पण ती कुत्सीतपणे केलेली नसावी. तसा सुर डोळे सरांच्या भाषणात जाणवला.

हेही वाचा: धनगर संमेलनाच्या निमित्ताने मूक समाज बोलू पाहतोय

भुरा आहे काय?

भुराची पहिली आवृत्ती आल्यापासून त्यावर नियतकालिकातून तसंच सोशल मीडियामधून सामान्य वाचका पासून मराठीतल्या मान्यवर साहित्यिक विचारवंताकडून प्रतिक्रिया आल्यात. किरकोळ अपवाद वगळता सर्वाकडून पुस्तकाचं उत्स्फूर्त कौतुक झालं. त्यात कुमार केतकर, नागनाथ कोतापल्ले, रावसाहेब कसबे, रंगनाथ पठारे, चंद्रकांत पाटील, राजन गवस, प्रकाश परांजपे, प्रमोद मुनघाटे, वीणा गवाणकर, सध्या नरे पवार अशा मान्यवरांचा समावेश होता.

संध्या नरे पवार यांनी लिहिलं हा व्यवस्थेवर भिरकावलेला दगड आहे. तर चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. भुरा हे आत्मकथन नाहीरे वर्गातल्या युवकांमधे आत्मविश्वास तयार करेल. तर आहेरे वर्गात न्यूनगंड निर्माण करेल. पण प्रत्यक्षात भुराने व्यवस्थेवर भिरकावलेला हा दगड व्यवस्थेतल्या पुरोगामी म्हणवणाऱ्या अभिजनातल्या काहींना घायाळ करून गेला. आणि त्यांच्या प्रतिक्रिया वरून त्यांच्यात न्यूनगंड निर्माण झाल्याची शंका येते.

जयदेव डोळेंचा विरोधाभास

डोळे सरांच्या अध्यक्षीय भाषणात हे प्रकर्षाने जाणवलं. सुरवातीलाच हे पुस्तक पहिल्याने वाचल्यावर आवडलं नसल्याचं ते सांगतात. एकदा न आवडलेलं पुस्तक दुसऱ्यांदा कोणी वाचतं का? नंतर ते लेखकावर मोदींचा प्रभाव असल्याचं सांगताना लेखक हा आत्मकेंद्री आणि आत्मलुब्ध असल्याचं सांगतात.

आता एका भंपक संघी असलेल्या मोदींचा प्रामाणिक कष्टाळू आणि लढाऊ बाविस्करांवर प्रभाव आहे या डोळे सरांनी काढलेल्या निष्कर्षाला आधार काय? काय तर म्हणे मोदीसारख्या बाविस्कर काही गोष्टी लपवतात. एकीकडे म्हणायचं साडेतीनशे पानाचं आत्मकथन पसरट झालं. मग काय त्यांनी इतर मराठी कादंबऱ्यातल्या वर्णनाप्रमाणे फालतू तपशील देऊन पानं वाढवायला पाहिजे होती काय?

हे भुराचं आत्मकथन आहे. त्यामुळे भुराचा जीवन संघर्ष केंद्रस्थानी राहणं स्वभाविक आहे. त्यानंतर कुटुंबातले सदस्य आणि इतरांचे उल्लेख आणि संदर्भ येतील. भुराची आई या आत्मकथनाचा कणा आहे. पूर्ण आत्मकथनात आईचा संदर्भ आला आहे. शिक्षण चालू असतानाही भुराला आई बहीण कुटुंबाची काळजी आहे. शिकत असताना कमाईतून तो घरी मदत करत असतो. अशा भुराला डोळे सर आऊटसायडर आणि आत्मकेंद्री संबोधतात.

डोळे सर म्हणतात साडे तीनशे पानाचं पुस्तकं आजकाल कोण वाचतं? दुसरीकडे म्हणतात याने बऱ्याच गोष्टी लपवल्या. हा विरोधाभास नाही काय? सरांना याची कल्पना नसावी की सर्व सामाजिक घटकातल्या तरुणाईत हे पुस्तकं वाचलं गेलं. अनेकानी हे पुस्तकं एक दोन बैठकीत वाचून संपवल्याचं सांगितलं. मोदीपासून भुरापर्यंत ओबीसी आत्मलुब्ध आहेत. आणि या आत्मलुब्ध पिढीत हे पुस्तक लोकप्रिय असल्यामुळे जास्त खपलं हा डोळे सरांचा निष्कर्ष अजबच म्हणावा लागेल.

हेही वाचा: साहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच! 

बोलीभाषा अशुद्ध कोण ठरवणार?

भुरा शिक्षण चालू असताना वर्तमानपत्र वाचत नाही, टीवी पाहत नाही. किंवा स्थानिक राजकारणावर बोलत नाही. दुष्काळी कोरडावाहू भागातल्या कष्टकरी कुटुंबातल्या भुराचं या दलदलीतून बाहेर पडणं हे प्रमुख लक्ष्य होतं. पेपर, टीवी, स्थानिक राजकारणात डोकं घालणं ही पांढरपेशा समाजाची चैन त्याला परवडणारी नव्हती. कारण त्याला सुटीच्या दिवशीसुद्धा पुस्तक कपड्यासाठीच्या पैशासाठी मजुरी करावी लागायची. पांढरपेशा अभिजनांच्या कष्टकऱ्यांच्या या प्रश्नांची जाणीव नसते. त्या अज्ञानातून त्यांच्याकडून अशा अपेक्षा व्यक्त केल्या जातात.

भाषिक दुरावस्था व्याकरणावरही डोळे टिपणी करतात. बहुतेक दलित कष्टकरी ग्रामीण समाजातल्या आत्मकथनात त्यांची बोली भाषा येतेच. भुराची मातृभाषा अहिराणी आहे. त्याच भाषेत त्यांनी काही मजकूर जाणीवपूर्वक लिहिला. कारण बोलीभाषेतच त्यातला आशय ठोसपणे येतो. या भाषेची अडचण वाचकांना पण आलेली दिसत नाही. महाराष्ट्राच्या सर्व भागातून पुस्तकाचं स्वागत झालं. आपलं म्हणणं वाचकपर्यंत ठोसपणे पोचणं महत्वाचं आहे. त्यापुढे व्याकरण शुद्धलेखन याची चिंता करू नये. पांढरपेशा अभिजनांची भाषा हीच प्रमाणभाषा आणि आमच्या बोलीभाषा अशुद्ध हे सांगणारे तुम्ही कोण?

लेखकाने फ्रेंच इटालियन लेखकांचे दाखले पुस्तकात दिले आहेत. भारतीय संस्कृतीतल्या रामायण महाभारतातल्या तत्वज्ञानाचे नाहीत असा डोळे सरांचा आक्षेप आहे. प्रा. शरद बाविस्कर हे फुले आंबेडकरी विचाराधारा मानणारे आहे. या पुस्तकाची महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकंरांनी चिकित्सा करून त्याची कशी चिरफाड केली हे डोळे सरांना माहीत नसावं काय?

डोळेंचं बाविस्करांच्या संघर्षांवर प्रश्नचिन्ह!

भुरा हा अराजकीय आहे. असं पण डोळे यांचं म्हणणं आहे. शरद बाविस्कर हे राजकीय तत्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी आत्मकथनात ते ठीकठिकाणी मांडलेलं आहे. तर त्यावर डोळे म्हणतात तत्वज्ञान सांगण्याची गरज नव्हती.

जेएनयूमधे नोकरीत असताना बाविस्कर जो संघर्ष करत आहेत. तो राजकीय नाही काय? देव धर्म आणि संघ याविषयी पुस्तकात त्यांनी घेतलेल्या भूमिका या राजकीय नाहीत तर अध्यात्मिक आहेत काय? यात भयंकर म्हणजे डोळे सर हे आत्मकथन घडिव, बेतीव, रचित तसंच डिमांडनुसार लिहिलं गेलं असल्याची शंका व्यक्त करतात. कष्टकरी कुणबी कुटुंबातून येणाऱ्या बाविस्कर सरांनी हा संघर्ष अतिशय संयत आणि प्रामाणिकपणे लिहिला आहे. त्यावर डोळे अशी शंका कोणत्या आधारावर घेतात. कमाल आहे!

निबंधकार आणि अध्यक्ष भुरावर कमी आणि प्रा. शरद बाविस्करांवरच टीका टिपणीच नाही तर उपहास करताना दिसतात. हा एकप्रकारे मराठवाडा साहित्य परिषदेच्या मंचावरून ठरवून ट्रोलिंग केल्यासारखं वाटतं. पुरोगामी म्हणवणारे लोक पण असं का करतात हा मोठा प्रश्न आहे.

हेही वाचा: 

मराठी भाषेच्या अभिजातपणाची कूळकथा

सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन

नयनतारा सहगलः फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान

वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण