मीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १

३० नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून पुढे सरकलीय. यात्रेबद्दलची लोकांमधली उत्सुकता कमी झालेली नाही. ही यात्रा केवळ काँग्रेस पक्षाची नाही तर सर्वसामान्यांची, सामाजिक संघटनांची, शेतकरी, कष्टकऱ्यांची राहील यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन आणि धोरण आखलं गेलं. त्यामुळे यात्रा सर्वसमावेशक झाली. या यात्रेत महाराष्ट्रातल्या टप्प्यात सहभागी झालेले पत्रकार प्रमोद चुंचूवार यांची या यात्रेबद्दलची निरिक्षणं.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू होणार अशी घोषणा झाली तेव्हा शंका कुशंका वर्तवल्या जाऊ लागल्या. राहुल हे खरोखरच पायी चालतील का हाच पहिला प्रश्न अनेकांच्या मनात आला. काही दिवस चालतील पायी, मग जातील विदेशात फिरायला, अशी टिप्पणीही अनेकांनी केली. ही यात्रा सलग पाच महिने चालणार हे वाचल्यावर तर इतरांचं सोडा काँग्रेसजनही शंका व्यक्त करू लागले.

ही यात्रा खरोखरच इतका काळ चालेल का, असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांनाही सतावत होता. पण यात्रेचं आयोजन करणारे आणि या यात्रेचं नेतृत्व करणारे यांच्या कल्पना स्पष्ट आणि निर्धार ठाम होता. ही यात्रा केवळ काँग्रेस पक्षाची यात्रा न ठेवता ती सर्वसामान्यांची, सामाजिक संघटनांची, शेतकरी, कष्टकऱ्यांची राहील यासाठी प्रयत्नपूर्वक केलेलं नियोजन आणि आखलेलं धोरण म्हणजे एक मास्टर स्ट्रोकच.

हेही वाचा: फरक पंजाब आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा

यात्रेकडे मीडियाचं दुर्लक्ष

सात सप्टेंबरला कन्याकुमारीहून ही यात्रा निघाली त्या काळात यात्रेला मिळालेला प्रतिसाद बरंच काही सांगून गेला. यात्रेला जनतेचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा जसा यात्रेला भविष्यातही मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाची कल्पना देऊन गेला तसाच या यात्रेला मुख्य प्रवाहातल्या सर्व प्रकारच्या माध्यमांनी हेतूपुरस्सरपणे ज्या पद्धतीने ठळक स्थान नाकारलं ते सुध्दा माध्यमांवर भारत जोडो यात्रेला प्रसिद्धी न देण्यात किती दबाव राहणार आहे, याचे स्पष्ट संकेत देऊन गेला.

भारत जोडो यात्रेला मुख्य प्रवाहातल्या  माध्यमांनी हवी तेवढी प्रसिद्धी दिली तर कदाचित दिल्लीश्वरांचं आसन डळमळीत होईल या भीतीने यात्रेला वाळीत टाकण्याच्या तोंडी सूचना आणि संकेत सर्वच माध्यमांच्या प्रमुखांना देण्यात आल्याची चर्चा आहे. नाहीतर माजी खासदार किरीट सोमय्या दोन चार लोकांना घेऊन कोकणात अनिल परबांच्या रिसॉर्टवर जाणार किंवा पोलिस स्टेशनमधे जाऊन तक्रार नोंदवणार अशा टप-या बातम्यांचा तासनतास रतीब घालणाऱ्या टिवी चॅनलवर हजारो लोक पायी चालत असताना, विद्यमान खासदार राहूल गांधी हे नेतृत्व करत असताना, त्यांच्या सोबतीला अनेक आजी-माजी आमदार, खासदार असतानाही  चॅनल आणि पेपरनी या यात्रेकडे पाठ फिरवून दिल्लीश्वरांना खूष करण्याची लाचारी पत्करली.

२०१४ नंतर देशातल्या माध्यमांनी सत्ताधाऱ्यांच्या पायांवर लोटांगणं घातली असताना माध्यमांची लाचारी भारत जोडो यात्रेने ठळकपणे अधोरेखित केली. माध्यमं जनतेच्या मनातनं वेगात उतरत आहेत. अशावेळी आपली विश्वासार्हता परत मिळवण्याची ही सुवर्ण संधी माध्यमांनी गमावली. अर्थात कोंबडा आरवला नाही तर सूर्य थोडीच उगवायचा थांबतो? माध्यमात विशेष प्रसिद्धी नसतानाही भारत जोडो यात्रेची सोशल मिडिया आणि तोंडी अशी प्रसिद्धी झाली की यात्रेला अपार प्रतिसाद लोकांनी दिला. लोक जणू काही अशी यात्रा निघण्याची वाटच पाहत होते. किंवा लोकांच्या प्रचंड मागणीनंतर ही यात्रा काढण्यात आली की काय असं वाटावं तसा हा प्रतिसाद होता.

सगळ्याच गृहितकांना धक्का

दक्षिणेत या यात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर सात नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रात आली तेव्हा या यात्रेला सुरवात होऊन दोन महिने झाले होते. देगलूरमधे या यात्रेचं जंगी स्वागत झालं. नांदेडमधली सभा तर विक्रमी होती. ज्या राजीव सातव यांनी शेवटच्या श्वासापर्यंत राहूल गांधींसोबत काम केलं त्यांच्या समाधीवर राहूल यांना श्रद्धांजली वाहताना पाहून अनेक जण गलबलून गेले. वाशिम जिल्ह्यात ही यात्रा आली तेव्हा मी त्यात जुळलो. यात्रेचं आगमन होताच एका छोट्याशा सभेला राहूल गांधींनी संबोधित केलं. या सभेनंतर उपस्थित तरूणाई राहूलच्या पोस्टरसोबत फोटो काढण्यात गर्क झाली होती. राहूलची एक झलक पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली होती.

वाशिम शहरात यात्रा येण्याआधीची घटना. एके ठिकाणी राहूल येणार म्हणून हजारो लोक थांबले होते. त्यात काही महिलाही होत्या. त्या हळदी प्रक्रियेशी संबंधित काम करणा-या मजूर होत्या. त्यांची सुपरवायझर की मालकिण कुणी तरी सोबत होत्या आणि कामावर जाण्याची वेळ झाली म्हणून निघण्याचा आग्रह धरत होत्या. कामावर गेलो नाही तर मजुरी मिळणार नाही, अशी भितीही दाखवत होत्या. या महिला राहूलला पाहिल्याशिवाय जायला तयार नव्हत्या.

अशातच एकाने त्यांचा धीर वाढवण्याच्या दृष्टीने त्यांना सांगितलं की तुमची राहूलशी भेट झाली आणि तुम्ही तुमच्या काही अडचणी सांगितल्या तर तुम्हाला राहूलकडून काही आर्थिक किंवा इतर मदत मिळू शकेल. त्यावर त्या उसळून म्हणाल्या की आम्हाला राहूलकडून काहीही नको आहे. आम्हाला फक्त त्याला पहायचं आहे. ही घटना प्रातिनिधिक आणि तितकीच बोलकी आहे. संघ परिवार आणि भाजपने अगदी ठरवून, ट्रोलर्सचं सैन्य मागे लावून ज्याची प्रतिमा मलिन केली, ज्याला पप्पू ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्याला पाहण्यासाठी गोरगरीब-श्रीमंत, अशिक्षित-सुशिक्षित, शेतकरी-कष्टकरी, नोकरदार,विद्यार्थी-रिटायर व्यक्ती, स्त्री-पुरूष यांची उडालेली झुंबड, धावपळ ही सर्वच गृहितकांना धक्का देणारी होती.

हेही वाचा: सत्ता संघर्षाच्या पेचात देवेंद्र फडणवीस एकाकी

शेतकरी नेत्यांचा सहभाग

वाशिममधली सभा आटोपून राहूल निघून गेले तरी मी त्याच परिसरात रेंगाळलो. काही स्त्री-पुरूष पोलिस अधिकारी यात्रेबद्दल गप्पा करत होते. त्यापैकी काही लोक यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेत  चालून वाशीमच्या सभास्थळापर्यंत आले होते. 'ज्या पद्धतीने यात्रेला प्रतिसाद मिळतोय तो पाहता देशात परिवर्तन होईल असं वाटतंय.' या त्यांच्यातल्या एक दोन जणांच्या वाक्याने आणि सर्वांनीच त्याबद्दल सहमती दर्शवल्यामुळे मी चकित झालो.

सभास्थळी फिरत असताना शेती विशेषतः शेतकरी आत्महत्या या विषयाचे गाढे अभ्यासक गजानन अमदाबादकर यांच्याशी भेट झाली. अमदाबादकर हे मूळचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य म्हणूनही ते ओळखले जातात. ते भारत जोडो यात्रेत कसे काय, हा प्रश्न मला पडला. 'भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचं कारण हे की सध्या देशात भितीचं शंकेचं अविश्वसनीय वातावरण आहे. याला बळी पडतोय तो शेतकरी. दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असताना मी राहूल गांधी यांना दीड वर्षांपूर्वी भेटलो आणि त्यांच्याशी १० मिनिटं चर्चा केली. स्वातंत्र्याची चळवळ ही शेतक-यांच्या मुद्यावर लढली गेली. मात्र स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक शोषण हे शेतक-यांचं झालं, हे मी म्हणताच कोणतेही आढेवेढे न घेता राहूल यांनी हे मान्य केलं.'

'कोणत्याही महायुद्धात मारले गेले नाही इतके म्हणजे ५ लाखांहून अधिक शेतक-यांनी देशात आत्महत्या केली. त्यामुळे शेतक-यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य द्यावं लागेल, असं मी म्हटलं. त्यांनी सहमती दर्शवली. त्यामुळे मी माझ्या सहका-यांसह या यात्रेला आलो आहे,' असं अमदाबादकर सांगत होते. राहूल हे कन्याकुमारी चालत येत आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी आपणही चालत जायला हवं, असा विचार करून अमदाबादकर हे आपल्या सहका-यांसह कारंजा लाड इथून ६० किमी चालत वाशीमला पोचले.

'पुस्तकं वाचून अभ्यास करून वेदना समजून घेता येत नाही. त्यासाठी वेदनेचा अनुभवच घ्यावा लागतो. म्हणून मी चालत आलो. यापूर्वी मी चंद्रशेखर यांच्या यात्रेत भारतभर चाललो होतो. आत्मक्लेष आणि आत्मचिंतन अशा पदयात्रेतून होत असतं,' असं सांगताना ही यात्रा यशस्वी ठरल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.

प्रेम करणाऱ्या देशवासियांची यात्रा

अविनाश पिंपळशेंडे हे चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजु-याचे. एका शाळेत शिक्षक. गेली तीन दशकं ते शेतकरी संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून वामनराव चटप यांच्यासोबत काम करत आहेत. ते ही या यात्रेत भेटले. राहूल गांधी यांच्या यात्रेमुळे समाज जोडल्या जातोय, व्देष कमी करायला मदत होतेय, ही त्यांची भावना.

शेतकरी संघटना एकेकाळी काँग्रेसच्या कट्टर विरोधकांपैकी एक संघटना. आज या संघटनेचे लढवय्ये पाईक भारत जोडो यात्रेत सहभागी होताना दिसतायत. तीच गोष्ट एकेकाळी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सहभागी होऊन काँग्रेसविरूद्ध, आणिबाणीविरूद्ध लढलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची. तीच गत अण्णा हजारे-अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आंदोलनात काम केलेल्यांची.

हे नेते, कार्यकर्ते आज मात्र राहूल गांधींवर प्रेम करू लागलेत. भारत जोडायला हवा, हा राहूलचा निग्रह त्यांना आपला वाटू लागला आहे. कोणत्याही पक्षात, संघटनेत नसलेल्या सामान्य लोकांनाही आता राहूल आणि भारत जोडो यात्रा आपली वाटू लागली आहे याची खात्री ही यात्रा पाहिल्यानंतर कुणालाही होईल. अपंग, अंध, महिला, श्रीमंत-गरीब, आमदार-खासदार, अधिकारी- नोकर या सर्वांमधेच एक नवी चेतना या यात्रेने जागवली आहे.

शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक आणि जेपी आंदोलनात तुरूंगवास भोगलेले चंद्रकांत वानखेडे हे सुद्धा या यात्रेत सहभागी झाले. जेपी आंदोलनात तुरूंगवास भोगलेले त्यांचेच मित्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव हे सुद्धा या यात्रेत आपल्या सहका-यांसह सहभागी झाले आणि त्यांना तर ४० मिनिटं राहूल गांधी यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मिळाली. सामाजिक संघटना, एनजीओ यांच्या सहभागामुळे ही एका पक्षापुरती मर्यादित यात्रा न राहता आता ती लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता यांच्यावर प्रेम करणा-या देशवासियांची यात्रा झाली आहे.

हेही वाचा: 

मनोहर पर्रीकरः शून्यातून विश्व उभं करणारा नेता

विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार म्हणजे ‘तीन पायांचा तमाशा’

हैदराबाद महानगरपालिका निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली त्याची पाच कारणं