जर्मनीमधे मागच्या कित्येक वर्षांच्या मागणीला यश मिळालंय. तिथल्या सार्वजनिक स्विमिंग पूलमधे महिलांना टॉपलेस पोहण्याची परवानगी मिळालीय. पुरुष आणि स्त्री यांच्यातला भेद संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. 'ब्रा' या महिलांसाठी त्रासदायक असलेल्या वस्त्राविरोधात आवाज उठवत, वस्त्रात नाही तर दृष्टिकोनात बदल व्हायला हवा, अशी ठाम भूमिका अनेक महिला मांडतायत.
नग्नता, सेक्शुअलिटी याचा संबंध आपण कायमच अश्लीलतेशी जोडत आलोय. पण जगभरातल्या अनेक देशात याबद्दलचा दृष्टिकोन बदलत आला आहे, बदलला आहे. आपल्याकडेही तो बदलतोय, पण आपली समाजरचना पाहता हे बदल स्वीकारायला आपल्याला आणखी काही वर्ष जावी लागतील, असं दिसतंय. हे जरी खरं असलं तरी जगभर काय चाललंय, याची कल्पना आपल्याला असायला हवी.
आजही शॉर्टस्कर्ट किंवा डाऊनशोल्डर घालून एखादी मुलगी निघाली, तरी आपल्याकडे 'फॅशन शो' म्हणून हिणवलं जातं. पाश्चिमात्य देशात विशेषतः जर्मनीत कायमच स्त्री-पुरुष समानतेबद्दल आग्रही भूमिका मांडण्यात आली. नाही म्हणायला नाझी काळात, या समानतेच्या चळवळीला खीळ बसली, पण दुसऱ्या महायुद्धानंतर पुन्हा एकदा ही चळवळ विस्तारली.
नुकतीच जर्मनीची राजधानी बर्लिनमधे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. तिथल्या सार्वजनिक स्विमिंग पूलमधे महिलांना पुरुषांप्रमाणेच टॉपलेस पोहण्याची परवानगी देण्यात आलीय. स्त्री आणि पुरुषांमधे शारिरीक दृष्टिकोनातून भेद करण्यात येऊ नये, अशी मागणी गेले अनेक वर्ष जर्मनीमधे केली जात होती. त्या चळवळीला आता यश मिळालंय.
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी म्हणजे १८९८ मधे जर्मनीमधे एफकेके चळवळ सुरू झाल्याचे संदर्भ सापडतात. एफकेके हा 'फ्री बॉडी कल्चर' या संकल्पनेचा जर्मन भाषेतला शॉर्टफॉर्म आहे. मानवी देह ही फक्त अस्तित्वाची भौतिक खूण आहे. त्याकडे दरवेळी लैंगिकतेच्या दृष्टिकोनातूनच पाहायला हवं असं नाही, अशी या चळवळीची भूमिका आहे.
१९२० मधे जर्मनीमधे सिल्ट बेटांवर नग्नता मान्य असलेला समुद्रकिनारा विकसित करण्यात आला. तसंच व्यायाम, पोहणं, आरोग्य अशा अर्थाने नग्नतेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रयोग करण्यात आले, संस्था उभारण्यात आल्या. आज आधुनिक जर्मनीमधे ६ लाखाहून अधिक एफकेकेसंदर्भातले क्लब आहेत. ऑस्ट्रियातही या क्लबची केंद्र असल्याचं सीएनएनचं म्हणणं आहे.
याच विचारामधून पुढे आलेल्या चळवळींनी स्त्री-पुरुषांच्या देहाकडे समभावाने पाहण्यासंदर्भातल्या अनेक मागण्या कायमच जोरात मांडल्या. डिसेंबर २०२२ मधे एका महिला जलतरणपटूने स्तन झाकल्याशिवाय शहरातल्या एका स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला अडवण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणाकडेही स्त्री-पुरुष भेद या दृष्टिनं पाहण्यात आलं आणि टॉपलेस स्विमिंगची मागणी वाढली.
हेही वाचा: चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषीपणाचा वायरस मारून टाकूया
२०२२ च्या या घटनेआधीही बर्लिन वॉटर पार्कमधे अशाच प्रकारची घटना घडली होती. २०२१ च्या उन्हाळ्यात एक फ्रेंच महिला गॅब्रिएल लेब्रेटनने तिचे स्तन झाकायला नकार दिल्यावर, सुरक्षा रक्षकांनी तिला परिसर सोडण्याचे आदेश दिले. तिने या प्रकरणी आर्थिक भरपाई मागितली. तिचं म्हणणं असं होतं की, स्त्री आणि पुरुषांच्या स्तनांकडे लैंगिक अवयव म्हणून पाहिलं जाऊ नये. उन्हाळ्यात उघडं राहण्याचं स्वातंत्र्य पुरुषांना आहे, तसंच स्त्रियांनाही असायला हवं.
'बर्लिन सिनेट फॉर जस्टिस, डायवर्सिटी अँड अँटी डिस्क्रिमिनेशन' या संस्थेनंही या प्रकरणी विषय उचलून धरला. त्यांनी स्विमिंग पूलच्या मागणीसंदर्भात सिनेटच्या लोकपाल कार्यालयात समान वागणुकीची मागणी करत, महिलांना पुरुषांप्रमाणे टॉपलेस पोहण्याची परवानगी मागितली. अखेर गुरुवार ९ मार्चला, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दुसऱ्या दिवशी बर्लिनर बॅडरबाटिबे यांनी स्विमिंग पूलमधल्या कपड्यांच्या नियमांमधे बदल करण्याचा निर्णय घेतला.
लोकपाल कार्यालयाचे प्रमुख डॉ. डॉरिस लीबशर यांनी सांगितलं की, हे शहरातल्या लैंगिक समानतेसाठी टाकलेलं एक पुढलं पाऊल आहे. आपल्या शहरात स्त्री आणि पुरुष यांना समान अधिकार आहेत. त्यामुळे या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. महिलांना त्यांच्या कपड्यांबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहील असाच आमचा प्रयत्न असेल.
जगभरात 'ब्रा' या महिलांच्या स्तन झाकणाऱ्या अंतवस्त्राबद्दल स्तनांच्या आरोग्यांच्या दृष्टिकोनातूनही नकारात्मकरित्या पाहिलं जात आहे. त्यातूनच २०११ पासून १३ ऑक्टोबरला #NoBraDay पाळायला सुरवात झाली. ऑक्टोबर महिना ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी वाहिलेला असतो. त्यात १३ तारखेला नो ब्रा डे पाळला जातो. महिलांच्या स्तनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची मागणी सर्वत्र वाढत असल्याचं हे द्योतक आहे.
भारतात ब्रा या अंतर्वस्त्राबद्दलही कमालीची गुप्तता पाळली जाते. ती लपवून ठेवली जातात. वाळत घालतानाही कुणाच्या नजरेस पडणार नाहीत, अशा पद्धतीने वाळवली जातात. त्याबद्दल फारसं बोललं जात नाही. वर्षानुवर्षांच्या या कोंडीलाही आता आवाज मिळत असून, शर्ट, पँट आणि बनियन या कपड्यांप्रमाणेच ब्रासुद्धा एक वस्त्रच आहे. ब्राकडे आपण एक वस्त्र म्हणूनच बघायला हवं, अशी मागणी वाढत आहे.
सतत ब्रा घातल्याने त्वचा स्वच्छ राहत नाही. त्या भागात घाम येतो. त्यामुळे फंगस किंवा बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव होतो. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे यामुळे ब्रेस्ट कॅन्सर उद्भवण्याची शक्यता असते. या सर्व समस्या सर्वांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. दिवसभर ब्रा घातल्याने खांदेदुखीला सामोरं जावं लागण्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
वायर मटेरियल किंवा टाइट स्पोर्ट्स ब्रा घातल्याने त्वचा मोकळा श्वास घेऊ शकत नाही. रक्तवाहिन्या आवळल्या जातात. मग त्वचारोग होण्याची शक्यता वाढते. तसंच आपल्या स्तनांच्या स्नायूंना नुकसान होऊ शकतं. नाजुक त्वचेवर रॅशेस म्हणजेच लाल चट्टे येणं, त्या भागात खाज येणं, जळजळ होणं. याव्यतिरिक्त त्वचेवर डाग येणं किंवा जखम होण्यासारख्या समस्याही होता. यामुळेही ब्रा या वस्त्राबद्दल नकाराची भावना वाढते आहे.
हेही वाचा: जागतिक कन्या दिनः स्त्री सन्मानासाठी दाढीमिशा लावून काम करणाऱ्या शास्त्रज्ञ
'brassiere' या फ्रेंच शब्दाचं ‘ब्रा’ हे संक्षिप्त रुप. ब्रेसियर या अर्थ शरीराचा वरचा भाग. पहिली मॉडर्न ब्रा फ्रान्समधेच बनवण्यात आली. हर्मिनी कॅडोल यांनी १८६९ मधे कॉर्सेटला दोन तुकट्यांत तोडून अंतर्वस्त्र बनवलं. याच वस्त्राचा वरचा भाग नंतर ब्रा म्हणून घालण्यात आला. आणि नंतर तसा विकण्यातही आला. १९११ मधे ‘ब्रा’ या शब्दाला ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत स्थान मिळालं.
रोमन साम्राज्यातल्या महिला स्तन झाकण्यासाठी छातीभोवती एक कपडा बांधायच्या. ग्रीक महिलाही स्तनांखाली एक पट्टा बांधून उभारी द्यायच्या. भारतीय साहित्यातही कंचुकी किंवा कासोळी या वस्त्राचा उल्लेख आढळतो. हे सगळं खरं असलं तरीही स्त्रियांच्या स्तनाकडे लैंगिक अवयव म्हणून पाहिलं गेल्याचे संदर्भ सापडत नाहीत. तसंच अनेक आदिवासी, ग्रामीण भागात महिला उघड्या छातीने दैनंदिन व्यवहार करत असल्याचंही आढळतं.
आता मात्र महिलांच्या अंतर्वस्त्रांकडे, खासकरून ब्राकडे एक लैंगिक उद्दीपक वस्त्र म्हणून बघितलं जातं. अनेक फॅशन डिझायनर त्या दृष्टिनेही या 'ब्रा'ची निर्मिती करतात. आता फॅशनच्या मार्केटमधली एक हॉट सेलेबल आयटम म्हणून ब्रा कडे पाहिलं जातं. लग्नासाठी आणि हनिमूनसाठी विशेष रंगाच्या आणि आकारातल्या ब्राही उपलब्ध असतात.
१९०७ मधे फेमस फॅशन मॅगझीन 'वोग'नं 'brassiere' शब्द लोकप्रिय होण्यात मोठी भूमिका निभावली. पुढे ब्राचा विरोध होऊ लागला. त्यावेळी फेमिनिस्ट संघटनांनी ब्रा घातल्यामुळे होणाऱ्या धोक्यांची जाणीव करून देऊ लागल्या. १९६८ मधे महिलांना सौंदर्याच्या विशिष्ठ चौकटीत बसवण्याची ही धडपड असल्याचं सांगत हा विरोध करण्यात आला. हे सगळं बाजारानं घडवलेलं असून, त्यात स्त्रिच्या आरोग्याचा विचार होत नाही, अशी स्त्रियांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या चळवळींची भूमिका आहे.
महिलांनी एक दिवस का होईना आपल्या स्तनाची काळजी घेतली पाहिजे. आपल्या स्तनाचं निरीक्षण केलं पाहिजे. प्रत्येक महिलेनं आपल्या स्तनासंदर्भात काही समस्या उद्भवली आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे नो ब्रा डे या मोहिमेकडे लाजीरवाणेपणाने बघण्यासारखं काही नाही, हे महिलांना मनापासून पटलं आहे. त्यामुळे आज स्तनांच्या कर्करोगाविषयी महिला मोकळेपणानं बोलताना दिसतायत.
जगभर स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण वाढतं आहे. एकंदरित बैठी जीवनशैली, आहाराच्या बदलत्या पद्धती यामुळे शरिरात चरबीचं प्रमाण वाढते आहे. त्यात सुडौल दिसण्यासाठी घट्ट ब्रा घालण्याची फॅशन जीवघेणी ठरू शकतं, याची जाणीव वाढणं गरजेचं आहे. त्यासाठी महिलांनी सुंदर दिसण्यासोबतच निरोगी राहणं, यासाठी शरीराकडे डोळसपणे पाहायला हवं.
माणसाच्या शरिराचं बाजारीकरण झाल्याचे लेख आपण अनेकदा वाचलेत. मॉडेलिंग, फोटोशूट, सिनेमा यात तर या देहाच्या आकर्षक असण्याला मोठी किंमत आहे. त्यातही स्त्रिचा देह हे तर आणखीच संवेदशनील प्रकरण. पण माणूस हा शेवटी माणूस असतो. त्याला समान अधिकार असायला हवेत, या मागणीला जर्मनीच्या घटनेनं छोटं यश मिळालंय. त्यामुळे किमान महिलांच्या शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलेल, अशी आशा करायला हरकत नाही.
हेही वाचा:
मुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना!
कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर
‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?
क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका
पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं?