४ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या निवडणुकीत बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आले. तो इतिहास होता. आज दहा वर्षांनी डोनाल्ड ट्रम्पबाबांनी त्या इतिहासावर कितीही पाणी फेरलं तरी त्याचं महत्त्व कमी होत नाही. ओबामांच्या त्या विजयाचा महाराष्ट्राच्या संदर्भात विचार मांडलाय ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांनी. २०११ला अमेरिकेतल्या बीएमएम संमेलनानिमित्त प्रकाशित आयडियल इंटरनॅशनल या विशेषांकातला हा एक महत्त्वाचा लेख. तो आजही तितकाच विचार करायला लावणारा आहे.
ही गोष्ट १० वर्षांपूर्वीची. बराक हुसेन ओबामा नावाचा तरुण अमेरिकेतल्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत होता. ९/११ चा हल्ला नुकताच झालेला आणि अमेरिकेतील राजकारणाचे संदर्भ नुकतेच बदललेले. त्याचवेळी ओबामांची तयारी सुरु. त्यावर एका पत्रकार मित्राने ओबामांना परखड सल्ला दिला, `आता तुझं काही होऊ शकत नाही. ओसामा सध्या बातम्यांमध्ये असताना ओबामा या नावाला काही भविष्य असू शकत नाही. तू तुझं नावही बदलू शकत नाहीस. त्यापेक्षा राजकारणाचा नाद सोडून दे तू.`
ही खुद्द ओबामानींच ‘ऑडिसिटी ऑफ होप’ मधे सांगितलेली आठवण. मग ‘ओसामा किल्ड ओबामा’ किंवा ‘ओबामांच्या आकांशा ओसामाने पायदळी तुडवल्या’ अशा प्रकारची विश्लेषणे प्रसिद्ध होऊ लागली. प्रत्यक्ष दहा वर्षांनी घडलं ते वेगळेच. ओबामांनी ओसामाला ठार मारल्याच्या बातमीने जगाचे लक्ष वेधून घेतले. अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक हुसेन ओबामा निवडून येणं, ही खरोखरच आश्चर्यकारक घटना होती. अमेरिकेतल्या अर्थकारणाचा संदर्भ भलाही असेल या निवडणुकीला. पण या विजयाचा आशय सामाजिक होता.
बराक ओबामा निवडून आल्यानंतर भारतात उमटलेली पहिली प्रतिक्रिया म्हणजे हे वेगळेपण लक्षात येते. त्यातही महाराष्ट्रात ओबामांच्या विजयानंतरच महिन्याभरात मराठीमध्ये ओबामांवर पाच पुस्तके यावीत, ही घटना सामान्य मानता येणार नाही, शिवाय प्रत्येक पुस्तकाचं वैशिष्ट्य हे की, त्यांनी ओबामाला आपल्याशी रिलेट केलंय. अमेरिकेच्या अध्यक्षाविषयी वाटणारं आकर्षण यापूर्वी केनेडी किंवा क्लिंटन यांच्या निमित्ताने महाराष्ट्राने अनुभवलं असलं तरी ओबामांविषयी असणारी भावना त्यापलीकडची असल्याचं स्पष्ट झालं.
अमेरिकेचा अध्यक्ष या बिरुदाच्या पलीकडे हे आकर्षण आहे. व्यक्तिश: बराक ओबामांविषयी वाटणारा आदर तर वेगळाच. पण राजकारणाच्या आखाड्यात उतरुन जो चमत्कार त्यांनी घडवला, त्याचं कौतुक सर्वांना आहे. एक विलक्षण अशी सकारात्मकता ओबामांनी निर्माण केलीय. ज्याविषयी जगाला तर कौतुक आहेच; पण महाराष्ट्राला सर्वात जास्त. कारण, महाराष्ट्र ओबामांना जेवढा रिलेट करु शकतो. तेवढं क्वचितच कोणी करु शकत असेल. अगदी अतिशयोक्ती करायची तर, अमेरिकाही ओबामांना तेवढी रिलेट करु शकणार नाही, जेवढा महाराष्ट्र करु शकतो.
ओबामा म्हणाले, माझी ही चित्तरकथा फक्त अमेरिकेतच घडू शकते, अन्यत्र नाही. तेव्हा महाराष्ट्राला वाटले, खरे म्हणजे ही कथा महाराष्ट्रात घडणं अधिक स्वाभाविक आहे. पण ती घडत नाही. घडली नाही. एवढ्यात घडण्याची शक्यता नाही. हेही तेवढंच खरं आहे. मराठी माणसांना ओबामांविषयी आकर्षण वाटावं, हा म्हटलं तर अंतर्विरोध आहे. म्हटलं तर त्यांची फँटसी आहे. पण असं काही इथे घडावं, ही तमाम मराठी माणसाची मनापासून इच्छा आहे.
बराक ओबामा ही जागतिकीकरणानंतरच्या सामाजिक खुलेपणाची स्वच्छ अभिव्यक्ती आहे. जागितिकीकरण म्हणजे फक्त अर्थकारण, असा ग्रह असणाऱ्यांना या खुलेपणाचा अर्थ लागणार नाही. हा ग्रह भांडवलवाद्यांचा आहे. तसा किंवा त्याहून अधिक तो समाजवाद्यांचा, साम्यवाद्यांचा आहे. जगाचं रुपांतर एकसंध बाजारपेठेत करायचं, या ‘ड्रायव्हिंग फोर्स’मधून जागितिकीकरण भलेही जन्माला आलं असेल. ज्या ‘मार्केट’साठी महासत्तांनी आजवर साम्राज्यविस्तार केला, त्याच साम्राज्यविस्ताराचे जागतिकीकरण हे नवं आणि व्यापक रुपही असेल.
मात्र कशासाठी का असेना एकदा भिंती पाडायचा निर्णय झाला की खुलेपणा येतो. तो खुलेपणा मग जगण्याच्या सगळ्या क्षेत्रात येतो. त्यातून असं काही घडतं, जे विस्तारवाद्यांच्या मनातही नसतं. जगाच्या सर्व कालखंडात तसं झालेलं आपल्याला ठाऊक आहे. त्याचप्रमाणे जागतिकीकरणाने जो खुलेपणा आणला, त्यातून जगाचं स्वरुप अंतर्बाह्य बदलत गेलं. बराक ओबामा ही या नवजागतिकीकरणाची अभिव्यक्ती आहे.
‘द पोस्ट अमेरिकन वर्ल्ड’मध्ये फरीद झकेरिया जी सैद्धांतिक मांडणी करतात. त्याकडे आपण पाहायला हवे. झकेरियांच्या मते, आधुनिक जगाने तीन प्रकारचे बदल अनुभवले आहेत. सत्तेचं वाटप आणि तंत्रज्ञानात्मक, अर्थरचनात्मक बदल या आधारांवर या परिवर्तनाचा विचार करता येईल. पंधराव्या शतकात पाश्चात्य देशांचा उदय झाला. ज्याला ‘राइज ऑफ द वेस्ट’ असे म्हटले जाते. विज्ञान, संस्कृती, भाषा या स्तरांवर हे बदल झाले. पाश्चात्य देशांकडे जगाचे नेतृत्व गेलं.
त्यानंतर एकोणिसाव्या शतकात अमेरिकेकडे सूत्रं जाऊ लागली. त्याला ‘राइज ऑफ युनायटेड स्टेट्स’ असे म्हटलं गेलं. अमेरिकेच्या उद्याचा पाया प्रामुख्याने आर्थिक असला तरी सांस्कृतिक अर्थानेही अमेरिका हे जगाचं ‘ड्रीम’ झालं. झकेरियांच्या मते आत्ता आपण तिसऱ्या टप्प्यात उभे आहोत. हा बदल झाला आहे किंवा होऊ घातला आहे. त्याला आपण ‘राइज ऑफ द रेस्ट’ असे म्हणतो. आजवर ज्या समूहांना आवाज नव्हता, ज्या देशांना ओळख नव्हती, ते आता झेपावत आहेत. ‘राइज अबोव द रेस्ट’चा कालखंड मागे पडून ‘राइज ऑफ द रेस्ट’ असे घडण्याची प्रकिया सुरु झाली आहे. ओबामांच्या अध्यक्षपदाला हा सामाजिक आशय आहे.
हा आशय जगाला तर कळेलच, पण महाराष्ट्राला तो अधिक चांगल्या पद्धतीने भिडेल. याचं मह्त्त्वाचं कारण असे की, ‘राइज ऑफ द रेस्ट’ची प्रक्रिया महाराष्ट्रात सगळ्यात अगोदर महाराष्ट्रात सुरु झालीय. वंचित समुदायांचा उदय इथे होऊ लागला तो कोणत्याही नकारात्मकतेतून नाही, तर सकारात्मक अशा तत्वज्ञानातून. म्हणजे, जगातील कोणत्याही समूहात या स्वरुपाचे असे शास्त्रशुद्ध तत्वज्ञान निर्माण झालं नाही, जे महाराष्ट्रात निर्माण झालं.
महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याची तत्वज्ञानात्मक मांडणी केली. तेव्हा जागतिकीकरण हा शब्दही उचारला गेला नव्हता. ‘एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले’ हे विश्लेषण फुलेंनी केले. तेव्हा माहितीचा स्फोट झालेला नव्हता. किंवा ‘नॉलेज इज पावर’ असं सांगितलं गेलं नव्हतं. मात्र हाच विचार मानवी कल्याणाचा आहे, हे सूत्र त्यांना समजलं होतं. शिवाय हा विचार मांडताना कोणताही विखार नव्हता. अथवा कोणतीही सूडाची भावना नव्हती. ‘एवरीबडी इज प्लेईंग द गेम’ हे जागतिकीकरणाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. त्या प्रकारची सामाजिक परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय मानवी समुदायाला भवितव्य नाही, अशी ती मांडणी होती. ही मांडणी महाराष्ट्राने सर्वप्रथम केली.
इथल्या व्यवस्थेने निर्माण केलेली विषमतामूलक तत्त्वज्ञान मनूस्मृती जाळून दुसरी सर्वंकष राज्यघटना देशाला देण्याचा चमत्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला. तो इथेच घडू शकला असता. दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील अनेक देश स्वतंत्र झाले. ते लोकशाहीच्या दिशेने अथवा नव्या प्रणालीच्या आशेने निघाले. अनेक ठिकाणी राज्यक्रांती झाली. पण कोठेही असा पाया नव्हता.
क्रांती म्हणजे तात्पुरती टोकदार प्रतिक्रिया किंवा केवळ सत्तापालट असंच स्वरूप अन्यत्र होतं. इथे मात्र कोणताही बदला नव्हता, बदल होता. वंचित समूहाचा उदय भारतात झाला आणि त्याचं नेतृत्व महाराष्ट्रानं केलं. ती अनन्यसाधारण अशी घटना होती. जगाच्या इतिहास असं कोठेही घडलं नाही. शिवाय महाराष्ट्रात जी आंदोलनं सुरु झाली होती, त्यांना वैश्विक भान होते. महात्मा फुलेंनी आपलं पुस्तक अब्राहम लिंकन आणि त्यांच्या चळवळीला अर्पण करावं, यातून त्याची कल्पना येते. अखंड मानवी समुदायाचा विचार त्यांच्या मनात होता. या पार्श्वभूमीवर बराक ओबामांविषयी महाराष्ट्राला असलेलं अप्रूप लगेच समजू शकतं.
बराक ओबामांचं ‘ड्रिम्स ऑफ माय फादर’ वाचताना मराठीतील काही दलित आत्मचरित्रांची आठवण होते. एवढी त्याची जातकुळी आपल्याशी नातं सांगणारी आहे. या अशा विलक्षण प्रवासानंतर ज्या टप्प्यावर ओबामा आज पोहोचले आहेत, त्याच टप्प्यावर एक समाज म्हणून आपणही आहोत. म्हणजे, ‘राइज ऑफ द रेस्ट’ची अनुभूती जगण्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपण घेत आहोत. आमच्या ‘झी सारेगम’ स्पर्धेमध्ये महागायक ठरणारे आश्वासक गायक असोत किंवा आमचे आजचे मराठी सुपरस्टार असोत. आपले एक स्कूल निर्माण करणारे मराठी कवी लेखक असोत किंवा आजचे संपादक पत्रकार असोत. या सगळ्यांच्या नावांच्या यादीकडे पाहिले म्हणजे ही यादी किती आणि कशी सर्वसमावेशक होत चालली आहे, याची कल्पना यातून यावी.
जागतिकीकरणाच्या खुलेपणानंतर भारत आणि त्यातही महाराष्ट्र अधिक वेगाने झेपावला किंवा त्यांच्या वाट्याला सर्वाधिक संधी आल्या. याचं मुख्य कारण, तशी भूमी इथे तयार झालेलीच होती. फक्त योग्य वेळ येण्याचा अवकाश होता. जागतिकीकरणाने ती वेळ आणली आणि इथल्या वंचित समूहांना नवं अवकाश मिळालं. याउलट दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, पाकिस्तान यासारख्या देशांमध्ये जागतिकीकरणानंतर पैसेवाले गब्बर झाले आणि दुबळ्यांचं दुबळेपण आणखी वाढलं. भारतात तसं घडलं नाही, असं नाही. घडणार नाही, असंही नाही. मात्र संधीचं आकाश काही विशिष्ट जातींच्याच हातात आलं, असं नक्कीच झालं नाही.
ज्या गावांमध्ये वर्षानुवर्षं शाळेसाठी मैलोनमैल पायपीट केली जाते, ज्या घरांमधे युगानुयुगे सहीऐवजी अंगठा दिला जातो, ती मुलंही सिलिकॉन वॅलीत जाऊ लागली ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ भोवती फिरणाऱ्या मुली सगळ्याच परीक्षांमध्ये पोरांना हरवू लागल्या. हे यश कशाचं आहे? ते केवळ जागतिकीकरणाचं यश नाही. तसं असतं, तर अन्य देशांमधेही त्याच प्रमाणात तसं घडलं असतं. जागतिकीकरण भारताने स्वीकारलं, त्याला झाली पंचवीस वर्षं उलटून गेली. एवढ्या कमी काळात असा चमत्कार घडत नसतो. तो महाराष्ट्रात घडला. कारण ही भूमी तयार होती.
मात्र सरंजामशाही चौकट आणि सरकारी लालफितशाही यामुळे लोकशाहीनंतरही तसं आकाश वंचित समूहांना उपलब्ध होत नव्हतं. खुल्या स्पर्धेत जातपात सोडून, लिंगधर्म विसरून सहभागी होणं, त्यांना शक्य होत नव्हतं. अशा वेळी जागतिकीकरणाने ती संधी दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मुलामुलींना त्यामुळे आश्वासन मिळालं. अर्थात ही मांडणी सामाजिक आशयाच्या संदर्भात आहे.
ओबामांनी सांगितलं, माझी कहाणी वेगळी आहे. जो बराक हुसेन ओबामा लहानपणी निराश होत असे कारण त्याचं नाव अमेरिका नव्हतं. आरशासमोर उभा राहून तो रडत असे, कारण तो गोरा नव्हता. त्या ओबामाला एक दिवशी साक्षात्कार व्हावा की अरे, हे वेगळेपण हेच तर माझं बलस्थान आहे. तीन खंडांशी माझी नाळ आहे. अनेक वंश-धर्माशी माझं नातं आहे. हेच तर माझं व्यवच्छेदकत्व आहे. कारण मी कोणीही नाही. मी फक्त माणूस आहे. मी अमेरिकन आहे. ‘वी आर नॉट रेड अमेरिका ऑर वी आर नॉट ब्लू अमेरिका. वी आर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’, हा तोच साक्षात्कार होता की, ज्यातून त्यांना त्यांची ओळख समजली.
वैविध्याचा हा साक्षात्कार अमेरिकेत होऊ शकला त्यापेक्षाही तो भारतात होऊ शकतो. हा तोच भारत आहे, ज्याविषयी विन्स्टन चर्चिल म्हणाला होता, ‘हा कसला देश? ही तर भौगोलिक अभिव्यक्ती आहे. ज्या देशाला एक धर्म नाही, भाषा नाही, भूगोल नाही, समान संस्कृती नाही, तो देश कसा टिकणार? तो तर कोसळणारच.’ चर्चिल खोटा ठरला हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण असा हा देश आहे, जिथे वैविध्य ओतप्रोत भरलेलं आहे. त्यामुळे सर्वसमावेशकतेचा विचार कळण्याची सर्वाधिक शक्यता इथेच तर आहे.
जात-धर्म-वंश-लिंग यांच्या पल्याड जाणाऱ्या ज्या सामाजिक भूमिकेच्या पायांवर ओबामांनी अध्यक्षीय निवडणूक लढवली आणि ते जिंकले, त्याच पायावर तर भारत नावाचा देश उभा आहे. त्यातूनही अधिक महाराष्ट्र. कडव्या गोऱ्या अमेरिकेने या संदर्भात आपल्याला काही शिकवावं, असं नाही. कारण जी मुल्यं घेऊन ओबामा उभे ठाकले. ती मूल्ये तर आपल्या स्वातंत्र्यलढ्यातच विकसित झाली आहेत. ‘मेन स्ट्रीट’वर तगमग असताना ‘वॉल स्ट्रीट’ वर झगमग असू शकत नाही, हे ज्या अर्थकारणाविषयी ओबामा बोलत आहेत, त्या संमिश्र अर्थकारणाचं तत्व तर आपण केव्हाच स्वीकारलंय.
असं सारं होऊनही बराक ओबामा नावाची अभिव्यक्ती आपल्याकडे कधी दिसली का नाही? आपल्याकडे दलित मुख्यमंत्री होईल किंवा महिला राष्ट्रपतीही येतील, पण, तरीही ओबामांच्या धाटणीची भूमिका थेट निवडणुकीच्या राजकारणात घेऊन आपल्याकडे कोणी निवडून येऊ शकेल का, हा खरा प्रश्न आहे, ओबामांचं वैशिष्ट्य हे की ते कृष्णवर्णीयांचे नेते नव्हते वा गौरवर्णीयांचे विरोधकही नव्हते. गौरवर्णीयांनी वर्षानुवर्षे केलेल्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी ते त्या रिंगणात उतरले नाहीत.
त्याच न्यायाने पाहायचं तर, ओबामा हे पुरेसे ब्लॅकही नाहीत. खरं म्हणजे ते कोणीच नाहीत. कोणी काही म्हणो, आज तरी हे फक्त अमेरिकेतच घडू शकते. बर्लिनची भिंत कोसळली आणि जागतिकीकरण सुरु झाले. असं म्हणण्याची शिष्टसंमत प्रथा आहे. प्रत्यक्षात मात्र जागतिकीकरणानंतरही अनेक भिंती तशाच शाबूत आहेत. जागतिकीकरणाने नवे सेतू बांधले, असं म्हटलं जात असताना दुसरीकडे मात्र जुन्या भिंती नव्या दिमाखात उभ्या राहू पाहत आहेत. मध्ययुगातील इतिहासाची आठवण यावी, अशा पद्धतीने समूहांच्या टोळ्या उभ्या राहत आहेत.
जातीपातींचं आणि धर्मवंशांचे गट कमालीचे प्रभावी होत असताना त्याचं खापर मात्र जागतिकीकरणाच्या डोक्यावर फोडलं जात आहे. अशा वेळी ‘मी कोणाचाच नाही आणि मी सर्वांचा आहे’ अशी भूमिका घेऊन ओबामांसारखा एक नेता बहुसांस्कृतिक समंजसपणाचा चेहरा घेऊन उभा राहतो आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या उमेदवार ठरतो हीच घटना मह्त्वाची. जगातील पहिले वैश्विक राष्ट्र किंवा मेल्टिंग पॉट असणाऱ्या अमेरिकेने दिलेला हा कौल आहे.
ओबामांच्या निवडणूक मोहिमेत वंश हा मुद्दाच नव्हता, असं नाही. या निवडणुकीतील विविध टप्प्यांवर अनेक राजकीय समीक्षकांना ते अगदी काळे किंवा पुरेसे काळे नसलेले भासले. त्यांच्या उमेदवारीला ‘अफर्मेटिव्ह अॅक्शन’चाच भागही मानले गेले. मात्र ओबामांनी काहीच नाकारलं नाही. ते म्हणाले, माझ्या कृष्णवर्णीय वडिलांना मी नाकारत नाही आणि गौरवर्णीय आजीलाही नाकारणार नाही. ज्या विषमतेने ही दुही निर्माण केली, ती विषमता मी नाकारणारा आहे. आणि यावेळी त्यांचा भरवसा होता तो नव्या पिढीवर!
Wouldn’t here if, time & again, the torch had not been passed to new generation ही त्यांना खात्रीच होती! ओबामा काय वेगळे बोलत आहेत? ते तेच बोलत आहेत, जे इथे आंबेडकर बोलत होते. त्यापूर्वी फुले बोलत होते. त्यामुळे हा आपल्या जातकुळीचा माणूस आहे, असं महाराष्ट्राला वाटलं तर नवल नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात ओबामांची भूमिका घेऊन कोणीच पुढे येऊ शकत नाही, ते का? ओबामा निवडून आले. हा आणखी नंतरचा मुद्दा आहे. पण या विचारांनी निवडणूक लढवणाऱ्या माणसाला महाराष्ट्रात प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारी तरी मिळू शकते का? ज्याचे वडील बौद्ध आणि आई मराठा आहे, अशा जातीच्या सर्वसमावेशक उमेदवाराला मराठाबहुल खुल्या मतदारसंघातून उमेदवारी देणं किती राजकीय पक्षांना शक्य आहे? यावर एक उत्तर असंही असू शकते की आपल्याकडे काही दलित उमेदवार खुल्या मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत. मात्र त्यांची नावं, त्यांचा दबदबा, मतदारसंघातील जातीचं गणित आणि त्यांनी केलेल्या बेरजा वजाबाक्या हा फार वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे त्यांची तुलनाही इथे अप्रस्तुत आहे.
पुरोगामित्वाच्या नावाखाली नवीन जातीय समीकरणं तर महाराष्ट्रात निर्माण होत नाहीत ना, हे भय आपल्यासमोर उभे आहे. जातीपातीच्या पल्याड जाण्याची भाषा करतानाच आपली दांभिकता अधिक ठळक तर होत चालली नाही ना? हा सवाल पुन्हा निर्माण झाला आहे की मग आपण अराजकीय होत चाललो आहोत? तसं नसेल तर, इथल्या राजकारणाची सरंजामी, जातीयवादी चौकट मोडण्यात आपल्याला अपयश का येतंय? जीवनाची सर्व क्षेत्रं सर्वजण पादक्रांत करीत असताना, राजकारणाचे क्षेत्र मात्र आपण काहींसाठी आरक्षित तर करुन ठेवलं नाही ना?
आपण वारसा कोणाचा सांगतो, हा मुद्दा नाही. आपलं वक्त्वय काय आहे, याकडे डोळेझाक करुन चालत नाही. शिवाय तुम्ही संकुचित वास्तवावर उभं राहून व्यापक वारसा सांगत असाल, तर तुम्ही केविलवाणे उरता किंवा दांभिक तरी. व्यापकतेशी नातं सांगणं सामूहिक स्तरावर आपल्याला आज शक्य होणार नसेल तर मग कधी? कारण ती वेळ आज तर आली आहे.
तेराव्या शतकात ज्ञानेश्वर ‘आता विश्वात्मके देवे’चा जयघोष करीत होते. तेव्हा अमेरिकेचा जन्मही झाला नव्हता. ती अमेरिका आता ओबामांच्या रुपाने सर्वसमावेशकतेचे भान देत असताना महाराष्ट्र नक्की कुठे आहे? जी मुल्ये घेऊन ओबामा राजकारणात उतरले आणि त्यांनी अमेरिकेलाही हलवलं, त्या धारणांचा या सर्वसमावेशक राजकारणाचे सामर्थ्य ज्ञानदेव-तुकारामांचा, बुद्ध-आंबेडकरांचा, शिवराय-शाहूंचा वारसा सांगणाऱ्या मराठी माणसांना तरी समजलं आहे का?
इतिहासाचं ओझं न नाकारता आणि त्याच वेळी अस्मितांच्या धगीवर पोळ्याही न भाजता हे असं सर्वंकष लोककल्याणकारी राजकारण महाराष्ट्रात होऊ शकतं का? बहुविविधता आणि सर्वसमावेशकता हेच आपलं बलस्थान आहे, असं सांगून अस्मितेला चुचकारणाऱ्या समूहांना ठोकण्याची, जातीय अंकगणिताला नाकारण्याची हिंमत आमच्या राजकीय संस्कृतीत अद्याप तरी आली आहे का? ओबामाविषयी आकर्षण आहे, हे खरे आहे. अप्रूप आहे हेही खरं. पण तो आमचा समकालीन आदर्श ठरु शकतो? उद्याच्या राजकीय संस्कृतीचा पासवर्ड ठरु शकतो?