पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झालीय.
चीन आणि पाकिस्तान यांची हिमालयापेक्षा उंच आणि सागरापेक्षा खोल अशी मैत्री असली, तरी चीनसाठी पाकिस्तान ही एक नवी जोखीम ठरण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. एकतर चीनला पाकिस्तानच्या इकॉनॉमिक कॉरिडॉरमधून अपेक्षित फायदा होताना दिसत नाही. उलट हा प्रकल्प पांढरा हत्ती ठरण्याची शक्यता दिसू लागली आहे. दुसरं म्हणजे चीन हा पाकिस्तानला कर्जाच्या सापळ्यात अडकवत आहे, अशीही भावना पाकिस्तानातल्या काही कट्टरपंथीयांच्या मनात घर करू लागलीय.
हेही वाचा: कंदील बलुच : पाकिस्तानी महिलांची प्रेरणा
चीनच्या झिंगझियांग प्रांतात उघीर मुस्लिम जनतेला जी वागणूक चीन सरकारकडून देण्यात येतेय, त्याबद्दलही पाकिस्तानातल्या कट्टर इस्लामी संघटनांमधे नाराजी आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात पाकिस्तानात कामासाठी आलेल्या चिनी लोकांवर हल्ले होण्याचं प्रमाण वाढलंय.
या हल्ल्यांमधे प्रामुख्याने बलोच बंडखोरांचा हात असल्याचं सकृतदर्शनी दिसत असलं, तरी पाकिस्तानातल्या तालिबानची शाखा तहरीक- ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेचाही या हल्ल्यात हात असल्याचा संशय आहे. मुख्य म्हणजे अशा हल्ल्यांत पाकिस्तानी लष्करातल्या काही अधिकार्यांचा हात असावा, असाही संशय व्यक्त केला जातोय.
पाकिस्तानातल्या चिनी नागरिकांवरचा ताजा हल्ला गेल्या २६ एप्रिलला झाला, त्यात ३ चिनी नागरिक आणि एक पाकिस्तानी नागरिक ठार झाला. हा हल्ला कराची विद्यापीठातल्या चीन अभ्यास केंद्रावर झाला. या हल्ल्याची जबाबदारी बलोच लिबरेशन आर्मीने स्वीकारली असून, हा हल्ला एका आत्मघाती बलोच महिलेमार्फत करण्यात आल्याचं घोषित केलंय.
चीन पाकिस्तानात जो इकॉनॉमिक कॉरिडॉर बनवत आहे, तो प्रामुख्याने बलुचिस्तान प्रांतातून जातो आणि या प्रांतातलं ग्वादार हे बंदर पाकिस्तानने चीनला दीर्घ भाडेकराराने दिलंय. या सर्व गोष्टींचा बलुची लोकांना काहीच फायदा होत नसून, उलट बलुचींचं चीन आणि पाकिस्तान मिळून शोषण करत आहेत, असा बलोच लिबरेशन आर्मीचा दावा आहे.
बलुची लोक स्वत:ला पाकिस्तानी मानत नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात बलुचिस्तान हा स्वतंत्र प्रांत होता, जो नंतर लष्करी बळाने पाकिस्तानला जोडण्यात आला. तेव्हापासून बलुची पाकिस्तानपासून फुटून निघण्यासाठी लढत आहेत. पण बलुचिस्तानच्या या लढ्याला फारशी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली नव्हती. पण गेल्या काही वर्षांत या लढ्याबाबत जागतिक समुदायात जागृती निर्माण झाली आहे.
पाकिस्तानात पाय रोवून अमेरिका आणि भारताच्या हितसंबंधाला चीन धक्का पोचवण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात आल्यानंतर या दोन्ही देशांनी बलुचिस्तानच्या मुक्ततेच्या लढ्याला मूक पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळे बलुची बंडखोरांचं मनोधैर्य उंचावलं असून, त्यांच्या कारवायांत वाढ झालीय. त्यांनी बलुचिस्तानातल्या पाकिस्तानी लष्करी तळांवर आणि चिनी आस्थापना आणि लोक यांच्यावरचे हल्ले वाढवलेत.
हेही वाचा: यासर अराफात : एका वादळाची शोकांतिका
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने गेल्या फेब्रुवारीत बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या दोन केंद्रांवर जबरदस्त हल्ले केले. या हल्ल्यात नऊ सुरक्षा सैनिक ठार झाले, असं अधिकृतरीत्या सांगण्यात आलं असलं; तरी हा आकडा किमान ४० ते १०० असावा, असा अंदाज आहे. यावेळी २० हल्लेखोरांना सुरक्षा दलांनी ठार केल्याचा दावा पाक सरकारने केला, पण बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने आपले १६ लोक ठार झाल्याचं मान्य केलंय.
हल्ले बलुचिस्तान प्रांतातल्या पंजगूर आणि नोश्की या दोन ठिकाणच्या लष्करी केंद्रांवर झाले. हे हल्ले व्यवस्थित नियोजन करून करण्यात आले होते. हल्ले परतवून लावायला दोन दिवस लागले. या हल्ल्यात दोन्ही बाजूंचे आणि विशेषत: पाकिस्तानी लष्कराचे ४०० सैनिक ठार झाले असावेत, असा अंदाज आहे. या हल्ल्यानंतर बलुची संघटनेने एक पत्रक काढून या हल्ल्याची सर्व उद्दिष्ट्यं साध्य झाल्याचं घोषित केलं.
पाकिस्तान सरकारने नेहमीप्रमाणे या हल्ल्यात भारताचा हात असल्याचा संशय व्यक्त केला. पण अफगाणिस्तानात तालिबान सरकार आल्यानंतर भारताचा तिथला प्रभाव संपला असताना, या हल्ल्यासाठी भारताची मदत मिळणं अवघड आहे. उलट आता असं लक्षात येतंय की, हा हल्ला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तान-तालिबान किंवा तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान या संघटनेच्या मदतीने केला असावा.
खरं तर, या दोन्ही संघटनांचं पाकिस्तान सरकारशी वैर असलं तरी त्याची कारणं परस्परविरोधी आहेत. बलुची संघटनेला बलुचिस्तानचं स्वातंत्र्य हवंय. त्यांच्या या मागणीला भारताची सहानुभूती आहे. त्यामुळे या संघटनेला भारताकडून राजकीय, लष्करी पाठिंबा मिळतो, असा पाकचा आरोप आहे. पण या संघटनेला इराणमधल्या बलुचींकडूनही पाठिंबा मिळतो, हेही खरं आहे.
पाकिस्तान आणि इराणची सीमा जवळपास एक हजार किलोमीटरची आहे आणि ती खुली आहे. त्यामुळे पाकिस्तानात हल्ले करून बलुची बंडखोर सहज इराणमधे आश्रय घेऊ शकतात. तालिबान आणि पाकिस्तान यांच्यात सख्य आहे, असं आतापर्यंत मानलं जात होतं. पण अलीकडेच या दोघांतले मतभेद चव्हाट्यावर येऊ लागलेत.
हेही वाचा: अराजकतेच्या उंबरठ्यावरचा अस्वस्थ पाकिस्तान
गेल्या वर्षी जुलैमधे खैबर पख्तुनवा प्रांतातल्या अप्पर कोहिस्तान इथं, चीनच्या मदतीने उभारण्यात येत असलेल्या ४३०० मेगावॅट क्षमतेच्या विद्युत केंद्रावर काम करत असलेल्या चिनी अभियंत्यांची बस बॉम्बने उडवून देण्यात आली. त्यात ९ चिनी आणि ४ पाकिस्तानी ठार झाले.
या हल्ल्याची जबाबदारी कुणीही स्वीकारली नसली, तरी तो हल्ला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनेच केला असावा, असा संशय आहे. पण यात पाकिस्तानी तालिबानचाही हात असण्याची शक्यता नाकारली जात नाही.
या सर्व हल्ल्यांनंतर चीन सरकारने या हल्ल्याच्या तपासासाठी चिनी तपास यंत्रणेला पाकिस्तानात येऊ द्यावं, अशी मागणी केली. पण त्यामुळे पाकिस्तानी जनतेत असंतोष निर्माण झाला असता हे ओळखून पाकिस्तान सरकारने त्याला नकार दिला. पण चीन सरकारचा या हल्ल्याच्या तपासासाठी आणि संबंधितांना शिक्षा करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव कायम आहे.
बलुचिस्तानी बंडखोरी दिवसेंदिवस वाढतच जाण्याची चिन्हं असून, ती कशी संपवावी? हा पाक प्रशासनापुढे आता मोठा पेच आहे. लष्करी बळाने ही बंडखोरी चिरडण्याचा प्रयत्न केला, तर ती अधिक चिघळण्याची शक्यता आहे. चर्चेने हा प्रश्न सोडवायचा असेल, तर आता खूप उशीर झाला आहे.
नुकत्याच झालेल्या हल्ल्यांचं स्वरूप पाहता, बंडखोर आता केवळ राजकीय अथवा आर्थिक स्वायत्तत्तेच्या आश्वासनांनी समाधानी होण्याची शक्यता कमी आहे. मुख्य म्हणजे बलुची बंडखोरांचा पाकिस्तानी लष्करावर विश्वास राहिलेला नाही. हे लष्कर आपल्याला चर्चेत गुंतवून ठेवून नंतर विश्वासघात करेल, अशी रास्त भीती या बंडखोरांना वाटतेय. त्यामुळे येत्या काळात बलुची बंडखोरांचे हल्ले सतत वाढत राहतील आणि त्यांना बाह्यमदत मिळत राहील, अशीच शक्यता जास्त दिसते.
पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि पाकिस्तानी लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतंय की काय, अशी भीती निर्माण झालीय.
हेही वाचा:
जगभर लोकशाहीची जागा टोळीवाद घेतोय
क्युबन मिसाईल क्रायसिस : जगाला नवा जन्म देणारे तेरा दिवस
तालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत?
बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज
पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय?
(दैनिक पुढारीतून साभार)