यशवंत मनोहर, सरस्वती आणि फेसबूकवरची चर्चा

१७ जानेवारी २०२१

वाचन वेळ : २० मिनिटं


१४ जानेवारीला कवी, विचारवंत यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाकडून 'जीवनव्रती पुरस्कार' दिला जाणार होता. पण कार्यक्रमाच्या ठिकाणी सरस्वतीची प्रतिमा ठेवण्याविषयी आक्षेप घेत त्यांनी पुरस्कार स्वीकारायला नकार दिला. त्यावरच्या उलटसुलट निवडक फेसबुक पोस्टींचं हे संकलन.

विदर्भ साहित्य संघाकडून दरवर्षी ‘जीवनव्रती’ पुरस्कार दिला जातो. ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या साहित्यिकाची निवड केली जाते. विदर्भ साहित्य संघाचा वर्धापनदिन या पुरस्काराचं निमित्त असतं. यावर्षी संघाचा ९८ वा वर्धापनदिन होता. यावर्षीच्या पुरस्कारासाठी साहित्यिक यशवंत मनोहर यांची निवड करण्यात आली.

१४ जानेवारीला त्यांना हा पुरस्कार दिला जाणार होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी विदर्भ साहित्य संघाकडून सरस्वतीची प्रतिमा ठेवली जाणार असल्याचं त्यांना कळल्यावर त्यांनी पदाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं. सरस्वतीची प्रतिमा ठेवायला त्यांनी आक्षेप घेत तसं न करायची विनंतीही केली. कार्यक्रमाची तारीख जवळ येत होती. पण साहित्य संघानं आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती.

शेवटी आपण हा पुरस्कार नाकारत असल्याचं यशवंत मनोहर यांनी जाहीर केलं. त्यांच्या भूमिकेमुळे वाद निर्माण झाला. या पुरस्काराविषयी आपल्या मनात आदर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचा: बदललेल्या वास्तवात समकाळाशी जोडून घेणं दिवसेंदिवस अशक्य होतंय!

यशवंत मनोहर काय म्हणतात?

यशवंत मनोहर कवी, विचारवंत आणि आंबेडकरी साहित्यिक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. आताच्या भूमिकेमुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा होतेय. या सगळ्या प्रकारावरची त्यांची प्रतिक्रियाही सध्या वायरल होतेय. पुरस्कार कार्यक्रमाच्यावेळी सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, ताराबाई शिंदे यांच्या प्रतिमा ठेवायची मागणी त्यांनी केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते नेमकं काय म्हणाले हे समजून घ्यायला हवं.

तुम्ही कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणारच असं कळलं. मराठी साहित्यातली माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल असं वाटलं होतं. पण ते झालं नाही म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणाऱ्या शोषणसत्ताकाची प्रतीकं मी पूर्णतः नाकारलीच आहेत.

‘माझा सन्मान म्हणजे जिच्या अनन्यतेमुळे मी ओळखला जातो त्या माझ्या जीवनदृष्टीचा सन्मान! माझ्या या जीवनदृष्टीत न बसणारे अनेक पुरस्कार मी नाकारले आहेत. हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही. म्हणून आपण मला दिलेला जीवनव्रती हा पुरस्कार मी नम्रपणे नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे.’

विदर्भ साहित्य संघाची भूमिका

झाल्या प्रकारावर साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवलीय. ते म्हणतात, ‘ज्या सभागृहात कार्यक्रम झाला त्या सभागृहाचं नावच रंगशारदा आहे. हे शारदेचं मंदिर आहे आणि सरस्वती आमच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. त्यामुळे सरस्वतीची प्रतिमा हटवण्याचा प्रश्नच नाही.’

‘यशवंत मनोहर यांना ते पटत नसेल तर त्यांचा मताचा मी आदर करतो. दरवर्षी आम्ही ज्या पद्धतीने कार्यक्रम करतो त्याच पद्धतीने तो यंदाही झाला. हा पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी यशवंत मनोहर यांनी पुरस्कार स्वीकारण्याचं मान्य केलं होतं. आता मात्र वैयक्तिक कारणामुळे येऊ शकत नाही, असा त्यांचा निरोप आला.’

या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी लिहिलेल्या फेसबूक पोस्टींचं संकलन इथं दिलंय -

अरुणा सबाने, ज्येष्ठ साहित्यिक

नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाने यंदाचा जीवनव्रती पुरस्कार डॉ. यशवंत मनोहर सरांना घोषित केला होता. तो त्यांना आज संध्याकाळी समारंभात दिला जाणार होता. त्या पूर्वी आम्ही सरांचं अभिनंदन केलं होतं. खूप आनंद झाला होता आमच्या सारख्या परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना.

पण आज सायंकाळी मनोहर सरांनी तो पुरस्कार नाकारल्याचं समजलं आणि धक्का बसला. पण त्यांनी साहित्य संघाला जे कळवलं ते तार्किक आणि विवेकवादी भूमिकेला धरून आहे. त्यांची भूमिका योग्य वाटते. जी तत्त्वे उराशी घेऊन त्यांनी आयुष्यभर साहित्यक्षेत्रात संघर्ष केला, त्या तत्वांशी प्रतारणा कशी करायची असा त्यांना पडलेला प्रश्न योग्यच वाटतो. आम्ही त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. साहित्य संस्था ही सार्वजनिक जागा असते, तिथं एका धर्माची प्रतीकं असू नयेत ही भूमिका कुणाही लोकशाही आणि विवेकनिष्ठा मानणाऱ्या व्यक्तीला पटणारी अशीच आहे.

साहित्य संस्थेचा आणि धर्माचा काहीही संबंध असू नये असं मला स्वतःला वाटतं. धर्म वेगळा, साहित्य वेगळे. भारतीय संस्कृतीत, विशेषतः हिंदू संस्कृतीत सरस्वतीला मोठं स्थान दिलं गेलंय. पण आमची श्रद्धा सावित्रीबाई फुले, जिजामाता, फातिमा शेख, ताराबाई शिंदे, रखमाबाई ही आहेत. करायचाच असेल, तर आम्ही यांचा गौरव करू, करतोच. वि.सा.संघानं कुणाचा गौरव करायचा, कुणाची प्रतिमा ठेवायची हा त्यांच्या अखत्यारीतील विषय आहे.  मनोहर सरांनी सरस्वतीची प्रतिमा तिथं असणार होती, म्हणून तो पुरस्कार नाकारला, हा सरांच्या तत्वांचा प्रश्न आहे. आपण कायम आपल्या भूमिकेशी प्रामाणिक असलंच पाहिजे. तरच आमच्या पुरोगामित्वाला काही अर्थ आहे. सरांची भूमिका योग्य आहे.

सर, आम्ही तुमच्या सोबत आहोत.

श्रीरंजन आवटे, राज्यशास्त्राचे प्राध्यापक, पुणे

प्रतीकांचं अवडंबर निर्माण झालं की आशयापासून भरकटण्याची शक्यता अधिक असते. आता कोणत्या बिंदूपासून अवडंबर निर्माण होतं, हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. ही सीमारेषा धूसर आहे. सापेक्ष आहे. प्रतीकांना केवळ अस्मितेपुरतं सीमित करता येत नाही आणि प्रतीकांपायी मूळ आशयाचा गाभा हरवणार नाही, याचंही सांस्कृतिक भान राखावं लागतं. ही तारेवरची कसरत आहे.

माझे आवडते कवी यशवंत मनोहर यांनी नुकताच सरस्वतीच्या प्रतीकामुळे पुरस्कार नाकारल्याच्या निमित्ताने पुन्हा याविषयी चर्चा सुरु झाली आहे. यामुळे मला एका कलाकाराविषयीचा प्रसंग आठवला. एका कार्यक्रमात गणेशाची मूर्ती ही वैदिक ब्राम्हणी परंपरेचे प्रतीक असल्याची कलाकाराची धारणा असल्याने त्याने ती नाकारली. अवघ्या दोनच वर्षांनी शिवसेनेच्या मोठ्या नेत्याकडून याच कलाकाराने गणेशमूर्ती स्वीकारली. आपण ही भूमिका का बदलली याविषयीची स्पष्टता असेल तर ठीक आहे. पण मूळ मुद्दा आहे तो आपल्या सांस्कृतिक राजकारणाचा.

आत्यंतिक नैतिक शुद्धीवादी हेकेखोर होऊन समाजापासून फटकून राहताही कामा नये आणि ‘समरसता’वादीही होता कामा नये. ही दोन्ही टोकं नाकारत ठाम भूमिका घेणं ही बाब कसोटीची आहे. ज्यांना बेरजेचं सांस्कृतिक राजकारण करायचं आहे त्यांना याचं सम्यक भान असणं आवश्यक आहे. ज्यांचा तो उद्देशच नाही, त्यांची गोष्टच वेगळी.

अलीकडच्या काळात हा प्रश्न पुन्हा उसळ्या मारु लागला आहे. हिंदू का आहे, असं म्हणत शशी थरुर मांडणी करताहेत तर आपण हिंदू का नाही, हे कांचा इलैया सांगताहेत तर हिंदू स्त्री असणं आपण का नाकारतो आहोत, हे सांगणारं वंदना सोनाळकरांचं पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालं आहे. व्यवहारी राजकारणाचा समन्वयवादी दृष्टिकोन एका बाजूला तर अकादमिक ऐतिहासिक मांडणीतून आलेला दृष्टिकोन दुसऱ्या बाजूला अशा हेलकाव्यात सांस्कृतिक भूमीत मूलभूत मंथन होण्याची आवश्यकता आहे.

बाबासाहेबांनी एका टप्प्यावर हिंदू धर्म नाकारत बौद्ध धर्म स्वीकारला. शोषणाची प्रतीकं नाकारत नवी पर्यायी सांस्कृतिक मांडणी करण्याचा हा अतिशय मूलगामी प्रयत्न होता. आजची सांस्कृतिक राजकारणाची मध्यभूमी उजव्या टोकाच्या दिशेने सरकलेली असताना या प्रयत्नांबाबत पुनर्विचार करुन सांस्कृतिक फेरमांडणी करावी लागणार आहे.

हेही वाचा: आजच्या किती लेखिका आजूबाजूच्या घटनांवर भूमिका घेतात? : अरुणा सबाने

प्रमोद मुनघाटे, मराठी विभाग प्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

कला आणि साहित्याच्या क्षेत्रातल्या प्रतीकांचा संघर्ष हा प्राचीन आहे आणि त्यामागे वैदिक, अवैदिक, आर्य, अनार्य असा सांस्कृतिक संघर्षाचा आदिम इतिहास आहे. समकालीन सामाजिक, राजकीय चळवळीनाही या संघर्षाचं अधिष्ठान आहेच. साहित्याच्या क्षेत्रात या आदिम संघर्षाच्या मुळाशी जावून वर्तमान प्रश्नाना भिडणं हा यशवंत मनोहर यांच्या सारख्या लेखकांचा स्थायीभाव असतो, तो आपण समजून घेतला पाहिजे. त्यातूनच धार्मिक प्रतीकांच्या नकाराची कृती एककल्ली आणि आक्रस्ताळी वाटत असली तरी, त्यामागची भावना आपण लक्षात घेतली पाहिजे असं मला वाटतं.'

आनंद देवधर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक

विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार व्यासपीठावर सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून नाकारला. हा वाड्मयीन कार्यक्रम आहे इथं धर्म आणणं मला मान्य नाही. मी म्हणे प्रखर इहबुद्धिवादी आहे. ही माझी प्रतिमा लक्षात घेऊन तुम्ही बदल करायला हवा होता.

कोण तुम्ही? सरस्वती ही विद्येची देवता आहे. सरस्वती स्तवनाने कार्यक्रमांची सुरवात होते. हातात वीणा घेतलेली देवीची प्रसन्न मूर्ती किती सुंदर दिसते! समारंभस्थानी कसं वागायचं याचे सभ्यसंकेत यांच्या इहबुद्धीवादाला मंजूर नाहीत. देवीचा फोटो लावला म्हणजे धर्म मधे आणला इतकी संकुचित वृत्ती? मग स्वीकारलातच का मुळात पुरस्कार? आलात कशाला तिथे? तमाशा करायला? हेडलाईन मिळवण्यासाठी? उद्या कुणी म्हणेल की दीपप्रज्वलन करू नका? बापाचा माल आहे काय?

इथून पुढे कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम असो दीप प्रज्वलन होईल, देवी देवतांच्या प्रतिमांना परंपरेनुसार हार घालण्यात येईल, सरस्वती स्तवन होईल, पसायदान होईल असे सर्व संबंधितांना लेखी कळवावं आणि त्यांच्या कडून लिखित स्वरूपात एनओसी घ्यावी. यातून काय निष्पन्न झालं? तुमची बदनामी झाली. मजबूत शिव्या पडल्या. तुमच्या सेक्युलर बांधवांना तोंड लपवावं लागलं.

सरफराज अहमद, इतिहास संशोधक

एकीकडे यशवंत मनोहर साध्या प्रतिमेसाठी पुरस्कार नाकारतात. तर दुसरीकडे मुसलमान रामजन्मभूमी प्रकरणाला उघड आर्थिक रसद पुरवणाऱ्याला जीवनगौरव पुरस्कार देतात. मुसलमानांना स्वतःचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सांस्कृतिक मुल्ये जपता येत नाहीत. ते सांस्कृतिकदृष्ट्या बॅकफूटला जाऊन बहुसंख्याकांना हवा असलेला गोंडसपणा खुशीखुशी स्वीकारू इच्छितात.

पुरुषोत्तम बेर्डे, निर्माते दिग्दर्शक

ही अतिशय गंभीर अशी भूमिका आहे, असं वाटतं. एका ज्येष्ठ साहित्यिकाने इतकं संकुचित असणं आश्चर्याचं आणि अपरिपक्व वाटतं. सारखं सारखं 'माझी तत्व, माझी तत्वं’ म्हणून बडबड ऐकणं असह्य होतं. बौद्ध आणि दलित समाजात माझे असंख्य बांधव आहेत. मित्र आहेत. त्यांचं बौद्ध असणं मला कधीच खटकलं नाही. त्यांच्याशी वागण्या बोलण्यात मी कसलाच फरक ठेवला नाही. त्यांनीही मी हिंदू आहे, देवपूजा करतो, देवळात जातो म्हणून नाराजी दाखवून माझ्याशी असलेले संबंध तोडले नाहीत. पण या अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विचारवंतांनी असं वागून कोणते आदर्श आणि कोणती मूल्य लोकांसमोर ठेवलीत?

तुम्हाला जसं देवपूजा अमान्य करण्याचं स्वातंत्र्य आहे तसंच ते कुळाचार करण्याचं स्वातंत्र्य इतरांनाही आहे. यात कट्टरतेचा प्रश्न कुठे येतो? आस्तिक लोक उघड उघड परमेश्वर मानतात. आणि न मानणाऱ्यांशी खऱ्या आस्तिकाने वाद घालू नये अशी शिकवण आहे. नास्तिक देव मानीत नाहीत. मान्य. पण आपल्या आदर्शांना अखेर ते देवत्वच देतात. त्यांचे फोटो यांना स्टेजवर चालतात. पण आस्तिकांच्या प्रतिमांची यांना लगेच ऍलर्जी होते.

धर्म म्हणजे आचरण. सदाचरण. चांगल्या आचारविचारांचा आणि नियमांचा समूह म्हणजे धर्म. त्यात तुझा माझा करत बसणं हे कुठच्याच धर्मात शिकवलेलं नाही, आणि असूही नये. अनेक विचारवंत मूग गिळून बसलेत. तूर डाळ आधीच महाग झालेय. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात मूग वापरले गेले तर व्यापाऱ्यांच्या लक्षात येईल आणि मग ते ही प्रचंड महाग होतील.

आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे... तोषोनी मज द्यावे पसायदान हे... हे एका महान कवीनं म्हटलंय. तो निरीश्वरवादी नव्हता. त्याला मोडीत काढणार का?

डॉ. नितीन सावंत, संस्कृती अभ्यासक

अलीकडच्या काळात पुरोगामी चळवळीतून आत्यंतिक टोकाची नकारात्मक मांडणी झाल्यामुळे किंवा होत असल्यामुळे शेतकरी जाती प्रबोधित होण्याऐवजी त्या जाती पुरोगामी चळवळीपासुन दूर जात आहेत. यात टोकाच्या नकाराची हौस भागवून घेणाऱ्या वर्गाला त्याचं सोयर सुतक नसतं. एखाद्या गरिबाच्या घरी गेलात तर त्या गरिबाचं व्यवस्थेकडून होणारं शोषण यांना दिसत नाही तर त्या गरिबाच्या घरात भिंतीवर लावलेले देवाधर्माचे फोटो आणि त्याचे देवघर यांच्या डोळ्यांना सलत असतं.

व्यवस्थेला नकार देणं एकेकाळी संयुक्तिक होतं. सुरवातीला नकार द्यावाच लागतो, जो फुलेंनी दिला. परंतु नकाराचा नकार किती पिढ्या उगाळायचा? आपली काही सांस्कृतिक, सामाजिक, संस्थात्मक नवनिर्मिती नको का करायला?

तुमच्या व्यवस्थेतलं सर्व काही खोटं, आम्हाला अमान्य म्हणून झाल्यानंतर आपलं काही ठोस उभं करावं लागतं. ते केलंय का उभं? मुळात समग्र काही नाकारून उपरं होणं परवडणारं आहे का? शेतकरी जाती ज्या इथल्या संस्कृतीत घट्ट नाळ रोऊन आहेत त्या समग्र नकार स्वीकारतील का? नकारात्मक मांडणी, सदैव नकार धोकादायक आहे. हे ब्राम्हणी ते ब्राम्हणी, हे नको ते नको, मग स्वीकारायचं काय? पर्याय काय ? याची सूत्रबद्ध मांडणी आजच्या यशवंत मनोहरांसारख्या पुरोगामी लेखक, साहित्यिकांकडे नाही. किंवा तसं दिसत नाही. ते अजूनही टोकाच्या नकारातच अडकून आहेत.

हा मुद्दा यशवंत मनोहर यांनी सरस्वती पूजनाला नकार देत पुरस्कार नाकारला म्हणून चर्चेत आलेला आहे. यशवंत मनोहर हे फुले - आंबेडकरवादात बसत नाहीत. कारण फुले निर्मिक संकल्पना मानतात. अशा टोकाच्या नकारात्मकवादाच्या  लाइनवर व्यक्तिगत मोठेपण मिळवून घेण्याची हौस भागवत आहेत. व्यवस्था बदलाचं त्यांना देणं घेणं नाही. ते आत्मप्रौढीत मग्न असल्यामुळे यातून नफा तोटा काय याचा ते विचार करताना दिसत नाहीत.

कॉ. शरद पाटील यांनी विधायक नकार ही संकल्पना मांडून शेतकरी जातींच्या विधायक प्रबोधनाचा मार्ग खुला केल. सरस्वतीच्या बद्दल मनोहरांनी शब्दांच्या उत्पत्तीसह त्याच स्टेजवरुन प्रबोधन करायला हवं होतं. आलेली संधी विधायक खर्च करायला हवी होती. आस्थेच्या पलीकडचं सरस्वतीचं आकलन त्यांनी मांडायला हवं होतं. मी अनेक स्टेजवरुन हे नेहमी करत आलेलो आहे. अनेक मंदिरांत शिल्प, मुर्त्या पाहताना तिथं द्वेष चालत नाहीत तर विधायक नकार द्यावा लागतो. मुर्तीवर वाहीलेलं नकाराचं बेलफुल बाजूला करून मुर्तीची विधायक मांडणी करावी लागते.

पुरस्कार नाकारावेत पण समाजमन जोडण्यासाठी. शेतकरी जाती आणि पूर्वीच्या अस्पृश्य जातींना एकत्र जोडण्यासाठी विधायक नकार देत नाकारावेत. उद्या शेतकरी जातींनी म्हणू नये, आहेतच ती लोकं कट्टर त्यांच्या नादी लागू नका? मग प्रबोधन कुणाचं करणार?

हैद्राबाद दक्षिण भारताचं मुख्यालय. तिथं संघ, भाजप अर्थात प्रतिगामी छावणी १० टक्यांहून वाढून ३५ टक्क्यांपर्यंत यशस्वी झालेली आहे. तिथं काही इवीएम मशीन नव्हती. उद्या या नकारात्मक मांडणीमुळे त्यांच्याकडे सरकलेले शेतकरी, ओबीसी प्रतिगाम्यांना ३५ वरुन ५१ टक्क्यांवर नेतील. पुरोगाम्यांचा नकार देण्याचाही आधिकार काढून घेतला जाईल. आत्मप्रौढी, बाजारूपणा सोडुन पुरोगामी चळवळीनी विधायक प्रबोधनासाठी सतर्क व्हायला हवं.

तुळजाभवानी, रेणुका, अंबाबाई, सप्तशृंगी, मावळाई, योगेश्वरी या देव्या नकाराच्या नकारातून तुमच्या बोकांडी बसणार तर आहेतच, शिवाय त्या  प्रतिगाम्यांच्या पारड्यात कौल देणार आहेत. आणि याच लोकदैवतांना जर तुम्ही विधायक नकार दिला तर या देवतांची सांस्कृतिक नेणिव शेतकरी जातींना क्रांतिकारक बनवणार आहे. पुरोगामी वर्गाच्या बाजूने जनमत मिळवून देणार आहे.

तुम्ही ठरवा नकाराचा नकार हवाय की विधायक नकार हवाय. पाश्चिमात्य नास्तिक धारणेवरचा नकार की भारतीय अब्राम्हणीकरणाचा मार्ग?

हेही वाचा: कविता व्यक्तीला संवेदनशील बनवते

सतीश वाघमारे, प्राध्यापक

मी एका कार्यक्रमात सरस्वती पूजन करायला नकार दिला होता. पण मूर्ती हटवा वगैरे काही म्हणालो नव्हतो. आणि दणकून भाषण करून शाब्दिक झोडपा झोडप करून आलो होतो. आपण आठवी नववी पासून दत्त जयंतीला दत्ताच्या देवळात जाऊन प्रसादाची बुंदी हाणत आलो दत्त माझ्यावर नाराज नाही आणि मी दत्तावर नाराज नाही. शिवाय माझं स्वतःचं, आजीनं ठेवलेलं नावही दत्ताचं असल्यानं आम्ही एकमेकांवर नाराज व्हायचं कारण नाही.

मटणाच्या कंदुरीचे देव तर आपले खास आवडते. आयोजकांना असलेलं स्वातंत्र्य त्यांनी जपलं. मनोहरांनी त्यांचं विचार स्वातंत्र्य जपलं. दोन्ही आपापल्या जागी ठीकच. पण तिथं जाऊन, पुरस्कार घेऊन, सरस्वती पूजन न करून मग भाषणात मनोहरांनी प्रतिमा, प्रतीके वगैरे विषय घेऊन सरस्वतीसह आयोजकांना सनकवायला पाहिजे होतं. असं झालं असतं तर एकदम बेस्ट झालं असतं.

किशोर पवित्रा भगवान गणाई, सामाजिक कार्यकर्ते

सरस्वतीची प्रतीमा ठेवली म्हणून यशवंत मनोहर यांनी पुरस्कार नाकारणं मला खेदजनक वाटतं. याचे वाईट परिणाम काय होतील याचा विचार त्यांनी केला नाही याबद्दल मला वाईट वाटतं आणि समाजाला जोडण्याऐवजी तोडणाऱ्यांना त्यांनी ताकद दिली असं मला वाटतं.

खरंतर यशवंत मनोहर यांनी समस्त मराठी समाजाला त्यांच्या साहित्याने विचार करायला लावले, त्यांच्या साहित्यामुळे अनेकांची बदललेली मतं मी स्वतः पाहिली आहेत. त्यामुळे त्यांचा हा निर्णय मला धक्कादायक वाटला. सरस्वती म्हणजे मनू नाही की ज्याचा विरोध त्यांनी केला पाहिजे.

माझ्या एका जवळच्या मैत्रिणीची देखील सरस्वतीबद्दल काही दूषित मतं होती. त्यावेळी मी सरस्वती कोण, याबद्दल मांडले असताना थोडे वाद उभे राहिले असताना प्रसिद्ध कवयित्री लेखिका तायबा कविता महाजन यांनी त्या वादात माझ्या बाजूने उडी घेतली होती. याबद्दल अधिक उहापोह न करता मी ठळक दोनच गोष्टींबद्दल बोलेन.

ज्या सरस्वतीवर लहानपणी ब्रम्हाने बलात्कार केला होता, त्या ब्रम्हाची भारतात एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी मंदिरं आहेत. एकार्थाने भारतीय समाजाने ती ब्रम्हाला दिलेली शिक्षा आहे. या ब्रम्हागिरीचे अनुकरण काही मनुवाद्यांनी कसं केलं त्या बद्दल मी याआधी उदाहरणानं दिली आहेत.

या सरस्वतीवर ब्रह्माने का बलात्कार केला? यांच्या काही कथा सरळ सरळ सांगतात की ती बंडखोर होती. सरस्वतीला विद्येची देवता मानलं जातं. भारतात सरस्वती पूजन करताना ४४४४ आकडे एकाखाली एक काढून पूजले जाते. त्यातून गायीचंच चित्रं ध्वनित होतं. म्हणजे पुन्हा गोपूजा, म्हणजे कृषी संस्कृती म्हणजे कृषी संस्कृतीची ती पुरस्कर्ती असल्याने तिच्यावर बलात्कार झाला का?

वीणा घेऊन गावोगावी जाऊन कृषिसंस्कृतीचं गुणगान गाणाऱ्या सरस्वतीवर याही काळात अन्याय होतो. या विचाराने मला भयंकर वेदना होतात. अनेक वर्षे भारतीय समाज ज्यांची पूजा करतो, गोडधोड करतो त्याअर्थी त्या समाजासाठी त्या व्यक्तीने महान कार्य केलं असावं, असं लोहिया नेहमी म्हणायचे. ते मला अनेक सो कॉल्ड पुराण देवतांचा अभ्यास करताना वेळोवेळी समजलं. त्यात सर्वात जास्त अपमान सरस्वतीचा झालाय, असं मला विचारांती वाटतं. शंकराचार्यांनी सरस्वती आईच्या कार्यापेक्षा रूपाचं वर्णन केलं आहे याचं सुद्धा मला वाईट वाटतं.

भारतीय प्राचीन साहित्यातून इतिहास शोधायचं काम महाराष्ट्रात शरद पाटील, आ. ह. साळुंखे, अशोक राणा, संजय सोनवणी आणि अनेक जणांनी करून महात्मा फुलेंची इतिहास विश्लेषणाची परंपरा पुढे नेली असताना यशवंत मनोहर यांनी हे पाऊल चुकीचं टाकलं आणि चुकीचा पायंडा पाडला, असं मला वाटतं.

संयोजकांनी सुद्धा त्यांची फसवणूक केली, ती केली नसती तर असं घडलं नसतं. असो आता मनुवादी अभिजन खूप पद्धतशीरपणे सांस्कृतिक दृष्ट्या समाज तोडायला निघाले असताना, आजही सरस्वतीवर टीका करून, भगव्या रंगावरून दूषणं देणं विचारवंतांनी समजून थांबवलं तर आमच्या कामात अडचणी वाढणार नाहीत आणि कट्टरता कमी करायला आम्हाला मदत होईल.

शंकर पार्वती, गणपती, अशोका सुंदरी यांचा इतिहास समजून घेतल्यानेच भारत वाचेल, चमकेश इंडियावाले जे चमकवत आहेत त्यांच्या मागे लोक धावत राहतील, आमचे बुद्धिवंत हे कधी समजून घेणार कोण जाणे? मनुवाद्यांनी एखादी गोष्ट स्वीकारली तर आम्ही तिला नाकारायचं हे कुठवर चालणार?  डिसइन्फॉर्मेशन आणि मिसइन्फॉर्मेशम मधून इतिहास शोधायची गरज आजही किती आहे हे सुद्धा पुन्हा एकदा प्रकर्षानं जाणवलं.

आमच्या सावित्रीवर शिक्षण देते म्हणून चिखल फेकला गेला, दगड फेकला गेला. तर त्या काळात आमच्याच सरस्वतीवर बलात्कार झाला हे कधी समजून घेणार आम्ही?

हेही वाचा: 

एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा

जॉर्ज ऑरवेल : सत्तेच्या खेळाचा चिरंतन भाष्यकार

ग दि माडगूळकर: भूमिकेला माणूसपण देणारा कलाकार

बाहेरच्या झगमगाटात काळजात कँडल पेटवते ग्लुकची कविता

विशीतला तरुण सांगतोय, ग्रामपंचायत निवडणुकीचा जांगडगुत्ता

मोबाईलमधून खासगी गोष्टीत डोकावणाऱ्या वॉट्सअॅपचं काय करायचं?