अनिल अवचटांनी आपल्याला काय दिलं?

०८ फेब्रुवारी २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


आपल्या ५५ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात अनिल अवचट यांनी समाजाला किती काय दिलं. साधना, युक्रांद, मुक्तांगण, विविधांगी लेखन असा त्यांचा प्रवास. समाजाकडून खूपच थोडं घेणारे आणि समाजाला खूप काही देऊन जाणारे अशी वर्गवारी केली तर, तर अवचटबाबा अव्वल स्थानी दिसेल. त्यांच्याविषयी विनोद शिरसाठ यांनी लिहीलेला साधना साप्ताहिकातला संपादकीय लेख.

१९४४ला जन्मलेल्या अनिल अवचट यांचं २७ जानेवारीला निधन झालं. ७७ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं, त्यातली ५५ वर्ष त्यांच्या सार्वजनिक आयुष्याची म्हणता येतील. १९६६ला स्थापन झालेल्या युवक क्रांती दल या संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते. १९६९ला त्यांनी दुष्काळग्रस्त बिहारचा दौरा केला आणि तिथली विदारक परिस्थिती पाहिली. तेव्हा त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. ती कशी, हे त्यांनी ‘माणूस’ साप्ताहिकातल्या ‘पूर्णिया’ या दीर्घ लेखात मांडलं, तेच त्यांचं प्रकाशित झालेलं पहिलं पुस्तक. त्याला नरहर कुरुंदकर यांची प्रस्तावना आहे.

हेही वाचा: राजन गवसः जगण्यातूनच आली लिहण्याची भूमिका

साधना साप्ताहिकातला काळ

त्याच्या आदल्या वर्षी त्यांनी साधना साप्ताहिकात ‘वेध’ या शीर्षकाखाली छोट्या छोट्या ३५ लेखांची मालिका लिहिली, त्याचं पुस्तक उशिरा प्रकाशित झालं. पण लेखनाच्या कालानुक्रमाचा विचार केला तर हे त्यांचं पहिलं पुस्तक. या पुस्तकाला विजय तेंडुलकर यांची प्रस्तावना आहे. हे पुस्तक त्यांनी साधना साप्ताहिकाला अर्पण केलंय. त्या पुस्तकाच्या प्रास्ताविकात त्यांनी लिहिलंय, ‘आयुष्यभर पुरतील इतके विषय मला या लेखमालेच्या काळात साधना साप्ताहिकाने दिलं.’

त्यानंतरची चार-पाच वर्ष म्हणजे १९७२ पर्यंत त्यांनी साधनात विपुल लेखन केलं, साधनाच्या काही अंकांचं संपादन केलं आणि दोन-अडीच वर्ष कार्यकारी संपादक म्हणूनही काम पाहिलं. म्हणजे १९६८ ते ७३ हा जेमतेम पाच वर्षांचा त्यांचा साधनातला कालखंड. पण त्यांच्या लेखन कारकिर्दीच्या अगदी सुरवातीचा. त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या अर्धशतकी वाटचालीच्या भक्कम पायाभरणीचा. साधनाचे तत्कालीन संपादक यदुनाथ थत्ते यांनी शेकडो चळवळ्या तरुणांना बळ दिलं, त्यातले सर्वोत्तमांमधे अनिल अवचट अग्रस्थानी.

महाराष्ट्रभर भ्रमंती, पुस्तकांमागून पुस्तकं

१९७३ हे वर्ष अनिल अवचट यांच्यासाठी आयुष्याची दिशा गवसलेलं वर्ष ठरलं. त्यांनी साधनाच्या कार्यकारी संपादकपदाचा राजीनामा दिला. त्याच वेळी युवक क्रांती दलातून बाहेर पडले. आणि थोडंबहुत करत होते ती वैद्यकीय प्रॅक्टिसही सोडून दिली. त्याचदरम्यान त्यांच्या पत्नीने डॉ.अनिता यांनी वैद्यकीय प्रॅक्टिस चालू ठेवून अनिल यांना जगण्यासाठी मुक्त वाव दिला.

अनिल अवचट महाराष्ट्रभर फिरू लागले. प्रश्न दिसला तिथं डोकावू लागले, अस्वस्थ झाले तिथे शोध घेऊ लागले. समाजातल्या तळागाळातल्या घटकांशी संवाद साधू लागले. त्यावर लिहू लागले. मनोहर, किर्लोस्कर, माणूस, मौज, साधना इत्यादी साप्ताहिकात लिहू लागले. प्रश्नांना वाचा फुटू लागली. समस्या चव्हाट्यावर येऊ लागल्या.

लेखन वाढत गेलं. महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख दिवाळी अंकांमधूनही प्रसिद्ध होऊ लागलं. वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळू लागला. विविध स्तरांवर त्याची चांगलीच दाखल घेतली जाऊ लागली. त्या लेखनाची पुस्तकांमागून पुस्तकं प्रकाशित होऊ लागली. पुढची तीन दशकं हा सिलसिला चालू राहिला. राज्यभरातून बोलावणं येऊ लागलं.

इतर राज्यांतल्या आणि विदेशातल्या मराठी भाषकांमधेही कुतूहल वाढीला लागलं. ते लेखन वंचित, उपेक्षित, शोषित घटकांच्या संदर्भात होतं. मात्र त्याने खडबडून जागे झालेले वाचक प्रामुख्याने मध्यम वर्गातले होते, उच्च-मध्यम वर्गातले होते. त्यांच्या जाणिवांना हादरे बसू लागले. आपल्याच सभोवताली काय जळतंय हे त्यांना दिसू लागलं, तेही अस्वस्थ होऊ लागले. त्यांच्या जाणिवांना नवे धुमारे फुटू लागले.

हेही वाचा: कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

जोपासलेल्या छंदांसाठी वेळ

वयाची साठी आली आणि मग अनिल बाबाने आणखी एक वळण घेतलं, त्या वळणावर उतार होता. त्याचं वर्णन ‘मस्त मस्त उतार’ असं त्यांनीच करून ठेवलंय. त्या शीर्षकाची कविता लिहिली आहे आणि कविता संग्रहाचं नावंही तेच दिलंय. पत्नीचं निधन झालेलं. ‘मुक्तांगण’ची जबाबदारी पार पाडण्यासाठी मुक्ता सक्षम झालेली.

तब्येत तशी ठणठणीत, पण आधीच्या साडेतीन दशकांत केलेल्या दगदगीमुळे फिरस्ती आणि शोधाशोध करण्याची उर्मी कमी झालेली. आधीपासून असलेले आणि जोपासलेले छंद डोकं अधिक वर काढू लागले. त्यात पडत गेलेली नित्यनूतन भर. पुढची दोन दशकं अशीच राहिली. अर्थातच या काळातही लेखन होत राहिलं, पुस्तकं येत राहिली. पण ते लेखन स्वतःशी संवाद साधणारं, गतकाळाशी संवाद साधणारं, निसर्गाशी संवाद साधणारं!

युक्रांदच्या पायाभरणीत अनिल अवचट

१९६६ नंतरचं दशकभर कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वात युवक क्रांती दल या संघटनेनं महाराष्ट्रातल्या तरुणाईवर गारूड केलं होतं. त्या काळातले हजारो तरुण आणि तरुणी कोषातून बाहेर पडू लागले, चौकटीबाहेरचा विचार करू लागले, नवी उमेद आणि नवा विश्वास घेऊन वावरू लागले. त्यातले अनेकजण दोन-चार वर्षच त्या झंझावातात वावरले, काहींना तर काठाकाठानेच तो वारा लागला. पण त्या सर्वांच्या पुढच्या आयुष्यावर त्याचा प्रभाव राहिला.

भले ते सरकारी नोकऱ्यांत गेलेले असो, खासगी क्षेत्रांत काम करू लागलेले असो, सामाजिक संघटनांत रममाण झालेले असो, साहित्याच्या क्षेत्रांत मुशाफिरी करू लागलेले असो... तर त्या युक्रांदच्या पायभरणीची पाच वर्ष अनिल अवचट त्यात चांगलेच सक्रिय होते. ‘युक्रांदचं बोधचिन्ह - चौकटीतून बाहेर पडलेला पक्षी,  अनिलने तयार केलं आणि आम्ही ते आजही वापरतो,’ हे कुमार सप्तर्षी यांनी काल नोंदवलं यातच बरंच काही आलं.

हेही वाचा: ‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

लिखाणातून अन्यायाला वाचा फोडली

अनिल अवचट यांनी वयाच्या पंचविशीपासून पन्नाशीपर्यंत हाताळलेले बहुतांश विषय असे होते, ज्याकडे तोपर्यंत कोणाचं लक्षच गेलेलं नव्हतं. इतकंच नाही तर त्यांनी लिहिलं तसं लेखन तोपर्यंत कोणी करतही नव्हतं.

कचरावेचक ते भंगीकाम करणारे, विडी कामगार ते मच्छीमार, ओशो रजनीश ते निर्मला माता, दारूग्रस्त ते गर्दग्रस्त, भंगारवाले ते जुना बाजारवाले, दलितांवर बहिष्कार ते महिलांची धिंड काढणं असे असंख्य विषय त्यांनी हाताळले.

त्यांनी अन्यायाला आणि अत्याचाराला वाचा फोडली, दुःखाचे डोंगर दाखवले. शोषकांचे मुखवटे उतरवले. आणि हे वाचून सुशिक्षित मध्यम वर्ग अस्वस्थ झाला, त्याच्या जाणिवांच्या कक्षा रुंदावत गेल्या. कोणत्याही सामाजिक बदलांचा कणा मध्यमवर्ग असतो, त्यामुळे अवचट यांनी तिथे घेतलेले छेद महत्त्वाचे ठरले.

तरुण पिढीवर गारूड केलं

अवचट यांना सर्व स्तरांतला वाचकवर्ग लाभला हे खरं. पण त्यातही अधिक लक्षणीय आहे तो युवा वर्ग. आपल्या सभोवतालाविषयी प्रश्न पडू लागलेले पंचविशीच्या दरम्यानचे संवेदनशील तरुण उत्तरांच्या शोधात निघाले की, अनिल अवचट यांच्या लेखनाचा थांबा त्यांच्या वाटेवर येतोच.

मागच्या चार दशकातल्या प्रत्येक तरुण पिढीवर असं गारूड काही काळ तरी राहिलंच. त्यामुळे अनेक तरुण पत्रकारांना, नवोदित साहित्यिकांना हा लेखक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रेरणा देत राहिला. अनेक तरुणांना कार्यकर्ते होण्यासाठी बळ देत राहिला. अनेक संघटनांना संघर्ष करण्यासाठी ऊर्जास्रोत बनत राहिला.

हेही वाचा: गोड ऊस तोडणाऱ्या कामगाराचं कटू वास्तव मांडणारं पत्र

महाराष्ट्राला मुक्तांगणची देण

अनिता अवचट यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं आणि चालवलं, त्यासाठी अनिल अवचट यांनी प्रत्यक्ष बळ दिलं. त्या केंद्रातून मागच्या साडेतीन दशकांत हजारो लोक उपचार घेऊन बाहेर पडले. हजारोंना पुनर्जन्म झाल्याची अनुभूती आली, हजारोंचे संसार धुळीला मिळता मिळता सावरले. कुटुंबं कोलमडण्यापासून वाचली. अनेक लहान मुलांचं, अनेक आई-बापांचं, अनेकांच्या पत्नी भावा-बहिणींचे हरवलेले चेहरे पुन्हा तजेलदार बनले. महाराष्ट्रात आजही व्यसनमुक्ती केंद्र हा शब्द उच्चारला तर सर्वप्रथम नाव येतं ‘मुक्तांगण’. त्यामागे अनिल अवचट यांची पुण्याई उभी आहे!

अनिल अवचट यांचं ‘स्वतःविषयी’ हे पुस्तक आणि तत्सम इतर लेख वाचून प्रभावित झालेला एक वेगळाच वर्ग आहे. ‘पती-पत्नीचं सहजीवन कसं असावं आणि स्वत:च्या मुलांना कसं वाढवावं याचे धडे आम्ही त्या लेखनातून घेतले आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला’ असं सांगणारी हजारो जोडपी या महाराष्ट्रात आहेत.

‘स्त्री-पुरुष समतेचा आणि बालसंगोपनाचा शास्त्रीय विचार त्या लेखनापुढे आम्हाला थिटा वाटला’ असे सांगणारे अनेक लोक आहेत. मुलांवरचं अतिरिक्त ओझं उतरवण्यासाठी आणि पती-पत्नीच्या नात्यातल्या अवास्तव अपेक्षा कमी करण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला, असे कित्येक लहान-थोर आजही सांगत आहेत. ‘सृष्टीत गोष्टीत’ आणि ‘वनात जनात’ ही दोन लहान पुस्तकं तर मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी यातली सीमारेषा पुसून टाकणारी ठरली.

समाधानी जीवनाचं तत्त्वज्ञान

अलीकडच्या दोन दशकातली त्यांची पुस्तकं एका अर्थाने उरलेसुरलं आणि पूर्वीचे खरडून काढलेलं अशी होती. त्यामुळे काही लोकांच्या चेष्टेचा विषय बनली. पण सर्वसामान्य वाचकांना त्या पुस्तकांतूनही खूप काही मिळत होतं. इतर गंभीर विषयांवरची आणि तत्त्वज्ञानाची पुस्तकं करू शकणार नाहीत, अशी मोहिनी अवचटबाबाच्या अनेक पुस्तकांनी केली. आपल्या आयुष्यातल्या पूर्वसुरींकडे कसं पाहावं इथपासून ते आपल्या सहवासातली प्रत्येक लहान-मोठी व्यक्ती आपल्याला काही ना काही देत असते, हे या पुस्तकांनी शिकवलं.

अधिक महत्वाचं म्हणजे साधी सरळ राहणी, कमीत कमी गरजा, कमीत कमी अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षा, निसर्गसंवादी जीवनशैली हे या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. आणि या सर्वांना पुढे घेऊन जाणारे अवचटबाबाचे छंद. चित्रकला, फोटोग्राफी, काष्ठशिल्प, बासरी, ओरिगामी, जादूचे खेळ आणि असं बरंच काही. या सर्व छदांचं कौतुक खूप झालं, काही लोकांकडून कुजबूज स्वरूपात उपहासही झाला.

‘अवलिया’ या तटस्थ छटेच्या शब्दात वर्णन केलं गेलं. पण ते खरं नाही. हा निव्वळ टाईमपास नव्हता. अर्थात ‘आनंद मिळतो एवढाच त्याचा फायदा’ असं खुद्द अवचटबाबाही सांगत राहिले. आणि मध्यम वर्गातल्या अनेकांनी ते खरं मानलं, तेवढाच अवचट उचलून धरला. पण सुखी-समाधानी जीवनाचं तत्त्वज्ञान शिकण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. विशेषतः व्यक्तिकेंद्रित समाज आणि आत्मकेंद्रित मनोवृत्ती वाढत असल्याचं जाणवतं तेव्हा तर याचं महत्त्व अधिक आहे.

अनिल अवचट यांनी समाजाला आणखी काय काय दिलं त्याची यादी बरीच वाढवता येईल, पण त्यांनी समाजाकडून किती अल्पस्वल्प घेतले याचा हिशोब केला तर? म्हणजे समाजाकडून खूपच थोडं घेणारे आणि समाजाला खूप काही देऊन जाणारे अशी वर्गवारी केली तर, तर अवचटबाबा अव्वल स्थानी दिसेल.

हेही वाचा: 

आपण बाल दिन साजरा करतोय की बाल दीन?

अश्विनची मुरलीधरनशी बरोबरी, आता कुंबळेंचा रेकॉर्ड मोडणार?

मार्वलच्या सुपरहिरोंना मार्टिन स्कॉर्सेसी सिनेमा का मानत नाही?

स्मार्टफोनच्या जमान्यातही लोकांना फीचर फोनचा नाद का सोडवत नाही?

भाजप-शिवसेनेकडून युती तोडण्याची अधिकृत घोषणा टाळण्यामागची चार कारणं