वेदनेने डोळ्यात अश्रू, तरीही खांद्यावर कॅमेरा सुरूच 

०७ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज ६ जानेवारी, पत्रकार दिन. टाईम मॅगझिनने २०१८चे पर्सन ऑफ द इयर म्हणून सत्याचा शोध घेण्यात सर्वस्व पणाला लावणाऱ्या पत्रकारांना गौरवलंय. त्यात शाजिला अली फातिमा यांचं नाव नाही. पण त्यांचं पत्रकारितेचं स्पिरिट जगभराने गौरवलेल्या पत्रकारांच्या तोडीचंचं आहे. केरळमधे सुरू असलेला राजकीय हिंसाचार कॅमेराने टिपणाऱ्या शाजिलांवर हल्ला झाला. पण त्या थांबल्या नाहीत. 

‘माझ्यावर पाठीमागुन कुणीतरी लाथ मारली. डोक्यावर गळ्यावर वार करण्यात आले. माझा कॅमेरा खेचण्यात आला मात्र मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केल. मी हादरले होते. कारण हा माझ्या व्यावसायिक करियरमधला सर्वात वाईट अनुभव होता.’ हा अनुभव आहे केरळमधल्या टीवी पत्रकार शाजिला अली फातिमा यांचा.

हल्ले केले, तरी थांबणार नाही

२ जानेवारीला केरळच्या शबरीमला मंदिरात बिंदू आणि कनकदुर्गा या दोन महिलांनी पहाटे चार वाजता प्रवेश केला. या घटनेचा निषेध म्हणुन राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांनी हिंसक आंदोलन केलं. यात ५५ वर्षांच्या चंदन उन्नीयन यांचा मृत्यू झाला. याच दरम्यान या सर्व घटना कवर करणाऱ्या मीडियावरही हल्ले करण्यात आले. पत्रकार शाजिला यांच्यावर हल्ला करण्यात आला. पण त्या मागे हटल्या नाहीत.

वेदनेमुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. पण त्यांनी आपला कॅमेरा बंद पडू दिला नाही. आक्रमक राजकीय गुंडांची अरेरावी त्या कॅमेरात बंदिस्त करतच राहिल्या. त्यांचा रडत असताना शूटिंग करतानाचा फोटो ३ तारखेच्या मातृभूमी या आघाडीच्या मल्याळम दैनिकात छापून आला. तो प्रचंड वायरल झाला. भाजपनेही त्यांची माफी मागितली. 

त्या सगळ्यावर शाजिला यांची प्रतिक्रिया मातृभूमीमधे छापून आलीय. ती आणि इतर ठिकाणच्या तिच्या प्रतिक्रियेचं सार असं आहे, `भाजपशी आमचं शत्रुत्व नाही. आरएसएसशी आमचं काही शत्रुत्व नाही. पण समोर घडणाऱ्या घटनांचं रिपोर्टिंग करणं आमचं काम आहे. भाजप आणि त्यांच्या लोकांना मी घाबरत नाही. पुढेही त्यांनी आतासारख्या गोष्टी केल्या. तरीही मी त्या कवर करेनच. पुढेही लोकांवर हल्ले झाले, तर मी ते कव्हर करायला जाईनच. आरएसएसचे लोक पोलिसांना मारत असतील तर ते आम्ही जगाला दाखवूच. तेच आमचं काम आहे.`

हल्ला असा झाला

शाजिला अली फातिमा या केरळातल्या कैराली टीव्हीच्या पत्रकार. हा मल्याळममधला आघाडीचा टीवी चॅनल आहे. सात वर्षं डेस्कवर बातम्या एडिट करायचं काम केल्यानंतर २०१३पासून त्या कॅमेरा खांद्यावर घेऊन वेगवेगळ्या बातम्या कवर करत आहेत. विधानसभा निवडणूक, राज्यातला पूर, अनेक राजकीय हिंसाचाराच्या घटनाचं त्यांनी रिपोर्टिंग केलंय. 

तिरुअनंतपुरममधे त्या दिवशीचा सगळा प्रसंग त्यांनी नोंदवून ठेवलाय. तो असा, `२ जानेवारीला शबरीमला देवळात दोन जणींनी प्रवेश केल्यानंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचं काम सांगितलं. मी सचिवालयासमोर कित्येक आठवड्यांपासून उपोषणासाठी बसलेल्या भाजप नेत्यांशी बोलू लागले. ते आटपून मी ऑफिसला जायला निघाले. तेव्हा एक मोठा समूह सचिवालयाच्या दिशेने येताना दिसला. ते डाव्या पक्षांनी लावलेले होर्डिंग आणि बॅनर फाडत होते. त्यांनी याचं शूटिंग करणाऱ्या पत्रकारांवर हल्ला सुरू केला. मी पण हे सारं शूट करत होते. गर्दीने मला जीवे मारण्याची धमकी दिली. मी त्याकडे लक्ष दिलं नाही. पण तेव्हाच मला धक्का बसला. माझ्यावर पाठीमागुन कुणीतरी लाथ मारली. डोक्यावर गळ्यावर वार करण्यात आले. माझा कॅमेरा खेचण्यात आला मात्र मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केल. मी हादरले होते. कारण हा माझ्या व्यावसायिक करियरमधला सर्वात वाईट अनुभव होता. तेव्हा माझा कॅमेरा स्वीच ऑफ झाला. त्यामुळे तेव्हाचा वीडियो शूट करता आला नाही. जवळपास दोन तासांनंतर हे शांत झालं. डॉक्टरकडे जाण्याआधीही मला मी घेतलेले फोटो आणि वीडियो ऑफिसात जमा करायची इच्छा होती. कारण ते माझं कर्तव्य होतं. मी आनंदात होते. कारण अशा स्थितीतही मी माझं काम सोडलं नव्हतं.`

वादळात तळहातावर दिव्याची ज्योत

एक पत्रकार म्हणून, आपल्या देशात एक बाई म्हणूनही शाजिला यांच्या कणखरपणाला दाद द्यावीच लागेल. त्या म्हणतात, `२ जानेवारी २०१९ ची घटना मी कधीच विसरू शकणार नाही.राजकीय नेत्यांनी मीडियाचं संरक्षण करायलाच हवं. महिलांनी पुढे येऊन आपली विरोधी मतं मांडू नयेत, असंच यांना वाटतं का?`

जमावाने हिंसक हल्ला करत मीडियाला लक्ष्य करणं नव नाही. मात्र अशा स्थितीत ठामपणे उभं राहण्याची गरज असते. शाजिला या अशा हिंसक प्रवृतींविरोधात उभ्या राहिल्या. हिंसक जमावाने त्यांना शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. तरीही त्या बधल्या नाहीत. त्यांनी आपला कॅमेराही सोडला नाही.

घोंघावणाऱ्या वादळात तळहातावर दिव्याची ज्योत तेवत ठेवावी तशी आजच्या पत्रकारितेची स्थिती झालीय. अशा सगळ्या काळात शाजिला यांनी हिंसक प्रवृतींना न जुमानता ठामपणे उभ्या राहतात. हे दबलेल्या आवाजांना ऊर्जा देणारं आहे. शाजिला यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेध म्हणून केरळातल्या पत्रकार संघटनांनी भाजप नेत्यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. 

पत्रकारः गार्डियन ऑफ ट्रूथ

शाजिला या स्वत:च्या हिमतीवर आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्यांचं प्रतिनिधित्व करतात, ज्यांनी प्रस्थापित चौकट मोडीत काढली. शाजिला यांच्या मागे कोणतंही राजकीय सामाजिक पाठबळ नाही. त्यामुळे त्यांचं हिंसक जमावाला समर्थपणे तोंड देणं धारिष्टयाचं आहे. शाजिला यांचा खांद्यावर कॅमेरा घेत सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला फोटो हा सत्याच्या बाजूने उभं राहण्याची आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी स्पष्ट करणारा आहे.

हा प्रश्न निव्वळ शाजिला यांच्यावरच्या हल्ल्यावरचा नाही. पण जमावाला हिंसेसाठी उद्युक्त करुन खुलेआम हिंसा घडवली जाते, ही चिंतेची गोष्ट आहे. समाजामधे होणाऱ्या सकारात्मक बदलांना विरोध करण्याची नवी परंपराच तयार होतेय. राजकीय मंडळी याला खतपाणी घालतात. अशा सगळ्याच प्रवृतींविरोधात ठाम भूमिका घेणा-या पत्रकारांचा आवाज दाबला जातो किंवा मग थेट हत्या केली जाते. भारतात पत्रकारांच्या हत्यांचा आणि हल्ल्यांचा आकडा सतत वाढतोच आहे. 

टाईम मॅगझिनने यंदा २०१८च्या पर्सन ऑफ द इयर म्हणून कुणा राजकारण्याची किंवा सेलिब्रेटीची निवड केलेली नाही. या वर्षीचे मानकरी आहेत, पत्रकार. द गार्डियन्स ऑफ द ट्रूथ म्हणून काही पत्रकारांना गौरवण्यात आलंय. त्यात सौदी अरेबियात मारण्यात आलेले पत्रकार जमाल खाशोगी यांचाही समावेश आहे. कोणी कितीही मारो, खून करो, देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक पत्रकार पत्रकारितेचं सत्याला जागण्याचं ब्रीद जपत आहेत. बाहेर परिस्थिती बिकट आहे. पत्रकारितेतही बजबजपुरी आहे. तरीही ते सत्यासाठी लढत आहेत. शाजिला त्यांच्यापैकी एक. पत्रकार दिनानिमित्त तिला अभिवादन करायलाच हवं.