अनुराधा पाटील म्हणजे कवितेपलिकडे जाणाऱ्या कवयित्री

२५ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला २०१९ चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. स्त्रियांचं जगण्याचं, त्यांच्या दुःखाचं प्रतिबिंब अनुराधा पाटील यांच्या कवितेतून दिसतं. त्यांच्या साहित्याचा आणि लेखनकार्याचा घेतलेला हा धावता आढावा.

ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या 'कदाचित अजूनही' या कवितासंग्रहाला २०१९ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय. यानिमित्ताने एका संवेदनशील आणि व्रतस्थ कवयित्रीचा सार्थ गौरव केलाय.

मराठीच नाही तर भारतीय भाषेच्या पलीकडे जाऊन अनुराधा पाटील यांच्या कवितेने वेगळेपण सिद्ध केलंय. समकालीन मराठी कवितेत प्रतिभासंपन्न कवयित्री म्हणून अनुराधा पाटील यांचं नाव आदरानं घेतलं जातं. जवळपास ४० वर्ष आपल्या चिंतनशील लेखणीच्या माध्यमातून महिलांचं दुःख, एकाकीपण, साचलेपणा त्यांची कविता सशक्त शैलीत व्यक्त करते आणि या प्रश्नांवर हळुवारपणे फुंकरही घालते. खरंतर स्त्रियांच्या उसवलेल्या दुःखाला वाट मोकळी करून देण्याचं काम त्यांची कविता करते.

कवितेत आहे मातीची संपन्नता

अनुराधा पाटील यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातल्या पहूर या गावच्या एका शेतकरी कुटुंबातला. ५ एप्रिल १९५३ हा त्यांचा जन्मदिवस. तेव्हाची एसएससीची परीक्षा म्हणजे इंग्रजी सोडून मॅट्रिक त्यांनी आर. टी. लेले हायस्कूलमधून पूर्ण केलं. शिक्षणानंतर १९७१ मधे कौतिकराव ठाले पाटील यांच्याशी त्यांचं लग्न झालं आणि त्या मराठवाड्याच्या सून झाल्या.

ठाले पाटील हे सिल्लोड तालुक्यातल्या अजिंठा लेणीजवळच्या पिंपळगाव घाट या गावचे. म्हणूनच अनुराधा पाटील यांच्या जगण्याला खान्देश आणि मराठवाड्याच्या मातीचा संपन्न, ऐसपैस स्पर्श लाभलाय. खरंतर त्यातूनच पुढे महिलांचं दुःख, प्रश्न, एकाकीपण त्यांच्या कवितेतून उतरत गेलं.

अनुराधा पाटील यांचं साहित्य

अनुराधा पाटील यांचे एकूण पाच कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. १९८१ मधे दिगंत हा त्यांचा पहिला कवितासंग्रह आला. १९८५ मधे 'तरीही', १९९२ मधे 'दिवसेंदिवस', २००५ मधे 'वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ' आणि २०१७ मधे आलेला 'कदाचित अजूनही'.

शब्द पब्लिकेशनने काढलेल्या 'कदाचित अजूनही' या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीने २०१९ सालचा साहित्य अकादमी देऊन त्यांच्यातील व्रत्तस्थ कवयित्रीचा गौरव केलाय. खरंतर हे पाचही कवितासंग्रह त्यांच्यातल्या प्रतिभेची जणू साक्षच देतात.

'नकाशावर न सापडणाऱ्या 
गावांच्या वाटा तुडवत 
चालीन म्हणत होते
जिथं हरवलेली असते
कुणाची शाळा 
कुणाची भाषा 
तर कुठं मुलंच हरवलेली
ज्यांची पाठी
फुटलेलीच असते अटळ
ही हरणारी लढाई
लढताना'

हेही वाचा : सिंधू संस्कृतीत पडला होता ९०० वर्षांचा दुष्काळ

स्वतःची वेगळी वाट

स्त्री जीवनाचे उत्कट अनुभव मांडणारी संवेदनशील आणि स्वतःची वेगळी वाट निर्माण करणारी कवयित्री म्हणून अनुराधा पाटील यांच्या कवितांकडे बघता येईल. वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ या संग्रहात अनुराधाताई म्हणतात,

'पण पुढं अबाधित राहील तिचं
हे टिकली-बांगडीच
चिमूटभर स्वातंत्र्य
की बाप नवरा मुलगा
परंपरेच्या या काटेरी कुंपणातच 
अडकून पडेल तिचा स्वर'

अनुराधा पाटील यांची कविता मराठी साहित्यात अव्वल आणि अग्रेसर अशीच राहिलीय. मराठीतल्या नामवंत समीक्षकांनी आणि लेखकांनी 'अनुराधा पाटील यांची कविता' या डॉ. दादा गोरे संपादित समीक्षा ग्रंथात त्यांची कविता सूक्ष्मपणे उलगडून दाखवलीय. त्यांच्या कवितेचं वेगळेपण सांगितलंय. आपल्या कवितेबद्दलची भावना त्या आपल्या कवितेतून अतिशय नेमक्या शब्दात आणि परखडपणे व्यक्त करतात.

'आता तुझा पैस ओलांडून
मला नुसतं
कवितेत तरी राहू दे
निदान
तळटीप बनून राहता येईल
एवढी तरी भूई
माझ्या वाट्याला येऊ दे'

पुरस्कारांची यादी मोठीच आहे

कवितेबरोबरच ‘नवसाला पावली डॉक्टरीण’ हा प्रौढ साक्षरांसाठी दीर्घ कथासंग्रह, दरअसल हा अनुवादित हिंदी कवितासंग्रह, काही कथा, उडिया कवितांचं भाषांतर, हिंदी कवितांचे भाषांतर, समकालीन कवितेवर समीक्षण लेख आणि इतर ग्रंथाचं संपादन त्यांच्या निःस्पृह आणि अविरत साहित्यसेवेचा जणू एक प्रवाहच. खरंतर या विविधांगी लेखनाद्वारे त्यांच्यातली एक चौफेर वावरणारी संवेदनशील कवयित्री वाचकांसमोर पर्यायाने समाजासमोर उभी राहते आणि वाचकाला अंतर्मुख करते.

अनुराधा पाटील यांच्या कवितांचा याआधीही सन्मान झालाय. उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ३ पुरस्कार, औरंगाबादेतल्या मराठवाडा साहित्य परिषद यांचे २ पुरस्कार, मुंबईमधल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचा विंदा करंदीकर राष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनाचा ललित वाङ्मय लेखन पुरस्कार, शिवार प्रतिष्ठानाचा संत जनाबाई वाङ्मय पुरस्कार, मराठवाडा समन्वय समितीचा मराठवाडा भूषण पुरस्कार, बहिणाबाई फाउंडेशनचा ना. धों. महानोर पुरस्कार, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट आणि जैन फाउंडेशनचा बहिणाबाई सर्वोत्कृष्ट लेखिका जीवनगौरव पुरस्कार ही यादी फार मोठी आहे. अशा अनेक पुरस्कारांतून अनुराधा पाटील यांच्या दीर्घ साहित्यसेवेचा यथोचित गौरव आणि सन्मान झालाय. आता साहित्य अकादमीनेही त्यावर मोहोर उमटवलीय.

हेही वाचा : अंधारात आनंद आहे, असं सांगणाऱ्या अक्किथम यांना यंदाचा ज्ञानपीठ

कवितेपलीकडे जाणारी कवयित्री

अनुराधा पाटील यांच्या कवितेवर २ संशोधकांनी पीएचडी, तिघांनी ३ एमफील केलंय. मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठान या नियतकालिकाने विशेषांक काढलाय.विविध भारतीय आणि परदेशी भाषेतल्या अनेक कवितांचा त्यांनी मराठीत अनुवाद केलाय.

कवितेवरील निस्सीम प्रेम आणि पदोपदी जोडलेली माणसं हीच अनुराधा पाटील यांच्या आयुष्याची खरी शिदोरी आहे. या ध्येयानिष्ठ साहित्यसेवेचा गौरव म्हणून 'कदाचित अजूनही' या कविता संग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय. खरंतर हा एका व्रत्तस्थ कवयित्रीचा आणि त्यांच्या कवितांचा मोठा सन्मानच आहे.

हेही वाचा : 

जे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट

डॉक्टर श्रीराम लागू म्हणजे नित्शेचा सुपरमॅन!

ग दि माडगूळकर: भूमिकेला माणूसपण देणारा कलाकार

युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता