पिवळा पिवळा पाचोळा: निरागस आणि कोवळ्या संवेदनेची कथा

१७ ऑक्टोबर २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


पपायरस प्रकाशनचा अनिल साबळे लिखित ‘पिवळा पिवळा पाचोळा’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झालाय. माणसं कशी जगतात हा न संपणारा शोध आहे. हा कथासंग्रह या शोधाचाच एक भाग आहे खरंतर. या कथांचं निवेदन करणाऱ्या एका किशोरवयीन मुलाचं कुतुहलपूर्ण सर्जक, मुक्त आणि नैसर्गिक जगणं या कथांच्या केंद्रस्थानी आलंय. त्याचाच शोध घेणारी नंदकुमार मोरे यांची ही फेसबुक पोस्ट.

कोणत्याही साहित्यप्रकाराची व्याख्या करताना पडणाऱ्या प्रश्नांना काही निवडक कलाकृती कारणीभूत असतात. नुकताच प्रकाशित झालेल्या अनिल साबळे यांच्या ‘पिवळा पिवळा पाचोळा’ या कथासंग्रहाबद्दल असंच म्हणता येईल. पारंपरिक कथेबद्दलच्या धारणा बदलवणारे नव्या दमाचे काही कथाकार अलीकच्या काही वर्षांमधे पुढे आले. त्यामधे आता अनिल साबळे यांच्याही नावाचा समावेश करता येईल.

‘पिवळा पिवळा पाचोळा’मधल्या कथा खरंच ‘कथा’ या शब्दात सामावणाऱ्या आहेत का? या प्रश्नापासून या कथेबद्दल बोलता येईल. या संग्रहात असलेल्या आठही कथांचं निवेदन एक किशोरवयीन मुलगा करतो. तो एकच आहे असा वाटतो. त्यामुळे या कथा एकमेकांमधे गुंफल्या तर ही एक सलग कथाही होऊ शकली असती असं या कथा वाचताना वाटत राहतं. मराठी साहित्याला अपरिचित असलेल्या एका अनवट भूगोलात हा किशोरवयीन मुलगा मुक्तपणे जगतोय. त्याचं कुतुहलपूर्ण सर्जक, मुक्त आणि नैसर्गिक जगणं या कथांच्या केंद्रस्थानी आहे.

या कथांमधे जसा निवेदक एकाच वयातला आहे, तशा काही व्यक्तीरेखाही आवृत्त होत जातात. कदाचित त्यांची नावं बदलतात. पण त्यांचा मन:पिंढ एकच आहे. त्यातून व्यक्तीरेखांमधे सेंद्रिय एकजीवता साधली जाते. पर्यायाने एका किशोरवयीन मुलाचं समृद्ध भावविश्व साकारणारी ही सलग एकच कथा वाटते.

हेही वाचा: ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

कथाकाराची निकोप जीवनदृष्टी या कथांमधल्या प्रत्येक व्यक्तीरेखेचं अंतरंग उजळून टाकते. कथाकार आजूबाजूचं वास्तव परखडपणे समोर ठेवण्याबरोबर आपल्या परिसराचा आत्मीय शोध घेतो. या कथेचा निवेदक ज्या आदिवासीबहुल प्रदेशाशी सलग्न जगतो, ते जगणं तो कौशल्यपूर्ण आणि नेमकेपणाने चिमटीत पकडतो. निवेदक मुलाला जीवनाची अनिवार ओढ आहे. त्याचं कुतुहल हाच एक जीवनशोध आहे. त्याला पडणारे नानाविध प्रश्न जीवनाचा निरंतर शोध ठरले आहेत.

पहिल्या कथेत ‘मी बोरीखाली बांधलेल्या वासरासारखा मान हलवत राहिलो,’ असं म्हणणारा मुलगा शेवटच्या कथेत नववीत नापास झाला आहे. स्वत:चा भाऊ आपल्या चुकीमुळं याला शोधण्यासाठी उलट्या वाऱ्यात सायकल हाणत खूप लांब गेलाय याचं त्याला मनापासून दु:खं झालं आहे.

भिलहाटीलगत असलेल्या वस्तीत वावरणारा हा मुलगा जीवनावर मनस्वी प्रेम करतो. आपल्या सभोवतालशी एकरूप होऊन जगतो. माणसांवर नितांत प्रेम करतो. त्याची तीव्र कोमल संवेदना त्याला माणसांशी जोडत जाते. या निवेदक मुलाला सरड्यांना मारण्यासारखा एक अघोरी छंदही आहे. या त्याच्या अघोरी छंदासकट त्याचं भावविश्व हा आपल्यासाठी औत्सुक्याचा आणि चिंतनाचाही विषय आहे.

गोल आंब्याच्या झाडाखाली अभ्यासाला बसणारा त्याचा समजूतदार भाऊ, त्याला मनस्वी जगू देणारे त्याचे आई-वडील हे जीवनावर नितांत श्रद्धा असलेलं एक नितळ कुटुंब हा कथाकार या निमित्ताने साकारतो. अर्थात हे मी कल्पना केलेलं एक सलग कथानक आहे.

हेही वाचा: एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

वास्तविक प्रत्येक कथेत निवेदकाच्या आजूबाजूचे कुटुंबिय बदलतात. पण आई, वडील, आजी, आजोबा, भाऊ आणि बहिण या व्यक्तिरेखा येतातच. मित्र येतात. नाना प्रवृत्तीचे शिक्षक येतात. शाळा, वसतिगृह, आदिवासी, धनगर अशा वस्त्या आणि जंगलझाडीतल्या वाटा-वस्त्या येतात. अगदी मुंबईही येते.

त्या अर्थाने ही अनेकविध पातळीवरचं सामान्य माणसाचं जगणं शोधणारी समृद्ध कथा आहे. जंगलझाडीत पारंपरिक जीवन जगणाऱ्या गरीब आदिवासी, धनगर वाड्यांवरच्या लोकांचा रोजगार बदलत्या काळात हिरावत गेला. त्यामुळे पोट मागे लागलेल्या या गरीब आणि हतबल समाजाची परवड ही कथा अधोरेखित करते.

या कथांचा निवेदक असलेला किशोरवयीन मुलगा एका अतुच्च्य पातळीवरची संवेदना व्यक्त करतो. ती व्यक्त करताना प्रतीत होणारी त्याची निरागसता हे या कथांचं बलस्थान बनलंय. त्याची साधी, सुबोध आणि अनलंकृत भाषा हे या कथांचं एक लक्षणीय वैशिष्ट्य आहे. ही संवेदना कोणत्या पद्धतीची आहे, हे पाहण्यासाठी या कथांमधे पुष्कळ उदाहरणं उधृत करण्यासारखी आहेत. कथाकार ‘गळ’कथेत ‘बनाबाई’सारखी व्यक्तीरेखा ज्या पद्धतीने उभी करतो, ते पाहता त्याच्या संवेदनेचा पोत लक्षात येतो.

हा कथाकार निवेदक मुलाच्या तोंडून, ‘माझ्या आजीच्या वयात असलेली बनाबाई मेंढीचा कान धरून तिला कुटलेल्या बेलांचं औषध पाजता पाजता त्या मेंढीसोबतच काहीतरी बोलत होती. रानात कुठेही हिंडताना सापडेलेली खायाची वस्तू ती आजी मला लुगड्याच्या पदरात घालून खायला आणायची. दिवसभर मुलांच्या मेंढ्या वळून ती म्हातारी थकून जायची. दिवसभर रानात मेंढ्या चारूनसुद्धा त्या म्हातारीला कपभर चहा आपल्या मुलाकडून लवकर मिळत नव्हता.’ असं लिहितो तेव्हा वाचकाचे डोळे डबडबतात.

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

माणसं कशी कशी जगतात हा न संपणारा शोध आहे. या कथाही या शोधाचा एक भाग आहेत. अनिल साबळे या कथाकाराला जीवनाचा काहीएक उलघडा झाला आहे. त्याला जीवनाचा, जगण्याचा अर्थही गवसला आहे. त्यामुळेच या कथांमधून हे जीवन उलघडण्याचा एक मार्ग त्यांनी चाचपडला आहे.

कथासंग्रहाची निर्मिती हा स्वतंत्र दखल घ्यावा असा मुद्दा आहे. पुस्तकाचे लाड प्रकाशकांनी करावेत असे दिवस आता मराठीत आले आहेत, याचं सूचिन्ह दाखवणारी ही निर्मिती आहे. मुखपृष्ठ, कथेच्या सुरवातीला येणारी रंगीत कागदावरची रेखीव आणि बोलकी रेखाचित्रं, मांडणी, कागद आणि छपाई या सगळ्या आघाड्यांवर हे पुस्तक संग्रही असावं असं झालंय.

कथासंग्रह - पिवळा पिवळा पाचोळा
लेखक - अनिल साबळे
प्रकाशक - पपायरस प्रकाशन, कल्याण
पानं - १९५
किंमत - ३००/-

हेही वाचा: 

एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा

कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह

मराठी जगात दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असताना संपेल कशी?

(लेखक शिवाजी युनिवर्सिटी, कोल्हापूर इथं मराठी विभागात प्राध्यापक आहेत)