शिवसेना पुन्हा उभारी घेऊ शकते का?

०८ ऑक्टोबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दसरा मेळाव्यातलं भाषण फसलं. उद्धव ठाकरे यांचं भाषण त्यांच्यापेक्षा चांगलं झालं, पण त्यात नवीन काहीच नव्हतं. नव्या पक्षाची मुहूर्तमेढ रचण्याची ही संधी असल्याचं शिंदेंना कळलंच नाही. तिथं शिवसैनिक अजूनही आपल्यासोबत आहेत, याचं समाधान शिवाजी पार्कच्या गर्दीने उद्धव यांना दिलं. पण त्या समाधानात अनेक प्रश्न दडले आहेत.

एकाच दिवशी मुंबईत शिवसेनेचेच दोन दसरे मेळावे होतील, असं गेल्या दसऱ्याला कुणी सांगितलं असतं तर तेव्हा कुणाला खरं वाटण्याचं कारण नव्हतं. पण तसं झालं खरं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कवर, तर शिवसेनेतून फुटून निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सवर दसरा मेळावा झाला. दोन्ही मेळावे गर्दीचे रेकॉर्ड मोडणारे झाले.

गर्दी जमली पण

एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याने गर्दी जमवली. त्यांनी आमिष दाखवून माणसं गोळा केली, असा आरोप त्यांच्यावर झाला. तशा बातम्या सगळ्याच मराठी न्यूज चॅनलवर पुराव्यांनिशी झाल्या. शिंदेंचं भाषण सुरू असताना अर्धं मैदान रिकामं झाल्याचंही वीडियोंसह दाखवण्यात आलं. तरीही शिंदेंच्या चाळीस पन्नास आमदारांनी आणि बारा खासदारांनी आपली ताकद दाखवून दिली, हे कुणालाही नाकारता येणार नाही.

त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर उभं केलेलं आव्हान हे प्रचंड आहे, हे या मेळाव्याने अधोरेखित झालं. शिंदेंच्या सभेचं नियोजन खूपच चांगलं होतं. पण उत्तम नियोजन, भव्य इवेंट ही काही शिवसेनेची वैशिष्ट्यं नाहीत. इवेंटीकरणात शिवसेनेचा स्थायीभाव असणारा उत्स्फूर्तपणा शिंदेंच्या मेळाव्यात गायब होता, विशेषतः भाषणांमधे.

फक्त शिंदेच नाही, तर इतरही वक्त्यांची भाषणं कुणीतरी दुसऱ्याने अजेंडा दिल्यासारखी झाली. शिंदेंनी भाषण वाचून दाखवलं. शिंदे हुकमी वक्ते नसले तरी त्यांचं मोकळं आणि मोजकं भाषण कार्यकर्त्यांना विश्वास देणारं असायचं. विधानसभेत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या पहिल्या भाषणातही ते दिसलं होतं.

हेही वाचा: उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची

सूर सापडला नाहीच

कुणीतरी लिहून दिलेलं भाषण वाचताना शिंदे गडबडले. तसं वाचून भाषण देण्यात काही चूक नाही. पण भाषण लिहिणाऱ्याला शिंदेंचा भाषणाचा स्वभावच कळलेला नाही. पद, पैसा मिळवलेल्या बहुजन नेत्यांमधे असलेल्या भाषेच्या टिपिकल न्यूनगंडामुळे शिंदेही या `सुसंस्कृत` भाषणाच्या सापळ्यात अडकले असावेत.

मागील काही भाषणांत मोकळेपणाने भाषण करताना ते स्वतःला आणि भाजपलाही अडचणीत आणत होते. त्यामुळे त्यांनी आता भाषण वाचूनच दाखवायला सुरवात केलीय. त्यामुळे त्यांनी स्वतःचा सूर गमावला आणि भाषण कंटाळा येईपर्यंत लांबलं. मुंबईबाहेरून आलेले लोक दुपारपासून बसलेले होते. त्यांनी शिंदेंचं भाषण सुरू झाल्यावर आपली बस शोधायला सुरवात केली.

श्रोते सोडाच, मंचावरचे आमदारही प्रतिसाद देत नव्हते. शिक्षणमंत्री दीपक केसरकर तर झोपताना दिसले. इतरही काही मंत्र्यांना झोप अनावर होत होती. त्यावर हसण्याआधी हेही लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या सभेत मुख्य वक्ते म्हणून भाषण करत होते. त्यांच्या लोकांचाही मुंबईत इतकी मोठा सभा घेण्याचा हा पहिलाच अनुभव होता. या अनुभवातून ते पुढे शिकू शकतील.

मोठी संधी गमावली

शिंदे भाषणात काय म्हणाले, ते या सगळ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. एकतर त्यांनी भाषणातला मोठा भाग टीकेला उत्तर देण्यात घालवला. आपण गद्दार, फुटीर किंवा कंत्राटी कसे नाही, याचे नव्याने जुनेच खुलासे देण्याचं काहीच कारण नव्हतं. ते कमी होतं म्हणून उद्धव यांनी शिवाजी पार्कवर केलेल्या नव्या आरोपांमधेही गुरफटण्याची गडबड त्यांनी केली.

त्यांनी आजवर अनेकांना कशी मदत केलीय, हे सांगताना मात्र ते खुलले होते. बाकी त्यांच्या चेहऱ्यावर किंवा देहबोलीत प्रसन्नता दिसलीच नाही. आपल्या नव्या पक्षाची मुहूर्तमेढ रचण्याची न भूतो न भविष्यति अशी संधी शिंदेंकडे या मेळाव्याच्या निमित्ताने चालून आली होती.

अशाच एका दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंच्या मार्गदर्शनात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली होती. तेव्हा या दोघांनीही कडाडत्या शब्दांत आपल्या पुढच्या वाटचालीचा आराखडा शिवसैनिकांसमोर ठेवला होता. शिंदेंकडे पुरेसा वेळ असूनही तशी नवी मांडणी करण्याची संधी शिंदेंनी कायमची गमावली. ते भानच त्यांना नव्हतं, हे शिंदेंचं सगळ्यात मोठं अपयश म्हणावं लागेल.

हेही वाचा: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार म्हणजे ‘तीन पायांचा तमाशा’

नवे शत्रू तयार झालेत?

शिंदेंनी भाषणात हिंदुत्वाची चर्चा केली. गर्व से कहो हम हिंदू हैं, हे वाक्य त्यांच्या मंचावर झळकत होतं. पण ते करताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वकिली केली. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच त्यांचं नेतृत्व असल्याचं अप्रत्यक्ष मान्य केलं. त्यामुळे भाजप असताना त्यांच्या वेगळ्या पक्षाची आता काय गरज, हा प्रश्न निर्माण झाला. शिंदेंचा प्रवास हा आता भाजपमधे विलीन होण्याच्या दिशेने होऊ लागलाय, असं त्यांच्या भाषणाचं ‘बिट्विन द लाइन्स’ सांगणं होतं. 

त्यामुळेच त्यांचे नवे शत्रू निर्माण झाले असावेत, अशी शक्यताही या मेळाव्याने दाखवली. शिंदेंच्या दसरा मेळाव्याचं सर्वच माध्यमांमधे निगेटिव रिपोर्टिंग झालं. या सभेसाठी जाणाऱ्या लोकांना काहीच माहीत नाही. ते फक्त फिरण्यासाठी किंवा पैशांसाठी येत आहेत, अशा बातम्यांची सुरवात नागपूरपासून झाली. पुढे औरंगाबाद, नाशिकपासून मुंबईपर्यंत त्या बातम्या सुरूच राहिल्या.

दोन्हीकडचे मेळावे सुरू असताना लाईव प्रक्षेपणात शिवाजी पार्कच्या मेळाव्याला जास्त जागा मिळाल्याचं स्पष्ट जाणवत होतं. हे सारं आश्चर्यकारक होतं. २०१४पासून पक्क्या झालेल्या न्यूज चॅनलच्या प्राधान्यक्रमाच्या विपरीत हे सगळं कव्हरेज होतं. एकीकडे घरून भाकऱ्या घेऊन येणारे, रिपोर्टरना तिकीटं दाखवणारे शिवाजी पार्कवरचे फाटके शिवसैनिक आणि दुसरीकडे बीकेसीमधे येणाऱ्या श्रोत्यांसाठी शाही जेवणाचे बॉक्स, हा विरोधाभास टीवीवर दिसला.

अशा बातम्या पेरण्याचं कौशल्य आणि यंत्रणा शिवसेनेकडे नाही. मग हे कुणी केलं? शिंदे भाजपमधे गेल्यावर ज्यांना अडचण होऊ शकेल, त्यांनी शिंदेंना आतापासूनच अडचणीत आणायला सुरवात केलीय का? शिंदेंच्या मेळाव्याच्या उलट बातम्या करणारे रिपोर्टर आजवर कुणाची तळी उचलून धरत होते, हे एकदा आठवलं, तरी या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील.

शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही

एकनाथ शिंदेंच्या तुलनेत उद्धव ठाकरेंचं भाषण चांगलं झालं. पण त्यात नवीन काहीच नव्हतं. सुरवातीला त्यांनी श्रोत्यांची पकड घेतली. पण विचारांचं सोनं वगैरे देण्याच्या नादात मधल्या वेळात ती पकड सुटली. नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करून त्यांनी स्वतःचं वेगळेपण दाखवून दिलं.

बिल्किस बानो प्रकरणाचा त्यांनी केलेला उल्लेख त्या दृष्टीने महत्त्वाचा होता. महागाई, घसरणारी अर्थव्यवस्था, लोकशाहीची बिकट अवस्था असे मुद्दे घेत त्यांनी स्वतःला संघाच्या हिंदुत्वापासून लांब नेलं. आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही, हे बाळासाहेबांचं वाक्य आता उद्धव यांच्या भाषणाचं सूत्र बनत चालल्याचं लक्षात येऊ लागलंय.

मात्र उद्धव ठाकरेंनी शिंदेंचा बाप, नातू काढण्याची चूक केलीच. कोरोना काळात तयार झालेल्या त्यांच्या कुटुंबवत्सल प्रतिमेच्या विरोधात जाणारी ही भाषा आहे. मात्र स्वतःच्या आईवडिलांची शपथ घेऊन त्यांनी शिवसैनिकांशी भावनिक पातळीवर जोडून घेतलं.

हेही वाचा: संघर्ष करायचा की शरणागती पत्करायची, हे ठाकरे कुटुंबाला ठरवावं लागेल

गर्दीच्या समाधानात रमले

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, शिवसेना संपली नाही हे या मेळाव्याने दाखवून दिलं. त्यामुळे उद्धव ठाकरे आश्वस्त झालेले दिसले. अजूनही शिवसैनिक आपल्यासोबत आहेत, ही भावना त्यांना समाधान देऊन गेली असावी.

मेळाव्याला दर वर्षीपेक्षा जास्त गर्दी होती. नेहमीपेक्षा जास्त उत्साह होता. ४० आमदार सोडून गेल्यानंतरही आणि त्यात शिवाजी पार्क परिसराचे आमदार, खासदार दोघेही असताना, ही गर्दी आली होती. या गर्दीने आणि उत्साहाने उद्धव आणि शिवसैनिक या दोघांनाही आत्मविश्वास दिला. 

मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आता ते पेटून उठण्याच्या तयारीत दिसले. पण उद्धव ठाकरे या गर्दीला नेमका कार्यक्रम देण्यात मात्र अपयशी ठरले. गर्दी झाल्याच्या समाधानात ते रमलेले दिसले.

पुन्हा पुन्हा बंड का होतात?

आता शिवसेनेचा सगळ्यात मोठा शत्रू हा भाजप आहे, याचं स्वाभाविक भान शिवाजी पार्कावरच्या मेळाव्याला होतं. नारायण राणे पंधरा वर्षांपूर्वी जे बोलत होते, तेच थोड्या फार फरकाने शिंदे बोलत असल्याने त्यांचं आव्हान पेलण्याचा आत्मविश्वास उद्धव यांना असावा. आपण शिवसेना पुन्हा उभी करू, याचाही विश्वास या मेळाव्याने त्यांना दिला असावा.

पण दर पंधरा वर्षांनी शिवसेनेत अशी बंड का होत असावीत, याचं उत्तर मात्र त्यांना सापडलेलं नाही, हे ही या मेळाव्याने दाखवून दिलंय. एका अर्थाने छगन भुजबळ यांच्या बंडानंतर नारायण राणे यांचा उदय झाला होता आणि नारायण राणे यांच्या बंडानंतरच एकनाथ शिंदेंचा पक्षात उदय झाला होता. शिंदेंची आमदार, जिल्हाप्रमुख, विरोधी पक्षनेते, मंत्री अशी प्रगती झाली ती उद्धव यांच्या आशीर्वादानेच. तरीही शिंदे आज त्यांच्याविरोधात ताकदीनिशी उभे आहेत.

शिंदेंच्या बंडातून पुन्हा नव्या नेत्यांचा उदय होईल आणि शिवसेना पुन्हा नव्याने उभारी घेईल, असं या दसऱ्या मेळाव्याने दाखवून दिलंय. पण ते होत असतानाच काही वर्षानंतरच्या नव्या बंडाचं बीजही रोवलं जाणार नाही ना? शिवसेनेच्या एकूण रचनेत आणि कार्यशैलीत या बंडांची कारणं आहेत, हे स्पष्ट आहे. उद्धव यांना ती कारणं अजून तरी सापडलेली नाहीत. ती सापडतील तेव्हा त्यांना खरी विजयादशमी साजरी करता येईल.

हेही वाचा: 

बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

स्वबळावर सत्तेसाठी भाजपने हा फॉर्म्युला वापरल्यास शिवसेनेला बसणार झटका

राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री

राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही