युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

३० मार्च २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


दुसऱ्यांच्या भूमीवर जाऊन लढाया करून अमेरिकेनं जगभरात महासत्ता म्हणून आपला  दबदबा निर्माण केलाय. आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकाच्या अचाट शक्तीची ताकद दरवर्षी येणाऱ्या चक्री वादळात दिसते. पण कोरोना वायरसपुढे मात्र अमेरिका हतबल झालीय. निष्काळजीपणा आणि अति आत्मविश्वासामुळे अमेरिका गंभीर संकटात सापडलीय.

भारतीय वेळेनुसार ३० मार्चला सकाळपर्यंत अमेरिकेत कोरोना वायरस संसर्गाचे १,३०,४९६ रूग्ण सापडलेत. तर २,३१५ जणांचा बळी गेलाय. मृत्यूदर १.८ टक्के एवढा आहे. एकट्या न्यूयॉर्क राज्यातच ५९,३१३ जणांना संसर्ग झालाय. ९६५ जणांचा मृत्यू झालाय. भारतानंही रविवारी १००० चा आकडा पार केलाय. कोविड-१९ च्या १०२४ पॉझिटिव केसेस सापडल्यात. तर २७ जणांचा मृत्यू झालाय. जगभरात ६ लाखाहून अधिक जणांना कोविड-१९ आजार झालाय. तर ३० हजाराहून अधिक लोकांचा जीव गेलाय. 

कोरोनानं सर्वशक्तिमान अमेरिकेला बेजार केलंय. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेले पत्रकार रवीश कुमार यांनी आपल्या फेसबूक पेजवर अमेरिकेची अशी अवस्था का झालीय, याचा सविस्तर वेध घेतलाय. २७ मार्चला लिहिलेल्या त्यांच्या या हिंदीतल्या लेखवजा पोस्टचा अक्षय शारदा शरद यांनी केलेला हा अनुवाद इथे देत आहोत. लेख २७ मार्चला लिहिलेला असल्यामुळे त्यातले आकडेही तेव्हाचेच आहेत.

हेही वाचा : कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

अमेरिकेनं चीन, इटलीला मागं टाकलं

अमेरिकेत एका दिवसातच कोरोना वायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या १० हजारानं वाढलीय. याबाबतीत अमेरिकेनं चीन आणि इटली या देशांना मागं टाकलंय. अमेरिकेत रुग्णांचा आकडा ८५,५०० च्या पल्याड गेलाय. चीनमधे ही संख्या ८१,७८२ हजारावर आहे.

इटलीत ८०,५८९ रुग्ण आहेत. चीनमधे संसर्ग झालेले ७४,००० रुग्ण बरे झालेत. अमेरिकेत ज्या ८६,००० केसेस समोर आल्यात त्यापैकी ८०० च्या आसपास लोक बरे झालेत. तर जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय.

अमेरिकेतही कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढलीय. न्यूयॉर्कमधे बुधवारी २५ मार्चला ही संख्या २८५ होती. तर पुढच्याच दिवशी हा आकडा ३८५ झाला. याचा अर्थ २४ तासात १०० लोकांचा मृत्यू झाला. अमेरिकेत मृतांची संख्या तेराशेच्या आसपास आहे. तर इटलीत ८२०० इतकी आहे.

हेही वाचा : कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

तर स्मशानंही कमी पडतील

७ दिवसांपूर्वी अमेरिकेत कोरोना वायरसचा संसर्ग झालेल्या १८,२०० केसेस होत्या. शुक्रवारी म्हणजेच २७ तारखेला सकाळी हा आकडा ८२,१०० वर गेला. तर आता ही संख्या ८६,००० च्या आसपास जावून पोचलीय. अमेरिकेच्या लुसियाना राज्यात गेल्या ७ दिवसांत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या ३५० ने वाढून ती ३००० झालीय.

७ दिवसांपूर्वी अमेरिकेत मृतांची संख्या २४१ होती. आता हाच आकडा १३०० वर पोचलाय.  ही वाढ भीतीदायक आहे. या रोगाच्या वाढत्या प्रसाराबद्दल सगळे अंदाज खोटे ठरावेत. त्या अंदाजानुसार, न्यूयॉर्कमधे मृतांना पुरण्यासाठी व्यवस्था केली जातेय. मृतदेहांची संख्या इतकी वाढेल की स्मशानं कमी पडतील. यावरून अमेरिकेत कोरोना किती वेगानं पसरतोय हे समजून येईल.

कोरोना वायरसचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. याचं कारण अमेरिकेनं आताशी कुठं चाचणीला सुरवात केलीय. फेब्रुवारी आणि मार्चच्या मध्यापर्यंत भारत आणि अमेरिकेवर कोरोनाच्या चाचण्या कमी केल्याची टीका होतेय. भारत अजून ३५,००० सॅम्पलही तपासू शकला नाही. सगळ्यात मागे पडल्यानंतरही आता अमेरिकेनं ५ लाख ५२ हजारांहून अधिक चाचण्या केल्यात. म्हणूनच अमेरिकेत दिवसाला दहा हजार केसेसची नोंद होतेय.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

कोरोना जगाला एकत्र आणू शकतो: रघुराम राजन

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोतः युवाल नोवा हरारी

लॉकडाऊनची वेळ आली नसती

केवळ चाचणी केल्यावर आपल्याला कळेल की कोणात लक्षणं आहेत आणि कोणात नाहीत. म्हणजेच आपण रुग्णाच्या लेवलवरच रोगाला रोखू शकतो. याकडे दुर्लक्ष करत राहिलं तर संपूर्ण शहरभर कोरोनाचा वावर वाढेल. कमी चाचण्यांमुळे भारतात संख्याही कमी आहे. हे सगळं असतानाही कोरोना भारतभर झपाट्याने पसरत चाललाय.

दोन्ही देशांनी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चचा अर्धा महिन्याचा काळ गमावलाय. गेल्या अडीच महिन्यांमधली ही ढिलाई लोकांवरचं ओझं वाढवणारी आहे. भारतात एकीकडे सरकार पाडलं जात होतं. अहमदाबादमधे एक रॅली काढली जात होती. दंगल घडत होती. हिंदू-मुस्लिम चाललं होतं. आता सर्व भारतीयांना थोडं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात डोकवावं लागेल. या सगळ्या काळात आपण आणि भारत सरकार नेमकं काय करत होतं तेही पहावं लागेल.

भारत आणि अमेरिकेनं परदेशातून आलेल्या लोकांच्या चाचण्या वेळेत केल्या असत्या तर आज दोन्ही देशांमधे लॉकडाऊन करण्याची वेळ आली नसती. यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांचा जीव धोक्यात आलाय. आधीच टेस्टची संख्या वाढवली असती तर आजाराचा पाठलाग करता आला असता. विमानतळावरच तीन लाखांहून अधिक लोकांची चाचणी घ्यायला हवी होती. तेव्हा त्यांना ट्रॅक करणं सोपं होतं. पण मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे प्रकरण गंभीरपणे घेतलं गेलं नाही.

हा अंदाज खरा ठरू नये

एकीकडे संसर्ग झालेल्या संशयितांचा शोध घ्यायला हवा होता. दुसरीकडे कोरोनाशी लढण्यासाठी हॉस्पिटल्स तयार असायला हवी होती. सध्या भारत आणि अमेरिकेतली खासगी आणि सरकारी रुग्णालय आधीच खचाखच भरलीत. म्हणूनच हॉस्पिटल्सवर मोठा भार आलाय.

पेनसाल्वेनिया युनिवर्सिटीच्या एका अभ्यासानुसार, येत्या काही दिवसांत अमेरिकेला दहा लाख वेंटिलेटरची गरज भासू शकेल. एप्रिलनंतर इतके पेशंट येतील की त्यांना हॉस्पिटलमधे जागाही मिळणार नाही. वॉशिंग्टनच्या स्कूल ऑफ मेडिसिन युनिवर्सिटीच्या अभ्यासानुसार अमेरिकेत चार महिन्यांत ८०,००० लोकांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणजेच एप्रिलपासून दररोज २३०० लोक मरतील. हा अंदाज खरा ठरेल का? माझी इच्छा आहे की हे सगळं खोटं ठरो.

हेही वाचा : कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

अर्थव्यवस्था वाचवा किंवा माणूस वाचवा

जगभरात अमेरिका आणि इटलीची आरोग्य व्यवस्था नावाजली जाते. अमेरिकेतल्या आरोग्य क्षेत्राच जवळपास खासगीकरण झालंय. इटलीची आरोग्य यंत्रणा सरकारी आहे. या दोन्ही आरोग्य व्यवस्था सर्वोत्कृष्ट मानल्या जातात. तब्येची योग्य निगा राखल्यामुळेच तिथे वृद्धांची संख्याही जास्त आहे. नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, कोरोनाच्या संसर्गानं इटलीमधे मृत्यू पावणाऱ्या ७० टक्के लोकांचं वय हे ८० वर्षांहून जास्त आहे.

अमेरिकेनंही या सगळ्या तयारीत बराच वेळ घालवलाय. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत भारतासारखंच अमेरिकेतही कोरोनाबद्दल थट्टामस्करी सुरू होती. अशा आपत्तींशी लढण्याची अमेरिकेची व्यवस्था जगातली सर्वोत्तम व्यवस्था मानली जाते. वेळोवेळी येणाऱ्या चक्री वादळांमुळे जीवित आणि वित्त हानी कमी करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील असते. आत्ता मात्र निष्काळजीपणा आणि अति आत्मविश्वासामुळे अमेरिका गंभीर संकटात सापडलीय. आत्ता त्यांच्याकडे फक्त दोन मार्ग आहेत. एकतर अर्थव्यवस्था वाचवा किंवा माणूस वाचवा.

न्यूयॉर्कमधे कोरोना वायरसच्या संसर्गानं २४ तासात १०० लोकांचा मृत्यू झालाय. बुधवारी सकाळी मृतांची संख्या २८५ होती. गुरुवारी ३८५ झाली. ३७,२५८ लोकांना संसर्ग झालाय. ५३०० लोकांना हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आलंय. यापैकी तेराशे लोक वेंटिलेटरवर आहेत. येत्या काही दिवसांत वेंटिलेटरची समस्या गंभीर होणार आहे. कारण कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णाला जास्त काळ वेंटिलेटरवर ठेवावं लागतं. या सगळ्या काळात इतर रुग्णांची स्थिती काय असेल याचा विचार करा. तो उपचार न घेताच मरेल.

हेही वाचा :  कोरोनाला हरवण्यासाठी जग वेगवेगळे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?

भारतातही स्थिती वेगळी नाही

भारतातही लाखो वेंटिलेटरची गरज आहे. मी माझ्या फेसबुक पेजवर पहिल्यांदा याबद्दल लिहिलं तेव्हा आयटी सेलवाल्यांनी मला शिव्या दिल्या. अशा लोकांमुळेच आपलं सरकार अडीच महिने गैरसमजात राहिलंय. आज आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी ४०,००० वेंटिलेटरच्या ऑर्डर दिल्याचं सांगितलंय. गेल्या आठवड्यात, त्यांनी सांगितलं की १२०० ऑर्डर देण्यात आल्यात. २४ मार्चला भारत सरकारनं वेंटिलेटरच्या निर्यातीवर बंदी घातली. या निर्णयावरून हा रोग किती धोकादायक असू शकतो हे भारत सरकारला आता कळेल.

उशीर आणि दुर्लक्ष झाल्यामुळे आज अमेरिका दोन आघाड्यांवर लढतेय. अमेरिकन नागरिकांचा जीव वाचवा किंवा त्यांच्यासाठी अर्थव्यवस्था वाचवा. त्यांच्यासाठी सरकारनं जाहीर केलेलं दोन ट्रिलियन डॉलरचं पॅकेजही पुरेसं नाही. अमेरिकेतली राज्यं भांडत आहेत की त्यांना कमी पैसे मिळालेत. तिथल्या एका सरकारी संस्थेच्या मते, या संकटाच्या काळात ३३ लाख लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्यात. एका आठवड्यात ३३ लाख लोकांनी सरकारी मदतीसाठी अर्ज केला, तेव्हा कुठं ही गोष्ट उघड झालीय.

भारतातही केंद्र सरकारनं १ लाख ७० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. या पॅकेजमधे समावेश असलेल्या वेगवेगळ्यां कॅटेगिरींची संख्या ३ कोटी ते ३० कोटीपर्यंत आहे. असं दिसतं की, भारताच्या ६० टक्के लोकसंख्येवर या सगळ्यांचा प्रभाव पडेल. आपण एका विचित्र वळणावर आलोय. ना वर्तमान सुरक्षित वाटतोय ना भविष्य. भूतकाळाला तर काही अर्थ नाही.

हेही वाचा : 

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

तैवान कोरोना डायरी ३ : भीतीच्या सावटातही शिस्त विस्कटली नाही

बुद्धप्रिय कबीरः 'जिंदाबाद मुर्दाबाद'चं तत्वज्ञान जगलेला अस्वस्थ कबीर

लॉकडाऊनः कोकणात हापूस घरातच पडून, युरोपात फळं खायला मिळेनात

जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर