व्यापार क्षेत्रातली बडी कंपनी असलेल्या अमेरिकेच्या अमेझॉननं आपल्या भेटीसाठी एक रोबोट आणलाय. ऍस्ट्रो असं त्याचं नाव आहे. हा रोबोट आपल्या घरी थेट सुरक्षा रक्षक बनून काम करेल. आयटी क्षेत्रातल्या व्यापक बदलांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळतेय. त्यातूनच अशाप्रकारचे रोबोट बनवायच्या कल्पना पुढे येतायत.
हल्ली जग कुठच्या कुठे धावत, पळत सुटलंय. फाइव जी तंत्रज्ञानानं तर यात अधिकची भर पडलीय. भारतात ते अद्याप आलेलं नाहीय. जगभरातल्या आयटी क्षेत्रातल्या व्यापक बदलांमुळे हे सगळं शक्य झालंय. त्याचाच भाग म्हणून हल्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रांमधे मोठ्या प्रमाणात केला जातोय.
चीन कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत नवं तंत्रज्ञान बनवण्यामधे आघाडीवर आहे. कोरोना काळात तर जगभरातल्या वेगवेगळ्या देशांनी याचा वापर करून भन्नाट रोबोट बनवले. चीननं तर अल्फा डॉग नावाचा एक रोबोट असलेला कुत्राही बनवला. इतकंच नाही तर कोरोनाच्या काळात अगदी टेस्ट करण्यापासून ते पोस्टाची पार्सल पोचवण्याची कामंही चीनचे रोबोट करतायत.
चीन, अमेरिका या महत्वाकांक्षी देशांमधे यावरून चढाओढ लागलीय. या देशांमधल्या बड्या कंपन्याही आता 'हम भीं कुछ कम नहीं' असं म्हणतायत. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेच्या अमेझॉननं आपल्या भेटीसाठी एक रोबोट आणलाय. अमेझॉनचा हा रोबोट आपल्या घरी सुरक्षा रक्षकाची भूमिका निभावेल.
अमेझॉननं बनवलेल्या रोबोटचं नाव 'ऍस्ट्रो' असं ठेवण्यात आलंय. हा रोबोट बाहेर बसून केवळ सलाम ठोकत बसणारा नाहीय. समजा एखाद्यावेळी अर्जंट कामानिमित्त तुम्ही बाहेर गेलात तर घरची सगळी देखभालही तो करू शकतो. तसंच 'ऍस्ट्रो' लोकांना ऐकू, बघूही शकतो असं अमेझॉननं आपल्या साईटवर या रोबोटची माहिती देताना म्हटलंय.
एखादी अनोळखी व्यक्ती घरात शिरली तर? ऍस्ट्रो या व्यक्तीची माहिती थेट तुमच्यापर्यंत पोचवेल. तीही अगदी रीतसर मॅसेज करून. हा रोबोट बनवण्यासाठी कॅमेरा, सेन्सर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आलाय. त्यामुळेच तो काही वेळातच आपल्याला अलर्ट करू शकेल.
या रोबोटची किंमत १ हजार डॉलर इतकी ठेवण्यात आलीय. हा रोबोट घरातली कामंही करू शकेल. म्हणजे काही वस्तू इकडून तिकडे द्यायच्या असतील तर हा रोबोट लगेच मदतीला धावून येईल. असं बरंच काही हा 'ऍस्ट्रो' करू शकेल.
हेही वाचा: आहे रे, नाही रे, हीच डिजिटल युगाचीही भाषा
ऍस्ट्रोची उंची १७ इंच इतकी आहे. त्याला आवाज देऊन बोलवता येत असल्याचं अमेझॉनचे कार्यकारी संचालक डेविड लिंप यांनी हा रोबोट लाँच करताना म्हटलंय. त्यांनी प्रत्यक्षात तशी कृतीही करून दाखवली. अमेझॉनचा हा वीडियो सगळीकडे वायरलही होतोय.
घर म्हटलं की कितीतरी दगदग असते. लहान मुलं असतील तर प्रत्येक ठिकाणी पसारा असतो. सगळं अस्ताव्यस्त टाकलं जातं. लहान मुलांना कितीही सांगितलं तरी दुर्लक्ष करतात. आपल्या खेळात दंग राहतात. अशावेळी घर साफ करण्यात ऍस्ट्रोची मदत होऊ शकेल.
हा रोबोट खूप स्मार्ट असल्याचं अमेझॉनचं म्हणणं आहे. माणसांसारखे त्याला दोन मोठे डोळेही आहेत. घराच्या बाहेर काढल्यावर त्याच्यावर रिमोटनं कन्ट्रोल करता येईल. घरातल्या पाळीव प्राण्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर आपल्याला टाकता येईल.
हा रोबोट सगळीकडे फिरवता येईल. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी न्यायचं आणि याने डिस्टर्ब केलं तर? असा प्रश्न पडला तर काळजीचं कारण नाही. कारण सार्वजनिक ठिकाणी रोबोटला घेऊन जाताना त्याचे कान आणि कॅमेरा बंद करता येईल अशी एक व्यवस्था त्यात तयार करण्यात आलीय. तसंच त्याला 'डू नॉट डिस्टर्ब' मोडवरही ठेवता येईल.
पुढच्या वर्षी अमेझॉनचं अजून एक गॅझेट लोकांच्या भेटीला येतं असल्याचं कंपनीने म्हटलंय. आपला टीवी हॉलमधे असेल आणि एखादा सिनेमा किंवा सिरीयल लागली आणि आपण किचनमधे असू तर आपली अडचण होते की नाही? अमेझॉनची फोटो फ्रेम ही आपली अडचण दूर करेल.
ही फोटो फ्रेम थेट आलेल्या किचनमधे लावली जाईल. त्यामुळे सारखं सारखं बाहेर हॉलमधे डोकावून पहायचा आपला त्रास वाचू शकेल. घरासोबत हॉटेलमधे क्रिकेट किंवा इतर काही सिनेमा वगैरे पाहताना विरंगुळा म्हणून ही फोटो फ्रेम आपल्यासाठी एकप्रकारे वरदान ठरेल.
हेही वाचा: तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ
भारतातल्या केरळच्या 'असिमोव रोबोटीक' या स्टार्टअप कंपनीने दोन रोबोट तयार केले होते. हे रोबोट सॅनिटायजर आणि मास्क वाटायचं काम करत होते. इंडोनेशियात बनलेल्या डेल्टा रोबोटची अशीच चर्चा झाली. कचऱ्यापासून बनवलेला हा रोबोट थेट कोरोना पेशंटना मदतीसाठी धावून जातोय. त्यांना जेवणाचे डबे देण्यापासून इतर अनेक कामं करू शकतोय.
ट्युनिशिया या देशात लॉकडाऊन काळात लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून थेट कॅमेरा लावलेले रोबोट रस्त्यावर उतरवण्यात आले. डॅनियल केलमन या जर्मन ऑस्ट्रियन लेखकाने तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कथा लिहिण्यासाठी थेट एका रोबोटची मदत घेतल्याचं डीडब्ल्यूवर वाचायला मिळतं. तर स्पेनच्या बीआर ५ या कंपनीनं थेट जेवण तयार करणारा रोबोट बनवलाय.
मंगळावरच्या मानवी वस्तीचं स्वप्न बघणाऱ्या टेस्ला कंपनीचे सीईओ ऍलन मस्क यांनी ऑगस्ट महिन्यात एका रोबोटची घोषणा केली होती. 'टेस्ला बॉट' असं त्याचं नाव आहे. गाड्यांची बारीक सारीक कामं करण्यापासून ते अगदी रेशन आणायचं कामही हा रोबोट करू शकेल असं मस्क यांनी म्हटलं होतं.
कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले रोबोट युद्ध काळात शत्रूशी लढण्यासाठी मैदानात उतरवण्याचा विचार केला जातोय. पारंपरिक युद्ध नीतीला एक पर्याय म्हणून अशाप्रकारची चर्चा होत राहते. पण अशा रोबोटना लोकांच्या जगण्या मरण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार का द्यावा असं म्हणत याला विरोधही केला जातोय.
युद्धासारखी गोष्ट रोबोटसारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्राच्या हवाली करणं हिताचं नाहीय. हा अधिकार माणसांकडेच असायला हवा असं म्हणत 'स्टॉप किलर रोबोट' सारख्या अनेक संस्था अशा रोबोटवर बंदी घालायची मागणी करतायत. तसंच त्यासाठी नियमावलीही बनायला हवी असंही या संस्थांचं म्हणणं आहे.
ऑस्ट्रिया या देशाच्या सरकारने तर थेट याविषयी एक आंतराष्ट्रीय कायदा बनवण्याची मागणी केलीय. त्यासाठी जगभरातल्या देशांना एकटवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ऑस्ट्रियाचे परराष्ट्र मंत्री अलेक्झांडर स्केलेनबर्ग यांनी गेल्यावर्षी जर्मन पेपर असलेल्या वेल्ट आम जोंटॉंगला म्हटलंय.
हेही वाचा:
लोकांनी सध्या गाड्या विकत घेणं का थांबवलंय?
ई-सिगारेटवर बंदी व्यसन रोखण्यासाठी की तंबाखू लॉबीमुळे?
मानसिक ताणतणावांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही