सिद्रमप्पा आलुरे गुरुजी : नवी भावसृष्टी उभारणारा शिक्षक आमदार

०५ ऑगस्ट २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार सिद्रमप्पा आलुरे यांचं २ ऑगस्टला निधन झालं. ओल्याचिंब तरारलेल्या झाडाबद्दल जे मनाला वाटतं तेच आलुरे गुरुजींबद्दल वाटतं. माळावर लावलेल्या झाडांची जोपासना कशी करावी ते आलुरेंसारख्या माणसांनी शिकवलं. तेही मर्यादित साधन सामुग्री असताना. त्यांनी कधीही सनातनी, कर्मठपणाला जवळ फिरकू दिलं नाही. गांधीजींच्या ‘नई तालीम’ या शिक्षणाच्या विचारातून ते सतत काम करत राहिले.

सिद्रमप्पा आलुरे हे तुळजापूरचे माजी आमदार. प्रदीर्घ आजारानंतर २ ऑगस्टला पहाटे त्यांचं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. सिद्रामप्पा आलुरे हे १९८० मधे काँग्रेस पक्षाकडून आमदार झाले. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे  तेव्हाचे आमदार माणिकराव खपले यांचा पराभव केला होता.

पण ते होते मुळातले शिक्षक. शिक्षणमहर्षी अशी त्यांची ख्याती होती बीडच्या पाटोदा तालुक्यातून त्यांनी शिक्षक म्हणून काम सुरु केलं. त्यानंतर ते अणदूरच्या जवाहर विद्यालयात रुजू झाले. तिथूनच मुख्याध्यापक म्हणून १९९० ला निवृत्त झाले. शिक्षण प्रसारक मंडळामार्फत त्यांनी वेगवेगळ्या गावात २८ शाळा सुरु केल्या. महावीर जोंधळे यांनी लिहिलेल्या या लेखातून आलुरे गुरुजींचं वेगळेपण लक्षात येतं.

लहानपणी दुडूदुडू धावणाऱ्या बाळाच्या पायाला जी माती लागते तिचे गुण मेंदूपर्यंत जातात. त्याची मेंदूत केलेली साठवण मातीच्या उत्कर्षासाठी कामी येते. त्याला आपण त्या मातीचे संस्कार म्हणतो. अशाच मराठवाड्यातल्या मातीचे संस्कार घेऊन आजन्म समाज सेवेत आयुष्य वेचणारे, महात्मा गांधीजींच्या 'नयी तालीम' या शिक्षण विचारातून काम करणारे आलुरे गुरुजी.

हेही वाचा: प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत

कासव गतीचं मोल

कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, जगदाळे मामा, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या परंपरेतले रुद्राप्पा आलुरे हे एक. त्यांची सत्तर एक वर्षाची शैक्षणिक परंपरा ऊस्मानाबाद जिल्ह्यातल्या जनतेने पाहिलेली. विचाराला माणिक मोती करण्यासाठी त्यांनी केलेल्या काबाड कष्टाला घामाचा एक श्रमजीवी वास होता. म्हणूनच ते चार चौघांपेक्षा वेगळे वाटतात.

वंचित, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी झटायला त्यांनी कधीच मागेपुढे पाहिलं नाही. त्यांना ते अवघड वाटलं नाही. माणसाला फक्त दोन हात असतात हे आलुरे गुरुजी यांनी अनेकदा खोटं ठरवलं. शरीरावर दिसणारे दोन हात असले तरी स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी यांनी ऊभे केलेले कोट्यवधी हात आलुरे गुरुजींची प्रेरणा होती. ती चळवळीतून आलेली होती.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विषारी चुळा टाकणारे सर्प अचानक वारुळातून बाहेर पडले. तरीही अरुले मूळ हेतूपासून हलले नाहीत. असं क्वचितच होतं. तसं पाहिलं तर साहसाचा वारसा नसलेल्या घरातून पुढे आलेल्या आलुरे गुरुजींनी उभ्या केलेल्या २४ शिक्षण संस्थांमधून हजारो विद्यार्थ्यांना हत्तीचं बळ दिलं. त्याच बरोबर कासव गतीचं मोल सांगितलं.

ट्रस्टीशिप रुजते तेव्हा

शिक्षण संस्थांचं जाळं जादूची कांडी फिरवून होत नसतं. त्यासाठी विचारांची भक्कम पायाभरणी करावी लागते. ती करत असताना लोकांच्या मदतीशिवाय भागत नसतं. यावर त्यांची निष्ठा असल्याने पहिलं काम कोणतं केलं असेल तर सग्यासोयऱ्यांना दूर ठेवण्याचं. कारण ते धंदेवाईक शिक्षण महर्षी नव्हते. हे करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे कुठून, कसं आलं? हा प्रश्न विद्वानांना पडू शकतो. पण त्याचं उत्तर कळलं तरी त्यांना ते वळत नाही.

ते उत्तर असं आहे की, ज्यांच्या मनात ट्रस्टीशिप रुजलीय त्यांनाच वेगळ्या जीवन शैलीचा अनुभव घेता येतो. खेड्यापाड्यातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी वसतिगृह चालवताना त्यांचं मन कधी साने गुरुजींचं व्हायचं ते कळायचं नाही.

हेही वाचा: माणसात असलेला काला बंदर कसा काढता येईल?

वाचन संस्कृतीचं पालन पोषण

प्राध्यापक सुधाकर अहंकारी, डॉक्टर शशिकांत अहंकारी या परिवारामुळे त्यांच्या 'जवाहर' विद्यालयाच्या परिसरात शिस्तबद्ध काम पाहता आलं. पुढे अनेकदा होत राहिलं. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारणीवर आल्यानंतर अनेकदा भेटी होत राहिल्या. तेव्हा ते आमदार होते.

एरवी लोकप्रतिनिधींना जी आदरतिथ्याची सवय असते ती आलुरे गुरुजींनी अंगवळणी पडू दिली नाही. मराठवाडा साहित्य परिषदेला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांनी केलं. त्यावेळी शिवाजी पाटील निलंगेकर मुख्यमंत्री होते. आजचा काळ फार वेगळा आहे.

हल्ली श्रीमंत लोकप्रतिनिधीचं सत्तेतलं महत्व बघून साहित्य संस्थेच्या कार्यकारिणीत घेतलं जातं. आलुरे गुरुजी मात्र वाचन संस्कृतीचं पालनपोषण करणारे होते. साहित्यिक गुणवत्ता जोखणारे होते. पदोपदी आधुनिकता स्वीकारणारे असूनही जुनं ते सोनं अशाचा आग्रह न धरता शिक्षण संस्थेच्या कारभारात नवरक्ताला सतत अग्रभागी ठेवणारे व्यक्तीत्व होतं असं अभिमानानं सांगावंसं वाटतं.

आसक्ती आणि विरक्तीतला फरक

शुभ्र कपड्यांसारखं चारित्र्यही स्वच्छ ठेवायचं असतं हा विचार कृतीतून दाखवला. विधानसभेतली त्यांची चिंतनशील कारकीर्द अल्पकाळच होती. खरंतर त्यांची निवडणूक ही एक आदर्शवत ठरावी अशीच होती. कारण ती त्यांच्या विद्यार्थ्यांनी खांद्यावर त्यांच्या विचारांचा झेंडा घेऊनच लढवली होती. त्यांच्या शिक्षण संस्थांमधून शिकून कर्तेसवरते झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक त्यांचे कार्यकर्ते बनले.

प्रचारासाठी, गाव विकत घेण्यासाठी पैसा नसलेल्या या माणसाकडून मतदार कोणतीच अपेक्षा ठेवत नसत. त्यांचा साधेपणा, निर्मोहीवृत्ती, काम आणि कधीही, कोणत्याही वेळी अवेळी गरजूंना भेटण्याची तयारी एवढ्या एका सूत्रावर ते निवडून आले. पण राजकारणात रमले नाहीत. त्याचं कारण त्यांना मान्य नसलेली तडजोड.

आधुनिक मतदारांना जे महत्त्व जाणवावं लागतं ते त्यांच्याकडे कधीच नव्हतं. त्यांच्या स्वभावाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं होतं की, त्यांना अआसक्ती आणि विरक्ती यातला स्पष्ट फरक दिसत होता. ते जनसामान्यांची प्रतिमा ओळखून होते. म्हणून त्यांना ज्ञात-अज्ञात प्रेरक शक्तीची स्पष्ट कल्पना होती. कृती उक्तीत विरोधाभास न जाणवणारा शिक्षण क्षेत्रातला एक सत्वशील कार्यकर्ता म्हणून दर्शन झालं ते असं. ते म्हणजे आदर्श आणि उदात्तच.

नव्या भावसृष्टीची उभारणी

निसर्ग सृष्टीतल्या रम्य आणि आगम्य सहनशीलता त्यांच्याकडे संस्कारातूनच आलेली होती. तो गांधीजींची मूल्यं आणि कार्यनिष्ठा विसरत जाण्यानं आपलं आणि देशाचं काय होतं ते आपण आज बघतच आहोत.

ओल्याचिंब तरारलेल्या झाडाबद्दल जे मनाला वाटतं तेच आलुरे गुरुजींबद्दल वाटतं. कारण माळावर लावलेल्या झाडांची जोपासना कशी करावी ते अशा माणसांनीच शिकवलं तेही मर्यादित साधन सामुग्री असताना. जे कल्पनेत होतं ते अस्तित्वात आणण्यासाठी जी प्रेमभावना, आपुलकी लागते ती त्यांच्यात होती. त्यांनी कधीही सनातनी, कर्मठपणाला जवळ फिरकू दिलं नाही म्हणून ते नवी भावसृष्टी उभी करू शकले.

अवाढव्य, असंख्य, अगणित या शब्दात त्यांचं शैक्षणिक क्षेत्र मोडत नसले तरी जे काही केलं ते परिवर्तनासाठी खूप काही देऊन गेलं. गांधीवादाचा मूलतत्वाधार तोच आहे. नैतिक, शैक्षणिक आणि आर्थिक संस्कृतीचा पाया म्हणून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. तेव्हा अशी माणसं काय तोलाची होती हे समजून येईल.

हेही वाचा: 

उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची

महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे

तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?