‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता

०५ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


अजय कांडर यांचा ‘युगानयूगे तूच’ हा कवितासंग्रह लोकवाङ्मय गृहकडून प्रकाशित झालाय. वाचकांचा या कवितासंग्रहाला उदंड प्रतिसाद मिळतोय. ‘युगानयुगे तूच’ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं समकाळाच्या संदर्भात पुनर्जागरण करणारी दीर्घकविता आहे. दीर्घकवितेच्या एकूण परंपरेतली ही महत्वाची कविता म्हणायला हवी.

अजय कांडर हे मराठी वाचकांसाठी ओळखीचं नाव आहे. नव्वदीनंतर मराठीत आलेल्या कवितांमधे अजय कांडर यांची कविता महत्त्वाची मानली आहे. यापुर्वी त्यांचे दोन कवितासंग्रह, ‘आवनओल’ आणि ‘हत्ती इलो’ प्रकाशित झालेत. ‘आवानओल’ या कवितासंग्रहात कोकणातल्या शेतीमातीशी तिथल्या माणसांच्या रोजच्या सुख दुखाशी घट्ट जोडलेली कविता आली आहे. यानंतरचा त्यांचा दुसरा कवितासंग्रह असलेला ‘हत्ती इलो’ ही दीर्घकविता आहे.

कोकणातल्या समाजवादी राजकारणाचा पाया ढासळत असताना व्यक्तिकेंद्रीत राजकीय नेतृत्वाचा शिरकाव होणं, तिथलं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवन गढूळ होत जाणं याता तळशोध ‘हत्ती इलो’ घेते. ही राजकीय फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर असलेली कविता वाटत असली तरी ती साधारण नव्वदी नंतर चहूदिशेला सुरु झालेल्या राजकीय संस्कृतीच्या अधोगतीचा हा अस्सल सातबारा आहे. 

अजय कांडर यांचा तिसरा कवितासंग्रह युगानयुगे तूच नुकताच लोकवाङ्मय गृहकडून प्रकाशित झालाय. `युगानयुगे तूच` ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं समकाळाच्या संदर्भात पुनर्जागरण करणारी दीर्घकविता आहे.

काळाला साद घालणारी दीर्घकविता

आपला देश आज एका मोठ्या संक्रमणाच्या अवस्थेतून जातोय. समाजामधे, व्यक्तींमधे आणि समूहांमधे अंतर्गत संघर्ष कायमच राहीले आहेत. आपल्या लोकशाहीत या संघर्षाला विशिष्ट पातळीपर्यंत मर्यादित ठेवणारं सामंजस्यही राहिलं आहे. यात मतभेद आणि संघर्ष असले तरी विरोधी समूहाचे मानवी हीत, नैतिक अधिकार आणि समान दर्जा मान्य केलेला असतो. परंतू हे सामंजस्य लयाला जाऊन आपल्या राजकीय संस्कृतीच्या समायोजनाची क्षमता हळूहळू नष्ट होत जातेय. या सर्व गोष्टी एका रेषेत आणण्याचे प्रयत्न यशस्वी होताहेत.

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, एकोपा विस्कटून टाकणाऱ्या शक्ती जोरकस होत आहेत. संख्येनं अधिक असणाऱ्या धार्मिक, जातीय, भाषिक, प्रादेशिक समुहांना गोंजारत मतपेटी बळकट केली जातेय. अल्पसंख्य समूहाच्या हिताचं, लोकशाहीनं दिलेल्या मानवी हक्कांचं दमन करुन त्यांची मुस्कटदाबी होताना आपण पाहत आहोत. लोकशाही व्यवस्थेवरचं हे संकट आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक भारतीयाचं सार्वभौम नागरिकत्व शाबूत ठेवण्यासाठी प्रतिबद्ध असणारं भारताचं संविधान एकमेव साधन भारतीय नागरिकांच्या हातात उरतं.

आणीबाणीनंतर पहिल्यांदाच भारतातला सर्वसामान्य नागरिक भारताच्या संविधानाविषयी तळमळीने बोलताना दिसतायत. आज मोठा जनसमुदाय लोककल्याणकारी राज्यांच्या संकल्पनेसाठी संविधानाच्या आधाराने झटत आहेत. पर्यायाने आपल्या राष्ट्रीय जनमानसाचे नेतृत्व भारताला संविधान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आलं आहे. अशा या पार्श्वभूमीवर अजय कांडर यांची ‘युगानयुगे तूच’ ही दीर्घकविता प्रकाशित होणं, ही महत्वाची सांस्कृतिक घटना आहे.

हेही वाचा: रात्रीस खेळ चालेः शेवंता हॉट म्हणून बदलला प्लॉट?

आंबेडकरी विचारांपर्यंत पोचण्याची ओढ

अजय कांडर यांच्या ‘युगानयुगे तूच’ या दीर्घकवितेची सुरवात आत्मटिकेनं होते. पण रुढार्थानं आपण त्य़ाला आत्मटीका म्हणू शकत नाही. खरंतर ती पारदर्शकपणे केलेली आत्मसमीक्षा आहे. ही आत्मसमीक्षा वरवर त्यांची स्वत:ची वाटते. ती एकट्यापुरती नाही. कवी स्वत:ला तपासण्याच्या स्वरात एकटा नसून सर्व समूहमनाचा आवाज त्यात मिसळलेला आहे.

कवीचा उद्देश कबुलीजबाब देऊन हतबलता प्रकट करणं, स्वत:चा वैचारिक पराभव जाहीर करुन नैराश्य उघड करणं असा नसून स्वत:च्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अनुनय करणाऱ्या लोकसमूहाची मूळ वैचारिक गाभ्यापासून भटकत जाण्याची मीमांसा करणं हा आहे. यामुळे या संपूर्ण आत्मनिष्ठेमधे वस्तुनिष्ठ कबुली असली तरी स्वत:ला जबाबदारीपासून बाजूला करणारं नैराश्य नाही, तर स्वत:ला दुरुस्त करत मूळ आंबेडकरी विचारांपर्यंत पोचण्याची प्रामाणिक ओढ असते.

आजच्या सांस्कृतिक राजकारणाकडे बोट

मागच्या पाचपन्नास वर्षात आपण आपल्या महापुरुषांच्या बाबतीत सर्वाधिक उत्साहाने केलेली गोष्ट म्हणजे त्यांचं विभूतीकरण. माणसांच्या कल्याणासाठी राबणाऱ्या महापुरुषांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे देवत्व बहाल केलं. वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना देवाऱ्यात बसवलं. त्यांच्या विचारांपासून ते प्रत्यक्षात जीवनात अवलंबण्यापासून स्वत:ला सोडवून घेण्याची आपली आत्मघातकी परंपरा जुनी आहे. या विभूतीकरणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या तर्कशुद्ध आणि कर्त्या विचारवंतालाही आपण सोडलं नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर विभूतीपूजनाला, देवत्वाला विरोध केला असला तरी आपण त्यांच्या भक्तीचे गोडवे गात आहोत. त्यांच्या मूळ शिकवणुकीपासून दूर जात असल्याची जाणीव कवी आपल्याला करुन देतो. ही जाणीव फक्त विधानाच्या पातळीवर न राहता कवी इथं विश्लेषणाच्या पातळीवर जातो. यामुळेच आपण स्वत:ला आंबेडकरांच्या विचारात अडकण्याऐवजी त्यांच्या प्रतिमेतच अडकत चाललो आहोत. असं का होतंय याच उत्तर शोधताना कवी कोणी मला अडकवतंय का? असा प्रश्न विचारुन एका मोठ्या सांस्कृतिक राजकारणाकडे निर्देश करतो.

समाजातील वंचित समुदाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वारश्यापासून जितका दूर जाईल आणि त्यांच्या विभूतीकरणात गुंतून पडेल तितका उच्चवर्ण, उच्चवर्ग सुरक्षित राहणारआहे. मग या विभूतीकरणाला खतपाणी घालण्याचा राजकीय खेळ सत्ताधारी वर्गाकडून खेळला जातोय. या राजकारणाची शिकार सर्वसामान्य शोषित होतोय असा सवाल इथं कवी करतो. तसंच यासाठी पलिकडे जाऊन कवी, आपणच डॉ. आंबेडकरांना कामापुरता वापरुन घेऊन स्वत:चे स्वार्थ साधतोय की काय असं परखड आत्मविश्लेषण करतो.

हेही वाचा: एकाचवेळी आत्ममग्न आणि वैश्विक असते इंदिरा संत यांची कविता

बाबासाहेबांच्या दुर्लक्षित पैलूंवर भाष्य

‘युगानयुगे तूच’ या दीर्घकवितेचे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य हे आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सार्वत्रिकता ही कविता अधिक ठळकपणे प्रकट करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ दलित समाजाचे मुक्तिदाते नसून संपूर्ण मानवजातीचे, शोषितांचे मुक्तिदाते असल्याचा उद्घोष करते. ते कोणा एका माणसाच्या, लोकसमूहाच्या विरोधात नसून माणसांच्या माणुसकीच्या बाजूने होते, प्रत्येक तहानलेल्याची तहान भागवणारे त्यांना पाण्याचा नैसर्गिक हक्क मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते अशी भूमिका कवी मांडतो.

आधुनिकीकरणाच्या नावाखाली आपण पाश्चात्तीकरणाच्या भांडवली जाळ्यात फसलो. एक माणूस म्हणजे एक समाज अशी परस्पर संवाद विघटन करणारी परिस्थिती आज निर्माण झाली. वस्तूंच्या मुबलकीकरणामुळे, चंगळवाद बळावल्यामुळे परस्पर संवादाची, समजुतीची बाजू नाकारणारी मूल्यव्यवस्था प्रस्थापित होत चाललीय. माणसामाणसातल्या संवादाच्या गरजेची, सोबतीची जागा आता वस्तूंनी आणि आभासी माध्यमांनी घेतलीय.

अशावेळेस सर्व अहंकार बाजूला सारुन माणसानं माणसासाठीच जगावं असं सांगत संवादाची बाजू भक्कम करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अजय कांडर यांना महत्वाचे वाटतात. ‘युगानयुगे तूच’ या दीर्घकवितेमधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातील महत्वाच्या परंतू काळाच्या ओघात आणि राजकीय हितसंबंधांच्या भाऊगर्दीत दुर्लक्षित ठेवण्यात आलेल्या पैलूंवर ही भाष्य करण्यात आलंय.

कृषी संस्कृतीत विद्रोही परंपरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीमुक्तीच्या संदर्भातील विचार इथं कवीच्या आजीच्या माध्यमातून येतात. आजीने गावाच्या विरोधात उभारलेला संघर्ष, आजचे दलित दीनदुबळे जमिनीचे मूळ मालक असल्याचं प्रतिपादन तसंच जमिनीत पहिलं बी पेरुन शेतीचा शोध लावणाऱ्या स्त्रीला आपल्या भूमीची संस्कृती संबोधणं या सगळ्यांमधून कवी इथल्या मूळ कृषीजनसंस्कृतीतील मानवताभावाचे अनुबंध प्रकट करतो.

स्वत:च्या मूळ पुरोगामी परंपरा शोधत कवी भूमीपुत्र गौतम बुद्धापर्यंत जातो. यातून कवीचं स्वत:च्या देशी विद्रोही परंपरेकडे जाणं दिसून येतं. इथं कवी परंपरेची उकल समतेच्या अंगानं करुन कृषी संस्कृतीतला भूमीनिष्ठ बंधूभाव जागृत करतो. आज शेतीव्यवसाय हा देशातील सर्वाधिक तोट्याचा व्यवसाय बनला आहे. अशावेळेस शेतकऱ्याला जीवदान देण्यासाठी योग्य धोरणं आखण्याऐवजी पक्क्या मालाच्या उत्पादकांना पूरक राहिल असं शेतीविषयक धोरण राबवलं जातंय.

मुळात शेती व्यवसायातून देशाचा विकास साधता येतो यावर आपल्या सत्ताधीशांचा विश्वास आहे असं आपल्या स्वातंत्र्यापासूनच्या सगळ्या पंचवार्षिक योजनांची आखणी आणि अंमलबजावणी पाहता वाटत नाही. स्वातंत्र्यापासूनच आपल्या नेतृत्वाला युरोपियन औद्योगिक विकासाच्या मॉडेलचं आकर्षण असल्याचं दिसतं. यामुळे खाजगी उद्योगातूनच देशाचा विकास होऊ शकतो अशी नियोजनकर्त्यांची सुरवातीपासूनची अंधश्रद्धा आहे. यामुळे भांडवलाचे केंद्रीकरण मुठभर कारखानदार घराण्यांकडे होत गेला. बहुसंख्य लोकसंख्या राबत असलेला शेतकी व्यवसाय बुडिताकडे गेला.

हेही वाचा: किती भाषा मारल्या याचीही यूएन मानवाधिकार संस्थेने नोंद करावीः भालचंद्र नेमाडे

बाबासाहेबांचा शेतीविषयक विचारही कवितेत

कवी अजय कांडर आपल्या कवितेत म्हणतात आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कृषिविषयक विचार स्वीकारले असते तर शेती आज ‘जळतं घर’ ठरली नसती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, शेती हे केवळ उत्पन्नाचे साधन नसून हा राष्ट्रीय उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. शेतीतून रोजगार निर्माण होतो त्यामुळे तो महत्वाचा उद्योग आहे. परंतु आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृषीविषयक अर्थविचाराकडे दुर्लक्ष केलं.

शेती शेतकऱ्याने कसायची आणि खोतकऱ्यांनी आयते खायचे याला बाबासाहेबांनी विरोध केला. ते खोत आणि सावकारांना आयत्या बिळावरचे नागोबा म्हणायचे. आजही शेतकऱ्यांचे शोषण करणारी शोषणव्यवस्था नष्ट झाली नसून फक्त तिचं स्वरुप बदललं आहे. मोठमोठाले भांडवलदार हे आजचे खोत, सावकार आहेत यांना इमानेइतबारे पोसण्याचं काम शेतीविरोधी सरकारी धोरणातून करण्यात येत आहे. 

‘युगानयुगे तूच’ या कवितेनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कृषीविषयक विचार पहिल्यांदाच मराठी कवितेत नोंदवला आहे. बाबासाहेबांचे कृषिविषयक अर्थविचार स्वीकारण्याच्या बाबतीत आपण जो करंटेपणा दाखवला त्यावर अजय कांडर नेमकेपणाने बोट ठेवतात. शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे कारण सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीच्या तुकडेकरणाला विरोध केला त्याचा उल्लेख करतात.

दीर्घकवितेच्या परंपरेतली महत्वाची कविता

सुरवातीला म्हटल्याप्रमाणे या कवितेतून समकाळाच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं पुनर्जागरण केलं आहे. कवितेच्या सुरवातीपासूनच आंबेडकरी विचार आणि आपलं आजचं वर्तन यातली तौलनिकतेच्या अंगानेच ही कविता पुढे  सरकत राहते. खोल तळ असणाऱ्या नदीसारखी संथ, संयमी भाषिक लय, सोप्या आणि नेमक्या प्रतिमांची निवड त्यांनी केलीय.

भोवतालच्या घटनांचे योग्य अर्थनिर्णयन करण्याची क्षमता, जड आणि वस्तुनिष्ठ वाटणाऱ्या घटनांना कवितीक रूप देण्याचं कसब, चरित्रवर्णनाच्या धोक्यापासून कवितेला परंतू ठाम स्वर या सगळ्या वैशिष्ट्यांसह ही कविता आपल्यासमोर येते.

अजय कांडर हे हत्ती इलो नंतर युगानयुगे तूच च्या माध्यमातून पुन्हा दीर्घकवितेकडे आले आहेत. येणाऱ्या काळात त्यांची तिसरी दीर्घकविताही कदाचित लवकरच आपल्याला पुस्तकरुपानं वाचायला मिळेल. कांडर यांनी पुन्हा पुन्हा दीर्घकवितेकडे येणं वैशिष्ट्यपूर्ण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिशादर्शक विचारसत्वाकडे नेणारी, माणसांविषयी अपार करुणा बाळगणं अजय कांडर यांची ‘युगानयुगे तूच’ ही मराठी दीर्घकवितेच्या परंपरेतली ही महत्वाची कविता आहे.

हेही वाचा: 

आपण इतके हिंसक का होतोय?

वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?

फुले दांपत्याचं काम फक्त स्त्री शिक्षणापुरतंच आहे?

यल्लमाच्या भाविकांची ओढाताण सरकारला दिसत नाही का?

युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता

(लेखक नव्या पिढीतील महत्त्वाचे कवी आहेत. )