३० वर्षांपूर्वी हरवलेल्या सुरेश कांबळेंना व्हॉट्सअपने शोधलं

२८ जून २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


आपण टीवी, न्यूजपेपरमधून हरवलेल्या लोकांविषयी वाचतो. कधी तर आपल्या घरातल्या किंवा आजूबाजूच्या लोकांनाही हरवताना पाहिलेलं असतं. पण लोक का हरवतात हे आपल्याला माहिती नसतं. कित्येक वर्ष लोक सापडत नाहीत. असेच सांगलीतले सुरेश कांबळे १९८९ ला हरवले आणि २०१९ ला सापडले. पण ते सापडल्यावर समजलं की त्यांचं नाव अब्दुल झालं होतं.

कोलकाता शहराला लागून असलेलं किड्डरपूर. तिथे अब्दुल १६ वर्षांपासून राहत होते. ते आता ६० वर्षांचे आहेत. आणि नेहल खान या त्यांच्या मित्राच्या किराणा मालाच्या दुकानात १५ वर्षांपासून काम करत होते. सर्वकाही व्यवस्थित सुरु होतं. पण अचानक एकेदिवशी त्यांना समजतं की ते अब्दुल नसून सुरेश गोविंद कांबळे आहेत.

कांबळेकाकांना काहीच आठवत नव्हतं

खरंतर कांबळेकाकांना स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार झालाय. त्यामुळे त्यांना स्मृतिभ्रंशही झाला. म्हणूनच ते किड्डरपूरला कसं आलं? का आले? याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हतं. १६ वर्षांपूर्वी ते किड्डरपूरात कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ बसून, कुराणातले अध्याय वाचताना लोकांना पहिल्यांदा दिसले होते.

नेहल खान रोज त्याच रस्त्यावरुन ये-जा करत असत. त्यावेळी त्यांना कांबळेकाका रस्त्यावर बसलेले दिसले. ते गप्प गप्प असायचे. मग एक दिवस खान यांनी कांबळेंना खायला दिलं. आणि त्यानंतर कांबळेकाका त्यांच्याशी बोलायला लागले. त्यांच्या बोलण्यातून त्यांना काहीच आठवत नसल्याचं समजलं. त्यांचं नाव काय? कुठून आले? काय काम करत होते? कुटुंब कोणतं? काहीच आठवत नव्हतं.

हेही वाचा: बातम्या कवर करतानाचा ताण पत्रकारांना आजारी पाडतोय

अब्दुल हे नावंही तेवढंच प्रिय

नेहल खान यांनी बेघर आणि मानसिक आजारांवर काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. आणि संस्थेमार्फत कांबळेकाकांवर उपचार सुरु झाले. तसंच त्यांच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी संस्थेने त्यांची माहिती आणि फोटो जागोजागी प्रसिद्ध केले. शेवटी १५ जून २०१९ ला कांबळेंच्या कुटुंबाचा शोध लागला.

कांबळेकाकांना आपलं कुटुंब भेटण्याआधी ते अब्दुल नावाने किड्डरपूरला राहात होते. आणि त्यांच्या सगळ्यात जवळच्या मित्राकडे काम करत होते आणि राहातही होते. मीडियाशी बोलताना कांबळेकाका म्हणाले, 'आज मला अब्दुल आणि सुरेश अशी दोन नावं आहेत. पण मी या दोन्ही नावांमधे आणि ओळखींमधे खुश आहे. मला काही आठवत नव्हतं तेव्हा किड्डरपूरच्या लोकांनी मला अब्दुल हे नाव दिलं. त्यांनी मला ओळख दिली. माझी काळजी घेतली. मला आपलसं केलं. त्यामुळे मला माझं अब्दुल हे नाव पुसून टाकावंसं वाटत नाही.'

हेही वाचा: धर्म कसला बघताय क्रिकेटपटूंची जिगर बघा

व्हॉट्सअपवरून सापडले

किड्डरपूरला कांबळेकाका काम करत असलेल्या दुकानात नुकतंच त्यांचं कुटुंब आलं. कांबळेकाकांना एवढ्या वर्षांनी सुखरुप बघून त्यांच्या डोळ्यात आंनदाश्रू आले. त्यावेळी कुटुंबीयांनी अर्धा तास गप्पा मारल्या. त्यातून असं समजलं की सुरेश कांबळे हे सांगली जिल्ह्यातले आहेत. तिथल्या हॉस्पिटलमधे ते लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होते. पण १९८९ ला त्यांची नोकरी सुटली. आणि याच गोष्टीचा त्यांनी धसका घेतला.

नोकरी गेल्याच्या दु:खात त्यांचं मानसिक संतुलन बिघडू लागलं. त्यात त्यांना स्मृतिभ्रंश झाला. आणि अचानक ते घरातून गायब झाले. कित्येक वर्ष त्यांचा सांगलीत शोधाशोध सुरु होता. एवढी वर्ष त्यांच्याशिवाय त्यांचा मुलगा मिथुन आणि मुलगी सुप्रियाने काम करून घर चालवलं. महत्त्वाचं म्हणजे कांबळेकाकांचा मुलगा मिथुन जूनच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेतून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा दाखला आणायला जाणार होता. पण त्याआधीच त्याला व्हॉट्सअप ग्रुपवरुन समजलं की त्याचे वडील कोलकात्यात आहेत.

हेही वाचा: शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?

३० वर्षांनंतर कुटुंब एकत्र

मिथुनचा आधी विश्वासच बसला नाही की आपले वडील कोलकात्यात असतील. पण त्याने त्यांची माहिती आणि फोटो व्यवस्थित बघितल्यावर आपले वडील असल्याचं कन्फर्म केलं. त्यावेळी मिथुनला आपले वडील सापडल्याचा सुखद धक्का बसला. मग त्याने संस्थेशी संपर्क केला. ओळख पटवली आणि शेवटी त्यांना सांगलीला त्यांच्या घरी घेऊन गेले.

१९८९ ला कांबळेकाका हरवले. पण २००३ मधे ते २ हजार किमीचं अंतर कापून किड्डरपूरला पोचले. एवढं अंतर कापून ते इथे कसे आले? त्यासाठी त्यांना कोणत्या परिस्थितून जावं लागलं? त्याआधी ते कुठे होते? या कोणत्याच गोष्टी आजही कांबळेकाकांना आठवत नाहीत. याविषयी त्यांचे मित्र खान यांनी द हिंदूशी बोलताना सांगितलं, माझा मित्र मला सोडून जातोय याचं मला दु:ख आहे. पण त्याला त्याचं कुटुंब भेटलं. त्याच्या भूतकाळातल्या गोष्टी समजल्या याचा मला मोठा आनंद आहे.

३० वर्षांनंतर कांबळेकाकांना त्यांचं कुटुंब भेटलं. कोलकात्यातल्या संस्थेच्या सचिव सरबनी दास रॉय मीडियाशी बोलताना म्हणाल्या की या प्रकरणामधे आपल्याला माणुसकीच दर्शन घडतं. रस्त्यावरच्या एका माणसाला आपलंस करून त्याला आपल्या कुटुंबातलं सदस्य बनवलं. त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता मदत केली.

शेवटी काय. तर जातीपाती, धर्मापेक्षा माणुसकी सगळ्यात मोठी आहे. कांबळेंना निरपेक्ष भावनेतून जवळ करणारा मित्र मिळाला. तो मिळाला नसता तर सुरेशचा अब्दुल झालेले कांबळेकाका आज त्यांच्या कुटुंबाला भेटू शकले नसते.

हेही वाचा: 

इस्लामविषयी साध्यासोप्या मराठीत ए टू झेड माहिती देणारं पुस्तक बाजारात

पाकिस्तानने महाराजा रणजित सिंहांचा पूर्णाकृती पुतळा का उभारला?

जी २० परिषद नेमकी काय आहे? आणि तिथे जाऊन मोदी काय करणार?

ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम