आदिवासी लेकींच्या हातात एसटीचं स्टेअरिंग

०६ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


वेगवेगळ्या क्षेत्रात महिला संधी मिळताच आपलं कर्तृत्व गाजवताहेत. आता काही दिवसांतच एसटीचं स्टेअरिंगही महिलांच्या हातात येणार आहे. एसटी महामंडळाने त्या दिशेने पाऊल टाकलंय. गाडीचं स्टेअरिंग हाती असलेली बाई हे शहरापुरतं मर्यादित असलेलं चित्र. पण एसटीमुळे गावखेड्यातही स्टेअरिंग सांभाळणारी बाई आपल्याला दिसणार आहे. या प्रयोगशील उपक्रमावर टाकलेला हा प्रकाश.

महाराष्ट्राच्या विधिमंडळातले काही सदस्य दोन वर्षांपूर्वी परदेशात अभ्यास दौऱ्यावर गेले होते. तिथे या सदस्यांच्या बसवर एक महिला ड्रायवर होती. मोठ्या सफाईदारपणे ती बस चालवत होती. परदेशात महिला बस चालवतात, मग महाराष्ट्रात हे का शक्य नाही? असा प्रश्न त्या दौऱ्यात सहभागी असलेले महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना पडला. त्यांनी हा प्रश्न परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे मांडला.

यवतमाळ जिल्ह्यातल्या मुलींना संधी

महाराष्ट्रातही महिलांना एसटी ड्रायवर म्हणून सेवेची संधी दिली पाहिजे. आपलं कुटुंब अत्यंत व्यवस्थितपणे चालवणारी महिला एसटीसुद्धा सुरक्षित आणि सुरळीत चालवतील, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. रावते यांनीही ही कल्पना उचलून धरली.

या सेवेसाठी आदिवासीबहुल यवतमाळ जिल्ह्यास प्राधान्य देण्यात आलं. अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातल्या किमान १०० मुलींना पहिल्या टप्प्यात राज्य परिवहन महामंडळात ड्रायवर म्हणून नोकरी देण्याची ग्वाही त्यांनी दिली. मग या मुली शोधण्याची जबाबदारी त्यांनी राठोड यांच्यावरच टाकली. राठोड यांनी अनुसूचित जमातीतल्या मुलींना एसटी ड्रायवर म्हणून काम करण्यासाठी तयार होण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत २५ मुली तयार झाल्या. 

वर्षभरापूर्वीच ड्रायविंगचं ट्रेनिंग

राठोड यांच्यातर्फे या मुलींना विविध ठिकाणी ड्रायविंगचं ट्रेनिंग लावून देण्यात आलं. त्यासाठी त्यांना गावावरून येण्या जाण्यासाठी प्रवासाची सोयही करून देण्यात आली. दोन जणींनी प्रशिक्षण अर्धवट सोडलं. २३ मुलींनी एक महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण केलं. त्यानंतर या सगळ्या जणींना ड्रायविंग लायसन काढून देण्यात आलं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून रावते यांनी २०१८ मधे या प्रकल्पाची घोषणा केली. २१ जानेवारी २०१८ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत एक कार्यक्रम झाला. त्यात यवतमाळ जिल्ह्यातल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील २३ मुलींना एसटी महामंडळात ड्रायवर म्हणून नियुक्ती देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.

तांत्रिक अडचणींचा अडथळा

एसटीत ड्रायवर म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी अवजड वाहन परवाना काढून कमीत कमी एक वर्षाचा काळ पूर्ण व्हावा लागतो. या मुलींनी ही पात्रता पूर्ण केली नव्हती. या तांत्रिक अडचणींमुळे त्यांचं मुख्य प्रशिक्षण रखडलं. विशेष बाब म्हणून या मुलींच्या प्रशिक्षणासाठी आदेश काढण्याची विनंती राठोड यांनी परिवहनमंत्र्यांकडे केली.

अखेर यासंदर्भात विशेष आदेश काढण्यात आला. या मुलींच्या ड्रायविंग अभ्यासपूर्व ट्रेनिंग सत्राला १ फेब्रुवारीपासून यवतमाळमधे सुरवात झालीय. आता १ एप्रिलपासून त्यांना थेट बस चालवण्याचं मुख्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तो दिवस ऐतिहासिक ठरणार

यासंदर्भात 'कोलाज'शी बोलताना संजय राठोड म्हणाले,  'विविध तांत्रिक अडचणी पार करीत निवड झालेल्या २१ विद्यार्थीनींचं ड्रायविंगपूर्व प्रशिक्षण सुरू झालंय. यासाठी घोषणा झाल्यानंतर वर्षभराचा काळ लागला. वेळोवेळी पाठपुरावा करावा लागला. आता लवकरच या भगिनींच्या हाती अधिकृतपणे एसटी बसचं स्टिअरिंग‍ येईल. तो दिवस महाराष्ट्रात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.'

निवड झालेल्या २३ पैकी २१ जणी ड्रायवर ट्रेनिंगमधे सहभागी झाल्या. त्यात सुवर्णा मेश्राम, मनीषा गाडेकर, हर्षा लडके, ज्योत्स्ना ठाकरे, रंजना शेळके, सुशीला वडेकर, पूजा नैताम, गायत्री होलगरे, अंजुता भोसले, सुवर्णा कुंभरे, पूजा टेकाम, शिल्पा तडाम, सुवर्णा नागमोते, शिल्पा पेंदोर, सीमा गवळी, अनुसया मडावी, महानंदा ठाकरे, शीतल पवार, नम्रता आगलावे, सपना कुरसंगे, राधा दाभेकर यांचा समावेश आहे.

न बघितलेलं स्वप्न हाती

या प्रशिक्षणाबद्दल बोलताना नेर तालुक्यातल्या मुकींदपूर इथली अंजुता भोसले म्हणाली, 'आम्ही मोलमजुरी करून जगणाऱ्या मुली. शाळा सुटली आणि लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. गेल्यावर्षी संजय राठोड यांच्याकडून या प्रशिक्षणाची माहिती मिळाली. त्यांनीच आम्हाला ड्रायविंग क्लास लावून दिला. लायसन्स काढून दिलं. मुंबईला घेऊन गेले. तिथेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आम्हाला बस ड्रायवर म्हणून नोकरी मिळणार असल्याची घोषणा झाली. तोपर्यंत आम्ही मुंबई कधी बघितली नव्हती.'

‘मधल्या एक वर्षाच्या काळात गावातच ट्रॅक्टर चालवून पैसे कमावले. माझ्या गावातल्या पाच मुलींना ट्रॅक्टर चालवायचं ट्रेनिंग दिलं. आता त्यांनीही ड्रायविंग लायसन काढलेत. त्यामुळे त्यांनाही आमच्यासारखी एसटी महामंडळात नोकरी लागेल, असं वाटतंय,’ अशा शब्दांत अंजुता यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.

या मुलींना आपण एक दिवस एसटी चालवू असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण म्हणतात ना,
सपने उन्ही के सच होते है,
जिनके सपनों मे जान होती है,
पंखो से कुछ नहीं होता,
हौसलों से उडाण होती है...
अशी बोलकी प्रतिक्रिया सुवर्णा नागमोते हिने दिली.
 

(लेखक यवतमाळ इथले अनुभवी पत्रकार आणि लेखक आहेत.)