नन्सचं कौतुक नाही केलं तरी चालेल निदान त्यांना छळू नका

०६ एप्रिल २०२१

वाचन वेळ : १२ मिनिटं


उत्तरप्रदेशात मागच्या आठवड्यात एक घटना घडली. दोन कॅथलिक नन्स ना रेल्वे प्रवासात तरुणांच्या टोळक्याने त्रास दिला. पोशाखातली विशिष्ट धार्मिक ओळख लपवायचा त्यांना सल्ला देण्यात आला. यात पोलिसही सहभागी झाले. त्यावरून ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक ए.जे. फिलिप यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. सध्या वायरल होत असलेल्या पत्राचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला हा अनुवाद.

दोन कॅथलिक नन्स दोन मुलींना घेऊन मागच्या आठवड्यात उत्तरप्रदेश ते ओरिसा असा रेल्वेप्रवास करत होत्या. नवशिक्या प्रशिक्षणार्थींना ओरिसातल्या त्यांच्या सोडायला म्हणून त्या निघाल्या होत्या. या प्रवासादरम्यान उत्तरप्रदेशमधल्या एका तरुणांच्या टोळक्याने त्यांना त्रास दिला. बळजबरीनं धर्मांतर करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. पोलिसही यात सहभागी होते.

ज्या राज्याचा मुख्यमंत्री विशिष्ट धार्मिक पोशाखात वावरतो त्या राज्याचे हे पोलिस होते. आपली विशिष्ट धार्मिक ओळख इतरांवर लादायचा प्रयत्न उजव्या संघटना सातत्याने करत असतात. ही ओळख अल्पसंख्याक समाजावर लादून त्यांना घाबरवणं हा त्यामागचा हेतू असतो. नन्सचा छळ हा त्याचाच भाग आहे. 

या प्रकरणावरून ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक ए.जे. फिलिप यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. द ट्रिब्यून, इंडियन एक्सप्रेस आणि हिंदुस्तान टाईम्समधे त्यांनी संपादकीय पदं भूषवलीत. ते इंडियन करंट्स, ओमान ट्रिब्यून आणि न्यू इंडियन एक्सप्रेससाठी लिहित असतात. ‘इंडियन करंट्स’ या साईटवर प्रकाशित झालेल्या त्यांच्या या पत्राचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला अनुवाद इथं देत आहोत. 

प्रिय अमित शहाजी,

आपण निश्चितच या देशातल्या अत्यंत कार्यमग्न व्यक्तींपैकी एक आहात. आता आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुद्दूचेरी आणि केरळात निवडणुका होत असताना तुमचा प्रत्येक मिनिट अत्यंत मोलाचं आहे. मनोज मेनन्स या पत्रकाराने तुमच्याबरोबर निवडणूक प्रचार दौऱ्यात सहभागी होऊन केलेलं वर्णन मी नुकतंच वाचलं. तुमच्या दौऱ्याची आखणी आणि अंमलबजावणी किती काटेकोरपणे केली जाते हे पाहून मी चकितच झालो.

दोन दिवसांपूर्वी मीही हरियाणातल्या झज्जर नावाच्या गावी जाऊन त्याच दिवशी राजधानीत परतलो. त्या प्रवासानंतर माझी किती दमणूक झाली याची जाणीव मला आहे. एका राज्यातल्या एका मतदारसंघातून लगेच दुसऱ्या राज्यातल्या दुसऱ्या मतदारसंघात असा सारखा प्रवास करताना तुम्ही स्वतःला इतके तंदुरुस्त कसे काय राखू शकता हे मला एक रहस्यच वाटतं.

प्रवासातून पळवून नेलं तर?

आता काही वेळ असं समजा की, एखाद्या जमावाने या प्रवासात तुम्हाला मधेच अडवलं आणि तुमचा प्रवास रोखून तुम्हाला जायचंय त्याऐवजी दुसऱ्याच ठिकाणी ते तुम्हाला बळजबरीने घेऊन गेले. सोप्या शब्दात सांगायचं तर समजा तुम्हाला कुणी पळवून नेलं.

प्रत्यक्ष तुमच्या प्रवासात अडथळे आणण्याची किंवा तुम्ही पळवलं जाण्याची नुसती साधी कल्पना मांडल्याबद्दलही माझे वाचक माझी टर उडवल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही या देशातल्या सर्वाधिक सुरक्षा मिळालेली व्यक्ती आहात. तुमच्या केसालाही धक्का पोचू नये यासाठी लाखो पोलीस नाही तर सगळी निमलष्करी आणि सशस्त्र दलं कायम सज्ज असतात. 

हो, देशातली अशी सर्वश्रेष्ठ सुरक्षा तर तुम्हाला नेहमी मिळायला हवी. पण या देशातले कायदे पाळणारी प्रत्येक व्यक्ती आणि तिची मालमत्ता सुरक्षित राखणं हे केंद्रीय गृहमंत्री या नात्याने तुमचं कर्तव्य आहे. तुमच्याप्रमाणेच या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आपापली महत्त्वाची कामं असतात, त्यांचं घाईगर्दीचं वेळापत्रक असतं.

हेही वाचा : सरकारला धडकी भरवणारं महुआ मोईत्रा यांचं वायरल भाषण

अन्यायात पोलिसांचाही सहभाग

या आठवड्यात दोन कॅथलिक नन्स ओरिसातल्या दोन मुलींना घेऊन एअर कंडिशन डब्यातून रेल्वेप्रवास करत होत्या. या नन्स आपल्या विशिष्ट धार्मिक पोशाखात होत्या. त्यांच्यासोबत असलेल्या मुली उमेदवार नन्स होत्या. त्यांचं प्रशिक्षण चालू होतं. 

एखाद्या मठाच्या, पंथाच्या किंवा धर्माच्या पठडीतल्या धार्मिक जीवनात पदार्पण करू देण्यापूर्वी उमेदवारांची नीट पारख व्हावी म्हणून प्रशिक्षण किंवा पूर्वतयारीचा काही एक कालावधी पार करावा लागतो. अशा दोन नवशिक्या प्रशिक्षणार्थींना ओरिसातल्या आपल्या घरी सोडायला त्या दोन नन्स निघाल्या होत्या.

दुर्दैवाने त्याच गाडीतून एका भगव्या संघटनेची टोळी प्रवास करत होती. गाडी झांसी स्टेशनवर येताच त्यांनी मोठाच दंगा माजवला. याच झांसीत राणी लक्ष्मीबाईंनी ब्रिटिशांविरुद्ध आपली तलवार चालवली होती. आपल्या स्वातंत्र्यलढ्यातली ती पहिली लढाई होती.

या युद्धात लढता लढता राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडली खरी पण ब्रिटिश सत्तेच्या अंगावर तिने केलेल्या जखमा पुढे कधीच बऱ्या झाल्या नाहीत. ब्रिटिशांना आपलं चंबूगबाळं आवरावं लागलं. १५ ऑगस्ट १९४७ ला लाल किल्ल्यावरचा युनियन जॅक उतरवला. तिथं आपला तिरंगा फडकवला जाईपर्यंत तिच्या लढ्याची आठवण ब्रिटिशांना सतत छळत राहिली.

या दोन घटनांमधे काही साम्य आहे असा दावा मी मुळीच करणार नाही. परवाच्या घटनेत त्या गुंडांनी सोबतच्या दोन्ही प्रशिक्षणार्थी मुलींचं बळजबरीने धर्मांतर करत असल्याचा आरोप त्या दोन नन्सवर केला. या घटनेचे वीडियो मी पाहिलेत. त्यात पोलिससुद्धा या नन्सच्या छळात सहभागी असलेले मला दिसले. या पोलिसांबरोबर  बळजबरीने त्यांना पोलिस स्टेशनवर नेण्यात आलं. तिथे कित्येक तास त्यांना प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावं लागलं.

धर्मवस्त्र घालायची नाहीत?

या दोन्ही प्रशिक्षणार्थी मुली ख्रिश्चन कुटुंबातल्या असून अगदी लहानपणीच त्यांचा बाप्तिझ्मा झालाय हे सिद्ध करणारी रीतसर कागदपत्रं धर्मपीठाकडून मिळाल्यावरच या चौघांना मुक्त करण्यात आलं. मात्र त्यांना सोडताना ओरिसात जाऊन दिल्लीत परतेपर्यंत त्यांचा विशिष्ट धार्मिक पोशाख न घालण्याचा सल्लाही या नन्सना देण्यात आला. 

तुम्ही काही ट्रेनने प्रवास करत नाही. त्यामुळे आपला प्रवास असा मधेच थांबवून पुन्हा सुरु करावा लागल्यामुळे या महिलांचे किती हाल झाले असतील याची कल्पना कदाचित तुम्हाला येणार नाही. आणि यातली विसंगती पहा. हा प्रसंग अशा राज्यात घडला जिथला मुख्यमंत्री सदैव आपला धार्मिक पोशाख घालूनच वावरतो!

आणि त्यांच्याच पोलिसांनी केवळ धार्मिक पोशाख घातल्यामुळेच या नन्सचा असा छळ केला. तो पोशाख नसता तर तुमच्या दक्ष तरुणांचे लक्ष त्यांच्याकडे गेलं नसतं. यापुढे सार्वजनिक ठिकाणी कॅथलिक नन्सनी आणि धर्मोपदेशकांनी आपला विशिष्ट झगा आणि इतर धर्मवस्त्रं घालायचीच नाहीत असा अर्थ यातून घ्यावा का?

हेही वाचा : सरकारी पदांवरच्या लॅटरल एण्ट्रीमुळे आरक्षणाची मूळ संकल्पना धोक्यात?

जैन मुनींना कपडे घालायला सांगू?

भारतीयांना देशात कुठंही प्रवास करण्याचं, कोणताही पोशाख घालण्याचं इतकंच काय आपल्या धर्माचा मार्ग इतरांना सांगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, याचं भान गृहमंत्री या नात्याने आपल्याला आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आपण इतके उदारमतवादी आहोत की दिगंबर जैन मुनींना तर निर्वस्त्र अवस्थेत प्रवास करण्याची आपण मुभा देतो. तुम्ही स्वतः जैनधर्मीय आहात. एखाद्या जैन मुनीला आपले गुप्तांग सक्तीने झाकायला लावलं तर तुम्हाला कसं वाटेल? 

असं काही या देशात घडू शकेल असा विचारही माझ्या मनात येऊ शकत नाही. हरियाणात तुमचा पक्ष सत्तेवर आल्या आल्या अशा एका मुनींना विधानसभेत पाचारण करुन सगळ्या आमदारांसमोर त्यांचं प्रवचन घेण्यात आलं. कपडे न घातलेल्या व्यक्तीने भर विधिमंडळात भाषण दिल्याची जगभरातली बहुतेक ही पहिलीच घटना असावी.

देशाची सुव्यवस्था कुठंय?

के. जे. अल्फान्स या तुमच्या विद्यमान राज्यसभा खासदारांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी तुम्हा आला होतात तेव्हा या नन्सवर झालेल्या अन्यायाविरुद्ध कारवाईची मागणी करणारं निवेदन ते अतिशय नम्रपणे आपल्याला देत आहेत असा एक वीडियो मी पाहिला. नन्सवरच्या हल्ल्यात सहभागी असलेल्या उपद्रवी लोकांवर कारवाई करा अशी विनंती एका भाजप खासदाराला देशाच्या गृहमंत्र्याकडे करावी लागावी या थराला या देशाची सुव्यवस्था आली आहे का?

अल्फान्स यांनी आपल्याला दिलेलं निवेदन म्हणजे त्यांचा उत्तर प्रदेश पोलिसांवर विश्वास नाही याचा पुरावाच नाही का? कुणीही कायदा हातात घेतला तर त्याला अटक करुन देशाच्या कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांकडे असतात. दिल्लीत डीडीएच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणाऱ्या या खासदारांना तर याची जाणीव नक्कीच आहे.

हेही वाचा : धर्मांतराच्या ६२ वर्षांनंतर तरी आत्मटीकेचा प्रवाह वाढायला हवा

पोलिसांकडूनच कायद्याच्या राज्याला धोका

दुर्दैवाची गोष्ट अशी की, झांसीत पोलीस तुमच्या तरुण पक्षकार्यकर्त्यांच्या तालावर नाचताना दिसले. हिंदू धर्मरक्षक असल्याचा दावा करणाऱ्या त्या धर्मांध तरुणांपेक्षा या पोलिसांकडूनच कायद्याच्या राज्याला अधिक धोका आहे. तुमच्यात हिंमत असेल तर गुन्हेगारांविरुद्ध लढण्याची आपली जबाबदारी टाळून या नन्सचा छळ केल्याबद्दल या पोलिसांना जबर शिक्षा व्हावी अशी खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे.

उलट धर्मपरिवर्तनविरोधी कायदा, लव जिहाद कायदा यासारखे कुख्यात कायदे लागू करुन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि तुमच्या पक्षाने त्या निरपराध नन्सप्रमाणेच मनात येईल त्या कुणाचाही छळ करण्याचं हत्यारच या पोलिसांच्या हाती दिलंय.

मंदिरात पाणी पिणाऱ्या मुलालाही मारहाण

एका मित्राने नुकताच मला एक वीडियो पाठवलाय. त्यात गुंडांचा एक जमाव बिचाऱ्या एकट्या ख्रिश्चन धर्मोपदेशकावर हल्ला चढवत असल्याचं दिसतं. त्याला क्रूरपणे मारहाण केलेली दिसते. पोटाखाली मांड्यांच्यामधे बसलेल्या लाथा सहन न होऊन तो खाली पडला तर त्या गुंडातला एक जण लांबून पळत येऊन त्याच्या छातीवर उड्या मारताना मला दिसला.

त्याला तसंच विव्हळत सोडून ते सगळे निघून गेले. नक्कीच त्याच्या बरगड्या मोडून यकृत किंवा फुफ्फुसासारख्या शरीराच्या महत्त्वाच्या भागात घुसल्या असणार. ते पाहून मला रडू आलं. नाही, तो ख्रिश्चन धर्मोपदेशक होता म्हणून नाही मी रडलो. एका मुसलमान मुलाला केवळ पाणी पिण्यासाठी मंदिरात शिरला म्हणून अमानुष मारहाण करण्यात आली तेव्हाही माझ्या भावना काही वेगळ्या नव्हत्या.

देवळातल्या विहिरीतलं किंवा नळाचं पाणी पिऊन एखाद्या गरीब मुसलमान मुलाने आपली तहान भागवली तर कोणता हिंदू देव नाराज झाला असता? त्या मारणाऱ्या राक्षसाला काही शिक्षा केलीत तुम्ही? लोकांना अचंबा वाटावा असे दौरे करण्यात नाही तर देशातल्या सगळ्यात दुर्बळ व्यक्तीलाही देशात सुरक्षित वाटावं अशी शाश्वती देण्यात गृहमंत्र्यांचं मोठेपण असतं. कुणालाही त्रास दिला जाऊ नये हे पाहणं त्याचं कर्तव्य असतं.

हेही वाचा :  आपले पूर्वज नॉनव्हेज खायचे, दारू प्यायचे का?

ख्रिश्चनांची भीती कशासाठी?

हो, तुम्ही झांसी प्रकरणात त्रास देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय याची मला जाणीव आहे. केरळात थोड्याफार जागा मिळायच्या तर काही करुन तुम्हाला ख्रिश्चन मतं मिळवण्याची गरज आहे. त्यामुळे या विशिष्ट घटनेत तुम्ही काही कारवाई करालही. पण आज देशातल्या अनेक गावात ख्रिश्चनांना आपला धर्म पाळण्याची, आपल्या ईश्वराची भक्ती करण्याची भीती वाटते ही वस्तुस्थिती आहे.

भीती हा शब्द मी वापरला. पण ख्रिश्चनांची भीती या देशात कोणाला बरी वाटेल? एकंदर लोकसंख्येच्या जेमतेम ३ टक्के लोकसंख्या आहे त्यांची. देशातला दुसरा कोणताच समूह त्यांच्यापेक्षा जास्त काटेकोर कायदेपालन करत नाही. शंका वाटली तर जनगणनेचे आकडे आपण पाहू शकता. आणि निव्वळ त्यांच्या भीतीपोटी एकापाठोपाठ एका राज्यात तुम्ही धर्मांतरविरोधी कायदे लागू करत आहात. योगींना ख्रिश्चनांची एवढी भीती का वाटते?

असभ्यतेचं टोक म्हणजे युपीचे मुख्यमंत्री

प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्यांच्याच तोंडून ऐकलेली एक गोष्ट मी आपल्याला सांगतो. योगी मुख्यमंत्री झाल्यानंतर थोड्याच दिवसांनी भारतीय वायुदलातल्या माजी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चन धर्मोपदेशकांचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेलं. या अधिकाऱ्यावर भगवे कपडे होते. तो एक ख्रिश्चन धर्मपंडित होता. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अगदीच थंड स्वागत केलं.

संभाषणाची कोंडी फोडण्याच्या हेतूने शिष्टमंडळातला एकजण म्हणाला, 'शांती ही आजची खरी गरज आहे.' क्षणाचाही वेळ न लावता मुख्यमंत्री फटकन उत्तरले, 'ख्रिश्चनांना आणि मुसलमानांनाच तुम्ही हे शांती आणि सहजीवनाचे धडे द्यायला हवेत. आम्हा हिंदू लोकांची  तर ‘वसुधैव कुटुंबकम’ या विचारावर पूर्ण श्रद्धा आहे. बाकी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काय करायचे ते करा,  पण एका जरी व्यक्तीचं तुम्ही धर्मांतर घडवून आणलं तर मी तुमचा पाय मोडून ठेवेन.' असभ्यपणाचे हे टोक होतं. झांसीत जे घडले त्याला तुम्ही निर्माण केलेली हीच मनोवृत्ती जबाबदार आहे.

हेही वाचा : उत्तर प्रदेशचा लव जिहाद कायदा संविधान विरोधी का ठरतो?

बगदाद युद्धातला ख्रिश्चन मठ

नन्सना सगळीकडे अशीच वागणूक सोसावी लागते का? एकदा झारखंडात फिरताना मी तिथल्या नन्स रहात असलेल्या एका घरात गेलो. तिथली एक नन्स त्यावेळी नुकत्याच झालेल्या युद्धाने उद्ध्वस्त केलेल्या बगदादहून आली होती. सेंट तेरेसा यांच्या कोलकाता येथील प्रसिद्ध अशा मिशनरी ऑफ चॅरिटीच्या नन्सचा एक मठ बगदादमधे प्रत्यक्ष युद्धकाळात सेवेत असल्याचं मला माहीत नव्हतं.

त्या नन्सने मला तिथली परिस्थिती सांगितली. युद्धात आईवडील गमावलेल्या अगदी तान्ह्या मुलांचा सांभाळ करण्याचं काम तिथल्या नन्स करायच्या. इराकच्या सरकारकडे तीन वर्षाखालच्या मुलांचा सांभाळ करण्याची कोणतीच यंत्रणा नव्हती. अशी मुलं या नन्सच्या हाती सोपवली जायची. ती तीन वर्षांची होईपर्यंत या नन्स त्यांची सर्व प्रकारची काळजी घ्यायच्या. तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते मूल सरकारी हॉस्टेलमधे पाठवायचं.

सरकारी मदत? ती त्यांना बिलकुल मिळायची नाही. सामान्य इराकी नागरिक मात्र या त्यांच्या केंद्रात यायचे. तेच त्यांना कपडे, अन्न, स्वच्छतेचं साहित्य वगैरे पुरवत. दर शुक्रवारी हे सगळं घेऊन खूप लोक या केंद्रात यायचे. या नन्सना कोणतीही गोष्ट विकत आणायला लागायची नाही. लोकच त्यांना हव्या असलेल्या सगळ्या वस्तू पुरवत. मुख्य म्हणजे या नन्स इतर धर्माचं पालन आणि प्रचार करत असल्या तरी बगदादचे हे लोक त्यांना अतिशय सन्मानाची वागणूक द्यायचे. त्यांच्याबद्दल आदर बाळगायचे.

नन्स कोणती कामं करतात?

पण आता वेगाने हिंदुराष्ट्र व्हायला निघालेल्या निधर्मी भारतात मात्र नन्सना जीव वाचवण्यासाठी आपली ओळख लपवायचा सल्ला दिला जातोय. कोणत्या प्रकारची सेवा या नन्स करतात हे पाहण्यासाठी काही वेळ काढणं शक्य असेल तर उत्तर प्रदेशातच बिजनोर इथल्या कॅथलिक हॉस्टेलला तुम्ही एकदा नक्की भेट द्या, असं मी सुचवेन.

प्रचंड शारीरिक व्यंग घेऊन जन्माला आल्यामुळे आईवडलांनी टाकलेल्या मुलांचा सांभाळ तिथल्या नन्स करतात. या मुलांपैकी बहुतेक मुलं फार काळ जगण्याची मुळीच शक्यता नसते. तरीही देवाचं बोलावणं येण्यापूर्वी त्यांना योग्यरित्या जगता यावं अशी सगळी काळजी इथं घेतली जाते.

सांगायला सोपं आहे पण अशा मुलांची काळजी घेणं हे महाकठीण काम असतं. आपल्या हाताखाली लाखो पोलीस आहेत. पण त्या सगळ्यांना मिळून या मुलांची देखभाल एक दिवसही करता येणार नाही. आयुष्यभराची गोष्ट सोडूनच द्या.

हेही वाचा : धम्मदीक्षा समारंभात मध्यरात्री कूठून आणली बुद्धमूर्ती?

दुर्गम भागातल्या नन्सच्या सेवा

एकदा मी बेंगळुरू इथल्या सेंट जॉन्स मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांना जाऊन भेटलो. ही एक कॅथलिक संस्था आहे. इथल्या काही जागा केवळ नन्ससाठी राखीव आहेत. नन्ससाठी. पुरुष धर्मगुरूंसाठी नाहीत. मी प्राचार्यांना विचारलं, 'अशा रीतीने केवळ नन्ससाठी जागा राखीव ठेवणं योग्य आहे का?'

यावर प्राचार्यांनी मला भिंतीवरचा नकाशा दाखवला. त्या नकाशावर ठिकठिकाणी काही खुणा केलेल्या होत्या. या कॉलेजमधून एमबीबीएस केलेल्या नन्स कुठे कुठे सेवा देत आहेत हे दाखवणाऱ्या खुणा होत्या त्या. दुसऱ्या कुठल्याच डॉक्टरला जावंसं वाटणार नाही अशा दुर्गम गावात या नन्स आपली वैद्यकीय सेवा पुरवत होत्या. 

आता तुम्ही केंद्रशासित केलेल्या काश्मीरला यापुढे जाल तेव्हा कृपा करुन बारामुल्ला इथल्या कॅथलिक हॉस्पिटलला जरुर भेट द्या. दहाएक वर्षांपूर्वी मी तिथं गेलो असताना तिथल्या स्रीरुग्ण विभागात खूप गर्दी असलेली मला दिसली. एक नन या विभागाची प्रमुख आहे. या ठिकाणी आजवर हजारो डिलीवरी तिने केल्यात. तिथल्या स्थानिक लोकांना ती आपली आईच वाटते.

मुलांमधे दिसतो तान्हा येशू

नन म्हणजे गरजवंताची गरज भागवण्यात, भुकेल्यांना घास भरवण्यात, जखमी लोकांवर उपचार करण्यात आणि उभं राहण्यासाठी आधाराची गरज असलेल्यांना आधार देण्यातच आत्मिक समाधान आणि शांती लाभते अशी व्यक्ती. अंथरुणावरुन उठू न शकणाऱ्या जवळपास दीडशे मुलांची सगळी स्वच्छता करण्याचे वरवर पाहता अतिशय गलिच्छ वाटणारं काम तू करु तरी कशी शकतेस असा प्रश्न मी बिजनोर इथल्या एका नन्सला विचारला.

ती म्हणाली, केवळ पैशासाठी करायचं असतं तर तिलाही ते काम जमलं नसतं. पण त्या प्रत्येक मुलात तिला दोन हजार वर्षांपूर्वी जगात आलेले गवताच्या ढिगातलं ते तान्हं बाळ दिसायचं. आणि म्हणून ती त्या प्रत्येक मुलाला रोजच्या रोज स्वच्छ आणि लोभस बनवू शकायची. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अशी सेवा म्हणजे धर्मांतराचा कावा वाटेल.

तुम्हालाही तसंच वाटत असेल तर तुम्ही सपशेल चुकत आहात. या नन्स म्हणजे देशाला लाभलेलं देवाचं दान आहे असं तुम्ही मानलं पाहिजे. संख्येने लाखभर असतील त्या पण शिक्षक, नर्स, डॉक्टर, समाजकार्यकर्त्या इतकंच काय वकीलसुद्धा बनून त्या कोट्यवधी लोकांची सेवा करत आहेत. त्यांची ही सेवा गाजावाजा न करता शांतपणे सुरू असते. 

या सेवेचं कौतुक करण्याएवढी दानत तुमच्याजवळ आणि तुमच्या पक्षाजवळ नसेल तर निदान प्रवासात त्यांना छळू तरी नका. आपल्या सेवेचं जाहीर कौतुक व्हावं अशी इच्छा त्या कधीच बाळगत नाहीत. पण निदान प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या राज्यघटनेने बहाल केलेलं स्वातंत्र्य तरी त्यांना उपभोगू द्या. किमान एवढं तरी तुम्ही करावं. कौरवांच्या दरबारात द्रौपदीचं वस्त्र हिरावून घेतलं गेलं त्यावेळी झाला तसा देवाचा कोप आपल्यावर होऊ नये म्हणून तरी तुम्ही एवढं करायला हवं.

हेही वाचा : 

आम्ही हिंदूही आणि मुसलमानही!

धर्मांतरः टोटल पोलिटिकल अॅक्शन

इश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १